बीबर आला वेशीपाशी! (वुई द सोशल)

We the social coloum by Shrimant Mane
We the social coloum by Shrimant Mane

कोवळ्या वयातल्या प्रेमाचं गाणं ‘‘बेबी, बेबी, बेबी, उहाहा...’, गात थिरकरणारा, लाखोंना थिरकायला लावणारा कॅनेडियन पॉपस्टार जस्टीन बीबर भारतात येतोय. परवा, बुधवारी, १० मे रोजी नव्या मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्याचा शो होताेय. परिणामी, सोशल मीडियावर बीबर आहेच. पण मुख्य प्रवाहातली माध्यमंही त्याचीच चर्चा करतायत. पंधरा ते वीस किंवा फार तर पंचवीस वर्षांचा वयोगट जस्टीन बीबरसाठी अगदी वेडा आहे. थोड्या मोठ्या वयाच्या, म्हणजे तरुण पालकांच्या वर्गाला हे पाहून वीस वर्षांपूर्वीचा मायकल जॅक्‍सनचा मुंबईतला शो आठवत असेल. राज ठाकरेंनी मायकल जॅक्‍सनला मुंबईत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता अन्‌ आता जसं बीबरचं तसंच तेव्हा जॅक्‍सनचं खाणपिणं, राहणं, वागणं, बोलणं अन्‌ महत्त्वाचं म्हणजे गाणं हा चर्चेचा विषय होता. अगदी हॉटेलातल्या उशीवर त्यानं लिहिलेलं काहीतरी बातम्यांचा विषय होता. अर्थात, हे बीबरला व त्याच्या पौगंडवयीन चाहत्यांना माहिती असायचंही कारण नाही. मुळात मायकल मुंबईत आला तेव्हा बीबर दोनेक वर्षांचं बाळ होतं. १९९४ चा जन्म आहे त्याचा.

गेल्या आठवड्यात बीबरचा बोलबाला झाला तो त्यानं मुंबईतल्या ‘शो’साठी दिलेल्या सामानाच्या यादीमुळं. अधिकृतपणे कोणी ती यादी नाकारली नाही; पण तिच्या बातम्याही झाल्या अन्‌ सोशल मीडिया त्यावर तुटूनही पडला. बीबर एकटा येत नाहीए. अर्थातच मोठा लवाजमा सोबत असणार. त्याला राहण्यासाठी म्हणे फाइव्ह स्टार हॉटेलात तेरा खोल्या हव्यात. सुरक्षेच्या कारणास्तव एक नव्हे तर दोन फाइव्ह स्टार हॉटेल हवीत. दहा लक्‍झरी सेडान कार, दोन व्हाेल्वो बसेस अन्‌ सोफासेट, प्ले-स्टेशन, वॉशिंग मशिन, टेबल टेनिसचे टेबल वगैरे सामानासाठी दहा कंटेनर हवेत. प्रवासासाठी खासगी जेट विमान पाहिजे व डी. वाय. पाटील स्टेडियमवर ते हेलिकॉप्टरने उतरणार. ही झाली बाकी व्यवस्था. हॉटेलात खोलीची खास सजावट हवीय. अख्खं वातावरण जांभळ्या रंगाचं पाहिजे. पण लिलीची फुलं अजिबात कुठं नकोत. दरवाजा व खिडक्‍यांना शुभ्र पडदे व काचेच्या दरवाजाचा पारदर्शक फ्रीज हवा. पाण्याच्या चोवीस बॉटल्स, चार एनर्जी ड्रिंक्‍स, सहा व्हिटॅमिन ड्रिंक्‍स हवीत. नारळपाणी, प्रोटिन पावडर, सेंद्रिय मध, केळी, हर्बल चहा, ताजी फळे अशी खाण्यापिण्याची मोठी यादी आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या स्वत:च्या आठ सुरक्षारक्षकांसह झेड प्लस सिक्‍युरिटी हवी.

जस्टीनची यादी पाहून कुणाला लग्नात वरपक्षाकडून होणाऱ्या मागण्या आठवल्या. एवढ्यात ‘तर शेजारच्या पाकिस्तानचा जीडीपी सुधारेल,’ असं एकानं म्हटलं. ‘कोण लागून गेला जस्टीन बीबर? कशासाठी आपण इतकं वेडं झालोत? त्याला चार वडापाव खाऊ घाला अन्‌ चप्पल उशाला घेऊन झोपायला सांगा’ अशा प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे ही टीका, तर दुसरीकडे तरुणाई त्याच्यावर तुफान फिदा आहे. बीबरची व्यसनं, बेफाम वेगानं गाडी चालवणं, त्यासाठी झालेली अटक वगैरे गोष्टींशी चाहत्यांना सोयरसूतक नाही. तिकिटांच्या किमती तोंडात बोट घालायला लावणाऱ्या असूनही किमान ४५ हजार लोक त्याच्या ‘शो’चा आनंद घेतील, असा अंदाज आहे. ‘बॉलिवूड’ही बीबरची चर्चा करतेय. सलमान खाननं त्याची सुरक्षाव्यवस्था बीबरला देऊ केलीय. रावडी गर्ल सोनाक्षी सिन्हा त्याच्यासोबत ‘परफॉर्म’ करणार असल्याची अफवा होती. सोनाक्षीनंच नंतर ते नाकारलं; पण कैलास खेर, अरमान मलिक, सोना महापात्रा वगैरेंना तिचा हेवा वाटला.

सौरव घोषला मराठी झटका
जस्टीन बीबरच्या स्वागताला सज्ज मुंबईनं अन्य एका कलाकाराला मात्र झटका दिलाय. सौरव घोष नावाच्या स्टॅंडअप कॉमेडियनला तसं फारसं कुणी ओळखत नाही. पण त्याच्या एका व्हिडिओने वादंग माजलं. मुंबईच्या विमानतळाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर त्यानं त्यात विनोद केले होते. मराठी माणूस शिवरायांवरील विनोद सहन करणारा नसल्यानं काहींनी त्यावर आक्षेप घेतला. तेव्हा, अत्यंत उद्धटपणे त्यानं पुन्हा मल्लिनाथी केली, वाद घातला. एकदा नव्हे हजारदा शिवाजी महाराजांवर विनोद करीन अशी भाषा वापरली. प्रकरण पेटलं. त्याचा पुणे-मुंबईतला कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला. मामला अंगाशी येत असल्याचं पाहून आधी उद्धट वागणारा घोष मग ताळ्यावर आला. फेसबुकवर शिवप्रेमींची माफी मागितली. एवढंच नव्हे तर मुंबईतले सगळे शो रद्द करून कोलकत्याला रवाना झाला.

(shrimant.mane@esakal.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com