नव्या वर्षाचं ओंगळवाणं स्वागत (वुई द सोशल)

श्रीमंत माने (shrimant.mane@esakal.com)
सोमवार, 9 जानेवारी 2017

विविध क्षेत्रांत कर्तबगारीचा ठसा उमटविण्यासाठी उंबरठा ओलांडलेल्या स्त्रियांची प्रतिष्ठा, आत्मसन्मान वगैरे सगळ्या चर्चा जणू वांझोट्या ठरल्या आहेत. भौतिकदृष्ट्या आपला समाज कितीही विकसित वगैरे होत असला, तरी त्याचे महिलांविषयक विचार मध्ययुगीन बुरसटलेलेच आहेत जणू. पाहा ना, नव्या वर्षाचं स्वागत करताना पुरुषांनी महिलांना बरोबरीची वागणूक देण्याचा, त्यांना सन्मानाचा संकल्प सोडलाच नाही. बंगळुरूपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे नव्या वर्षाचे पहिले क्षण मुलींसाठी संतापजनकच ठरले.

विविध क्षेत्रांत कर्तबगारीचा ठसा उमटविण्यासाठी उंबरठा ओलांडलेल्या स्त्रियांची प्रतिष्ठा, आत्मसन्मान वगैरे सगळ्या चर्चा जणू वांझोट्या ठरल्या आहेत. भौतिकदृष्ट्या आपला समाज कितीही विकसित वगैरे होत असला, तरी त्याचे महिलांविषयक विचार मध्ययुगीन बुरसटलेलेच आहेत जणू. पाहा ना, नव्या वर्षाचं स्वागत करताना पुरुषांनी महिलांना बरोबरीची वागणूक देण्याचा, त्यांना सन्मानाचा संकल्प सोडलाच नाही. बंगळुरूपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे नव्या वर्षाचे पहिले क्षण मुलींसाठी संतापजनकच ठरले. नववर्ष स्वागताचा धागडधिंगा जणू अवतीभोवतीच्या "मादीं'ना कवटाळण्यासाठीच होता की काय, असं वाटण्यासारखी दृश्‍यं "आयटी हब' बंगळुरूमधून जगासमोर आली. तिथूनच पुन्हा घराकडं परतणाऱ्या आणखी एकीला तशाच वासनांधांनी एकटी पाहून छळल्याचं "सीसीटीव्ही फुटेज' आलं. दिल्लीतही असंच घडलं. हे सारं बीभत्स, ओंगळवाणं अन्‌ समाजातल्या प्रत्येकाला मान शरमेनं खाली घालायला लावणारं आहे. पुरुष असे पार श्‍वापदांच्या पातळीवर गेल्यानंतरही अबू आझमी नावाचा पुढारी महिलांच्या तोकड्या कपड्यांवर बोलतो, साखरेची उपमा देतो. "साखर टाकली की मुंग्या येणारच' असा महिलांनाच दोष देतो. गेला आठवडाभर सगळा "सोशल मीडिया' या घटनांवरच्या प्रतिक्रियांनी व्यापून गेलाय. राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, मुख्य प्रवाहातली माध्यमं त्या श्‍वापदांवर तुटून पडलीत. 

दरम्यान, दिल्लीतल्या एका नमुन्यानं हद्द केली. "प्रांक' म्हणजे गंमत नावाच्या प्रकाराची "सोशल मीडिया'वर नेहमीच धूम असते. तसे अनेक व्हिडिओ फिरत असतात. पूर्वी टीव्हीवर "बकरा' असायचा तसा हा प्रकार; मनोरंजनासाठी गाफील ठेवून माणसांची थोडीशी गंमत करणारा! पण, दिल्लीतल्या सुमित नावाच्या दिवट्याला थेट रस्त्यावरच्या अनोळखी मुलींचे चुंबन घेण्याची गंमत करावीशी वाटली. त्याचा "व्हिडिओ' तयार केला व "यू ट्यूब'वर टाकला. या आधी अशा वेगवेगळ्या गमतींचे काही व्हिडिओ "क्रेझी सुमित' नावाने त्याने "लोड' केले आहेत. अनेक जण तसं करतात. पण, नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं हा चुंबनाचा फालतू प्रकार केला. तो व्हिडिओ "व्हायरल' होताच पोलिसांचे डोळे उघडले. चौकशीचा फेरा सुरू होताच पठ्ठ्या घाबरला. मुलींची, तमाम स्त्रियांची माफी मागितली. "यू ट्यूब'नेही ते व्हिडिओ काढून टाकले. पण, एवढ्यानं प्रश्‍न सुटणारा नाही. असली गंमत करावीशी वाटणं हेच गंभीर आहे. स्त्रियांकडं पाहण्याच्या पुरुषी मानसिकतेचं ढळढळीत दर्शन घडवणारं हे उदाहरण आहे. 

"तो' सध्या काय करतो? 
महाराष्ट्रातला "सोशल मीडिया' आजकाल खूपच हळवा बनलाय. "ती सध्या काय करते?' सिनेमामुळं प्रत्येक जण "नोस्टाल्जिक' अवस्थेत आहे. लहानपणीचे मित्र-मैत्रिणी आठवायला लागल्यात. फोनाफोनी सुरू आहे. फेसबुक, व्हॉटस्‌ऍप अन्‌ ट्‌विटरवरही "ती सध्या काय करते?' याचा जणू महाजागर सुरू आहे. काही जण धीरगंभीर, काही नर्मविनोदी, आणखी कसल्या कसल्या विचारणा करणाऱ्या "पोस्ट' टाकतायत. 

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा काहींनी या "ट्रेंड'लाही जोडला - ""ती सध्या काय करते, तर ती अजून वासनांधांच्या वाईट नजरांमुळे खाली मान घालून जगते. ती आजही एकटी कुठे जायला घाबरते.'' काहींनी महिलांच्या प्रगतीचे पंख या निमित्ताने अधोरेखित केले- ""तिने माजघर व स्वयंपाकघर सोडले आहे. कर्तबगारीचे पंख लावून ती सध्या अथांग आकाशाचे मोजमाप घेत आहे. ब्रह्मांड कवेत घेण्याची ती सध्या तयारी करते आहे.'' अर्थात, आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला राजकारणाचा तडका बसणार नाही, असं शक्‍यच नाही. परिणामी, नाशिकमध्ये वनौषधी उद्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं शस्त्रास्त्र संग्रहालयाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने सक्रिय झालेल्या राज ठाकरेंची अनेकांना आठवण झाली, ती अशी- ""राज ठाकरे यांच्यावर नवीन चित्रपट येतोय..... तो सध्या काय करतो?'' काहींना राज्यातले सत्ताधारी शिवसेना-भारतीय जनता पक्षातल्या परस्परसंबंधांवर चिमटे काढले. 

मित्र : ती सध्या काय करते? 
मी : ती सध्या आपल्या जोडीदाराबरोबर संसार थाटूनही सतत भांडत असते. तरीसुद्धा काडीमोड घेत नाही. 
मित्र : मी बहुतेक ओळखतो तिला. तिचं नाव? 
मी : शिवसेना. 
 

Web Title: Welcome to the new year very Bad