सामूहिक शहाणपणाला आवाहन (अग्रलेख)

whatsapp fake message claimed five people in dhule
whatsapp fake message claimed five people in dhule

हिरोशिमा, नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बचा जन्मदाता ज्युलिअस रॉबर्ट ओपनहेमर आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकी व चिंताग्रस्त होता. त्याला त्याचे वैज्ञानिक पाऊल मानवी विनाशाला कारणीभूत तर होणार नाही ना, ही चिंता सतावत होती. ही आठवण यासाठी की ओपनहेमरच्या मृत्यूनंतर अर्ध्या शतकानंतर सोशल मीडिया नावाच्या तंत्रज्ञानाने काहीसा तसाच पेच जगापुढे उभा केला आहे. नवे तंत्रज्ञान, नवे माध्यम संपूर्ण टाळायचे की त्याचा तारतम्याने वापर करायचा, हा तो पेच आहे. ओपनहेमरची भीती तशी अनाठायी ठरली. आण्विक शक्‍तीने मानवी जीवन अधिक सशक्‍त व सुखकर बनविले.

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियामुळे कधी गोहत्येच्या, मुले पळविण्याच्या किंवा महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याच्या अफवा वणव्यासारख्या पसरल्या. कधी बेभान झालेल्या झुंडींनी, तर कधी हजारोंच्या हिंसक जमावाने निरपराध्यांना ठेचून मारले. देशभरात अशा घटनांमध्ये तीसहून अधिक व एकट्या महाराष्ट्रात त्यापैकी दहा बळी गेल्यानंतर सरकारी पातळीवर या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने त्यासाठी सोशल मीडिया चालविणाऱ्या कंपन्यांना, विशेषत: अलीकडच्या अफवांचे माध्यम ठरलेल्या "फेसबुक'च्या मालकीच्या "व्हॉट्‌सऍप'ला पत्र लिहून उपाय योजण्यास सुचविले. त्याला लगेच प्रतिसादही मिळाला आहे. सरकार, समाज व तंत्रज्ञ मिळून ही समस्या सोडविली जाऊ शकते, असा विश्‍वास त्या प्रतिसादातून समोर आला आहे. जगभर दीड अब्जाहून अधिक लोक नियमितपणे "व्हॉट्‌सऍप' वापरतात. त्यात वीस कोटींहून अधिक भारतीय आहेत. "ट्विटर' व "फेसबुक'वर चुकीचे "ट्विट' किंवा "पोस्ट' रिपोर्ट करता येतात. त्याची दखल घेऊन बऱ्याच वेळा संबंधितांचे अकाउंट किंवा हॅंडल बंद केले जाते. "व्हॉट्‌सऍप'बाबत मात्र बऱ्याच मर्यादा आहेत. म्हणूनच अफवा पसरण्यात "व्हॉट्‌सऍप'चा वाटा मोठा आहे.

वरवर दिसते तशी ही समस्या केवळ चुकीची माहिती, "फेक न्यूज' किंवा अफवांपुरती मर्यादित नाही. सर्वसामान्यांचे अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यही त्याच्याशी निगडित आहे. परिणामी, सरकारकडून समाज माध्यमांवर निर्बंध आणले, तर ते पूर्णपणे स्वीकारले जाणार नाहीत. केवळ तंत्रही त्यात खूप काही करू शकेल, असे नाही आणि या दोन्ही घटकांनी कितीही प्रयत्न केले तरी समाज, ही माध्यमे वापरणारी माणसे चिकित्सक होत नाहीत, खात्री नसलेली माहिती इतरांना पाठविण्याबाबत जागरूक राहणार नाहीत, तोपर्यंत काहीही होणार नाही. थोडक्‍यात, जमावाच्या व झुंडींच्या मूर्खपणाची ही चर्चा सुरू असताना अधोरेखित होते ते सामूहिक शहाणपण.

इंटरनेट व सोशल मीडियाचा गैरवापर हा प्रश्‍न खरेतर जागतिक आहे. त्यातून घडणाऱ्या अनुचित घटनांमागे एखादे पद्धतशीर षड्‌यंत्र असण्याचीही शक्‍यता असतेच. कारण, अलीकडे युद्धाचे किंवा संघर्षाचे स्वरूप बदलले आहे. परस्परांविरूद्ध उभे ठाकलेले घटक किंवा देशही प्रतिस्पर्ध्यांची सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतात. बनावट नोटा किंवा अमली पदार्थांचा व्यापार त्यातूनच फोफावतो. समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी अफवांचा आधार व त्यातून हिंसाचार, व्यापक सामाजिक अस्थैर्य असे काहीही यात असू शकते. सोशल मीडियाचाच वापर करून रशियातल्या हॅकर्सनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर कसा प्रभाव टाकला, त्यामागे काही षड्‌यंत्र होते काय, वगैरेची चौकशी तिकडे सुरू आहे. अन्य काही देशांमध्येही अशी उदाहरणे आहेत. "गुगल'पासून "ट्‌विटर' व "व्हॉट्‌सऍप'सारखी पश्‍चिमेकडून आलेली नवमाध्यमे अजिबात न वापरणाऱ्या व त्या सगळ्यांना स्वत:चे पर्याय उभ्या केलेला चीनदेखील अफवांना अपवाद नाही.

तथापि, प्रत्येक समस्येचे, प्रश्‍नाचे उत्तर तंत्रज्ञानातच आहे, हा विश्‍वास मनात असला की मार्ग प्रशस्त होतात. मानवी जीवन अधिक सुखकर बनविणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक आविष्काराला, संशोधनाला दोन बाजू असतातच. नवे तंत्र, नवे संशोधन माणूस वापरतो कसे, यावर त्या संदर्भातला दृष्टिकोन ठरतो. नवमाध्यमाने जगातल्या सर्वसामान्यांना अभिव्यक्‍त होण्याची संधी दिली. त्यांची सुख-दु:खे, व्यथावेदना, आनंद, एकूणच भावविश्‍वाला वैश्‍विक परिमाण लाभले. वाचक किंवा दर्शकांपुढे नेमके काय ठेवायचे, या अधिकारातून तयार झालेले मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधील अडथळे सोशल मीडियामुळे दूर झाले. माणसे जवळ आली. त्याची दखल पुन्हा मेनस्ट्रीम मीडियाला घ्यावी लागली, हे या नवमाध्यमाचे मोठे यश आहे. त्यामुळे अफवांना बळ मिळते म्हणून ही माध्यमेच नाकारणे हा करंटेपणा ठरतो. माणसाचा जीव अनमोल आहे, तेव्हा त्याला धोका निर्माण होईल, अशी प्रत्येक कृती टाळण्याचे, त्या दृष्टीने सोशल मीडिया वापरणाऱ्या सामूहिक शहाणपणाचा विस्तार हाच या समस्येवरचा उपाय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com