कौन बनेगा मुख्यमंत्री?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

उत्तर प्रदेशासारख्या देशातील सर्वांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यास भाजपला लागणाऱ्या विलंबामुळे निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. ही निवड करताना उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणांची पार्श्‍वभूमीही मोदी व शहा यांना लक्षात घ्यावी लागेल. 
 

उत्तर प्रदेशासारख्या देशातील सर्वांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यास भाजपला लागणाऱ्या विलंबामुळे निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. ही निवड करताना उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणांची पार्श्‍वभूमीही मोदी व शहा यांना लक्षात घ्यावी लागेल. 
 

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता जवळपास एक आठवडा होत आला आहे. या पाच राज्यांपैकी गोवा आणि मणिपूरमध्ये बहुमत मिळालेले नसतानाही सरकारे स्थापन करण्यात भारतीय जनता पक्षाच्या ‘कूटनीती’ला यश आले! मात्र, उत्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात दणदणीत म्हणजे तीनचतुर्थांशहून अधिक बहुमत मिळूनही तेथे मात्र अद्याप सरकार स्थापन होऊ न शकल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणूक रंगात आलेली असताना आणि भाजपला तेथे सत्ता स्थापन करता येईल की नाही, याबाबत शंका-कुशंकांचे पेव फुटलेले असतानाही, भाजपच्या छावणीत किमान अर्ध्या डझनाहून अधिक जण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे चित्र होते! त्यात मुरब्बी राजकारणी जसे होते, त्याचबरोबर विधिमंडळ कामकाजाचा अनुभव नसलेले नवशिकेही होते. मात्र, आता आठवडा उलटत आला, तरी तेथे सरकार अस्तित्वात येऊ न शकल्यामुळे भाजपला मुख्यमंत्र्यांची निवड करणे दिवस उलटत आहे, तस तसे अधिकाधिक कठीण होत चालले आहे काय, असा प्रश्‍न उत्तर प्रदेश भाजप विधिमंडळ पक्षाची गुरुवारी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याने उभा राहिला आहे! मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या ज्या काही उमेदवारांची नावे निकालापूर्वी चर्चेत होती, त्यात अर्थातच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे नाव आघाडीवर असणे स्वाभाविक होते. राजनाथसिंह यांनी प्रचाराचा धडाका लावून दिल्यामुळे त्यांच्या मनात हे स्वप्न आहे, असे दिसत तर होतेच; शिवाय उत्तर प्रदेशसारख्या सामाजिक आणि राजकीय समीकरणाची गुंतागुंत असलेल्या राज्याचा कारभार हाकण्याचा अनुभवही त्यांच्या गाठी आहे. २००२ मध्ये दोन वर्षांसाठी का होईना त्यांनी हे पद भूषविलेले आहे. आता मात्र, त्यांनी ही बाब ठामपणे नुसती नाकारलीच नाही, तर ‘ये क्‍या फालतूपन है?’ असा प्रतिप्रश्‍नच पत्रकारांना विचारला. त्यामुळेच या पदावरून भाजपच्या केंद्रीय वर्तुळात काही अंतर्गत संघर्ष तर सुरू नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गोव्यातील राजकीय समीकरणे जुळवून सत्ता पादाक्रांत करण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीहून तेथे धाडण्यात आले. तसेच राजनाथ सिंह यांच्या बाबतीतही होणार काय, हा प्रश्‍न उपस्थित झाला. राजनाथसिंह यांनी तो उडवून लावला असला, तरी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तसाच निर्णय घेतला, तर त्यांना आपले बिऱ्हाड दिल्लीहून लखनौला हलवावे लागेल, यात शंका नाही. ही निवड दिवसेंदिवस पुढे ढकलण्यामागे अर्थातच अनेक कारणे आहेत आणि त्यात भाजपला मिळालेले पाशवी बहुमत हेच कारण आहे. सव्वातीनशे आमदारांना सोबत घेऊन कारभार हाकणे, हे एका अर्थाने नव्या मुख्यमंत्र्यांवर अनपेक्षितपणे आलेले ओझे आहे. त्याशिवाय, भाजपने या प्रचारमोहिमेत जनतेच्या आशा-आकांक्षांना नको इतके पाणी घातले आहे. त्यामुळेच ते पद स्वीकारणाऱ्या नेत्याची जबाबदारी वाढली आहे. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणांची पार्श्‍वभूमीही मोदी व शहा यांना नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करताना लक्षात घ्यावी लागेल. सध्या राजनाथसिंह यांच्यापाठोपाठ लखनौचे महापौर दिनेश शर्मा व प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांची नावे आघाडीवर आहेत. शर्मा हे ब्राह्मण आहेत. मात्र, उत्तर प्रदेशात आताच्या काळात आणि अखिलेश यादव, मायावती यांच्याशी संघर्ष करताना ती बाब तेथील जनतेच्या पचनी पडेल काय, हा प्रश्‍न आहे. केशवप्रसाद मौर्य हे ओबीसी आहेत आणि संघपरिवाराशी त्यांची जवळीक आहे. त्याशिवाय अन्य नावांमध्ये केंद्रीय मंत्री महेश शर्मा, मनोज सिन्हा व योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. त्यातून निवड करण्याचे अवघड काम मोदी-शहा यांना करावयाचे आहे. 

अर्थात, ही निवड करताना दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका भाजपच्या डोळ्यांपुढे असणारच. लोकसभेत या राज्यातून ८० खासदार निवडून जातात आणि २०१४ मध्ये भाजप आणि अपना दल या मित्रपक्षाचे मिळून ७१ अधिक दोन असे एकूण ७३ खासदार निवडून आले आणि त्यामुळेच मोदी हे निर्विवाद बहुमत मिळवणारे भाजपचे पहिले पंतप्रधान ठरले. परिणामी नव्या मुख्यमंत्र्यांवर अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातून खासदारांची सत्तरी गाठण्याचे आव्हान असणार. प्रश्‍न अनेक आहेत आणि त्यामुळेच ही निवड अधिकाधिक कठीण होत चालली आहे.

अर्थात, मोदी-शहा हे आपल्या धक्‍कातंत्राबद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळेच या अर्ध्या डझन नावांच्या पलीकडले नावही ते आपल्या पोतडीतून बाहेर काढू शकतात. तीनशेहून अधिक आमदार निवडून आल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशाने जातीपाती आणि धार्मिक तेढ यांच्या पलीकडे जाऊन मतदान केल्याचे चित्र उभे राहिले आहे. त्याशिवाय, भाजपमधील एकजुटीचे दर्शनही प्रचारात घडले होते; पण सध्याचा विलंब त्याविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत आहे.

Web Title: who is uttar pradesh chief minister