कुस्तीला हवा दणकट राजाश्रय (अग्रलेख)

कुस्तीला हवा दणकट राजाश्रय (अग्रलेख)

कुस्तीच्या कलेला मरण नाही. उलट तिचे ग्लॅमर वाढताना दिसते आहे. लोकाश्रय मिळताना दिसतो आहे; पण त्याचबरोबर कुस्तीला हवा आहे राजाश्रय.

मेहनतीने सलग तिसऱ्यांदा "महाराष्ट्र केसरी' किताब पटकाविणाऱ्या विजय चौधरीला भले शाब्बास. शेवटच्या सामन्यात खडाखडीच जास्त झाली; पण गुणांच्या जोरावर विजयने बाजी मारली. "महाराष्ट्र केसरी' किताबाची हॅटट्रिक साधणे, हे यश देदीप्यमान आहे. कामगिरीत सातत्य राखणे, ही खेळात महत्त्वाची बाब असते आणि विजय चौधरीने ते सातत्य दाखविले आहे. भारताकडून खेळण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. अशीच कामगिरी करेल, असा विश्‍वास वाटतो.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे हे साठावे अधिवेशन पुण्यात पार पडले. मायबाप कुस्तीप्रेमी चाहते आहेत, तोवर कुस्तीला मरण नाही, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. अधिवेशनात झालेल्या "महाराष्ट्र केसरी' किताबाच्या लढतीसाठी लाखो शौकिनांनी लावलेली उपस्थिती याचे उत्तम उदाहरण. किताबाची लढत होती म्हणून इतकी गर्दी झाली असे म्हणणे निश्‍चितच चुकीचे ठरेल. अधिवेशनात चार दिवस झालेल्या विविध वजनी गटाच्या लढती पाहण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती. कित्येक अधिवेशनात किताबाच्या लढतीत मल्लांचे समर्थक जणू संयोजक आणि पंचांना वेठीस धरल्यासारखे वागवतात. कुस्तीचा निकाल जणू हेच लावणार, असा त्यांचा अविर्भाव असतो. मात्र, आजपर्यंत बघितलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनापैकी वादाचा डाग न पडता पार पडलेले हे अधिवेशन म्हणता येईल. पाठीराखे आणि समर्थक येथेही होते. फरक इतकाच, की या वेळी त्यांचा त्रास आयोजकांना न होता मल्लांनाच झाला. विजय चौधरीला समर्थकांनी उचलून धरले. व्यासपीठावर पारितोषिक घेताना हा गडी समर्थकांना पेलवला नाही. धक्काबुकीत तो खाली पडला. त्याच्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे तो गदादेखील उचलू शकत नव्हता. मल्लांवर तुमचे प्रेम आहे, यात शंकाच नाही; पण ते व्यक्त करण्यालासुद्धा काही मर्यादा आहेत, याचे भान चाहत्यांनी ठेवायला हवे. विजयची दुखापत सुदैवाने गंभीर नाही. अन्यथा पुन्हा एकदा त्यांचे वर्ष उपचारासाठी खर्ची गेले असते. गेल्या वर्षी नागपूर अधिवेशनादरम्यान गुडघादुखीमुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे त्याचे सहा महिने सरावाशिवाय गेले. त्यानंतर त्याला पुन्हा आखाड्यात उतरण्यासाठी मेहनतीवर अधिक भर द्यावा लागला. चाहत्यांनी प्रेम करावे; पण त्याचा अतिरेक असा व्हायला नको.


अधिवेशनादरम्यान उपस्थित राहिलेले माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कुस्तीची परंपरा जपायला हवी, असे आवाहन केले. त्यांनी व्यक्त केलेली भावना नक्कीच कुस्तीप्रेमींना आधार वाटणारी आहे. मल्ल म्हणा, त्यांचे वस्ताद म्हणा हे परंपरा जपतच आहेत. त्यामुळेच दरवर्षी यथासांग राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन संपन्न होते. चाहते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. ही परंपरा जपण्यासाठी शासकीय हात मिळणे गरजेचे आहे. तो मिळत नाही म्हणूनच राज्यातील मल्ल पुढे न जाता "महाराष्ट्र केसरी'पर्यंतच मर्यादित राहतो. अलीकडच्या काळात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. एकटा नरसिंग सोडला, तर महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल भारतीय संघात कधीच दिसला नाही. नरसिंगबाबत जे घडले ते सर्वांनाच माहीत आहे. अन्याय फक्त महाराष्ट्राच्या मल्लांनी सहन करायचा. हे असे किती दिवस चालणार? प्रत्येक अधिवेशन होणार आणि त्यात स्व. खाशाबा जाधव यांचा वारसदार निर्माण करण्याच्या घोषणा केल्या जाणार. घडत काहीच नाही. नुसत्या घोषणांनी वारसदार मिळणार नाही, तर त्यासाठी कृतीची आवश्‍यकता आहे आणि याच कृतीची वाट मल्ल आणि कुस्ती चाहते पाहत आहेत. आज कुस्तीचा खर्चदेखील आवाक्‍यात राहिलेला नाही. मल्ल हा ग्रामीण भागातील असतो. त्याला हा खर्च पेलवत नाही. खुराक, सराव, आहार, सपोर्ट स्टाफ या सगळ्याच सुविधा मल्लांना मिळणे आवश्‍यक आहे. ओघाने येणारा आणखी एक नेहमीचा प्रश्‍न म्हणजे मल्लाच्या उपजीविकेचा. किती मल्लांना सरकारने सेवेत सामावून घेतले आहे?

शासन कुठलेही येऊ देत घोषणांखेरीज कुस्तीच्या पदरात काहीच पडलेले नाही. "ट्रिपल' महाराष्ट्र केसरी विजयचे उदाहरण समोर आहे. उच्चशिक्षित असलेल्या विजयला दुसऱ्यांदा "महाराष्ट्र केसरी' झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी नोकरीचे आश्‍वासन दिले होते. आता जिद्दीने त्याने तिसऱ्यांदा हा किताब पटकावला तरी सरकारने अजून त्याची दखल घेतलेली नाही. विजय हे एक उदाहरण आहे. अभिजित कटके, सागर बिराजदार, विक्रांत जाधव असे कितीतरी उदयोन्मुख मल्ल महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. पण, त्याला सहकार्याचा हात हवा आहे. केवळ अधिवेशनातील प्रोत्साहन, गर्दीचा महापूर याने त्यांचे भवितव्य घडणार नाही. कुस्तीतून नावारूपाला आलेल्या मल्लाने कुस्तीत आणि कुस्तीसाठी काही तरी करण्याची गरज आहे. बहुतेक मल्ल कुस्ती सोडून राजकारणाचा मार्ग धरतात. पण, तो त्यांचा आखाडा नाही. त्यांनी कुस्तीतच रमायला हवे. त्यासाठी शासकीय आधार मिळणार नसेल, तर असे अनेक "महाराष्ट्र केसरी' होतच राहतील आणि त्यांची ओळख तेवढीत मर्यादित राहिल. कुस्तीच्या कलेला मरण नाही. उलट तिचे ग्लॅमर वाढताना दिसते आहे. लोकाश्रय मिळताना दिसतो आहे; पण त्याचबरोबर कुस्तीला हवा आहे राजाश्रय. सरकारी पातळीवर कुस्तीबाबत जाग यायला हवी हेच खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com