भित्तीलेखनाचा 'पंजाबी संदेश'

arvind kejariwal
arvind kejariwal

भारत आणि शेजारी देशांतल्या मुशाफिरीतून 'भिंतीवरचे लिखाण' हे रूपक साकारते. खास करून निवडणूक प्रचाराच्या काळात तर हे ठळकपणे दिसते. कान आणि डोळे सताड उघडे ठेवून शहरे, तसेच झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या ग्रामीण भागातून जाताना बदलाच्या चाहूलखुणा समोर येतात. काय बदलतेय आणि काय नाही, हे भिंती-भिंतींवर लिहिलेली अक्षरे सांगतात. भारतात परिवर्तनाचा गाडा कधीही थबकत नाही, याचा हाकारा देतात. या उपखंडाच्या अंतरीचे गूज भिंतीवरूनच कळते. इथे भिंतीचा शब्दशः अर्थ घेऊ नये. ती कधी गुजरातमधल्या महामार्गावरच्या एखाद्या कारखान्याची छाया असेल, कधी कांचीपुरममधल्या पेरियार यांच्या जुन्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावरचा शिलालेख असेल, तर कधी निवडणूक प्रचाराकडे लक्ष ठेवणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यांवरचे स्मितहास्य असेल.


हे हसू नेहमीचे, मौजेचे नाही; ते अगदी वेगळे आहे. व्याख्या करता येणार नाही, असे आदर, कौतुक आणि आशेचे मिश्रण त्यात आढळते. हे जेव्हा निवडणूक प्रचारात दिसते, तेव्हा समजते, की आपण सकारात्मक बदल पाहात आहोत. हे आपण पाहिले 1990 मध्ये व्ही. पी. सिंह यांच्या आव्हानात, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात, बिहारमध्ये नितीशकुमार आणि पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या दोन निवडणूक मोहिमांत. त्यानंतर 2015 मध्ये दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारात. या प्रत्येक वेळचा कौल स्पष्ट आणि होकारात्मक होता. आता पंजाबमध्ये मतदारांच्या कलाची 'हास्य चाचणी' कितपत सार्थ आहे, हे पडताळण्याची वेळ आली आहे.
पंजाबमधल्या उद्योजकतेचे केंद्र आणि सर्वांत मोठे तसेच श्रीमंत शहर असणाऱ्या लुधियानात जाऊ. रस्त्यावरच्या हिंदू आणि शीख पुरुषांचे चेहरे तसेच भिंती, सज्जे, गच्च्या आणि खिडक्‍यांतून डोकावणाऱ्या बाया आणि मुलांचे चेहरे व मोबाईल कॅमेऱ्यांनाही वाचण्याचा प्रयत्न करू. निवडणूक प्रचारातले अगदी अलीकडचे वैशिष्ट्य म्हणजे रोड शो. त्यात नेता एक शब्दही न बोलता सर्वांत पुढच्या गाडीवर फक्त उभा राहतो. सगळीकडे पाहत हात हलवतो, हात जोडतो. तो नमस्कार कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला नसतो. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर 'मलाच मते द्या', असे सांगणारे घट्ट हसू असते. अशा वेळी मोठी गर्दी जमते. भारतात कोणत्याही तमाशाला बघे मिळतातच. जेव्हा दुतर्फा जमलेल्या माणसांच्या भिंतींवर आदर आणि आशेचे हसू झळकते, तेव्हा खुशाल समजावे, की ही बदलाची नांदी आहे. असाच रोड शो अरविंद केजरीवाल यांचाही झाला.


पायी रस्ता तुडवताना किंवा गाडीत बसून प्रवास करताना दिसलेले हजारो चेहरे वाचायला मदत होईल, असा एकही अनुभवसिद्ध फॉर्म्युला किंवा पॅथॉलॉजी टेस्ट अस्तित्वात नाही. म्हणूनच लोकांच्या हास्याचा अर्थ लावणे अगदी व्यक्तिनिष्ठ बाब आहे. परंतु, मी यापूर्वीही असे चेहरे पाहिले आहेत आणि बदल हाच त्याचा अर्थ होता. किमानपक्षी ते एका नव्या राजकीय प्रक्रियेच्या उदयाचे चिन्ह असते, असे म्हणता येईल. निवडणूक विश्‍लेषक हे विवेचन धुडकावून लावतील. भिंतीवरची अक्षरे वाचण्याच्या बळावर त्यांचे विज्ञान आणि कौशल्य बाद ठरवण्याची माझी प्राज्ञा नाही. म्हणूनच 11 मार्चला कोण जिंकणार हे सांगून मी तुमच्या जाळ्यात सापडणार नाही. परंतु, मी खात्रीपूर्वक सांगतो, की कदाचित राष्ट्रीय नसेल; पण एका बहुराज्यीय राजकीय पक्षाचा उदय आपण पाहतो आहोत. व्ही. पी. सिंह यांच्या 1989 मधल्या जनता दलानंतर हे पहिल्यांदाच घडते आहे. त्याकाळात अस्तित्वात असलेल्या प्रस्थापित समाजवादी- जातलक्षी राजकारणातून जनता दलाचा उगम झाला होता. आम आदमी पक्ष मात्र शून्यातून निर्माण केलेला, अन्य कोणत्याही पक्षाशी साम्य नसलेला; अगदी 'ओरिजिनल' आहे.
भाषिक तत्त्वावर (आणि शीख- हिंदू अशा सांप्रदायिकसुद्धा) 1966 मध्ये झालेले राज्याचे विभाजन, तसेच 1983 ते 93 हे दहशतवादी कारवायांचे दशक जमेस धरून तब्बल 70 वर्षे पंजाबमधले राजकारण अकाली आणि कॉंग्रेस या दोन बिंदूंभोवती फिरते आहे. हे दोन्ही पक्ष आलटून- पालटून सत्ता उपभोगतात आणि अधल्या-मधल्या काळात राष्ट्रपती राजवट असते. इतर राजकीय पक्ष आणि अकाली दलाच्या फुटीर गटांना कधीच फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. डाव्यांनी आपली जुनी क्षेत्रे दीर्घकाळ टिकवली असली (हरकिशनसिंग सुरजित इथलेच), तरी दोन पक्षांच्या राजकारणाचा खुंटा अधिक बळकट झाल्यावर त्यांचा प्रभाव विरून गेला. मूळ पंजाबचेच असलेल्या कांशीराम यांचा उदय इथेच झाला; मात्र त्यांना या भूमीत राजकीय ताकद उभी करणे कधीच शक्‍य झाले नाही. विशेष म्हणजे देशातल्या दलित मतदारांचे सर्वाधिक, तब्बल 32 टक्के प्रमाण असणारे राज्य म्हणजे पंजाब, हे इथे सांगावे लागेल. भिंद्रनवालेंच्या टोळ्या आणि त्यांच्या वारसदारांनी दहशतवादाच्या दशकात धुमाकूळ घातला होता; पण त्यांना जनमानसात कधीही स्थान मिळाले नव्हते.


या पार्श्वभूमीवर आपण बाहेरचे असल्याचे न दडवणाऱ्या 'आप'ची भरारी खरोखरच लक्षणीय ठरते. पक्षाचा नेता पंजाबी न बोलणारा हिंदू असणे, त्याच्या जातीच्या लोकांची इथे फारशी संख्या अथवा प्रभाव नसणे, तसेच त्याचे 'हरयाणवी' असणे (पंजाब आणि हरियाना यांच्यात नद्यांमधले पाणी आणि अन्य मुद्द्यांवरून तुंबळ वाद आहेत) या घटकांचा अडथळा आलाच नाही. अस्मितेच्या परीक्षेत नापास झालेल्या या पक्षाची विचारसरणी कुणालाही फारशी कळलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे, असंख्य लोकांना हे मुद्दे निरर्थक वाटतात. 'ते पंजाबी नसल्याने काय फरक पडतो? ते कॅनडा किंवा लंडनवरून तर आलेले नाहीत. तेही भारतीय आहेत आणि आम्हीही भारतीय आहोत,' असे सेहवतसिंग म्हणतात. भटिंडाजवळच्या जतरू गावाबाहेर एका तिठ्यावर दहा-बारा जण पत्त्यांचा डाव मांडून बसलेले असतात. या घोळक्‍यात 'आप'चे समर्थक सर्वाधिक, त्यांच्या निम्म्याने कॉंग्रेसचे पाठीराखे, तर अवघे दोघे अकालींची तळी उचलणारे निघतात. त्यांच्यातली चर्चा आवेशपूर्ण, कडोविकडीची आणि खडाखडीची असली, तरी वातावरण मात्र खेळीमेळीचे असते. एकमत होते, ते एकाच मुद्द्यावर : निश्‍चलनीकरणाने प्रत्येकालाच तडाखा दिलाय. कापूस आणि गव्हाच्या सुपीक क्षेत्रात जसजसे आत जाऊ, तसतसा या मुद्द्यावरून निर्माण झालेला कल्लोळ जाणवतो. या आठवड्याच्या सुरवातीला मौर मंडी इथे कॉंग्रेसच्या सभेत कारमधल्या स्फोटात सहा जणांचा बळी गेला होता. त्या ठिकाणापासून जवळच, मौर चरतसिंग इथला, अडीच एकरांचा धनी असणाऱ्या मिठूसिंगच्या बोलण्यातून कडवटपणा जाणवतो. शेतातले पीक एक लाख दहा हजारांना विकले; पण पैसे मात्र एका वेळेला दहा हजार, अशा हप्त्यानेच काढता येतात. त्यामुळे ते काढले, की संपून जातात, असे तो सांगतो.
अमृतसरपासून लुधियाना आणि पुढे भटिंडा, पतियाळा असा दक्षिणेकडे प्रवास करताना, लोकांशी बोलताना, या तुलनेने लहान आणि रस्त्यांचे उत्कृष्ट जाळे असणाऱ्या राज्याच्या संपूर्ण अंतर्भागात 'आप' आणि त्याचे निवडणूक चिन्ह असणारा 'झाडू', हे दोन शब्द सतत कानांवर पडतात. कॉंग्रेस आणि अकाली दल, कॅप्टन (अमरिंदरसिंग) आणि प्रकाशसिंग बादल यांच्यापेक्षा किती तरी जास्त वेळा. अकालींबद्दल एखादा चांगला शब्द क्वचितच ऐकायला मिळतो. जुना, प्रस्थापित पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसच्या पाठीराख्यांचा निःशब्द साठा बातमीदारांना दिसत नसला, तरी निवडणूक विश्‍लेषकांना दिसतो, अशी शक्‍यता आहेच. मी मात्र त्यावर फारसा विश्वास ठेवत नाही. 'आप'चा प्रभाव पंजाबच्या एकाच, अलबत्‌ मोठ्या भागापुरताच मर्यादित असल्याचा दावाही मी अमान्य करतो.


लहानशा पंजाबवर संपूर्ण राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे एक आनुषंगिक नुकसान झाल्याचे आढळते, ते म्हणजे राज्याचे नेटके त्रिभाजन. पंजाबचे तीन ठळक विभाग आहेत, हे वास्तव. अमृतसरसह बिआस नदीच्या पश्‍चिमेकडील जिल्हे, म्हणजे माझा हा सर्वांत लहान. लुधियाना आणि जालंधर यांचा समावेश असणारा, बिआस व सतलज नद्यांमधला सर्वांत श्रीमंत विभाग म्हणजे दोआबा. दोन नद्यांमधली जमीन, हा त्याचा शब्दशः अर्थ. सतलजच्या पूर्वेकडे आणि राजस्थान व हरियानाच्या सीमांलगत असणाऱ्या राज्याच्या कोरड्या दक्षिण विभागाला मालवा म्हणतात. या विभागातच पंजाब विधानसभेच्या सर्वाधिक, 69 जागा आहेत. बाकीच्या दोन विभागांचे एकूण संख्याबळ 48 एवढेच होते. 'आप'चे अपील मालव्यापुरतेच आहे, असे विरोधक आणि निवडणूक विश्‍लेषक म्हणतात. त्यासाठी समाजशास्त्राचा हवाला दिला जातो. मालवा परंपरेने बंडखोर, डाव्या प्रवृत्तीचा, प्रस्थापितविरोधी, अधिक गरीब आणि कोरडा, तसेच सुदूर असल्याचे सांगितले जाते. तथापि, एका विभागात अत्यंत प्रबळ दिसणारी लाट भूगोल अथवा नदीमुळे तिथेच थोपवली जाईल, यावर विश्वास ठेवणे अंमळ कठीणच वाटते.
या तथाकथित रखरखीत मालवा प्रदेशात चहूकडे नजर टाकली, तर काय दिसते? शेतात डोलणारे गव्हाचे पीक, मोहरीचा पिवळाधम्मक बहर, खळखळणारे कालवे, देशातल्या कुठल्याही ग्रामीण भागाला असूया वाटावी अशी घरे, उत्कृष्ट रस्ते, शाळा, महाविद्यालये आणि कोणतीही तक्रार नसणारा वीजपुरवठा. कोरड्या, भकास भूतकाळापेक्षा आजचा मालवा अगदी वेगळा आहे. या बदलाशी बादलांचा काही तरी संबंध असावा, हे निश्‍चित.


पंजाब 2017 मध्ये मात्र हा मुद्दा संदर्भहीन ठरतो. विकासाची आश्वासने देणारी कॉंग्रेस आणि विशेषतः कॅप्टन अमरिंदरसिंग हेच पर्याय मानले जात होते; परंतु 'आप'ने खेळच बदलून टाकल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगवेगळी लघुनामे बनवायला आवडतात. तसाच हा माझा प्रयत्न : 'आप'च्या साध्या, एकच संदेश असणाऱ्या निवडणूक रणनीतीसाठी 'क्राय' म्हणजे 'सीआरवाय' (चेंज, रिव्हेंज, यूथ अर्थात परिवर्तन, सूड, तरुणाई) हे लघुनाम कसे वाटते? बदल हवा, मग थकलेल्या अकालींची उचलबांगडी करून कंटाळवाण्या कॉंग्रेसला आणण्यात काय हशील? त्यापेक्षा काही तरी नवा पर्याय जोखून पाहा. तुम्ही सर्वांवरच संतप्त आहात? आम्ही त्या सगळ्यांना गजाआड करेपर्यंत धीर धरा. आम्ही आताच तर सुरवात करतोय, त्यामुळे मागील कामगिरीचा दाखला देता येत नाही; मात्र आम्ही तरुण आहोत, एकदा संधी देऊन तर बघा. हे रसायन झिंग आणणारे वाटते अन्‌ पंजाबी तर साहसाच्या मूडमध्ये आहेतच. म्हणूनच, निवडणूक विश्‍लेषकांचे म्हणणे खरे ठरले आणि भिंतीवरची अक्षरे केवळ उघड्या डोळ्यांना दीपवणारी असल्याचे निष्पन्न झाले; तरी एक महत्त्वाची राष्ट्रीय शक्ती म्हणून 'आप' पुढे येईल, याबाबत शंका नाही. पंजाबमध्ये हा पक्ष दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहिला, तरी त्याचे परिणाम देशभरात दिसतील. सुरवात पुढच्या वर्षी, गुजरातमधूनच होईल.
(अनुवाद : विजय बनसोडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com