योगायोग! (ढिंग टांग!)

योगायोग! (ढिंग टांग!)

पृथ्वीलोकाच्या उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठ्या दिवसाचा पहिला प्रहर. देवाधिदेव इंद्रदेवाने दंतमार्जन करोन सिंहासन ग्रहण केले. प्रघाताप्रमाणे प्रभातसमयीच्या वृत्तांकनासाठी (पक्षी : मॉर्निंग बुलेटिन) मुनिवर नारदांस निमंत्रण धाडिले. अमृततुल्य कषायपेयाचा (खुलासा : अमृततुल्य, म्हंजे अमृत नव्हे!) वाफाळ चषक ओठांस लाविला, तेवढ्यात- 

इंद्रदेवाचे सिंहासन हिंदकळून त्यांच्या हातातील अमृततुल्य पेय कपातून बशीत सांडले! 

घाईघाईने कषायपेय समोरील स्फटिकमंडित चौरंगावर (पक्षी : काचेचे टीपॉय) ठेवून इंद्रदेवाने कुर्सी की पेटी बांध ली! (मागल्या खेपेपासून त्यांनी आपल्या सिंव्हासनाला ही सोय करून घेतली आहे!) जबर्दस्त धक्‍क्‍याचे तेहेतीस मिनिटे आफ्टरशॉक्‍स येत राहिले. सारे काही शांत होते न होते, इतक्‍यात नारदमुनी प्रविष्ट जाहले : ‘‘नारायण, नारायण!‘‘ 

‘‘मुनिवर, आमचं सिंहासन असं बशीत का सांडलं?‘‘ उपरण्यावर सांडलेले कषायपेयाचे डाग पुसत इंद्रदेव अनवधानाने म्हणाले. 

‘‘देवाधिदेव, पाताळलोकातही हाहाकार उडाल्याची ब्रेकिंग न्यूज आहे. कुंभीपाकातील उकळत्या तेलाच्या कढया या धक्‍क्‍याने सांडल्या. इतकेच नव्हे, तर आपल्या नंदनवनातील सुप्रसिद्ध रॉक गार्डन जमीनदोस्त झाले आहे. हजारो कल्पवृक्ष उन्मळून पडले आहेत. सारे देवगण आणि आसुरगणांची धावाधाव झाली असून, साऱ्यांनी उघड्या क्रीडांगणांकडे धाव घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. हानीचा अंदाज अजून लागत नाही, देवाधिदेव!‘‘ नारदमुनींनी वृत्तनिवेदन केले. 

‘‘नेमके काय झाले? आमचं सिंहासन डळमळीत करणारा हा महाभाग कोण? शिवाने पुन्हा तांडव तर नाही

सुरू केले? जनमेजयाने पुन्हा सर्पसत्र तर नाही आरंभले? लंकेश रावणाने पुन्हा घोर तप तर नाही ना केले?‘‘ देवाधिदेव चांगलेच चिंतित झाले होते.

नारदमुनींनी माहिती पुरवली, ‘‘पृथ्वीलोकातील एका मानवानं हा प्रताप केला आहे, भगवन!‘‘ 

‘‘अरे बाप रे! पुन्हा आला का तो रजनीकांत?‘‘ कपाळावर ठाणकन हात मारत इंद्रदेव वदले. 

‘नाही भगवन, नमोजी नामक एका सामान्य मानवाने आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर इंद्रासनास आव्हान दिलं आहे! आपल्या अलौकिक तपोबलाने त्याने जगभरातील कोट्यवधी अनुयायांसमवेत सामूहिक योगसाधना केली!! इतकेच नव्हे, तर पवन-मुक्‍तासनदेखील केले!!! त्यायोगे अत्युच्च कोटीचा ध्वनी निर्माण होवोन त्याचे तरंग इंद्रासनापर्यंत पोचले! डेसिबलमध्ये हा ध्वनी मोजणे अशक्‍य आहे, भगवन!‘‘ नारदमुनी म्हणाले. 

‘‘हंऽऽऽ... हा नमोजी नामक मानवप्राणी भलताच डेसिबलवान दिसतोय!‘‘ इंद्रदेवांना घाम फुटला हे पाहून तत्परतेने शीतला नावाची अप्सरा हातात पंखा घेऊन आली, पण देवाधिदेवांनी तिला परत पाठवून ‘टॉवेला‘ नावाच्या गौरांग अप्सरेस घर्मबिंदू टिपण्यासाठी फर्मावले. 

‘‘पृथ्वीलोकांत लाखो योगसाधकांनी चटया पसरून पसरून योग केला! त्यामुळे...‘‘ नारदमुनींचे हे वाक्‍य अर्धवट राहिले. कारण संतप्त इंद्रदेवाने शेजारी उभे करून ठेवलेले वज्र उचलले होते. 

‘‘यांच्या योगामुळे आम्ही चटईवर आलो, त्याचे काय? हे योग काय पाल्टिक्‍स आहे, सांगा बरे जरा डिटेलमध्ये!‘‘ इंद्रदेवाने काही न सुचून विचारले. 

‘‘त्याचे असे आहे, की गोनार्द ग्रामातील पतंजली ऋषींनी योगसूत्र लिहिले. शरीराला कळू न देता आत्म्याचा व्यायाम किंवा आत्म्याला कळू न देता शरीराचा व्यायाम, असे त्यास ढोबळमानाने म्हणता येईल. पण हजारो वर्षांनंतर या नमोजीने प्रकरण थेट युनोत नेले. परिणामी, अवघ्या विश्‍वाने एकाच वेळी योगासने केल्याने हा प्रकार घडला!‘‘ मुनिवरांनी बेधडक जमेल तसे, ज्ञानकण वेंचिले. (खरा पत्रकार!) असो. 

‘‘आम्हाला युद्धमान होणे क्रमप्राप्त आहे, असं दिसतं!‘‘ इंद्रदेव वज्र परजत म्हणाले. 

‘‘येथे शस्त्र कामी येत नाही, भगवन! याला एकच धोरण उपयुक्‍त आहे, त्याला कॉंग्रेस पॉलिसी म्हंटात!‘‘ नारदमुनींनी सल्ला दिला. 

‘‘काय आहे ही कॉंग्रेस पॉलिसी?‘‘ वज्र खाली ठेवत इंद्रदेवाने पृच्छिले. 

‘‘हेच, की एकाने चटईवर पवन मुक्‍तासन केले, की शेजारील चटईवरील साधकाने प्राणायाम कराऽऽऽऽवा!.. नारायण, नारायण!!‘‘ एवढे सांगून मुनिवर नारद अंतर्धान पावले. आणि... 

...आम्ही शवासन आटोपून चटई गुंडाळली!! इति.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com