विकृतीकडून अधिक विकृतीकडे... 

बुधवार, 6 सप्टेंबर 2017

या मिरवणुकीला ना कसला आकार ना उकार. मिरवणूक मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ती सुरू झाली, ती सुरू होताना पुण्यातील माजी-विद्यमान आणि भावी नेतृत्वाने गर्दी केली, पण काही शे मीटरच्या 'प्रदीर्घ' चालण्यानंतर ते नाष्ट्यासाठी थांबले आणि पुढे मिरवणुकीला वाऱ्यावर सोडून पांगले. मग मिरवणूक कार्यकर्त्यांच्या हाती सोडली गेली.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दोन अंगांपैकी दहा-बारा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवात हळूहळू का होईना, पण काळानुरूप स्वागतार्ह बदल होत चालला असताना मिरवणूक हे दुसरे अंग मात्र विकृतीकडून अधिक विकृतीकडे चालले आहे. या विकृतीचा अंत दोन प्रकारे होऊ शकतो... एक म्हणजे तिला कंटाळू लागलेले पुणेकर या थिल्लरबाजीकडे पाठ फिरवतील आणि ती आटोक्‍यात येईल आणि दुसरा म्हणजे कधीकाळी उदयाला येणाऱ्या एखाद्या सर्वमान्य नेतृत्वाकडून किंवा न्यायालयाकडून पुरेशी बंधने घातली गेल्याने ती थांबेल... 

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा गेल्या काही दशकांमध्ये प्रवास हा विकृतीकडून अधिक विकृतीकडे असा होत चाललेला आहे. अठ्ठावीस तासांपर्यंत लांबलेली, मानाच्या मंडळांनी लक्ष्मी रस्त्यावर पाच-सहा तासांपर्यंतचा वेळ खाल्लेली, कसलेही नियंत्रण नसलेली, झुंडशाहीपुढे पोलिस दलाने नमते घेतल्याने ठरलेले माफक नियमही पायदळी तुडवण्यात धन्यता मानणारी, दारूच्या उग्र वासाने वेढलेली, हृदयाचे ठोके चुकतील आणि कानाचे पडदे फाटतील अशा कर्कश 'डीजे'चा प्रादुर्भाव असलेली, त्याच त्या दोन-तीन रस्त्यांचा मंडळांचा हट्ट पुरवणारी अशी ही मिरवणूक आपण गेली अनेक दशके सहन करीत आहोत. या वर्षीचा सुदैवाचा भाग असा की याविरोधात प्रत्यक्ष भेटीपासून ते सोशल मीडियापासून बोलणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याचे दिसते आहे. 

या मिरवणुकीतील किती प्रकारच्या विकृती असाव्यात ?... 

एक तर दहा दिवस मंडळाचे काम करणारे कार्यकर्ते आणि शेवटच्या दिवशी मंडळापुढे नाचणारे 'कार्यकर्ते' हे एक नसतात. मिरवणुकीतील या 'कार्यकर्त्यां'ना आपण कोणत्या मंडळापुढे नाचतो आहोत, याचे काहीही सोयरसुतक नसते तर त्यांना 'आला बाबुराव', 'पप्पी दे पारूला' अशा उडत्या, अभिरूचिहीन ठेकेदार गाण्यांवर नाचायला जागा हवी असते. मिरवणुकीच्या आदल्या दिवशी पुण्याच्या रस्त्यांवरून फिरलो असता दारूच्या दुकानांमधून मिरवणुकीसाठी पुरेसा 'स्टॉक' करून ठेवण्यासाठी तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. 'उत्सव हा पावित्र्याचे, मांगल्याचे वगैरे प्रतिक म्हणून मानले जाते आणि गणरायाला निरोपही तेच पावित्र्य राखून द्यायला हवे', वगैरेवगैरे गोष्टी या एकतर जाहीरपणे बोलताना किंवा फार झाले तर वृत्तपत्रांतील बातम्यांमध्ये शोभतात. याला काही चांगले, सन्माननीय अपवाद वगळता प्रत्यक्षात डोळे उघडे ठेवून फिरणाऱ्या कोणालाही यातील ढोंगबाजी ठिकठिकाणी दिसेल. गणपतीच्या गाड्याच्या खालच्या बाजूला ठेवलेली बाटली थोड्याथोड्या वेळाने तोंडाला लावणारे तरूण आपण पाहिले आहेतच ना ? बेधुंद नाचणाऱ्यांच्या फौजा जेवढ्या अधिक तेवढ्या त्या मंडळाच्या भाऊची कॉलर अधिक ताठ. 

डिजे असलेल्या मंडळांच्या ध्वनिवर्धकाजवळून जातानाच्या दोन मिनिटांमध्ये कोणत्याही सर्वसामान्य माणसाला किती त्रास होतो, ते आपल्याला माहिती आहे. कानांमध्ये कापूस किंवा बोटे घालून त्या मंडळापासून लांब जाणारे कितीएक आपल्याला दिसून येतात, मात्र त्या ध्वनिवर्धकाच्या अगदी जवळ उभे राहून शेकडो महात्मे अंगविक्षेप नृत्य तासनतास करू शकतात, याचे कारण ते उन्मनी अवस्थेत असतात. 'व्हाय शुड ओन्ली बॉईज ऑल्वेज हॅव द फन ?' असे विचारत महिलांचा सहभाग वाढला. त्याचे कौतुकही झाले, मात्र यंदा मुलगा आणि मुलगी अशा जोड्या एकत्र नाचताना दिसल्या. टिळक रस्त्यावर तर डिजेचा कहरच दिसून आला आणि त्या रस्त्यावर जाणे म्हणजे शिक्षाच वाटू लागली. 

या मिरवणुकीला ना कसला आकार ना उकार. मिरवणूक मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ती सुरू झाली, ती सुरू होताना पुण्यातील माजी-विद्यमान आणि भावी नेतृत्वाने गर्दी केली, पण काही शे मीटरच्या 'प्रदीर्घ' चालण्यानंतर ते नाष्ट्यासाठी थांबले आणि पुढे मिरवणुकीला वाऱ्यावर सोडून पांगले. मग मिरवणूक कार्यकर्त्यांच्या हाती सोडली गेली. पोलिस अधिकारी उत्सवापूर्वी काही नियम मोठ्या थाटात जाहीर केले होते, मात्र त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या झुंडींपुढे नमते घेतले. चार ध्वनिवर्धक म्हणजे स्पीकर आणि पथकांची संख्या तीन अशी मर्यादा पोलिसांनी घातली, पण प्रत्यक्षात त्याचे पालन फारच कमी मंडळांनी केले. 

लक्ष्मी, टिळक, कुमठेकर आणि केळकर या चार रस्त्यांवरून अनेक वर्षे मिरवणूक जाते आहे, मात्र या चार रस्त्यावरील मंडळांची संख्या तब्बल 612 झाली आहे. हा ताण हे चार रस्ते किती काळ सहन करू शकतील ? त्यामुळे प्रत्येक भागातील गणपतींसाठी त्या त्या ठिकाणच्या प्रमुख रस्त्यावर मिरवणूक असावी, या सूचनेचा गांभीर्याने विचार होणार का ? त्यातही मानाच्या गणपतींनी लावलेला वेळ हा प्रत्येक वेळी चर्चेचा मुद्दा होतो, पण त्यावर उपाय शोधला जात नाही. मिरवणूक सकाळी साडेदहाला सुरू झाली आणि लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीतील पाचव्या गणपतीचे विसर्जन होण्यास नऊ तास लागले. पहिल्या पाच गणपतींनी नऊ तास घेतले. शेवटच्या मानाच्या तीन गणपतींचीही तीच स्थिती. भाऊसाहेब रंगारी गणपती बेलबाग चौकात सव्वाबाराला आला आणि विसर्जित साडेपाचला झाला. मंडई गणपती सव्वा वाजता तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पावणेदोनला बेलबाग चौकात आले आणि अनुक्रमे पावणेसात, सात पंचावन्नला विसर्जित झाले. म्हणजे लक्ष्मी रस्त्यावर त्यांना साडेपाच ते साडेसहा तास लागले. शतकोत्तर रौप्यमहोत्सव असल्याने महोत्सवी मंडळांना पाचव्या गणपतीनंतर वाट देण्यात आली. त्यामुळे नेहमी सहावे असणारे त्वष्टा कासार मंडळ यंदा सोळा-सतरा क्रमांकावर गेले. त्यांचा गणपती रात्री अकराला विसर्जित झाला. म्हणजेच तब्बल साडेबारा तासात फारतर सतरा मंडळांचाच गणपती विसर्जित होऊ शकला होता. 

अचकट-विचकट नाचाला उत्तर म्हणून ढोल-ताशांच्या वादनाचा पर्याय प्रभावीपणे गेल्या काही वर्षांत पुढे आला आणि शंभरावर पथके मंडळांपुढे वादन करू लागली. मात्र त्यातील ढोलांची संख्या शंभरावर जाऊ लागली. त्याचा परिणाम वेळेवर जसा झाला तसाच त्याचा आनंद लुटण्यावरही परिणाम झाला. म्हणूनच ढोलांची संख्या तीसपर्यंत मर्यादित ठेवण्याचा नियम करण्यात आला. तोही पायदळी तुडवला जातो आहे. 

मिरवणुकीत काही मंडळे कटाक्षाने चांगल्या प्रथा पाळताना दिसतात, मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. 

सोशल मीडियाद्वारे पुणेकर आपल्या भावना आता प्रभावीपणे व्यक्त करू लागल्याने आतापर्यंत अव्यक्त राहिलेला याबाबतचा राग जनमानसावर परिणाम करू लागला आहे. त्यामुळे या थिल्लरपणाकडे सर्वसामान्य पुणेकरच पाठ फिरवतील, अशी शक्‍यता आहे आणि सर्वमान्य नेतृत्वाने पुढे येऊन मिरवणुकीवर सुयोग्य नियंत्रण मिळवले तरच हा एकेकाळचा हा दिमाखदार सोहळा पुन्हा कात टाकेल...

अन्यथा... ?