शाहूमहाराजांच्या कार्याचं साक्षेपी मूल्यमापन

शाहूमहाराजांच्या कार्याचं साक्षेपी मूल्यमापन

राजर्षी शाहूमहाराजांच्या अजोड कर्तृत्वाचा आढावा घेणारे अनेक ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रकाशित झालेला ‘राजर्षी शाहू गौरवग्रंथ’ हा त्यांत आगळा ठरावा असा आहे. ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. रमेश जाधव यांनी आपल्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल टाकत हा ग्रंथराज संपादित करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीत शाहूमहाराजांनी केलेल्या कामगिरीचं यथार्थ दर्शन हा ग्रंथ घडवतो.

विसाव्या शतकातल्या ब्रिटिशकालीन भारतात, आज आश्‍चर्य वाटावं असा राजा, शाहूमहाराजांच्या रूपानं कोल्हापुरात होऊन गेला. एखादा माणूस किती क्षेत्रांमध्ये निरपवाद कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतो, याचा हा राजा आदर्श. ‘काळाच्या पुढं पाहणारा द्रष्टा राजा’ हे तर शाहूमहाराजांचं वैशिष्ट्य होतंच; पण हे द्रष्टेपण केवळ पुस्तकी नव्हतं. त्याला कृतीची खणखणीत जोड होती. द्रष्टा आणि कर्ता यांचा दुर्मिळ संयोग शाहूमहाराजांमध्ये असल्यानंच परिवर्तनाची लढाई पुढच्या टप्प्यावर नेण्यात ते यशस्वी ठरले. म्हणूनच धर्ममार्तंडांना उघड आव्हान देत शाहूमहाराजांनी समतेचा धडा घालून दिला. त्यांनी पूर्वास्पृश्‍य समाजाला केवळ पोटाशी धरलं नाही, तर शिक्षणात मागं पडलेला हा वर्ग पुढारला पाहिजे, यासाठी राजा म्हणून जी ताकद वापरता येईल ती त्यांनी वापरली. शतकामागं मागासलेल्यांना अधिकच्या संधी देणारं आरक्षण आणण्याचा कल्याणकारी निर्णय घेणं आणि राबवणं हे शाहूमहाराजांच्या काळातलं मोठंच धाडस होतं. रांगड्या व्यक्तिमत्त्वाचे शाहूमहाराज पट्टीचे शिकारी होते. जंगली श्वापदांशी झुंज घेणारे शाहूमहाराज सुधारणांसाठीच्या बौद्धिक झुंजीतही तितक्‍यात ताकदीनं उतरत असत. वेदोक्त अधिकाराचा मुद्दा व्यक्तिगत मानापमानापुरता न ठेवता सामजिक उत्थानासाठी वापरण्याची कल्पकता त्यांनी दाखवली.

‘क्षात्रजगद्गुरू’सारखं पीठ निर्माण करून धर्माच्या ठेकेदारीवरच त्यांनी प्रहार केला. प्रतिगामी आणि सनातन्यांविरुद्ध शाहूमहाराजांनी दिलेला लढा अजोड आहे. सक्तीचं आणि मोफत शिक्षण आपल्या राज्यात देण्यापासून ते विधवा विवाहापर्यंत अनेक क्रांतिकारी अशा गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. सर्व जातिधर्माच्या मुलांसाठी वसतिगृहं बांधली, अस्पृश्‍यतानिवारणाचा कायदा त्यांनी केला. विषमतेवर आधारित महारवतन, कुलकर्णीवतन आणि बलुत्याची पद्धत शाहूमहाराजांनी शतकापूर्वी बंद केली. राधानगरी धरणाची उभारणी आणि त्यातून शेतीव्यवस्थेत आणलेली समृद्धी, शाहू मिल आणि उद्यमनगरला चालना देऊन कोल्हापुरात आणलेलं औद्योगिकीकरणाचं वारं यापासून ते कुस्तीचा शौक जोपासत तो केवळ राजेरजवाड्यांचा रंजनापुरताच न ठेवता खासबागसारखं मैदान उभं करून कोल्हापुरी कुस्तीची परंपराच त्यांनी तयार केली. अल्लादिया खाँ यांच्यासारखं ‘संगीतातलं गौरीशंकर’ अशी सार्थ ओळख असलेलं व्यक्तिमत्त्व, आबालाल रहमान यांच्यासारखा कलंदर चित्रकार, केशवराव भोसले, बालगंधर्व हे संगीतनाटकाच्या क्षेत्रातले दिग्गज, लहरी हैदर यांच्यासारखा अफाट प्रतिभेचा धनी शाहीर अशा सगळ्यांना आश्रय देऊन सांस्कृतिक प्रगल्भताही शाहूमहाराजांनी दाखवली. नाट्य-सिनेमा-संगीत-शिल्पकला अशा सगळ्याला शाहूमहाराज प्रोत्साहन देत असत.

विकासाच्या आणि प्रशासनाच्या झापडबंद कल्पनांपलीकडं जाणारे असंख्य निर्णय घेतल्यानं शाहूमहाराजांचं कोल्हापूर सामाजिक अभिसरणात आणि आर्थिक विकासातही देशात आगळं ठरलं. राजर्षी शाहूमहाराजांचे अनेक गुण समकालिनांनी वर्णन करून ठेवले आहेत. ‘राजदंड हा शोभेचा आणि मिरवण्याचा नसून, तो रयतेच्या सेवेसाठी आहे,’ हे सूत्र आयुष्यभर जपणारे शाहूमहाराज तत्कालीन देशी संस्थानिकांमध्ये नेहमीच आगळे ठरले. शाहूमहाराजांच्या या विविधांगी कामगिरीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणारा गौरवग्रंथ शाहूमहाराजांच्या जन्मशताब्दीमध्ये, म्हणजे १९७६ मध्ये, पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. नंतर त्याची आणखी एक आवृत्ती निघाली. डॉ. जाधव यांच्या साक्षेपी संपादनानं ही तिसरी आवृत्ती अनेक नवे संदर्भ, लेख, आठवणी, शाहूमहाराजांचे आदेश आणि छायाचित्रं आदींच्या समावेशानं आणखी उंचीवर नेली आहे. मूळ ग्रंथात ४१ लेख, नऊ आठवणी आणि कित्येक अस्सल कागदपत्रं, हुकूम, जाहीरनामे आणि दुर्मिळ छायाचित्रं अशी भर तिसऱ्या आवृत्तीत घालण्यात आली आहे. तब्बल एक हजार २६८ पृष्ठांचा हा ग्रंथराज शाहूमहाराजांचं समग्र व्यक्तिमत्त्व अनेक मान्यवरांच्या लेखणीतून तर मांडतोच; पण त्याच वेळी तो सामाजिक चळवळीच्या इतिहासाचं यथायोग्य मूल्यमापन करणारा दस्तऐवजही बनला आहे. मूळ ग्रंथात तितकीच तोलामोलाची भर घालण्याचं काम जिकिरीचं आणि कष्टपूर्ण असतं. शाहूमहाराजांचे अभ्यासक असलेले डॉ. जाधव यांनी दीड वर्षाच्या मेहनतीतून ते साकारलं आहे. कला, क्रीडा, साहित्यृ-संस्कृती, विज्ञान, संशोधन, शेती, उद्योग, व्यापार, सहकार अशा अनेक क्षेत्रांत शाहूमहाराजांची कर्तृत्वमुद्रा उमटली आहे. आर्य समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज अशा विविध प्रवाहांना प्रोत्साहन देताना परिवर्तनाचा महात्मा फुलेकृत मूलभत विचार तत्कालीन परिस्थितीचं भान ठेवून पुढं नेण्याची कृतिशीलता हे शाहूमहाराजांच्या अवघ्या २२ वर्षांच्या राजेपदाच्या कारकीर्दीचं पिढ्यान्‌पिढ्यांना पुरेल असं संचित आहे. या सगळ्याचं वर्णन करणारा हा गौरवग्रंथ असला, तरी शाहूमहाराजांच्या निर्णयांचं, कार्याचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्नही अनेक लेखांमधून झाला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर, डॉ. अप्पासाहेब पवार, भास्करराव जाधव, गं. बा सरदार, ‘प्रबोधन’कार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, रा. ना चव्हाण, प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे आदींचे लेख मुळातून वाचण्यासरखे आहेत. शाहूमहाराजांच्या कार्याचं समग्र दर्शन समकालीन विद्वानांसह नामवंत साहित्यिक, संशोधक, विचारवंत, लेखकांच्या चार पिढ्यांनी या ग्रंथात घडवलं आहे, हे या ग्रंथाचं ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. राजा, प्रशासक, समाजधुरीण, रसिक या अंगानं तर शाहूमहाराजांचं व्यक्तिमत्त्व यातून उभं राहतंच; पण माणूस म्हणूनही शाहूमहाराज किती मोठे होते, याचं मनोहारी दर्शन यात समाविष्ट केलेल्या आठवणींमधून घडतं. यात महायुद्धाच्या काळता लोखंड मिळत नसल्यानं तोफा वितळवून नांगर बनवण्याला मान्यता देणारे शाहूमहाराज भेटतात, अस्पृश्‍य समाजातल्या मुलाला आपल्या गाडीतून जाणीवपूर्वक फिरवून त्याच्या शिक्षणाची सोय लावून देणारे शाहूमहाराज भेटतात. तीन वर्षांतून दुष्काळाचा फेरा येतो, हे गृहीत धरून जनावरांच्या चाऱ्यापासून सगळी सोय करण्याचं नियोजन कोल्हापूर संस्थान आधीच करत असे, अशी नोंद एका लेखात येते. धर्म, प्रांत, भाषा आणि जातीनुसार महापुरुषांची वाटणी होत असल्याच्या या काळात ‘शाहूमहाराज हे या संकुचित चौकटींच्या पल्याडचं द्रष्टं आणि धुरंधर व्यक्तिमत्त्व होतं’, यावर प्रकाश टाकणाऱ्या या ग्रंथाचं औचित्य निश्‍चितच आहे.

पुस्तकाचं नाव - राजर्षी शाहू गौरवग्रंथ (तिसरी आवृत्ती)
संपादक - डॉ. रमेश जाधव, प्रकाशक - महाराष्ट्र शासन
पृष्ठं - १२६८, मूल्य : ३०० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com