नव्याने करू जुन्याचा शोध (आनंद घैसास)

नव्याने करू जुन्याचा शोध (आनंद घैसास)

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक पुरातन गोष्टींकडं नव्या नजरेनं पाहता येतं. अनेक निसटलेले दुवे सांधण्यासाठी, इतिहासाची पानं नव्यानं उलगडण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडतं. फ्लोरिडाच्या केप कॅनव्हेरलजवळ सागराच्या तळाशी सापडलेल्या गलबताबाबतचे पुरावे, चेफ्रेन पिरॅमिडचं केलेलं सर्वेक्षण आणि कॅलिफोर्नियातल्या ‘शेरिट’ ममीची प्रतिमाचित्रं या साऱ्यांच्या निमित्तानं एकूणच जुन्याच्या शोधाच्या नव्या तंत्रावर एक नजर.

फ्लोरिडाच्या एका न्यायालयात सध्या एक खटला चालू आहे. सोळाव्या शतकातल्या एका गलबताच्या जलसमाधीचं शोधकार्य करण्याचा आणि त्यातल्या वस्तूंवर अधिकार कोणाचा आहे, हा त्यातल्या वादाचा मुद्दा आहे. कारण आहे फ्लोरिडाच्या केप कॅनेव्हरलजवळ सागराच्या तळाशी पडलेल्या आणि गेल्या वर्षी पाणबुड्यांना सापडलेल्या एका गलबताचं. त्यात दिसणाऱ्या वस्तू, विशेषत: पितळेचं नक्षीकाम असणाऱ्या तीन ब्राँझच्या तोफा आणि काही ग्रॅनाइट आणि संगमरवरी पुतळे- जे सागरतळाशी गाळात रुतलेले दिसत आहेत- त्यावरून हा वाद उफाळून आला आहे. यातल्या तोफा आणि पुतळ्यांवरच्या नक्षीत ‘कोट ऑफ आर्म्स’ म्हणून साऱ्यांना माहीत असलेलं, फ्रेंच आरमारी लष्कराचं चिन्ह, राजमुद्रा, स्पष्ट दिसत आहे. ते गलबत खरंच फ्रेंच आरमाराचं असेल, तर अमेरिकेतल्या फार आधी असणाऱ्या फ्रेंच वसाहतीच्या मदतीसाठी पाठवलेल्या लष्करी मदतीच्या गलबतांपैकी ते एक असावं. सागरतळाशी असलेल्या या वस्तूंचा प्रथमदर्शनी काढलेला माग असं दाखवतो, की जीन रिबोल्टच्या (१५२० ते १५६५) मार्गदर्शनाखाली चाललेल्या सागरी मोहिमेतील हा एक भाग असावा. सागरतळाशी या तोफांशेजारी पसरलेल्या काही सामानाचाही गलबताच्या जुन्या नोंदींशी मेळ जुळत आहे!

सागरतळाशी शंभर वर्षांहून अधिक जुन्या, अशा बुडालेल्या गलबतांचा, जहाजांचा शोध घेणासाठी काम करणाऱ्या ‘ग्लोबल मरिन एक्‍स्प्लोरेशन’ या संस्थेला, फ्लोरिडाच्या राज्यसंस्थेनं शोधकार्यासाठी परवानगी दिलेली होती. तसंच त्यातून शोधलेल्या वस्तू वर काढण्याची परवानगी आणि त्यांचे मालकी हक्कही मिळावेत, अशी मागणी या संस्थेनं फ्लोरिडाच्या राज्यशासनाकडं केली होती. या परवानगीप्रमाणं फ्लोरिडाच्या केप कॅनेव्हरलजवळच्या सात सागरी क्षेत्रांत हे शोधकार्य चालू होतं. सागरतळाशी वाळूत रुतलेलं हे गलबत आणि त्यातल्या वस्तू गेल्या वर्षी म्हणजे २०१६च्या मे आणि जून महिन्यात खरं तर दिसून आल्या होत्या. ग्लोबल मरिन एक्‍स्प्लोरेशनचे अध्यक्ष रॉबर्ट प्रिचेट यांनी या शोधकार्याला लगेचच २०१६च्या जुलै महिन्यात प्रसिद्धी देऊन या वस्तू वर काढण्याची तयारी चालवली होती. यातून वर काढलेल्या वस्तूही नंतर लिलावात विकल्या गेल्या, तर त्यांची किंमतही चांगली येईल, अशी त्यांना आशा होती. (एका तोफेला दहा लाख डॉलर असा अंदाज.) मात्र, या शोधकार्याला लगेचच खीळ बसली. कारण २०१६च्या नोव्हेंबरमध्ये फ्रेंच सरकारनं या समुद्रतळाशी असलेल्या तोफा आणि इतर सर्व वस्तूंवर त्यांचा हक्क सांगितला आहे. तोही एका ‘सॉव्हरिन राइट’ या लष्करी समन्वय कराराचा दाखला देत. मूळ अमेरिकी लष्करी सागरी कायद्यानुसार, एखाद्या देशाचं गलबत- ते जगात कुठंही असलं तरी (भर समुद्रात काय किंवा कोणत्या तरी बंदरात काय), ती त्या देशाची मालमत्ता असते. त्यानुसारच, हे गलबत सुमारे चारशे वर्षांपूर्वी सागरात बुडालं असलं, तरी ते सागरातच असल्यानं ते गलबत आणि त्यावरचं सर्व सामान ही फ्रान्सचीच मालमत्ता राहते, असा दावा ओर्लांडोच्या न्यायालयात फ्रेंच सरकारनं दाखल केला आहे.
अर्थात शोधकार्य करणाऱ्यांनी हा एकूण सागरी खजिना हातचा जाऊ न देण्याची लगोलग तयारी केली आहे. कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. आपल्याला साह्य करतील, असे पुरावे गोळा करणं सध्या सुरू आहे; पण हे काम कठीण आहे. सागरतळाशी चारशे वर्षं पडून असलेल्या या वस्तू आता वर तर आणता येत नाहीत; पण त्यांचा शोध घेत, त्यांचं चित्रीकरण करून ते दाखवणं शक्‍य आहे. काय करावं लागतं सागरी शोधकार्य करताना?

सागरी शोधाची प्रक्रिया
सागरात गलबत बुडल्याची जागा नक्की कुठं आहे, हे एकदा माहीत झाल्यावर तो ठावठिकाणा कोणत्या खुणांच्या आधारे परत ओळखता येणं कठीण असते. तसंच एखादी तरंगती ‘बॉयू’सारखी खूण ठेवायची, तर त्याचा नांगर एवढ्या खोलवर, एका जागी राहील अशी व्यवस्था करणं अवघड. त्यामुळं आता ही जागा ‘जीपीएस’च्या मदतीनंच नोंद करावी लागते. पाण्यात ही जागा किती खोल आहे ते ‘सोनार’ तंत्रानं ठरवलं, तरी प्रत्यक्ष तिथं उतरताना लागणारं सामान, ऑक्‍सिजनपुरवठा करणाऱ्या नलिकांच्या क्षमतेपासून, पाणबुड्यांचा पोशाख किती दाब सहन करू शकणारा निवडावा इथपर्यंत विचार करावा लागतो. पाण्याखाली खोलवर जाण्याची आणि तसंच सुखरूप वर येण्याची सारी व्यवस्था हाती असावी लागते. पाण्याखाली चालणारा कॅमेरा सोबत असला, तरी त्याच्यासाठी किती प्रमाणात प्रकाशाची गरज लागणार हेही पाहावं लागतं. कारण सूर्यप्रकाश खोलवर फारसा पोचत नाही. त्याचा दिसण्याच्या क्षमतेशी थेट संबंध असतो. गाळात रुतलेल्या वस्तू, त्यावर वाढलेल्या पाणवनस्पती, सागरी जीवांनी त्यावर केलेलं आक्रमण, मग ते शंखशिंपल्यांनी, प्रवाळांनी बांधलेली त्यांची घरं असोत, की कणखर दातांच्या आणि जबड्यांच्या माशांनी त्यांचे लचके तोडलेले असोत, केलेले तुकडे असोत, ते आता मिळाले आहेत त्या स्वरूपात कसे जपायचे, वर आणताना काय खबरदारी घ्यायची या सगळ्या गोष्टीही पाहाव्या लागतात. या सागरतळाशी लपलेल्या वस्तू शोधताना, धातूशोधक चुंबकीय संयंत्रं (मॅग्नेटोमीटर-मेटल डिटेक्‍टर) वापरतात. कित्येकदा पाण्यातच, पाण्याच्या फवाऱ्यानं अशी ठिकाणं उत्खनन करण्यासाठी ‘वॉटर ड्रेजर’ वापरतात. वस्तू पाण्याबाहेर काढल्यावर त्यांची देखभाल हा त्यानंतरचा वेगळा विषय. असो.

गलबताचा माग
या गलबताबद्दल एक अंदाज असा, की सेंट जोन्स नदीच्या मुखातून १५६२ला बाहेर पडलेल्या आणि फ्लोरिडावर आपला वसाहत हक्क पुनर्प्रस्थापित करायला निघालेल्या चार गलबतांच्या चमूपैकी ‘ला ट्रिनिटे’ नावाच्या गलबताचे- ज्याला ध्वजपताका-पात म्हटलं जातं त्याचे- हे अवशेष आहेत. फ्लोरिडातल्या फोर्ट कॅरोलिना इथं फ्रेंच प्रोटेस्टंट लोकांची एक छोटीशी वसाहत होती. ते अमेरिकेत दाखल झाले त्याच सुमारास स्पॅनिश वसाहत करणारेही याच परिसरात आले होते. त्यांच्यापैकी काहींनी फोर्ट कॅरोलिनावर हल्ला करून, ती उद्‌ध्वस्त करायचा घाट घातला होता. त्यांच्या विरुद्ध कॅरोलिनाच्या वसाहतीला मदत करायला ही गलबतं निघाली होती. म्हणजे स्पॅनिश लोकांनी नव्यानं त्यासाठी उभारलेल्या सेंट ऑगस्टाइनच्या वसाहतीवर हल्ला करायला निघालेली ही चार गलबतं होती; मात्र अचानक आलेल्या चक्रीवादळानं ही जहाजं दक्षिणेकडं वाहत गेली. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. फोर्ट कॅरोलिना सुरक्षेपासून वंचितच राहिलं. स्पॅनिश वसाहतवाद्यांनी ते पूर्ण नेस्तनाबूत तर केलंच, शिवाय फ्लोरिडावर पुढची दोन शतकं आधिपत्य गाजवलं.

मात्र, शोधकार्य करणाऱ्यांनी आता असा दावा केला आहे, की त्यांना एकूण १९ तोफा हाती लागल्या आहेत. त्यातल्या फक्त तीन फ्रेंच बनावटीच्या दिसतात, हे खरं असलं तरी गलबताच्या नांगरावरून तो स्पॅनिश आहे. फ्रेंच गलबताच्या नांगरापेक्षा आकाराने मोठा. लष्करी राजमुद्रा असणारी दगडाची मूर्ती असली, तरी ती  फ्रान्सशी संबंधित असणारी एकच मूर्ती. मग ती तिथं कशी? तर फ्रेंच वसाहत निपटून काढताना, या वस्तू स्पॅनिश वसाहतीच्या लोकांनी जिंकलेल्या, लुटलेल्या असाव्यात. तसंच ही गलबतं क्‍युबाच्या स्पॅनिश वसाहतींकडं जायला निघालेली असावी, जेव्हा त्यांना जलसमाधी मिळाली.

गंमत म्हणजे खटल्यात हक्क कोणाचे का ठरेनात, ‘शोधकार्य करणाऱ्यांकडं ऐंशी टक्के वस्तूंचे हक्क, तर फ्रेंच सरकारकडं वीस टक्के हक्क राहतील; पण सागरातून वर काढलेल्या या साऱ्या पुरातन वस्तू मात्र फ्लोरिडातच राहतील. सर्वांना खुल्या असणाऱ्या सरकारी वस्तुसंग्रहालयात,’ असा निर्णय होईल असं अनेक विधितज्ज्ञांचं म्हणणं आहे...पाहूया प्राचीन घडलेल्या आणि नव्यानं घडणाऱ्या हक्कांच्या इतिहासाकडं...

वैश्‍विक किरणांच्या मदतीनं शोध
मिळालेल्या नव्या पुराव्यांवरून, इतिहासाची पानं नव्याने उलटून पाहायची, त्यात आणखी बारकावे भरायची इच्छा तर सर्वच पुरातत्त्वसंशोधकांची असते. त्यात आता नव्या विज्ञानाची, तंत्रज्ञानाची जोड मिळत असल्यानं अचानक वेगळंच काही हाती येत असतं. अशाच प्रकारे एक पुरातत्त्वशोध घेतला गेला आहे, तो चक्क वैश्विक किरणांच्या मदतीनं.

अवकाशातून येणारे वैश्विक किरण पृथ्वीवर सततच सगळीकडून येत असतात. या वैश्विक किरणांमधल्या भारित कणांची जेव्हा पृथ्वीच्या वातावरणाशी आंतरक्रिया होते, तेव्हा या किरणांची ‘क्षयक्रिया’ (डीके) होऊन त्यांचं ‘म्युऑन’ या मूलकणांत रूपांतर होतं. म्युऑन्स हे इलेक्‍ट्रॉनप्रमाणेच असणारे, लेप्टॉनच्या गटातले मूलकण आहेत. यांना वर्गीकरणात ‘फर्मिऑन्स’ असंही गणलं जातं. (१९३६मध्ये कार्ल डेव्हिड अँडरसन आणि सेठ नेडरमेअर यांनी कॅलिफोर्नियातल्या कॅलटेकच्या प्रयोगशाळेत यांचा शोध लावला होता.) म्युऑन्स हे इलेक्‍ट्रॉनपेक्षा २०७पट अधिक वस्तुमान असणारे कण आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर, एका मीटरच्या क्षेत्रफळात, दर मिनिटाला सुमारे दहा हजार म्युऑन्स येऊन आदळत असतात. म्युऑन्सचं आयुष्य फार काळ टिकून राहणारं नसलं, तरी त्यांचा विलय किंवा अभिशोषण दहा ते पंधरा मीटरची दगडी भिंतही ते करू शकत नाही. ते आरपार जाऊ शकतात. तेही त्या माध्यमातून जाताना त्यांचा संवेग कमी झाल्यानं त्यांचा ठराविक रीतीनं मार्गबदल झाल्यानंतरच. याचाच उपयोग करून गिझाच्या सर्वांत मोठ्या, खूफूच्या पिरॅमिडच्या आत काही उपकरणं, तर बाहेर भिंतीलगत काही उपकरणं लावून एक सर्वेक्षण करण्यात आलं. ते या म्युऑन्स शोधयंत्रांचा वापर करून.

चेफ्रेन किंवा खाफ्रेच्या पिरॅमिडचं असंच एक सर्वेक्षण १९६०मध्ये करण्यात आलं होतं. (त्याचा अहवाल १९७०मध्ये ‘सायन्स’ नियतकालिकात होता.) ल्युईस अल्वारेट्‌झ यांनी केलेल्या या सर्वेक्षणात, गिझामधल्या चेफ्रेन पिरॅमिडमध्ये अंतर्गत काही रिकाम्या जागा- ‘गुप्त कक्ष’ असं त्यावेळी त्यांना म्हणण्यात आलं होतं त्या- दिसून आल्या होत्या. आता पन्नास वर्षांनंतर या म्युऑन शोधतंत्रात बरीच प्रगती झाली आहे. त्यातून हे सर्वेक्षण करण्यात आलं. यासाठी तीन प्रकारची साधनं वापरण्यात आली होती. पहिल्या प्रकारात जपानच्या एका संस्थेनं बनवलेल्या ‘न्युक्‍लिअर इमल्शन फिल्म्स’ वापरून म्युऑन्सचे वेध घेतले गेले. यात कॅमेराप्रमाणं उच्चस्तरीय ऊर्जाकणांची नोंद बराच काळपर्यंत करत त्यांच्या प्रतिमा तयार करता येतात. दुसरा प्रकार मूलकण संग्राहक संवेदक- ज्याला ‘होडोस्कोप’ म्हणतात तो- ‘केइके’ या संस्थेने तयार केलेल्या ‘उच्च ऊर्जा त्वरकाचा’ (पार्टिकल ॲक्‍सिलरेटर) वापर करून तयार केलेला ‘अभिज्ञापक’ होता. तिसरा प्रकार अरगॉन या वायूचा वापर करून तयार केलेला म्युऑन संसूचक होता, जो फ्रेंच ‘अल्टरनेटिव्ह एनर्जी अँण्ड अटॉमिक एनर्जी कमिशन’नं तयार करून पुरवलेला होता. हा तिसरा प्रकार पिरॅमिडच्या सर्व बाजूंनी भिंतींलगत बसवलेला संवेदक होता, तर पहिली दोन उपकरणं पिरॅमिडच्या आत असणाऱ्या विविध कक्षांत, दालनांत बसवलेली होती. यातल्या पहिल्या प्रकारच्या न्युक्‍लिअर फिल्ममधे अतिशय सूक्ष्म बारकावे पकडण्याची क्षमता असली, तरी ही फिल्म फक्त ऐंशी दिवसच कार्यरत राहू शकते, ही त्यांची एक मर्यादा आहे. बारकावे पाहण्याच्या इतर दोन संवेदकांची क्षमता थोडी कमी असली, तरी ते कितीही काळपर्यंत चालू ठेवण्याची आणि त्यातून मिळणारी माहिती सातत्यानं संगणकाला पुरवण्याची त्यांची क्षमता आहे.

गिझाच्या पिरॅमिडचं अंतर्गत दर्शन
कुठंही प्रत्यक्ष स्पर्शही न करता, प्रत्यक्ष उत्खनन न करता, गिझाच्या पिरॅमिडसारख्या दगडी बांधकामाचं अंतर्गत दर्शन या तंत्रानं घेतलं गेलं. जपानच्या नागोया विद्यापीठातले भौतिकशास्त्रज्ञ कोनिहिरो मोरिशिमा यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण एका आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या चमूनं केलं. त्याचा शोधनिबंध नुकताच ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या प्रकल्पात सहलेखक मेहदी तय्युबी हे ‘स्कॅनपिरॅमिड्‌स’ या संस्थेचे संस्थापकही एक महत्वाचे सहभागी होते, ज्यांनी या संस्थेतर्फे प्रकल्पातील सगळी संगणकीय व्यवस्था पाहिली.

यात मिळालेल्या माहितीनुसार, पिरॅमिडच्या मध्यात असलेल्या ‘ग्रॅंड गॅलरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दालनाच्या वर, सुमारे तेवढ्याच आकाराचं एक दालन असावं- जे असण्याचा अंदाज इसवीसन अठराशेपासून या पिरॅमिडसंबंधी चाललेल्या शोधकार्यातून आलेला नव्हता. म्युऑनच्या पिरॅमिडमधून जाताना होणाऱ्या मार्गबदलातून पिरॅमिडच्या अंतर्गत कुठं किती घनता आहे, याचं चित्रच या पद्धतीनं हाती आलं आहे. पिरॅमिडच्या आतल्या या ‘गूढ’ दालनात काय सापडेल, काय असावं याच्या चर्चा या निमित्तानं मीडियामधून फिरू लागल्या आहेत. त्यावर मात्र पुरातत्त्वसंशोधक नाराज आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, की पूर्वीच्या काळी कशा संकल्पना आणि आराखडा ठरवून या पिरॅमिडचं बांधकाम करण्यात आलं, ते अशा प्रकल्पातून समजून येणार आहे. ते गूढ उलगडणं हे अधिक महत्त्वाचं ठरायला हवं. बांधकामातल्या उणीवांमुळं राहून गेलेल्या अशा रिकाम्या जागा इतर पिरॅमिडमध्ये सापडल्या आहेत. त्यामुळं या प्रचंड दगडी वास्तूचं अंतर्गत चित्रण हा वैज्ञानिक भाग जगासमोर अधिक यायला हवा, पुरातन खजिन्याच्या गूढाची, शापित राजांची, पिरॅमिडच्या आत असणाऱ्या ‘ममीं’ची गूढं, खजिन्याच्या बातम्या पसरवण्यात आता काही अर्थ नाही.

या अंदाजित दालनाची लांबी सुमारे तीस मीटर (९८ फूट) असावी, रुंदी मात्र पायाशी तीन मीटर असावी. ती वर निमुळती होत जाणारी, सुमारे ग्रॅंड गॅलरीएवढ्याच उंचीची असावी. हा पिरॅमिडच्या वर निमुळत्या होत जाणाऱ्या दगडांच्या बांधकामाच्या रचनेचाच एक भाग तर नसावा ना, असाही विचार अभियांत्रिकीतले संशोधक आता करत आहेत.

शेरिट ‘ममी’ची अंतर्गत रचना
इजिप्तच्या ‘ममी’ हे मोठं गूढच आहे. इजिप्तमधली एक छोटी ‘ममी’ जी आकारानं छोटी असल्यानं, तोच अर्थ असणारा ‘शेरिट’ हा इजिप्शियन शब्द जणू तिच्या नावासारखाच आता वापरला जातो. मात्र, ‘शेरिट’ ही ममी इजिप्तमधे नाही, तर ती आहे कॅलिफोर्नियातील एका म्युझियममध्ये. प्रत्यक्ष तोडफोड न करता, या ममीला हातही न लावता अंतर्गत रचना पाहण्याचं नवीन तंत्र या वस्तुसंग्रहालयानं त्यांच्या प्रेक्षकांसाठी योजलं आहे.

संपूर्ण शरीराचा ‘सीटी स्कॅन’ (कॉम्प्युटेड टोमोग्राफी) ही आता वैद्यकीय शाखेतली एक नेहमीची गोष्ट झाली आहे. क्ष-किरणांचा वापर करून विविध प्रतलांतून वस्तूतून आरपार पाहण्याचं हे तंत्र. आता तर वेगवेगळ्या दिशांनी, वेगवेगळ्या कोनांतून असे अनेक ‘प्रतल-छेद-प्रतिमा’ घेऊन, संगणकीय माध्यमातून त्यांची एक एकत्रित त्रिमितीय प्रतिमा तयार करण्याचं तंत्र विकसित झालं आहे. त्याचप्रमाणं, आता हातात धरायचा, त्रिमित रंगीत स्कॅनिंग कॅमेरा आला आहे. ज्यात थोड्या अंतरावर असणारी दोन वस्तुभिंगं असतात, ज्यातून दोन डोळ्यांनी बघितल्याप्रमाणं प्रतिमा तयार करता येतात. यात खरं तर पृष्ठभागावरच्या प्रत्येक बिंदूचं, त्याच्या कॅमेरापासूनच्या अंतराचं आणि रंगाचं मापन त्रिकोणमितीच्या तंत्रानं होत असतं. हा स्कॅनर कॅमेरा एका संगणकाला जोडून त्यात याचं सलग चित्रण करता येतं. हातात धरायच्या अशा कॅमेरातूनच अनेकदा अवरक्त (इन्फ्रा रेड) किरणांची शलाका वस्तूवर टाकली जाते, ज्यातून अधिक यथार्थ पृष्ठीय उंचसखलपणा चित्रित करता येतो. एकाच ठिकाणाहून नव्हे तर अनेक दिशांनी, विविध कोनांतून अशा मिळवलेल्या प्रतिमांचं संगणकीय एकत्रीकरण करून वस्तूचं एकसंध त्रिमित प्रतिमाचित्र तयार करता येतं. कधीकधी तर स्कॅनरमधून जाळीदार प्रकाशाच्या शलाका टाकून हा उंचसखलपणा अधिक चांगल्या प्रकारे मापन केला जातो.

अंतर्गत अवयवांसाठी त्रिमित सीटी स्कॅन आणि बाह्यपृष्ठभागासाठी रंगीत त्रिमित स्कॅन या दोन्हींचं एकत्रीकरण करून या प्रकल्पातून खूप बारकावे दाखवणारी एक संगणकीय प्रणालीच तयार करण्यात आली आहे. हा प्रकल्प २००५ला सुरू झाला होता, तरी आता हातात धरण्याच्या त्रिमित स्कॅनरच्या (अर्टेक इव्हा हॅंडहेल्ड थ्रीडी स्कॅनर) साह्यानं आणि ‘व्हॉल्युम ग्राफिक’ या संगणकीय प्रणालीतून तो नुकताच पूर्ण केला गेला.

कॅलिफोर्नियातल्या सॅन होजे इथले ‘रोझिक्रुशियन इजिप्शियन म्युझियम’मध्ये ही ‘शेरिट’ ममी आहे. आपण तिथं गेलो आणि आपली संगणकीय टॅब्लेट, मोबाईल, आयपॅड आदी साधनं या प्रणालीला जोडली, तर आपण या ममीच्या शवपेटीवरून आपला संगणक जसजसा फिरवू, तसतसं शवपेटीत बंदिस्त असलेलं, ममीचं कापडाच्या गुंडाळ्यात लपेटलेलं शव आणि विविध गोष्टी आपल्यासमोर त्रिमित स्वरूपात उलगडत जातात. आपण निरनिराळ्या कोनांतून आणि विविध अंतरावरच्या, स्तरांवरच्या रचनांचे बारकावे त्यातून पाहू शकतो.

इजिप्तवर रोमन साम्राज्याचं आधिपत्य होतं त्या काळातलं, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचं हे एका पाच वर्षाच्या मुलीचं शव आहे. तिचा मृत्यू अतिसारानं शरीरातल्या निर्जलीभवनानं (डिहायड्रेशन) झाला असावा, असंही अनुमान यातून निघालं आहे. मात्र, ममी करताना या शवातले काही अवयव काढून टाकल्याचंही दिसून आलं आहे. कानात रिंगा, गळ्यात दागिन्यांचा हार आणि हातातही कडं घातलेलं दिसून येतं!
एखाद्या पुरातन वस्तूची तोडमोड न करता, खणून, उत्खनन करून मूळ वस्तू आणि वास्तूंना बाधा न आणता, विविध प्रारणांच्या माध्यमातून, नव्या तंत्रज्ञानानं त्यांची अंतर्बाह्य प्रतिमाचित्रं बनवण्याचं तंत्र आता आपल्याला ‘जुन्याकडे अधिक विकसित आणि नव्या दृष्टीने पाहण्यास’ मदत करणार आहे... याचा नक्कीच फायदा पुरातत्त्वविज्ञानाच्या प्रगतीस होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com