ओरिएंट एक्स्प्रेसचा स्वप्नवत प्रवास (आशा परांजपे)

ओरिएंट एक्स्प्रेसचा स्वप्नवत प्रवास (आशा परांजपे)

व्हेनिस ते लंडन असा तीन हजार २५० किलोमीटरची सफर घडवून आणणाऱ्या ओरिएंट एक्‍स्प्रेसचा प्रवास हा खरोखरच एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. चार रात्री चालणाऱ्या या प्रवासात ही रेल्वेगाडी अनेक देश ओलांडते. सन १८८२ मध्ये बेल्जियममधल्या एका श्रीमंत माणसानं आपले सगे-सोयरे, मित्र यांच्याबरोबर आरामात, आनंदानं प्रवास करण्यासाठी पॅरिस-व्हिएन्ना-पॅरिस या मार्गावर नवी रेल्वे सुरू केली होती. याच धर्तीवर १८८३ मध्ये एक लांब पल्ल्याची पॅसेंजर रेल्वेही सुरू करण्यात आली. तिलाच पुढं ‘ओरिएंट एक्‍स्प्रेस’ हे नाव मिळालं. या रेल्वेगाडीतल्या स्वप्नवत्‌ प्रवासाचं हे अनुभवकथन...

जगात अशा अगणित वस्तू, ठिकाणं, गोष्टी आहेत, की ज्यांच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. त्या गोष्टी माहीतच नसल्यामुळं आपल्याला त्यांच्याविषयी कसलंही सुख-दुःख नसतं; पण जर एकदा का अशा एखाद्या ठिकाणाबद्दल काही समजलं, तर आपलं कुतूहल जागं होतं आणि मग आपण त्याविषयीची माहिती कुठून कुठून गोळा करू लागतो.

‘आई, आपण या वर्षी ओरिएंट एक्‍स्प्रेसनं चार रात्रींचा प्रवास करणार आहोत...’ असं माझी मुलगी अपर्णा हिनं मला जेव्हा सांगितलं, तेव्हा या रेल्वेगाडीविषयीचं माझं कुतूहल असंच जागं झालं. जगात अशा नावाची खास रेल्वेगाडी आहे, हे मुलीनं मला सांगेपर्यंत माझ्या गावीही नव्हतं. एकदा त्या प्रवासाची तारीख निश्‍चित झाल्यावर तिकिटं, व्हिसा यांबरोबरच मी त्या रेल्वेगाडीसंबंधीची माहिती गोळा करायला सुरवात केली.
***

ओरिएंट एक्‍स्प्रेसला फार जुना इतिहास आहे. सन १८८२ मध्ये बेल्जियममधल्या एका श्रीमंत माणसानं आपले सगे-सोयरे, मित्र यांच्याबरोबर आरामात, आनंदानं प्रवास करण्यासाठी पॅरिस-व्हिएन्ना-पॅरिस या मार्गावर नवी रेल्वेगाडी सुरू केली होती. त्याच धर्तीवर १८८३ मध्ये लांब पल्ल्याची एक पॅसेंजर रेल्वेगाडीही सुरू करण्यात आली. तिलाच पुढं ‘ओरिएंट एक्‍स्प्रेस’ असं नाव देण्यात आलं. सुरवातीला ही रेल्वेगाडी युरोपच्या अनेक देशांतून जात असे. पॅरिस ते इस्तंबूल हा त्या रेल्वेचा सगळ्यात लांबचा प्रवास होता. युरोपमध्ये पूर्वीच्या काळी कुठलाही प्रवास तितकासा सोपा नव्हता. मात्र, त्या काळातही या रेल्वेचा प्रवास अगदी वेगळा व आरामदायी असे. मधल्या दोन महायुद्धांच्या काळात या रेल्वेचा प्रवास काही काळ खंडित करण्यात आला होता. २००७ मध्ये या रेल्वेची मधली स्थानकंही बदलण्यात आली. २००९ मध्ये या रेल्वेचं नामकरण ‘व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्‍स्प्रेस’ असं झालं. या रेल्वेच्या बाह्यरूपातही अनेक वेळा बदल झाले. बाहेरची रंगरंगोटी बदलली, डब्यांची संख्या कमी-जास्त झाली, तरी मूळ रेल्वेनं आपलं जुनेपण जपलं आहे. १०० वर्षांपूर्वीचं आतलं लाकडी नक्षीकाम, अंतर्गत रचना आहे तशीच आहे. शिवाय, १०० वर्षांपूर्वीपासूनची सहा हजार सहाशेहून अधिक छायाचित्रं, एक हजार भित्तिपत्रं अशा जुन्या गोष्टींची कलात्मक मांडणी या रेल्वेगाडीत करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनातून या गाडीची अनेक स्थित्यंतरं प्रवाशांच्या लक्षात येऊ शकतात.
***

युरोपमध्ये धावणाऱ्या या रेल्वेचं नाव ‘ओरिएंट एक्‍स्प्रेस’ असं का ठेवलं असावं, हे एक कोडंच आहे. कदाचित तिचं पूर्वीचं शेवटचं ठिकाण इस्तम्बूल हे पूर्वेकडचं आहे म्हणून हे नाव दिलं असावं. सध्या ही गाडी  इस्तम्बूलला वर्षातून एकदाच प्रवास करते. साधारणतः व्हेनिस ते लंडन (कॅले) या मार्गावर ही गाडी धावते. या मार्गावरची महत्त्वाची ठिकाणं म्हणजे व्हेनिस, प्राग, बुडापेस्ट, पॅरिस व कॅले अशी आहेत. हा सगळा प्रवास तीन हजार २५० किलोमीटरचा आहे. आज जगात अनेक आरामदायी रेल्वेगाड्या आहेत. अशा आरामदायी गाड्यांपैकीच एक म्हणजे ओरिएंट एक्‍स्प्रेस असं या गाडीचं वर्णन केलं जातं. भारतातली ‘पॅलेस ऑन व्हील’ ही अत्यंत आरामदायी, राजेशाही रेल्वेगाडी या प्रकारात मोडते. युरोपमधला या मार्गावरचा प्रवास म्हणजे काश्‍मीर ते कन्याकुमारी या प्रवासासारखा आहे. एकच महत्त्वाचा फरक म्हणजे, भारतातली गाडी अनेक राज्यांतून जाते, तर ओरिएंट एक्‍स्प्रेस ही अनेक देशांमधून प्रवास करते. अनेक देश, वेगळ्या भाषा, आगळावेगळा निसर्ग यांमुळं युरोपचा हा प्रवास नावीन्यपूर्ण ठरतो. ही गाडी जलद असल्यानं आपण कुठल्या देशातून चाललो आहोत, हे प्रवाशांना प्रत्यक्षात काहीच कळत नाही. देश बदलल्याचा संदेश मोबाईलवर मात्र येत राहतो. आजकाल या सगळ्या देशांचा मिळून एकच व्हिसा असल्यानं फार त्रास होत नाही. प्रवाशांचे पासपोर्ट फक्त घेतले जातात.
***

ओरिएंट एक्‍स्प्रेस ही रेल्वे कित्येक महत्त्वांच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या गाडीवर असंख्य माहितीपूर्ण मालिका, कथा, कादंबऱ्या व पुस्तकं लिहिली गेली आहेत. यातलं १९७४ मधलं एक गाजलेलं पुस्तक म्हणजे ॲगाथा ख्रिस्तीचं ‘मर्डर ऑन ओरिएंट एक्‍स्प्रेस’. या पुस्तकावर याच नावाचा सिनेमाही नंतर निघाला व तो अत्यंत लोकप्रियही झाला. याशिवाय अनेक इंग्लिश मालिकांचं व सिनेमांचं चित्रीकरणही या गाडीत झालं आहे. त्यांपैकी एक गाजलेला सिनेमा म्हणजे जेम्स बाँडचा ‘रशिया विथ लव्ह.’ युरोपमधल्या अनेक राजकीय नेत्यांनी, श्रीमंत व्यक्तींनी, विख्यात अभिनेत्यांनी, नामवंत साहित्यिकांनी या गाडीतून प्रवास केल्यानं तिला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
***

आमच्या प्रवासाचं नियोजन झाल्यावर आम्ही व्हेनिसला पोचलो. मुलगी अपर्णा तिच्या जोडीदारासह आम्हाला तिथं भेटणार होती. तसे आम्ही व्हेनिसला २५ वर्षांपूर्वी गेलो होतो; पण या वेळचा प्रवासाचा अनुभव फारच वेगळा होता. आमचं आयर्लंडहून येणारं विमान रात्री पावणेबाराला व्हेनिसला पोचलं. टॅक्‍सीचालकानं आम्हाला व्हेनिसच्या एका छोट्या पोर्टवर सोडलं. आजूबाजूला काहीच नव्हतं. ‘बाई तुम्ही व्हेनिसमध्ये आहात. तुम्हाला इथं कुठंही पाण्यातूनच जावं लागेल. दुसरं कुठलंही वाहन तुम्हाला मिळणार नाही,’ असं सांगून तो निघूनही गेला. रात्री साडेबारा वाजता त्या सुनसान डेकवर आम्ही पती-पत्नी दोघंच होतो. आम्हाला हॉटेलवर नेण्यासाठी एका बोटीची (वॉटर-टॅक्‍सी) सोय आधीच करण्यात आलेली होती. असा मध्यरात्रीचा, वेगळ्या वाहनाचा आणि परक्‍या देशातला हा पहिलाच प्रवास होता आणि मुख्य म्हणजे त्याची आम्हाला आधी काहीच कल्पना नव्हती. त्या मिट्ट काळोखात जीव मुठीत घेऊन आम्ही बोटीत बसलो. बोटीचा चालक बोट सुसाट वेगानं चालवत होता. बाजूला सगळीकडं समुद्राचं पाणीच पाणी होतं. सुमारे ४० मिनिटांनी आम्ही हॉटेलच्या दारात पोचलो. बाहेर पाहिलं तर आम्ही पाण्यातच होतो आणि आमच्यासमोर एक मोठी खिडकी होती व ही खिडकी म्हणजेच हॉटेलचं पाण्यातलं ‘दार’ होतं. सतत हलणाऱ्या बोटीतूनच वर चढून जावं लागलं. अपर्णा व तिचा नवरा आमची वाटच पाहत होते.
***

दुसरा दिवस आम्ही व्हेनिसमध्ये फिरण्यातच घालवला. व्हेनिस हे जगातलं खरोखरच वेगळं ठिकाण आहे. इथल्या सगळ्या इमारती शेकडो वर्षांपासून पाण्यातच उभ्या आहेत. सगळी घरं पाण्यातच आहेत. कुठंही जायचं असल्यास छोट्या बोटीतूनच जावं लागतं किंवा पायी फिरावं लागतं. या शहराचा काही भाग जमिनीला जोडलेला आहे. त्यातल्या एका भागावरच गाव वसलेलं आहे. जगभरातले लाखो प्रवासी इथं वर्षभर येत असतात. व्हेनिस म्हटलं, की गंडोलाची एक सुखद सहल आलीच. त्या दिवशी पावसाची भुरभूर असतानाही अनेक प्रवासी डोक्‍यावर छत्र्या घेऊन तो आनंद लुटत होते.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता ओरिएंट एक्‍स्प्रेसच्या वतीनं एक युवती आम्हाला नेण्यासाठी आली. एका मोठ्या वॉटर-टॅक्‍सीतून  आणखी काही प्रवाशांसह आम्ही व्हेनिसच्या रेल्वे स्टेशनवर पोचलो. ओरिएंट एक्‍स्प्रेस प्लॅटफॉर्मवर उभी होतीच. गाडी सुटायच्या आधी अर्धा तास सगळ्या प्रवाशांना आत जायला सांगण्यात आलं. एका मदतनीसानं प्रत्येक प्रवाशाला त्याची केबिन दाखवली. आमच्या या गाडीला १८ मोठे कोच (डबे) होते. प्रत्येक कोचमध्ये १० ते १२ प्रवाशांची सोय होती. प्रत्येक डब्यात दोन माणसांना आरामात बसण्याची व झोपण्याची सोय होती. डबा अतिशय स्वच्छ व नेहमी लागणाऱ्या वस्तूंनी सुसज्ज होता. आमच्या डब्यातल्या १२ जणांसाठी एक खास मदतनीस २४ तास देण्यात आला होता. चहा, कॉफी व किरकोळ स्नॅक्‍स देण्यापासून ते बिछाना तयार करणं व आवरणं अशी सगळी कामं त्याच्याकडं होती. गाडी अगदी वेळेवर सुटली.
***

गाडी सुरू झाल्यावर थोड्याच वेळात आमच्या खास मदतनीसानं येऊन आम्हाला गाडीची, तीमधल्या सोई-सुविधांची, जेवणाच्या व नाश्‍त्याच्या वेळांची सविस्तर माहिती दिली. जेवणाची सोय दोन वेळांमध्ये करण्यात आलेली होती. काही खास गोऱ्या लोकांना साडेसहा वाजताच जेवण पाहिजे असे. त्याचाही विचार जेवणाच्या नियोजनात करण्यात आला होता. जेवणाच्या आधी १५ मिनिटं सूचना दिली जात असे. सगळ्यांना अगदी आरामात बसून जेवता येईल अशा या वेळा होत्या. जेवणाच्या वेळी पुरुषांना बो टाय व सूट सक्तीचा होता.  जेवायला जाताना स्त्रियांनी जो वेश परिधान केलेला होता, त्यात १०० वर्षांपूर्वीच्या फॅशनचे कपडे जास्त प्रमाणात होते. पिसांच्या व फुलांच्या हॅट व नाना तऱ्हेच्या बॅगा विशेषकरून होत्या. जेवणाची व्यवस्था रेल्वेच्या ज्या डब्यांमध्ये करण्यात आली होती, त्या सगळ्या डब्यांची सजावट सुंदर होती. प्रत्येक डबा वेगळ्या प्रकारे सजवलेला होता. ही सगळी नावीन्यपूर्ण सजावट रोमी ललिक नावाच्या इटालियन कलाकाराची आहे. जेवणाच्या या डब्यांना खूप मोठ्या खिडक्‍या व त्या खिडक्‍यांना सुंदर नाजूक पडदे होते. बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या, पांढरेशुभ्र टेबलक्‍लॉथ, नाजूक व उत्तमातली उत्तम क्रॉकरी-कटलरी असा एकूण थाट होता. बसण्याची जागा प्रत्येकाला अदबीनं दाखवली जात होती. जेवताना सर्वप्रथम उंची शॅम्पेन दिली जात असे. त्यानंतर पाच कोर्सचं जेवण, गोड पदार्थ, चीज, फळं, बिस्किटं, चॉकलेट व शेवटी चहा-कॉफी दिली जात असे. हे सगळं होताना कुठलीही घाई केली जात नसे. त्यामुळं अगदी आरामात बसून बाहेरचा निसर्ग न्याहाळत जेवता येई. ही रेल्वे युरोपच्या अनेक देशांतून जात असल्यानं बाहेरचा वेगवेगळा परिसर प्रवाशांना दिसतो. सगळ्या युरोपचा हा परिसर अत्यंत सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खळाळून वाहणाऱ्या नद्या, ओढे, द्राक्षांचे मळे, मोहरीचं अमाप पीक असलेली पिवळीधमक शेती मैलोन्‌मैल पसरलेली... जेवणात आम्हाला युरोपीय पद्धतीचं शाकाहारी पदार्थ देण्यात आले होते. सकाळचा नाश्‍ता व दुपारचा हाय टी डब्यात प्रवाशांना जागेवरच दिला जाई. रात्रीचं जेवण करून परतेपर्यंत आरामशीर गाद्या, उबदार पांघरुणं यांसह प्रवाशांच्या झोपण्यासाठीची सिद्धता  आमच्या मदतनीसानं केलेली असे. वरच्या बर्थवर जाण्यासाठी तीन-चार पायऱ्यांची छोटीशी शिडी होती. ही गाडी १०० वर्षांपूर्वीची असल्यानं या गाडीत वातानुकूलन यंत्रणेची सोय नाही. प्रत्येक डब्यात केवळ दोन फॅन होते. युरोपमध्ये सुमारे सात-आठ महिने थंडीच असते; त्यामुळं वातानुकूलन यंत्रणेऐवजी आवश्‍यकता असते ती हीटरचीच. प्रत्येक डब्याला दोन स्वच्छतागृहं होती. डब्यात वॉश बेसिन होतं. या गाडीचा एकच दोष म्हणता येईल व तो म्हणजे तीत स्नानाची सोय नाही. अर्थात दर दिवसाआड ही गाडी कुठल्या तरी गावात एक दिवस थांबते. त्यामुळं गाडीत स्नानाच्या व्यवस्थेची तशी गरजही भासत नाही.
***

या प्रवासाचा आमचा पहिला टप्पा व्हेनिस ते प्राग (झेकोस्लोव्हाकियाची राजधानी) हा होता. अनेक जण प्रागला आपला प्रवास संपवतात किंवा प्रागपासून पुढं सुरूही करतात. ही गाडी प्रागला दोन रात्री थांबते. त्यामुळं आम्हीही प्रागला दोन दिवस थांबून ते शहर पाहण्याचं ठरवलं. तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता या गाडीचं प्रस्थान लंडनकडं होणार होतं. प्राग शहर पाहून झाल्यावर ठरलेल्या वेळेला आम्ही प्राग स्टेशनवर पोचलो. तिथं आमची गाडी आम्हाला पुढं नेण्यास सिद्ध होती. तोच डबा, तोच मदतनीस, सगळं काही तसंच होतं. प्रागहून निघालेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पॅरिसला पोचली. तिथं ५० मिनिटांचा वेळ होता. काही प्रवासी पॅरिसलाच हा प्रवास संपवतात. पॅरिसहून निघालेली गाडी वाटेत कस्टमसाठी कॅलेरिस या ठिकाणी थांबली. तिथंही आमचं खास स्वागत झालं. तिथं अत्यंत आरामदायी अशा बसेस आमची वाट पाहत सज्ज होत्या. आमची आख्खी बस एका जलद जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात शिरली! आता आम्हाला इंग्लिश खाडी पार करायची होती. ४० मिनिटांत या जलद रेल्वेनं खाडी पार करून आम्हाला कॅलेला सोडलं. फोकस्टोन या स्टेशनवर आम्ही वेटिंग रूममध्ये बसलो असताना इंग्लिश बॅंडनं उत्तम प्रात्यक्षिकं दाखवून आमचा प्रवासाचा शीण घालवला. त्यानंतर आणखी एका खास रेल्वेनं आम्हाला लंडनपर्यंत पोचायचं होतं. इथून लंडनचा पाच तासांचा प्रवास आणखी एका आलिशान रेल्वेनं करायचा होता. थोड्याच वेळात एक दिमाखदार गाडी प्लॅटफॉर्मवर आली. त्या गाडीत आमच्या जागा आधीच निश्‍चित करण्यात आलेल्या होत्या. त्या गाडीचं नाव ‘बेलमाँट ब्रिटिश पुलमन एक्‍स्प्रेस’. युरोपमध्ये ज्या अनेक अत्यंत आरामदायी गाड्या आहेत, त्यांपैकी ही एक गाडी आहे. आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो. या गाडीचं महत्त्व सांगणारी आकर्षक पुस्तिका आम्हाला देण्यात आली. त्या पुस्तिकेतल्या माहितीनुसार,  जॉर्ज पुलमन या अमेरिकी माणसानं युरोपमध्ये अत्यंत आरामदायी अशा अनेक रेल्वेगाड्या सुरू केल्या; त्यांपैकी एक पुलमन एक्‍स्प्रेस. -मात्र, प्रत्यक्षात १८८२ मध्ये जेम्स शेरवूड या दुसऱ्या एका अमेरिकी माणसानं या गाडीची निर्मिती केली. या गाडीचं वैशिष्ट्य असं, की तिच्या प्रत्येक डब्याची बांधणी पूर्वी कोणत्या ना कोणत्या तरी राजा-राणीसाठी १९२० ते १९५० या काळात करण्यात आलेली आहे.
असे १४ आलिशान डबे या गाडीला जोडण्यात आलेले असल्यानं ही खऱ्या अर्थानं ‘पॅलेस ऑन व्हील’ आहे. या डब्यांची आतली मूळ रचना व कल्पना तशीच ठेवून त्यावर अपरिमित कष्ट घेऊन प्रत्येक डबा आकर्षक तऱ्हेनं साकारण्यात आलेला आहे. या डब्यातून अनेक राजेशाही लोक, मोठ्या राजकीय व्यक्ती यांनी प्रवास केलेला आहे. उदाहरणार्थ ः Audry नावाच्या डब्यातून एलिझाबेथ राणीच्या कुटुंबीयांनी प्रवास केला आहे. Cygnus या डब्यातून विन्स्टन चर्चिल यांचं पार्थिव नेण्यात आलं होतं. Phonix या डब्यातून जनरल द गोल यांसारख्या अनेक राजकीय व्यक्तींनी प्रवास केला होता. आम्ही ज्या डब्यातून प्रवास केला त्याचं नाव  होतं Lucille. १९२८ मध्ये खास स्कॉटिश राणीसाठी या डब्याची बांधणी तिच्या आवडीनुसार करण्यात आली होती.

बेलमाँट पुलमन एक्‍स्प्रेसची महती वाचत असतानाच खास इंग्लिश हाय टी आम्हाला देण्यात आला. याचा थाट काही वेगळाच होता. उंची नाजूक, सोनेरी कलाकुसर असलेल्या बोन चायनाच्या क्रॉकरीमधला आणि टिकोझी घातलेल्या किटलीतला हा गरमागरम असा इंग्लिश चहा होता. या चहाचा सुगंध काही वेगळाच होता. चहाबरोबर गरम दूधही दिलं जात होतं.

(एरवी सगळीकडं चहाबरोबर थंडगार दूध दिलं जातं). याशिवाय काकडी, चीज व भरपूर लोणी लावलेली छोटी सॅंडविचेसही चहाबरोबर देण्यात येत होती. इंग्लंडचे प्रसिद्ध चविष्ट क्रोन्स आणि क्रीम चीज, एका घासात खाता येतील अशा सुका मेव्याच्या कुकीज्‌ आणि कित्येक प्रकारचे केक पुनःपुन्हा आग्रहपूर्वक दिले जात होते. एकंदर हा खरोखरच हाय टी होता! एरवी फारसा न बोलणारा, चेहऱ्यावर कमीत कमी भाव व्यक्त करणारा इंग्लिश माणूस- इथं वेटरच्या वेगळ्या भूमिकेत असल्यानं - हसतमुखानं सगळ्या सेवा देत होता...गरम चहाचा आग्रहही वारंवार करत होता. या सगळ्या चहापानाच्या सुखदायक कार्यक्रमात पाच तास कसे गेले व पुलमन एक्‍स्प्रेस लंडनच्या व्हिक्‍टोरिया स्टेशनमध्ये कधी शिरली ते कळलंही नाही. १० मिनिटांच्या आतच बॅगा वगैरे अशी आमची सगळी सामग्री प्लॅटफॉर्मवर आमच्या हवाली करण्यात आली. अनेक लोकांचं या गाडीतून प्रवास करण्याचं स्वप्न असतं. आमचं हे स्वप्न असं साकार झालं. ओरिएंट एक्‍स्प्रेसचा आमचा सहा दिवसांचा अविस्मरणीय प्रवास लंडनला संपला; पण प्रवासाची खरी सांगता झाली ती मात्र ऑस्टिन इथं.  तिथं पोचल्यापोचल्याच आम्ही ॲगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीवर आधारित असलेला ‘मर्डर ऑन ओरिएंट एक्‍स्प्रेस’ हा सिनेमा पाहिला आणि त्या रेल्वेच्या प्रवासाचा जसाच्या तसा अनुभव घेतला! आजच्या या रेल्वेत काहीच बदल झालेला नाही, हेही त्या वेळी जाणवलं. अशा या अत्यंत वेगळ्या रेल्वेचा प्रवास करायला मिळाला, याचा खरा आनंद आम्हाला त्या वेळी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com