बाबासाहेबांच्या भूमिकेनं बळ दिलं! (अभिजित चव्हाण)

बाबासाहेबांच्या भूमिकेनं बळ दिलं! (अभिजित चव्हाण)

प्रत्येक भूमिकेनं मला काही तरी दिलं आहे आणि कलाकार म्हणून बरंच काही शिकवलं आहे. ‘गांधी आंबेडकर’ या नाटकात साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मी कधीच विसरणार नाही. या भूमिकेनं मला खूप काही दिलं. एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळाला. माझ्याकडं पाहण्याचा समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलला. एखाद्या महान नेत्याची भूमिका किती अभ्यासपूर्वक केली पाहिजे, हेही मला या भूमिकेमुळं समजलं.

रंगभूमी; तसंच छोट्या आणि मोठ्या पडद्यावर मी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यातल्या प्रत्येक भूमिकेनं मला काही तरी दिलं आहे आणि कलाकार म्हणून बरंच काही शिकवलं आहे. ‘गांधी आंबेडकर’ या नाटकात साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मी कधीच विसरणार नाही. ती भूमिका माझ्या कायम लक्षात राहील अशीच आहे आणि माझ्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण आहे. हे नाटक मिळण्यापूर्वी मी ‘यदाकदाचित’, ‘उंच माझा झोका गं’, ‘चारचौघी’ अशा काही नाटकांमध्ये काम केलं होतं. एक विनोदी कलाकार असा माझ्यावर शिक्का बसलेला होता. मात्र, बाबासाहेबांची भूमिका साकारताच तो शिक्का पुसला गेला. या नाटकाचा दिग्दर्शक प्रफुल्लचंद्र दिघेचा एके दिवशी मला फोन आला आणि ‘अमुक-अमुक नाटक आहे... त्यामध्ये तुला अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारायची आहे,’ असं त्यानं सांगितलं. खरं तर त्यापूर्वी ही भूमिका दुसरा एक अभिनेता साकारणार होता. मात्र, काही कारणामुळं त्यानं ती साकारायला नकार दिला आणि ती भूमिका माझ्याकडं आली. मग मी नाटकाची स्क्रिप्ट मागवली आणि ती संपूर्ण वाचून काढली. मला ती मनापासून आवडली आणि ‘मी हे नाटक करत आहे,’ असं कळवलं. त्यानंतर दिग्दर्शकानं मला या भूमिकेसाठी काही पुस्तकं आणि कॅसेट्‌स दिल्या. मग दिवसा रिहर्सल आणि रात्री पुस्तकांचं वाचन आणि कॅसेट पाहणं असा माझा दिनक्रम सुरू होता. त्यातच माझा मित्र किशोर चौघुले यानं मला सांगितलं, की बाबासाहेबांची भाषणं कळकळीची असायचीच; पण तरीही ते खुसखुशीतपणे आपले मुद्दे मांडायचे. मीसुद्धा तशाच प्रकारचा प्रयत्न या नाटकात केला. या नाटकातली भाषणं गंभीर स्वरूपाची होती; ती थोडी वेगळ्या ढंगात मांडली. पण, या महान व्यक्तिरेखेचा आब कायम राहील, याची पुरेपूर काळजी घेतली. मग रंगभूषा, प्रकाशयोजना, वेशभूषा या सगळ्याच गोष्टींचा मला ही भूमिका साकारताना फायदा झाला. माझ्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. समीक्षकांनी नावाजलं. एवढंच नाही, तर मध्यंतरात प्रेक्षक मेकअपरूममध्ये यायचे आणि माझ्या पाया पडायचे. मला ते अवघडल्यासारखं व्हायचं. मग आम्ही मध्यंतरात कुणीही भेटायला येऊ नये, असा बोर्ड लावला. खरोखरच या भूमिकेनं मला खूप काही दिलं. एक प्रकारचा आत्मविश्‍वास मला या भूमिकेद्वारेच मिळाला. माझ्याकडं पाहण्याचा समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलला. एखाद्या महान नेत्याची भूमिका किती अभ्यासपूर्वक केली पाहिजे, हे मला या भूमिकेमुळं समजलं.

‘कुछ मीठा हो जाये’ या नाटकातल्या भूमिकाही मजेशीर होत्या. या नाटकात पाच लेखकांनी लिहिलेल्या पाच प्रेमकथा मला साकारायच्या होत्या. शिरीष लाटकर, अंबर हडप, गणेश पंडित, अभिजित गुरू आणि आशिष पाथरे या प्रसिद्ध लेखकांनी या प्रेमकथा लिहिलेल्या होत्या. त्यातल्या एका कहाणीमध्ये मला सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची भूमिका साकारायची होती. एका कहाणीत बरीच वर्षं लग्न न झालेल्या तरुणाची भूमिका करायची होती, तर अन्य एका कहाणीत चक्क लहान बाळाची भूमिका करायची होती... अशा विविध प्रकारच्या पाच भूमिका साकारण्याची संधी मला या नाटकात मिळाली. गणेश पंडितनं हे नाटक दिग्दर्शित केलं. या नाटकाचं लेखनच अप्रतिम होतं. नुसती वाक्‍यं म्हटली, की प्रेक्षकांच्या टाळ्या मिळायच्या.

राजेश म्हापूसकर यांच्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटातली माझी भूमिका माझ्या खूप आवडीची आहे. कारण यापूर्वी मी काहीशा ‘लाऊड’ विनोदी, खलनायकी भूमिका केल्या. मात्र, या चित्रपटात नैसर्गिक अभिनय करण्याची संधी मला मिळाली. या चित्रपटासाठी मला ‘ऑडिशन’ला बोलावण्यात आलं, तेव्हा मी काहीसा नाराज झालो होतो. कारण मराठी चित्रपट आणि ‘ऑडिशन?’... परंतु ‘ऑडिशनला नाही.. भेटायला ये,’ असं नम्रता कदम मला फोनवर म्हणाली आणि मी गेलो. तिथं गेल्यानंतर माझी भूमिका मला सांगण्यात आली. नंतर पुन्हा मला बोलावण्यात आलं. त्या वेळी मला पूर्ण पटकथा वाचून दाखवण्यात आली. ती ऐकताच माझ्या डोळ्यांत पाणी आलं. माझ्यासमोर राजेश म्हापूसकरही बसले होते. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. माझी भूमिका छोटी की मोठी, हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही; या चित्रपटाचा मी एक भाग झालो, याचाच मला जास्त आनंद आहे. मला सुरवातीलाच सांगण्यात आलं होतं, की या चित्रपटात मुद्दामहून अभिनय करायचा नाही, तर अगदी नैसर्गिक काम करायचं आहे. मी जसा आहे, तसंच काम करायचं आहे. मी तसंच काम केलं. या चित्रपटात मराठीतल्या शंभरहून अधिक नामवंत कलाकारांनी काम केलं. इतके कलाकार असतानासुद्धा दिग्दर्शक राजेश म्हापूसकर कधी कुणावर रागावलेले किंवा चिडलेले दिसले नाहीत. सेटवर ते सतत हसतमुख आणि शांत. एखादा शॉट चुकला आणि तो पुन्हा घ्यायचा झाला, तर ते आमच्याजवळ यायचे. ‘काय चांगलं काम केलं तुम्ही... काय चांगला शॉट दिला तुम्ही... आपण पुन्हा असाच एक आणखी शॉट घेऊया,’ असं सांगून काही सूचना करायचे आणि तोच शॉट पुन्हा घ्यायचे. त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करताना आणखी हुरूप यायचा. या चित्रपटात काम केल्यामुळं मला खूप काही शिकता आलं. परिस्थिती कुठलीही असो.. शांत आणि संयमी राहिलं पाहिजे, हे राजेश म्हापूसकर यांच्याकडून शिकलो. आता पुढं-मागं मी कधी दिग्दर्शक झालो, तर मला राजेश म्हापूसकर यांच्यासारखा दिग्दर्शक व्हायला आवडेल. त्यांच्याइतका मी हुशार नसेन; पण गडबड न करता शांत, संयमी राहून आणि विचार करून काम कसं करायचं, हे मी त्यांच्याकडून शिकलो.
निशिकांत कामतच्या ‘रॉकी हॅंडसम’मधली फ्रान्सिस ही भूमिकाही उल्लेखनीय होती. खरं तर निशिकांतबरोबर ‘लय भारी’च्या वेळी काम करण्याची संधी मिळाली होती; पण त्या वेळी मी ‘आंबटगोड’ ही मालिका करीत होतो, त्यामुळं त्या चित्रपटात काम करता आलं नाही. मात्र, ‘रॉकी हॅंडसम’साठी मला त्यानं बोलावलं आणि मी हैदराबाद इथं चित्रीकरणासाठी गेलो. जॉन अब्राहमबरोबर एका सीनसाठी रिहर्सल केली आणि आमच्यामध्ये छान मैत्री झाली. या चित्रपटात एक स्टंट सीन होता आणि तो खूप आव्हानात्मक होता. तो करत असताना मला दुखापत झाली आणि आठ दिवस विश्रांती घ्यावी लागली. कारण, मला चालताच येत नव्हतं. मग आठ दिवसांनंतर तोच शॉट मी पुन्हा दिला. दिवस-रात्र आम्ही काम करत होतो; पण कधी थकवा जाणवला नाही. काम करताना मजा आली.

‘बिग मॅजिक’ वाहिनीवरच्या ‘अकबर बिरबल’ या मालिकेत मी अकबराची भूमिका साकारीत आहे. ही मालिका गेली तीन वर्षं या वाहिनीवर सुरू आहे. यापूर्वी या मालिकेत किक्कू शारदा ही भूमिका करत होता. काही कारणामुळं त्यानं ही मालिका सोडली आणि या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं. मी ही भूमिका करण्यास होकार दिला खरा; पण सेटवरचे सुरवातीचे दोन दिवस अतिशय तणावाचे गेले. या मालिकेत काम करणारे सगळेच हिंदी कलाकार तीन वर्षांपासून काम करत होते. हा व्यवस्थित काम करेल का, त्याला हा रोल झेपेल का, अशी त्यांच्या डोळ्यांसमोरची प्रश्‍नचिन्हं मला स्पष्ट दिसत होती. पण मी आजूबाजूच्या वातावरणाचा विचार केला नाही. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं. खूप मेहनत घेतली आणि दोनच दिवसांनंतर सेटवरचं वातावरण अगदी ‘फ्रेंडली’ झालं.
(शब्दांकन - संतोष भिंगार्डे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com