संसारावरचं तिरकस भाष्य (अभिजीत पानसे)

abhijeet panse write article in saptarang
abhijeet panse write article in saptarang

शहरी, तरुण विवाहितेच्या प्रश्‍नांकडं अगदी धमाल पद्धतीनं बघणारी "मॅरीड वूमन्स्‌ डायरीज' ही वेब सिरीज. अगदी वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आलेली आणि शहरी तरुण-तरुणींना अगदी जवळची वाटणारी ही सिरीज. तिरकस भाष्य करणाऱ्या, बोल्ड आणि खुसखुशीत अशा या वेब सिरीजविषयी...

डायरी ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते. म्हणजे एके काळी होती. डायरीत स्वतःच्या मनातील प्रामाणिक भाव, विचार, संकल्प, मूळ स्वभाव सर्व उतरत असतो. डायरी हे जणू आपल्या दाटलेल्या भावनांचं, विचारांचं "व्हेंट' असतं. नकारात्मक भावनांचं प्रदूषण बाहेर काढणारी मनरूपी घराची चिमणीच. काही वेळा आपल्या मनात एखाद्या नात्याविषयी, व्यक्तीविषयी काही अशा भावना असतात, ज्या आपण त्या व्यक्तीला सांगू शकत नाही, कारण त्यामुळं नातं बिघडू शकतं; पण मनात ठेवल्यास आपलंच मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. अशा स्थितीत डायरी लिहिणं हा सर्वोत्तम मार्ग. तर एकूण, डायरी ही "मन की बात' असते. प्रत्येकाला आपल्या मनातली गोष्ट कोणाला तरी सांगायची असते. विवाहित स्त्रीला तर खूपच. एका विवाहित स्त्रीची "मन की बात' सांगणारी एक अशीच आगळीवेगळी वेब सिरीज म्हणजे "मॅरीड वूमन्स्‌ डायरीज!'
डायरी हा विषय तसा गंभीर असला, तरी एका स्त्रीच्या हृदयाचा वेध घेणारी वेब सीरिज मात्र अजिबातच गंभीर किंवा जड नाही. खूप टवटवीत, विनोदी, हलकीफुलकी अशी ही वेब सिरीज.

हातात माइक घेऊन समोर प्रेक्षक आहेत, असं गृहीत धरून वा दाखवून शाब्दिक विनोद करत आयुष्यातल्या घडामोडी सांगण्याचे "स्टॅंडअप कॉमेडी'चे कार्यक्रम पूर्वी बरेच झाले आहेत. "मॅरीड वूमन्स डायरी' त्याच ढंगात सादर करण्यात आली आहे. श्‍वेता ही स्टॅंडअप कॉमेडियन असलेली, सुंदर तरुणी आपला पती, त्यांच्यातले रोजचे प्रसंग, घडामोडी, तिच्या मनातले त्याच्याविषयीचे विचार, कधी गंमतीचा राग, कंटाळा, सासूच्या गोष्टी, संसार यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी काल्पनिक प्रेक्षकांसमोर सांगताना या वेब सिरीजमध्ये दिसते. शहरी दांपत्यांचे प्रश्‍न हे अनेकदा जगावेगळेच असतात. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, विचार वेगळे असतात आणि हे प्रश्‍न सोडवण्याची स्टाइलही वेगळी असते. या वेब सिरीजमध्ये नेमकी त्याच अँगलनं मांडणी असल्यामुळं तोच तिचा युनिक सेलिंग पॉइंट (यूएसपी) आहे.

श्‍वेताचा पती ऋषी हा अल्लड, जबाबदारी कमी घेणारा, नेहमीच रोमॅंटिक मूडमध्ये असलेला आणि कधी आपल्या प्रेमामुळं तिला भंडावून सोडणारा. त्याच्याबद्दलचे श्‍वेताचे किस्से धमाल आहेत. अगदी छोट्याछोट्या भागांतून संसारातल्या गोष्टींवर मस्त मल्लिनाथी करण्यात आली आहे. "टूथ ब्रश', "सिक्रेट अफेअर', "लेझी स्पर्म' असे काही मजेशीर "नेटिसोड' या सिरीजमध्ये आहेत. श्वेता करिअरला महत्त्व देणारी आधुनिक स्त्री, तर ऋषीला कुटुंब वाढवायचं असतं म्हणून तो तिचा पाठपुरावा करतो, तो भाग मस्त आहे. त्याला टाळायला श्वेता एक युक्ती करते. तो वडिलांची जबाबदारी पेलण्यास अजून तयार नाही, हे ती त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते, तेही मस्त झालंय. एवढं करूनही त्याचा हट्ट सुरूच राहिल्यावर ती त्याला एक अंडं देते आणि त्या अंड्याला बाळ म्हणून एक आठवडा वागवण्याचं चॅलेंज देते. त्यात तो यशस्वी झाला, तरच आपण कुटुंब वाढवू, अशी अट घालून ती तात्पुरता मार्ग काढते. तेव्हापासून तो त्या अंड्याची बाळासारखी काळजी घेऊ लागतो आणि त्याचं नाव ठेवतो "अंडेश!' हा "वेबिसोड' खूप धमाल झाला आहे.

या सिरीजची खरी जान आहे ती श्वेता म्हणजे सुझाना मुखर्जी. तिनं यापूर्वी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत; मात्र ती या वेब सिरीजमध्ये सहज अभिनय आणि तल्लख विनोदबुद्धीनं धमाल करते. ती "एम टीव्ही रोडीज'मध्येही काही भागांसाठी स्पर्धक होती; पण "मॅरीड वूमन्स डायरी' ही सिरीज जणू तिच्यासाठीच बनली आहे, असं वाटतं. ती ही सिरीज अक्षरशः एकटी पेलते. थोडी बोल्ड असलेली ही वेब सिरीज आधुनिक जमान्यातल्या जोडप्यांचं विश्‍व उत्तम पद्धतीनं मांडते. अभिषेक रावतनंही तिला उत्तम साथ दिली आहे. कबीर सदानंद यांनी सिरीज दिग्दर्शित केली आहे. यातल्या गंमतीजमती फार काही नवीन नसल्या, तरी सिरीजची "ट्रीटमेंट' अगदी टवटवीत आहे. पारंपरिक टीव्ही मालिकांपेक्षा वेगळी, थोडी पाश्‍चिमात्य धाटणीची आणि विवाहित स्त्रीची "मन की बात' असलेली ही वेब सिरीज आवर्जून बघण्यासारखीच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com