योगायोग (अच्युत गोडबोले)

अच्युत गोडबोले achyut.gobole@gmail.com
रविवार, 13 ऑगस्ट 2017

‘यश’ या शब्दाचा अर्थ काय आणि मला मी खरोखरच यशस्वी का वाटत नाही, याची कारणं क्षणभर बाजूला ठेवली तरी मी जे काही आयुष्यात थोडंफार करू शकलो, ते खरोखरच माझ्या कर्तृत्वामुळं होतं की परिस्थितीमुळं? की योगायोगामुळं? इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या असंख्य प्रतिकूल गोष्टींपैकी एक किंवा कदाचित दोन जरी गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या असत्या, तरी मी जे काही आयुष्यात केलं, त्याच्या १०-२० टक्के तरी करू शकलो असतो का?

‘यश’ या शब्दाचा अर्थ काय आणि मला मी खरोखरच यशस्वी का वाटत नाही, याची कारणं क्षणभर बाजूला ठेवली तरी मी जे काही आयुष्यात थोडंफार करू शकलो, ते खरोखरच माझ्या कर्तृत्वामुळं होतं की परिस्थितीमुळं? की योगायोगामुळं? इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या असंख्य प्रतिकूल गोष्टींपैकी एक किंवा कदाचित दोन जरी गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या असत्या, तरी मी जे काही आयुष्यात केलं, त्याच्या १०-२० टक्के तरी करू शकलो असतो का?

परवा रस्त्यावर मला एक चाहता-वाचक भेटला. आयआयटीत शिक्षण, सीईओसारख्या उच्च पदावरचा आयटी क्षेत्रातला २३ वर्षांचा अनुभव, त्यानंतरची इंग्लिश आणि मराठीतली तीसेक गाजलेली पुस्तकं याबद्दल तो भरभरून बोलत होता. ‘तुम्ही इतकं ‘यश’ कसं मिळवलं,’ असं त्यानं मला विचारलं. ‘यश’ या शब्दाचा अर्थ काय आणि मला मी खरोखरच यशस्वी का वाटत नाही, याची कारणं क्षणभर बाजूला ठेवली तरी मी जे काही आयुष्यात थोडंफार करू शकलो, ते खरोखरच माझ्या कर्तृत्वामुळं होतं की परिस्थितीमुळं? की योगायोगामुळं? यावर मी विचार करायला लागलो आणि आयुष्यातली अनेक वर्षांची पानं मी उलटून बघितली, तेव्हा मला माझ्या ‘कर्तृत्वा’चा फोलपणा दिसायला लागला.

मी कसा वाढलो? मी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात वाढलो. मला किंवा माझ्या आई-वडिलांना रोज पाण्याच्या एकेका कळशीसाठी तीन-चार किलोमीटर चालत जावं लागलं नाही. सगळ्यात खालच्या जातीचा म्हणून शाळेतल्या वर्गात माझा कुणी दुःस्वास केला नाही. मी गव्हाळ रंगाचा असल्यामुळं वसाहतवादी वृत्तीतून आलेला गोऱ्या कातडीचा वृथा अभिमान बाळगणाऱ्यांकडून ‘काळा’ म्हणूनही माझी कुणी कुचेष्टा केली नाही. आज भारतातल्या कोट्यवधी लोकांना हे ‘भाग्य’ लाभत नाही.
मी झोपडपट्टीत वाढलो नाही. रात्रभर डासांनी मला भंडावून सोडलं नाही. आमच्याकडं वीज असल्यामुळं दिवे आणि पंखे नीट चालायचे. आम्हाला कंदिलात अभ्यास करावा लागला नाही किंवा उकाड्यानं कधी बेजार होऊन रात्री तळमळत काढाव्या लागल्या नाहीत. शेजारीपाजारी किंवा आमच्या घरी रोज कुणाची तरी दारू पिऊन भांडणं मला ऐकावी लागली नाहीत. समोरच पडलेल्या कचऱ्याचा घाणेरडा वास कधी आम्हाला आला नाही. घरासमोरच पावसाळ्यात तुडुंब वाहणारे नाले आणि गटारं आमच्या समोर नव्हती. त्यामुळं घरात कधीही कुबट वास आला नाही किंवा सतत घोंघावणाऱ्या माश्‍यांनी सतावलं नाही. वडिलांची मिळकत कमी पडते म्हणून मला शेतात गुरं राखायला जावं लागलं नाही...हॉटेलमध्ये कप-बश्‍या विसळाव्या लागल्या नाहीत...रेल्वेमध्ये खेळणी विकावी लागली नाहीत...घरोघर वर्तमानपत्रं टाकावी लागली नाहीत...कुणाकडं जाऊन घरकाम कराव लागलं नाही...आणि बालकामगार म्हणून अत्यंत गलिच्छ आणि कुबट कारखान्यात रोज १२-१४ तास कामही करावं लागलं नाही...आदिवासी आणि भटक्‍या-विमुक्तांचं आयुष्य माझ्या वाट्याला आलं नाही...आज भारतात कोट्यवधी लोकांच्या वाट्याला असं बालपण येत नाही.
मला घालायला भारी किमतीचे नसले तरी व्यवस्थित कपडे मिळाले. फाटके कपडे घालून येतो, म्हणून कुणी माझी चेष्टा केली नाही किंवा मला कपड्यांचे फक्त तेच दोन जोड रोज धुऊन घालावे लागले नाहीत. कधी अनवाणी चालत यावं लागलं नाही किंवा छत्री नाही म्हणून भिजतही घरी यावं लागलं नाही. मुख्य म्हणजे, मला खायला-प्यायला व्यवस्थित मिळालं आणि तेही पौष्टिक आणि सकस. त्यात डाळी, दूध, भाज्या भरपूर असल्यामुळं प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स असं सगळं व्यवस्थित मिळायचं. त्यामुळं मिळालाच तर फक्त एखादा वडापाव किंवा फेकून दिलेली शिळी भाकरी यावर पोट भरावं लागलं नाही. थोडक्‍यात माझं कुपोषण झालं नाही. आपल्या मेंदूची वाढ पहिल्या पाच वर्षांत होते असं म्हणतात. त्यामुळं माझ्या मेंदूची वाढ फार मोठी जरी झाली नसली, तरी जी काही झाली त्यात बाधा आली नाही. पूर्वीचं तर सोडाच, आजही ४०-५० टक्के भारतीय मुलांना हे शक्‍य होत नाहीय.

आमच्या घरी वातावरण सुरक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत होतं. म्हणजे शिकणं ही आपोआपच होणारी नैसर्गिक गोष्ट होती. याउलट माझ्या लहानपणी ५० टक्के आणि आजही जिथं ३० टक्के लोक पूर्णपणे निरक्षर आहेत आणि पुढच्या ३०-४० टक्के लोकांना जेमतेम अक्षरं वाचता येतात किंवा जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण करता येतं आणि जिथं शिक्षणाची परंपराही नाही आणि ऐपतही नाही अशा कुटुंबांत शिक्षण घेणं हाच मुळी एक पराक्रम मानला जातो. तसा तो माझ्या बाबतीत मानला जाण्याचा प्रश्‍नच नव्हता.

शिवाय, आमचं घर लहान असलं तरी ते स्वतंत्र होतं. एकाच खोलीत दोन-तीन कुटुंबं राहत आहेत, रोज कॉमन संडासासाठी किंवा पाण्यासाठी एक-दोन तास थांबावं लागतंय, सतत घराबाहेर आणि घरात गोंगाट, भांडण, मारामाऱ्या आणि शिव्या ऐकायला मिळत आहेत, बाहेरून सतत कर्ण्यावर कुठल्याशा सिनेमाची गाणी कानठळ्या बसेपर्यंत ऐकू येत आहेत, बाहेर नाक्‍यावर बेकार तरुण गुटखा खात आणि सिगारेट किंवा चरस फुंकत चकाट्या पिटत बसलेले आहेत, शेजारच्या दारूच्या गुत्त्यापासून सतत वास येतोय आणि तिथल्या भांडणांचा, आरड्याओरड्याचा आणि शिवीगाळाचा त्रास होतोय, दारू आणि चरस पिणारे मित्र मिळाले आहेत, दर दुसऱ्या दिवशी गल्लीतल्या कुणाची तरी चौकशी पोलिस करत आहेत किंवा कुणाला तरी पकडून नेत आहेत, पाऊस पडला की पूर्ण झोपडी पाण्यानं भरल्यामुळं दिवस दिवस बाहेर राहावं लागतंय आणि नंतर भांड्यांनी पाणी बाहेर काढावं लागतंय, समोरच चाललेल्या वेश्‍याव्यवसायातल्या बायका रोज पान खाऊन रस्त्यावर थुंकत आहेत आणि अचकट-विचकट चाळे करून गिऱ्हाइकांना बोलावत आहेत...हे असले कसलेच अनुभव माझ्या वाट्याला आले नव्हते.

मी गरीब शेतकऱ्याच्या घरीही जन्मलो नव्हतो. एकतर पावसाच्या भरोशावर आपलं आयुष्य अधांतरी तरंगतंय असं मी बघितलेलं नव्हतं. आपण जे पिकवतो त्याला काही महिन्यांतच किती भाव मिळणार आहे, हे माहीत नसल्यामुळं येणारी असुरक्षितता मी अनुभवली नव्हती. आपल्या हातात नसलेल्या कारणांनी मालाचे भाव पूर्ण पडल्यामुळं माल रस्त्यावर फेकून द्यावा लागून आपणच रस्त्यावर येणार आहे, याची कल्पना नसणं एवढं बेभरवशाचं आयुष्य मी किंवा माझे वडील जगत नव्हतो. शेवटी कर्जबाजारी होऊन केवळ १०-२० रुपये परत करता न आल्यामुळं माझ्या वडिलांनी विष पिऊन किंवा झाडाला टांगून घेऊन आयुष्य संपवलं नव्हतं.

मला कोणताच मानसिक आजार झाला नव्हता आणि आमच्या कुटुंबातही कुणाला स्किझोफ्रेनिया किंवा गंभीर नैराश्‍य अशा तऱ्हेचे विकार झालेले नव्हते. अशा कुठल्याही आजारामुळं संपूर्ण कुटुंब जसं उद्‌ध्वस्त होतं, तसं काहीच माझ्या आयुष्यात घडलं नव्हतं. घरात कुणी आजारी पडलं तरी औषधाला किंवा डॉक्‍टरसाठी लागणारे पैसे आमच्याकडं होते. सगळे डॉक्‍टरही ओळखीचे असल्यामुळं पैसेही कमी पडायचे नाहीत किंवा वागणूकही चांगली मिळायची. औषधांकरता किंवा एखाद्या ऑपरेशनसाठी दागिने किंवा घर गहाण टाकण्याची वेळ आईवर कधी आली नाही किंवा हॉस्पिटलमध्ये तासन्‌तास रांगेत उभं राहावं लागलं नाही किंवा त्यांची हिडीसफिडीसही वाट्याला आली नाही. हॉस्पिटलमध्ये एखाद्या चाचणीसाठी कित्येक दिवस किंवा महिने थांबावं लागलं नाही, तिथं जमिनीवर झोपावं लागलं नाही, हार्ट ॲटॅक झालेल्या वडिलांना तीन-चार किलोमीटर हॉस्पिटलपर्यंत चालवत किंवा हातगाडीवर घेऊन जावं लागलं नाही किंवा ज्यातून वाचूच शकणार नाही अशा आजारातही, फक्त पुढचे काही दिवस जगता यावेत यासाठी त्या व्यक्तीनं काढलेलं कर्ज ती व्यक्ती मृत्युमुखी पडल्यावर सगळं आयुष्य आम्हाला फेडत बसावं लागलं नाही.

मी गरीब कुटुंबातली बाईमाणूसही नव्हतो. अनेक पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा मला सहन कराव्या लागल्या नाहीत; ना बलात्कार, हुंडाबळी किंवा ऑनर किलिंग यांना मला बळी पडावं लागलं ना कुठल्याही खाप पंचायतीसमोर मला जावं लागलं. माझ्यावर कुणी ॲसिड फेकलं नाही की माझी कुणी छेडही काढली नाही. आमच्या घराशेजारीच शौचालय असल्यामुळं बाहेर उघड्यावर बसण्याची काही वेळ आली नाही. मारामाऱ्या, लूटमार, बलात्कार, छेडछाड, अपमान अशा गोष्टींना मला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळं मी सतत भीतीच्या छायेत आणि दडपणाखाली वाढलो नाही. आई-वडिलांना मी ‘नकोशी’ झालो नाही.

दंगलीमध्ये किंवा ‘धर्म किंवा जात’युद्धामध्ये हजारो लोक मारले गेले आणि लाखो बेघर झाले. जगात तर कोट्यवधी. त्यात मी कधी सापडलो नाही किंवा माझ्या समोर शेकडो निरपराध लोकांना मरतानाही मला बघावं लागलं नाही, मी निर्वासितासारखा राहिलो नाही आणि कामाच्या शोधात माझ्या आई-वडिलांना एका ठिकाणाहून दुसरीकडं सतत फिरावं लागलं नाही किंवा शहरामध्ये नाक्‍यानाक्‍यावर कुठल्याशा बिल्डिंगमध्ये काम मिळतंय का यासाठी तासन्‌तास उभं राहावं लागलं नाही, तसंच कुठल्याशा अनोळखी गावात कुठल्याही अनोळखी बिल्डिंगसाठी विटा उचलायचं कामही त्यांना करावं लागलं नाही.

ेएकूण काय तर, मी जेव्हा मागं वळून पाहतो, तेव्हा प्रश्‍न पडतो की मी जे काही तथाकथित ‘यश’ मिळवलं, ते खरंच माझं होतं की परिस्थितीचं? वर सांगितलेल्यांपैकी एक किंवा कदाचित दोन गोष्टी जरी माझ्या आयुष्यात घडल्या असत्या, तरी मी जे काही आयुष्यात केलं, त्याच्या १०-२० टक्के तरी करू शकलो असतो का?
आयुष्यातली ही रेस मी ‘वनसायडेड’च लढत होतो. मला इतर ७०-८० टक्के लोकांपेक्षा थोड्याथोडक्‍या नव्हे तर प्रचंडच प्रमाणात ‘लीड’ मिळाला होता आणि मग ‘ही शर्यत मी स्वकर्तृत्वावर जिंकली’ असल्याचं सांगत मी फिरत होतो. मलाच यातला माझा पोकळ युक्तिवाद लक्षात येत होता. अशीच प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असतानाही जे ‘यशस्वी’ होतात, त्यांचं कौतुक झालंच पाहिजे; पण एकदा त्यांचं कौतुक केलं, त्यांना पारितोषिकं दिली की मग ज्यामुळं त्यांना हा संघर्ष करावा लागला, ती भीषण परिस्थिती बदलण्याची जबाबदारी झटकता येते, हा आपल्या समाजाचा ढोंगीपणाही माझ्या लक्षात आला.

मला असं वाटतं, की सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीत समान करता येणं अशक्‍य आहे; पण निदान ही शर्यत एकाच पातळीवरून तरी सुरू व्हायला नको का?
त्यामुळंच प्रत्येकाला अन्न-धान्य, कपडे, पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, घरं, शौचालयं, करमणूक, प्रवास या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत. नाहीतर गेल्या अनेक शतकांपासून/दशकांपासून सुरू असलेली ही अन्यायपूर्वक शर्यत आपण पुढंही लढवत बसू आणि स्वतःच्या ‘यशा’बद्दल आणि ‘कर्तृत्वा’बद्दल स्वतःचीच पाठ थोपटत बसू!