श्रीदेवी - एका शापित अप्सरेचा अटळ प्रवास... 

sridevi_plastic_surgery_difference
sridevi_plastic_surgery_difference

रुपेरी पडद्यावरच्या तारकांना पृथ्वीतला वरच्या शापित अप्सरा म्हणून अनेक कवींनी आणि कलावंतानी उपमा दिली आहे. पडद्यावर झळकणाऱ्या सुंदर आणि लावण्यखाणी अभिनेत्रींच्या छबीमागे दु:ख , वेदना, अपमान आणि शोषणाची प्रचंड मोठी काळदरी पसरलेली असते याची कल्पना फार थोड्या लोकांना येऊ शकेल. जगप्रसिद्ध हॉलीवूडच्या ग्रेटा गार्बो ते मेरलिन मुनरोच्या दर्दभऱ्या कहाण्यांपासून ते आपल्या हिंदीतल्या मीनाकुमारी, मधुबाला ते श्रीदेवीपर्यंतचा या शापित अप्सरांचा आयुष्य प्रवाह कुठल्या अकल्पित वळणांनी वाहत राहतो हे सामान्य माणसांना कळणे मुश्‍कील. सेटवर काम करताना अति तणावाने व्हिवियन ली चा गर्भपात झाला होता. मेरलिनला अति रक्तस्त्रावाचा त्रास होता पण त्याबाबत तिच्या शरीराचा जास्तीत जास्त वापर करून पैसे कमावून घेण्याच्या विचाराने warner brothers चा तत्कालीन मालक असलेल्या डॅरेल झानुकने तिच्या या आजाराचं सुद्धा जाहीर भांडवल केल होत. ममता कुलकर्णी, मंदाकिनी यांचं आयुष्य चित्रपट सृष्टीवर पडद्याआडून स्वत:चा दबाव ठेवणाऱ्या माफियांनी उध्वस्त केलं. रंजना देशमुखसारख्या संवेदनशील अभिनेत्रीला अपघात झाल्यामुळे चित्रपट सृष्टीने बाजूला फेकून दिलं. तिच्या उमेदीच्या काळात तिचा फायदा करून घेणारे तिच्या अंतयात्रेला फिरकले सुद्धा नाहीत. 

आतापर्यंत जितके माहितीचे तुकडे हाती आलेत; त्यावरून सर्जरींचा अतिरेक, त्यामुळे घेतल्या जाणाऱ्या औषधांचा अतिरेक, कौटुंबिक ताण तणावाच्या मानसिक आंदोलनात व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे श्रीदेवीचा अकाली मृत्यू झाला असा अंदाज आहे. बर तो मृत्य आहे , अपघात आहे का अजून काही यावर ही अजून प्रकाश पडणे बाकी आहे. बदलत्या काळाबरोबरच प्रचंड प्रमाणात पैसा खेचणाऱ्या मनोरंजन व्यवसायात काहीतरी भयंकर चुकीचे पायंडे ही पडत चालले आहेत. 18-18 तासांच्या शिफ्ट्‌स मध्ये काम करणं, शरीर फिट ठेवण्यासाठी steroidical drugs घेणं, मनाला विरंगुळा देण्यासाठी व्यसनाच्या आहारी जाणं, गळेकापू स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करत शरीराचा चुथडा करण - या गोष्टी जवळपास प्रत्येक कलाकाराला त्याची इच्छा असो वा नसो; कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये नवीन चेहऱ्यापासून अगदी प्रस्थापित कलाकारांचाही समावेश होतो. काही महिन्यांपूर्वी अश्विनी एकबोटे पुण्यात तिच्या प्रयोगादरम्यान हृदयविकाराचा झटका येवून रंगमंचावरच कोसळली होती. तिच वय फक्त 44 होतं. तिच्याबद्दल लिहिताना शरद पोंक्षेने कलाकारांना कुठल्या प्रकारच्या आयुष्याला समोर जाव लागतंय आणि उमद्या वयात स्वत:चं आयुष्य कसं गमवावं लागतं, याबद्दल हृदयाला भिडणारा एक लेख ही लिहिला होता. अर्थात या लेखावर विचार किती केला गेला असेल हा वादाचा मुद्दा आहे. 

स्वत:ला झिरो फिगर पर्यंत आणण्यासाठी सर्जरीच कर, botox चे shot मारून घे, सिलिकॉननी ओठ मोठे कर, शरीर उठावदार दिसण्यासाठी अवयवांमध्ये सिलिकॉन भर, नैसर्गिकरीत्या असलेला चेहरा सर्जिकल करेक्‍शन करून बोजड झाल्यावर तो लपवण्यासाठी हेवी मेकअप च रोगण फास आणि त्यानंतर कॅमेऱ्या समोर उभं राहा हा ट्रेंड प्रत्येक जण न चुकता अनुसतोय. मग कुठेतरी बातमी येते कोईना मित्रा ची नाकाची प्लास्टिक सर्जरी चुकीची झाल्यामुळे तिच करीअर संपलं. तेलगु इंडस्ट्री मध्ये स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आरती अगरवाल लायपोसक्‍शन सर्जरी झाल्यावर श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे ऍडमिट असताना वयाच्या 31 व्या वर्षीच हृदयविकाराचा झटका येवून गेली. या अशा गोष्टींवर श्वास घेवून दु:ख व्यक्त करायला ना बॉलिवूडला वेळ आहे ना लोकांना याच्याशी काही देणघेणं आहे. इथे एक संपली तर तिची जागा घ्यायला 100 जणी तयार असतात. 

श्रीदेवीच्या बाबतीतच जर बोलायचं झालं तर अक्षरश: स्वत:चं वय तिने 30 च्या आत गोठवून ठेवलं होत. वयाच्या 48 व्या वर्षी जेव्हा ती इंग्लिश- विंग्लिशद्वारे तिची दुसरी इनिंग खेळायला उतरली तेव्हा विशीतल्या अभिनेत्रीला लाजवेल असा कायापालट तिने केला होता. पडद्यावर ती अप्रतिमच दिसली पण त्यापाठीमागे तिच्या दिराने उलगडलेलं 29 सर्जरींचं भयाण सत्य आता लोकांसमोर येतं आहे. श्रीचे कुठलेही जुने फोटो पाहा. सावळा चेहरा, बसकं नाक, जाड ओठ, कुरळे केस अशा द्राविडीयन सौंदर्याचा ती उत्तम नमुना होती. ज्या दक्षिणेत तिचा जन्म झाला होता तिथले सौंदर्याचे परिमाण हे उत्तर भारतात प्रचलित असलेल्या गोरी त्वचा, कमनीय बांधा या मापदंडापेक्षा मैलो दूर होते. ही मानसिक गुलामगिरी आहे का काय, माहीत नाही पण गोरी त्वचा, कमनीय बांधा, सडपातळ शरीर, सरळ चाफेकळी नाक असले विचित्र मापदंड समाजाने बाईसाठी बनवून ठेवले आहेत. या मापदंडा मध्ये जी बाई बसेल ती सुंदर नाहीतर ती कुरूप अशी कित्येक लोकांची धारणा असते. जेव्हा दक्षिणेतून भानुरेखा गणेशन, रेखा हे नाव घेवून आपलं नशीब आजमावण्यासाठी हिंदीत आली तेव्हाही तिच्या काळ्या रंगाचा लोकांनी कमालीचा तिरस्कार केला होता. तीच गोष्ट श्रीदेवीची सुद्धा झाली. दक्षिणेत कमाल हसन आणि रजनीकांत या दादा लोकांबरोबर लेडी सुपरस्टार म्हणून तिच्या सशक्त अभिनयाच्या जोरावर जे बिरूद तिने कमावलं, होत त्याची बॉलिवूडला तरी काहीच किंमत नव्हती जोपर्यंत ती हव्या असलेल्या सौंदर्यांच्या मापदंडा मध्ये बसणार नव्हती. त्यामुळे श्री बदलली. तिला बदलावंच लागलं. शरीरावर आणि चेहऱ्यावर सुऱ्या फिरवून घेवून तिला त्या मापदंडामध्ये स्वत:ला बसवावं लागलं. 

तिची मिस्टर इंडिया मधली अदाकारी असो, चांदणी मधली पांढऱ्या कपड्यात सहजपणे वावरणारी लावण्यवती असो, सदमा मधली फक्त डोळ्यांनी 70 एम एमचा कॅनव्हास व्यापून टाकणारी अदाकारी असो, लम्हे सारख्या चित्रपटातला out of the box जावून पेललेलं आव्हान असो किंवा खुदा गवाह मधली खुद्द शहनशाह अमिताभ बच्चन समोर घट्ट पाय रोवून उभा राहत साकारलेली बेनझीर असो, श्रीने अभिनयाच्या प्रत्येक साच्यात स्वत:ला बसवलं आणि बॉलिवूड गाजवलं सुद्धा. लेडी सुपरस्टार हे बिरूद मिळवणारी ती एकमेव अभिनेत्री ठरली. 

प्रचंड पैसा, प्रचंड प्रसिद्धी, पुरस्कार, अमाप लोकप्रियता त्याच्यानंतर बोनी कपूरशी वादग्रस्त विवाह करून पत्करलेली चाहत्यांची नाराजी, मुलींच्या जन्मानंतर घेतलेला चित्रपट संन्यास इतके टप्पे पार करून आयुष्यात हवे असलेले बहुतांशी सर्व यश मिळवल्यानंतर सुद्धा तिला सेकंड इनिंग खेळाविशी वाटली. तिने ती खेळून आजही आपण बॉलीवुडच्या शिखरावर असलेल्या कुठल्याही अभिनेत्रीला काट्याची टक्कर देवू शकतो हे दाखवून ही दिलं. पण हे करताना आजच्या पिढीबरोबर राहण्याची धडपड, पुन्हा एकदा त्याच प्लास्टिक सर्जरींचा चक्रव्यूह, चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसू नये म्हणून दर वेळी केलं जाणारं विखारी प्रोसिजर असा संपूर्ण चेहऱ्याचा, संपूर्ण शरीराचा कायापालट पन्नाशी ओलांडलेल्या, थकलेल्या शरीराला झेपत होता का? 

मागे एकदा घरी गेले असताना नेहेमीप्रमाणे आई च्या हातून रिमोट हिसकावून घेवून सगळे चॅनेल फिरवत असताना एका ठिकाणी श्री दिसली होती तिच्या मॉम या चित्रपटा बद्दल बोलताना. गाल, जबडा ,नाक, ओठ, डोळे या ठिकाणी केलेल्या सर्जिकल करेक्‍शन मुळे तिला बोलताना, ओठांची उघडझाप करतानाही त्रास होत होता हे दिसून येत होतं. आज जरी इन्स्टावर तिचा शेवटचा फोटो पाहिला तरी ती एकदम सामान्य, फिट, चांगल्या शारीरिक मानसिक अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्ती सारखीच दिसते पण खरच असं होतं का? वयाच्या 54 व्या वर्षी ही 30 व्या वर्षा सारखी दिसण्याची धडपड, अतोनात प्रमाणात केलेल्या प्लास्टिक सर्जरी, त्या सर्जरींचे इतर दुष्परिणाम टाळण्यासाठी ज्या ठिकाणी सर्जरी झाल्या त्या अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सततच्या वाऱ्या, वजन कमीत कमी ठेवण्यासाठी केले जाणारे fad diets, शरीरातले नैसर्गिक हार्मोन्स बंद झाल्यामुळे कृत्रिमरीत्या steroidical drugs टाकून त्याच्या आधारावर उभी केलेली फिरणारी स्लिम, ट्रीम अशी जिवंत डेडबॉडी बनली होती ती!

तिच्या पोस्टमोर्टेम रिपोर्ट वरून तिच्या दारू पिण्याच्या सवयीचं सत्य हे अधोरेखित होत आहे. आयुष्यात सगळं काही अमाप मिळवून आणि कमावूनसुद्धा रुपेरी पडद्यावर स्वत:च तेच लावण्यखणी रूप शेवटपर्यंत झळकावण्याचा अट्टाहास श्री सारख्या गुणी आणि संवेदनशील अभिनेत्रीला तिच्या जीवाची किंमत मोजून चुकवावा लागला. शेवटपर्यंत सोन्यासारखी झळाळणारी तिची कारकीर्द शेवटच्या क्षणी तिच्या अकाली मृत्युचं गालबोट लागून निस्तेज झाली. खरचं का तिने व्यसन करावं इतकी निराशा किंवा हताशा तिच्या आयुष्यात होती का, याचं उत्तर कुणाकडेच नाही. 

श्रीच्या मृत्यूचं गूढ अजूनही अज्ञात आहे. कदाचित नवनवीन सत्य बाहेर येवू ही शकेल. मनुष्य दारु पिऊन मरतो. पण त्याला मुळात दारुचं व्यसन का लागु शकतं, या गोष्टींचा त्याच्या मरणाशी अर्थाअर्थी संबंध जोडता येत नाही. पोस्टमोर्टेम रिपोर्ट फक्त माणूस दारू पिऊन पाण्याच्या टबात पडून मेला इतकं फक्त सांगू शकतो; पण त्याला दुसरा काही त्रास होता. दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा ताण होता, मग त्याने शरीराला न पेलणारी ऑपरेशन्स केली होती. त्याचा परिणाम होऊ नये म्हणून भरपूर औषध गोळ्या त्याला खाव्या लागत होत्या. त्याचाही तणाव त्याला कदाचित झेपत नव्हता, त्याचं कौटुंबिक आयुष्य बिघडलेलं होतं ही असली अनेक कारणे कितीही बरोबर असतील तरी त्या अहवालात मध्ये ती येत नाहीत.

फेसबुकवर माझ्या मित्रयादीत सिने सृष्टीचे रंग जवळून पाहणाऱ्या एका मित्राने त्याच्या पोस्ट मध्ये एक शब्द वापरला होता - रंगरंगोटी केलेली सडत चाललेली हडळ. तो शब्द श्रीदेवी बद्दल बिलकुल नव्हता. जिवंत, रसरशीत माणूस या चकाचौंध मायानगरी मध्ये आल्यावर त्याचं रुपांतर हळूहळू शरीरातल्या हाडामासाच्या जागी सर्जऱ्या करून भरलेल्या सिलिकॉनच्या सापळ्यात कसं होतं, असा या चित्रपटसृष्टीच्या एकूणच ढोंगीपणाच्या वर्मावर आघात करणारा आशय त्यातून व्यक्त होत होता. मग व्यसन दारुचं असेल किंवा स्वत:वर 29 वेळा सर्जरी करुन घेण्याचं असेल. स्वत:च्या नवऱ्याच्या पैसे कमावण्याच्या ईर्ष्येसमोर मान तुकवून स्टारडमच्या पाठीमागे धावणं असेल, सारासार विवेकबुद्धी गमावणं असेल किंवा दारूच्या नशेत स्वत:चा तोल जावून जीव गमावणं असेल. 

श्रीदेवीची चिता रचण्याच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या सार्वभौमत्वाचा डंका पिटणाऱ्या या मायावी चित्रपटसृष्टीने या सगळ्याची गोळाबेरीज जरूर करावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com