बेबंद गारव्याला वेसण (आदित्य चुनेकर)

aditya chunekar
aditya chunekar

नव्यानं बाजारात येणाऱ्या एअर कंडिशनरचं डिफॉल्ट तापमान (एसी सुरू होण्याच्या वेळचं तापमान) 24 अंश सेल्सिअस असं निश्‍चित करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्रालयानं संबंधित कंपन्यांना दिले आहेत. यांमुळं ऊर्जा वाचेल आणि आरोग्यावरही चांगले परिणाम होतील, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे. या निर्णयामुळं नेमकी किती ऊर्जाबचत होईल, त्याचे फायदे-तोटे काय, जगभरातला "ट्रेंड' कसा आहे, माणसाच्या शरीराला खरंच अतिगारव्याची आवश्‍यकता असते का, कृत्रिम गारव्यामुळं दीर्घकालीन काय परिणाम होतात आदी सर्व पैलूंचा वेध.

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं नव्यानं बाजारात येणाऱ्या एअर-कंडिशनचं डिफॉल्ट (सुरू होण्याच्या वेळचं) तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवण्याचे नुकतेच निर्देश दिले आहेत. ऊर्जामंत्री राजकुमारसिंह यांनी याबाबत घोषणा केली आणि ऊर्जा मंत्रालय एसी उत्पादकांबरोबरच हॉटेल्स, मॉल्स, विमानतळ आणि सरकारी कार्यालयांमध्येही वातानुकूलित जागांचं डिफॉल्ट तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवण्याची सूचना देणार असल्याचं सूतोवाच केलं. एसीचं तापमान एका अंशांनी जरी वाढवलं, तरी विजेचा वापर सहा टक्‍क्‍यांनी कमी होतो. सगळ्यांनी एसीचं किमान तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवलं, तर भारताचा विजेचा वापर तब्बल दोन हजार कोटी युनिट्‌सनी कमी होईल, असं ऊर्जामंत्र्यांचं मत आहे. भारतातल्या विजेच्या एकूण वापरापैकी अंदाजे दीड टक्का एवढी वीज एका छोट्याशा कृतीनं वाचत असेल, तर त्याची नक्कीच अंमलबजावणी केली पाहिजे; पण याचा अर्थ काय आणि ही बचत नक्की कशी साध्य होईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

सर्वांत आधी आपण 24 अंश सेल्सिअस या आकड्याबद्दल बोलू. वातानुकूलित जागांमध्ये कुठल्या तापमानाला लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल, ही खरं तर प्रत्येकाची वैयक्तिक आणि व्यक्तीनुसार बदलणारी बाब आहे. भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) "नॅशनल बिल्डिंग कोड'नं वेगवेगळ्या प्रकारच्या इमारतीसाठी दिलासादायक तापमानाचे संदर्भ दिले आहेत. त्यानुसार, सेंट्रल एअर-कंडिशन्ड इमारतीत 23 ते26 अंश सेल्सिअस, मिश्र पद्धतीच्या इमारतीत 26 ते 30 अंश सेल्सिअस आणि एसी नसलेल्या इमारतींत 29 ते 34 अंश सेल्सिअस तापमान ठेवल्यास लोकांना आराम मिळू शकतो. मिश्र पद्धतीच्या इमारतीमध्ये जास्त उकाडा झाला, तरच एसी चालू केला जातो. अर्थात हे साधारण प्रातिनिधिक चित्र आहे आहे आणि नेमकं तापमान लोकांच्या सवयीवर अवलंबून असतं. काही सर्वेक्षणांत असं दिसून आलं आहे, की लोक 26 ते 32 अंश सेल्सिअस या तापमानातही समाधानी असू शकतात. त्यामुळं किमान तापमानाबाबत नेमका आकडा प्रत्येकाची आवड, गरज आणि इतर गोष्टींनुसार बदलता असला, तरीही किमान आवश्‍यक तापमान 24 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नाही, तर उलट जास्तच असेल. पण समजा किमान तापमान निश्‍चित करायचं झालं, तर त्याचा लोकांच्या वागणुकीवर कसा फरक पडेल?

छोट्या एसींच्या वापरावर परिणाम
घरांत, छोट्या दुकानांत आणि छोट्या ऑफिसमध्ये एक ते तीन टनचे रूम एसी वापरले जातात. या एसींच्या उत्पादकांनी सरकारच्या प्रस्तावित योजनेला होकार दिला आहे. सध्याचे एसी सगळ्यांत सुरुवातीला 18-19 अंश सेल्सिअसला सुरू होतात. त्यानंतरच्या काळात एसी सुरू केला, की तो संबंधित व्यक्तीनं बंद करताना वापरलेल्या शेवटच्या तापमानाच्या सेटिंगला सुरू होतो. आता नवीन सूचनेनंतर एसी नेहमी 24 अंश सेल्सिअसलाच सुरू होईल. एसी सुरू झाल्यावर तुम्हाला सेटिंग बदलायचं असेल, तर तुम्ही बदलू शकता. ते 18 अंश करू शकता किंव्हा 28 अंश; पण पुढच्या वेळी एसी परत 24 अंश सेल्सिअसलाच सुरू होईल. यामागचा हेतू असा, की तुम्ही एसी नेहमी 20 डिग्री सेल्सिअसला वापरत असला, तर तुम्हाला प्रत्येक वेळी तापमान कमी करताना जाणीव होईल, की एसी 24 अंश सेल्सिअसना वापरल्यानं विजेचा वापर कमी होतो आणि हळूहळू तुमची सवय बदलेल. मात्र, तेच जर तुम्ही नेहमी 27 अंश सेल्सिअसला एसी वापरत असाल, तर मात्र उलटा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच ऊर्जा दक्षता ब्युरो (बीईई) या योजनेचं पहिले चार-पाच महिने सर्वेक्षण करेल आणि मगच ही योजना सक्तीची करेल. यामध्ये डिफॉल्ट तापमानाबाबतही अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. एक पर्याय असा असू शकतो, की लोकांचं एसी बंद करण्यापूर्वीचं सेटिंग 24 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल, तरच डिफॉल्ट पर्याय लागू होईल. जर ते 24 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर त्याच सेटिंगला एसी परत सुरू होईल.

केंद्रीत वातानुकूलित प्रणालीवर परिणाम
मोठी ऑफिसेस, मॉल्स, हॉटेल्स इत्यादी जागांमध्ये केंद्रीत वातानुकूलित प्रणालीचा (सेंट्रल एअर-कंडिशनिंग) वापर होतो. या जागांमध्ये या योजनेचा प्रभावशाली वापर होऊ शकतो. याचं कारण असं, की या बहुतांश जागांमध्ये तापमान फार कमी (18 ते 21 अंश सेल्सिअस) ठेवण्याचं प्रमाण जास्त आहे आणि केंद्रीत नियंत्रण असल्यानं त्यात बदल करणं तुलनेनं सोपं असतं. मात्र, ऊर्जा मंत्रालयाच्या नियमावलीमध्ये या संस्थांबरोबर ही योजना कशी राबवली जाईल, याचा तपशील नाही. याच्यासाठी जपानमध्ये राबवली जाणारी "कूल बिझ' मोहीम हे उत्तम उदहारण ठरू शकतं. 2005 च्या उन्हाळ्यात जपान सरकारनं आपल्या सर्व इमारती, वाचनालयं, समुदाय केंद्रं यांसारख्या सार्वजनिक इमारतींना वातानुकूलित प्रणालींचं तापमान 28 अंश सेल्सिअस ठेवणं बंधनकारक केलं. या तापमानात काम करताना त्रास होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोडसुद्धा शिथिल करण्यात आला. त्यांना सूट आणि टायच्या ऐवजी उन्हाळी पोशाख घालण्याची परवानगी देण्यात आली. सुरवातीला या मोहिमेवर बरीच टीका झाली. जपानसारख्या रुढीप्रिय देशामध्ये लोक कामासाठी सूट आणि टायऐवजी दुसऱ्या पोशाखात जातील का, अशी शंका बऱ्याच जणांनी व्यक्त केली. मात्र, जपान सरकारनं नेटानं ही मोहीम राबवली आणि जनतेत जागरुकता वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. स्वतः पंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांनी उन्हाळी पोशाखात मुलाखती दिल्या. तेव्हापासून दर उन्हाळ्यात ही मोहीम राबवली जाते. 2011च्या त्सुनामीमुळं आण्विक वीज प्रकल्प बंद झाल्यानंतर आलेल्या वीजतुटीच्या समस्येला तोंड देण्यासाठी जपाननं "सुपर कूल बिझ' मोहीम सुरू केली. कर्मचारी आता टीशर्टस आणि शॉर्टसमध्येही ऑफिसला जाऊ शकतात. त्याचबरोबर ऑफिसमधलं तापमान कमी ठेवण्यासाठी पडदे, आच्छादन इत्यादींचा वापर केला जातो. दर सकाळी विजेच्या अपेक्षित पुरवठ्याचा आणि मागणीचा अहवाल टोकियोच्या बातम्यांमध्ये आणि मेट्रोवर सांगितला जातो. 2011 मध्ये या मोहिमेमुळं टोकियो परिसरात अंदाजे बारा टक्के विजेची बचत झाली. भारतातसुद्धा अशा धर्तीवर मोहीम राबवल्यास लक्षणीय विजेची बचत होऊ शकते.

याच्या व्यतिरिक्त काय?
आपण पाहिलं, की वातानुकूलित जागांचं डिफॉल्ट तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवण्याचा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला, तर विजेचा वापर कमी होऊ शकतो. त्याचबरोबर या उपक्रमामुळं ऊर्जाबचतीबद्दल जनजागरुकता वाढू शकते. त्याच्यामुळं लोक फक्त एसीच नाही; पण इतर उपकरणंसुद्धा दक्षतेनं वापरतील. मात्र, याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्‍यकता आहे. सध्या भारतात फक्त चार ते पाच टक्के घरांमध्ये एसी आहे. वाढतं घरगुती उत्पन्न, शहरीकरण आणि वाढती उष्णता यांमुळं एसींच्या वापरात वाढ होत चालली आहे. हे एसी चालवण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या निर्मितीला जी नैसर्गिक साधनं लागतात, त्यांचा साठा मर्यादित आहे. शिवाय वाढत्या वीजउत्पादनामुळं विविध सामाजिक आणि पर्यावरणविषयक समस्याही उभ्या राहतात. एसीच्या बाबतीतली एक विशिष्ट गोष्ट म्हणजे त्याचा वापर दिवसाच्या उच्च वापराच्या (पीक) वेळेत होतो. ती पुरवण्यासाठी विजेचे प्रकल्प बांधावे लागतात- जे फक्त उच्च वापराच्या वेळेतच उपयोगी पडतात आणि बाकी वेळी निष्क्रिय असतात. या सर्व कारणांमुळं एसींचा वापर कमी करणं अपरिहार्य आहे.
एसी किमान वापरणं हा विजेचा वापर कमी करण्याचा सर्वांत उत्तम पर्याय. हवा खेळती ठेवणारे इमारतींचे आराखडे आणि उष्णतारोधक बांधकाम साहित्य यांचा वापर करून एसीशिवायसुद्धा उकाड्यापासून आराम मिळू शकतो. ऊर्जा दक्षता ब्युरोचे एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड (ईसीबीसी) अशा इमारतींना प्रमाणित करतात. त्यांची संख्या वाढण्यासाठी ईसीबीसीबद्दलची जागरुकता वाढली पाहिजे- जेणेकरून ग्राहक घर विकत घ्यायच्या आधी बिल्डर्सना याच्याबद्दल विचारतील. एसीचा वापर समजा आवश्‍यकच असेल, तर ऊर्जा-कार्यक्षम एसी वापरणं उपयुक्त ठरेल. बीईईचा स्टार लेबल प्रोग्रॅम ग्राहकांना एसीच्या वीजवापराबद्दल माहिती देतो. जितके जास्त स्टार, तितका तो एसी जास्त कार्यक्षम. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक एसीवर हे लेबल असणं बंधनकारक आहे. वार्षिक विक्रीच्या आकड्यांनुसार, थ्री-स्टार एसींचा खप जास्त दिसतो. फाइव्ह-स्टार एसी महाग असला, तरी विजेच्या बिलामध्ये होणाऱ्या बचतीमुळं तोच जास्त फायदेशीर ठरतो. याच्याबद्दलसुद्धा जागरुकता वाढायला हवी.

रेफ्रिजरेटरकडंही लक्ष द्या
एसीशिवाय घरात आणखी एक उपकरण आहे- ज्याच्या विजेच्या वापराबद्दल आपण जास्त विचार करत नाही; पण कधीकधी ते एसीएवढंच किंबहुना जास्तच वीज खाऊ शकतं. हे उपकरण म्हणजे रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर घरात 24 तास सुरू असतो. एसी नसलेल्या घरात एकूण वीजवापराचा 25 ते 50 टक्के भाग रेफ्रिजरेटरमुळं असू शकतो.
काही जुने, अकार्यक्षम, रेफ्रिजरेटर नवीन रेफ्रिजरेटरपेक्षा तब्बल चार ते पाचपट जास्त वीज खाऊ शकतात- ज्याच्यामुळं आपला विजेचा वार्षिक खर्च चार ते पाच हजार रुपयांनी वाढू शकतो! एसीमुळं उन्हाळ्याच्या महिन्यात एकदम बिल वाढतं, म्हणून आपण एसीच्या वापराबद्दल जास्त जागरूक असतो; पण रेफ्रिजरेटरकडं आपण जास्त लक्ष देत नाही- कारण त्याच्यामुळं आपलं बिल एकदम वाढत नाही. प्रयास ऊर्जा गट या आमच्या संस्थेतर्फे घरगुती वापरातल्या वेगवेगळ्या उपकरणांकडून होणारा वीजवापर आणि त्याचा घराच्या एकूण विजेच्या वापरावर होणाऱ्या परिणामाचा आम्ही सध्या अभ्यास करतो आहोत. यासाठी आम्ही पुण्यातल्या काही घरांचा आणि त्यातल्या उपकरणांचा वापर आधुनिक स्मार्ट मीटर लावून अभ्यास करत आहोत. याचा पूर्ण डेटा www.emarch.watchyourpower.org या संकेतस्थाळावर उपलब्ध आहे.

बऱ्याच छोट्याछोट्या कृतींचा एकत्रित परिणाम घरगुती वीजवापरावरती लक्षणीय ठरू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी एसी सुरू करताना तो मुळात त्या वेळी आवश्‍यक आहे की नाही, याचा आधी विचार करा आणि मग 24 अंश सेल्सिअसच्या वरतीच तापमानाचं सेटिंग ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com