आक्रमक खेळाशिवाय तरणोपाय नाही!

आक्रमक खेळाशिवाय तरणोपाय नाही!

विजयासाठी प्रचंड भुकेलेल्या अन्‌ आक्रमक झालेल्या खेळाडूंमुळे सध्या भारतीय क्रिकेटने मोठी उभारी घेतली आहे. यापूर्वीच्या दिग्गज खेळाडूंपेक्षा आपल्या गुणवत्तेचे नाणे खणखणीत असल्याचे सध्याच्या खेळाडूंनी सिद्ध करून दाखविले आहे. आक्रमक कामगिरीचा हा आलेख असाच कायम राहायला हवा.

सध्या सुरू असलेली भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिका नको त्या कारणांसाठी चर्चेत असताना आणि निवडणूक निकालांचा गदारोळ सुरू असतानाच क्रिकेटबाबत मी काही खळबळजनक खुलासे करणार आहे. पहिला मुद्दा असा, की जोपर्यंत सभ्य, क्‍लबकडून खेळणारे आणि चांगल्या परिवारांमध्ये वाढलेले खेळाडू खेळत होते, तोपर्यंत आपल्या संघाची प्रगती बांगलादेशच्या संघाप्रमाणे होती. दुसरी बाब अशी, की 'ऑक्‍सफर्ड', 'हिंदू', 'स्टिफन'मध्ये शिकलेल्या सुशिक्षित पिढीनंतर भारतीय संघात छोट्या शहरांतून आलेल्या 'हिंदी मीडियम टाइप' प्रकारातील खेळाडूंचा उदय होऊ लागला. पुढील 25 वर्षांत हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत गेले. सर्वोत्तम महान भारतीय खेळाडूंचा संघ निवडायचे ठरवले, तर त्यात 1992 पूर्वीच्या अवघ्या तीन दिग्गज नावांचा (गावसकर, विश्‍वनाथ आणि कपिल) समावेश करावा लागेल. भारताच्या महान फिरकीपटूंच्या चौकडीनेही (बिशनसिंग बेदी, ई. प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर, एस. वेंकटराघवन) उत्कृष्ट कामगिरी बजावलेली असली, तरी या ज्येष्ठांना अनिल कुंबळे, हरभजनसिंग, रवीचंद्रन अश्‍विन आणि 'सर' रवींद्र जडेजा यांनी मागे टाकले.
आणखी दोघांचा येथे उल्लेख करायला हवा. त्यातील पहिले म्हणजे भारतातील उत्कृष्ट क्रिकेट संख्यातज्ज्ञ मोहनदास मेनन अन्‌ दुसरी गोष्ट म्हणजे माजी कसोटीपटू आणि निवेदक आकाश चोप्रा याने लिहिलेले 'नंबर्स डोन्ट लाय' (हार्पर कॉलिन्स) हे नवे पुस्तक. फक्त रंजक किस्से आणि 'नॉस्टालजिया' यामुळे खेळाडू महान ठरत नाही, तर त्यासाठी मजबूत आकडेवारीचा आधार हवा असतो, हे चोप्रांच्या पुस्तकांने सप्रमाण सिद्ध करून दिले आहे.


भारताने 1932 ते 1967 या कालावधीत शंभर कसोटी सामने खेळण्याचा टप्पा पूर्ण केला. त्यापैकी अवघे दहा जिंकले आणि चाळीस कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला. पहिल्या शंभर कसोटी सामन्यांमध्ये भारताने बांगलादेशपेक्षाही खराब कामगिरी नोंदविली होती. बांगलादेशने 2000 पासून 98 कसोटी सामन्यांपैकी अवघ्ये आठ जिंकले होते. विनू मंकड, लाला अमरनाथ, पॉली उमरीगर, पंकज रॉय, सी. के. नायडू, सुभाष गुप्ते, नरी कॉन्ट्रॅक्‍टर, बापू नाडकर्णी, नवाब पतौडी, चंदू बोर्डे आणि इतर अनेकांनी उजवी कामगिरी केली होती. मागील 25 वर्षांमध्ये (1967-91) भारताने 174 पैकी 34 कसोटी सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला. या काळात जिंकण्याची टक्केवारी दुप्पट झाली. त्यापुढील 25 वर्षांमध्ये (1992 ते आजपर्यंत) जिंकण्याची टक्केवारी पुन्हा दुप्पट (39.2 टक्के) झाली. या काळात भारताच्या पराभवाच्या टक्केवारीत घट होत गेली.
भारतीय क्रिकेटच्या या प्रगतीमध्ये आणखी एक महत्त्वाचा 'ट्‌विस्ट' आहे. नोव्हेंबर 2000 मध्ये सौरभ गांगुली हा भारतीय संघाचा कर्णधार झाला आणि त्यानंतरच्या 177 कसोटी सामन्यांमधील विजयाची टक्केवारी वाढत गेली, तर पराभवांची संख्या घटत गेली. 43.5 टक्के विजयाच्या टक्केवारीसह भारताने ऑस्ट्रेलिया (60.6 टक्के) आणि दक्षिण आफ्रिका (49 टक्के) यांच्यानंतरचे तिसरे स्थान पटकावले. या क्रमवारीत भारताने इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान यांनाही मागे टाकले.
गांगुलीच्या कारकिर्दीमध्ये वादविवादांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. आक्रमक असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तितक्‍याच आक्रमकतेने गांगुली सामोरा गेला. लॉर्डसच्या बाल्कनीत उभे राहून आपले 'टी शर्ट' काढणाराही गांगुलीच होता. 'एससीसी'चे आमंत्रण नाकारून अशा प्रकारांना सुनील गावसकरने काही प्रमाणात सुरवात केली होतीच.


गांगुलीच्या काळातच भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलत होता. लहान शहरांमधील, इंग्रजी माध्यमांत न शिकलेले आणि महाविद्यालयांमध्येही पाय न ठेवलेले (सचिन तेंडुलकरसह) खेळाडू भारतीय संघात दाखल झाले. दुसऱ्या शब्दांत याचे वर्णन 'संप्रेरकांचा विस्फोट' असे करायला हरकत नसावी. याच काळात भारतीय हॉकीनेही आपल्या दृष्टिकोनात आणि कामगिरीत मोठा बदल घडवून आणला. दरम्यान, लियंडर पेसने 'डेव्हिस कप'मध्ये चमकदार कामगिरी केली. तिकडे भारतीय क्रिकेट संघटनेच्या प्रशासनातही मोठे बदल होत गेले. विजय मर्चंट, राजसिंह डुंगरपूर, माधवराव शिंदे, आर. पी. मेहरा फत्तेसिंहराव गायकवाड आदींच्या ज्येष्ठांच्या पिढीपेक्षा त्यांच्यानंतर आलेले जगमोहन दालमिया, आय. एस. बिंद्रा, ललित मोदी आणि एन. श्रीनिवासन हे उजवे ठरले. आता सर्वच चित्र बदलेले पाहावयास मिळते आहे.


भारतीय क्रिकेटमधील हे बदल अनेकांना पचवता आले नाहीत. आत्ताचे आपल्या संघातील फिरकीपटू बेदी-प्रसन्ना यांच्या तोडीचे नसतीलही; मात्र चौकार मारल्यानंतर फलंदाजीसाठी ते कधीही टाळ्या वाजविणार नाहीत. उलट त्यानंतर ते फलंदाजांवर आणखी धारदार हल्ला चढवतात. गांगुलीच्या आगमनानंतर भारतीय क्रिकेटमध्ये झालेला हा मोठा बदल म्हणावा लागेल. गांगुलीच्या येण्याआगोदर फक्त कपिल देव हा एकटाच आक्रमक खेळाडू आपल्याकडे होता. 1992मध्ये केप्लर वेसेल्स आणि कपिल यांच्यात जे झाले तसे आजच्या कोहली, इशांत शर्मा, अश्‍विन किंवा जडेजासोबत झाले, तर त्यांची प्रतिक्रिया किती तीव्र असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

अशाच प्रकारची कामगिरी तिकडे इम्रान खानने केली होती. कमी शिकलेल्या, मुख्यत्वे पंजाबी बोलणाऱ्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचे 1970च्या दशकाच्या अखेरीस इम्रानने सर्वोत्तम संघात रूपांतर केले होते. त्याने ज्या पद्धतीने खेळात आक्रमकता आणली, तेच गांगुलीमुळे भारताच्या बाबतीत झाले.
तर अशा आक्रमकता धारण केलेल्या आजच्या भारतीय संघाला आता नवे बोर्ड खानदानी सभ्यता शिकविण्याचा प्रयत्न करत असून, क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे, असा त्यांचा जुना समज अजूनही कायम आहे.
(अनुवाद : अशोक जावळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com