बुकं तर द्याच, पण 'बुके'ही द्या

Flower Bouquet
Flower Bouquet

सध्या सांस्कृतिक क्षेत्रात एक 'फॅड' आलं आहे. हे फॅड म्हणजे 'बुके नको, बुकं द्या'. अनेक कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः पुस्तकांचे व्यापारी या नव्या 'फॅड'चा जोमानं प्रचार करताना दिसतात. सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर असलेली मंडळीही अशी फॅडं उचलून धरतात आणि फुलांकडे पाठ फिरवतात. 

का द्यायची नाहीत फुले? ...तर म्हणे पैसे वाया जातात..... फुलांचा गुच्छ एखादाच दिवस टिकतो, दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातो. पुस्तके आपल्याला आयुष्यभर साथ देतात....युक्तीवाद बिनतोड आहेत. पण तरीही नीट विचार केला तर पटणारे नाहीत. फुला-पानांच्या साथीत आपलं मराठमोळं साहित्य बागडलं. फुलांच्या रंगातून, गंधातून अनेक कविता कवींच्या लेखणीतून उतरल्या आणि मग त्या पुस्तकात शिरल्या. याच फुलांनाच बाद करायचं?

एखाद्या प्रियकराने आपल्या प्रियेला पुस्तक देऊन 'प्रपोज' केल्याचं ऐकलंय कुणी? नाही. त्यासाठी फुलाचीच आवश्यकता भासते. माझी आठवण आयुष्यभर रहावी म्हणून हे अमुकचं आत्मचरित्र मी तुला देतोय...असं सांगितलं तर प्रेम फुलेल काय? तेच प्रियकराने पहिल्या भेटीत दिलेलं गुलाबाचं फूल एखादी हळूवार तरुणी आपल्याकडच्या पुस्तकातच जपून ठेवेल आणि पुढे कधीतरी पुस्तक उघडल्यावर वाळलेलं ते फुल पाहून जुन्या आठवणीत रमेल. 

या फुलांवरच राग का? पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके का द्यायची. साहित्याचं, प्रेमाचं सोडा...जरा व्यवहारी जगात पाहिलं तर ही फुलं पिकवतो कोण? शेतकरीच ना? त्याच्याशी का वैर धरताय? त्याला उपाशी का मारताय? बळीराजाच्या या देशात त्याच्याच मालावर बहिष्कार टाकायचा? आज देशभरात हजारो शेतकरी याच फुलांच्या उत्पन्नावर जगताहेत. अनेक जण मोठेही झालेत. ग्रीन हाऊस आणि ओपन फार्मिंगच्या माध्यमातून फुलांचे उत्पन्न घेताहेत. फुलांची निर्यातही करताहेत. आपण जर त्यांची फुलंच घेण्याचं बंद केलं तर?

रुक्ष आकडेवारीतच बोलायचं तर देशात वर्षाला सुमारे दोन हजार टन फुलांचे उत्पन्न होते. बाहेरच्या अनेक देशात आपल्या देशातून फुले जातात. केवळ आपणच तथाकथित पुढारलेपणातून 'बुके नको...'ची भूमीका घेतो. पुस्तके भेट द्यावीत या वावगे काहीच नाही. पण सरसकट फुले नकोच म्हणणे हे फूल उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. केवळ आपला व्यवसाय वाढावा याच हेतून पुस्तक निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांनी कथित सुशिक्षितांच्या डोक्यात भरवलेले हे खूळ आहे, असे मला तरी वाटते. 

फुलांचा आणि दुधाचा व्यवसाय एका परिने सारखा आहे. सकाळी काढलेले दूध तातडीने डेअरीत नेऊन टाकावे लागते नाहीतर ते खराब होतं. फुलांचंही तसंच आहे. एकदा खुडलेली फुलं बाजारात नेली नाहीत तर ती खराब होतात. त्यामुळे त्यांचा उठाव होणं गरजेचं असतं. दुसऱ्या बाजूला चायनीज कृत्रिम फुलांचाही धोका फुल उत्पादकांसमोर आहे. तिथली शोभिवंत कृत्रिम फुलं दिवाणखान्यातल्या, सभासमारंभातल्या खऱ्या फुलांची जागा घेताहेत. अशा परिस्थितीत फुल उत्पादक शेतकरी जगला पाहिजे. समाजानंही फुल उत्पादकांचा माल खरेदी करुन त्याला उभारी द्यायला पाहिजे. जर फुलं विकलीच गेली नाहीत, तर हे शेतकरी कुठं जातील हा प्रश्न बुके नको बुकं द्या....असं सांगणाऱ्यांनी एकदा स्वतःला विचारून पहावा. आज नवं वर्ष सुरु होतं आहे. या नव्या वर्षातही 'बुकंही देऊ आणि बुकेही..' असा एक चांगला संकल्प करायला काय हरकत आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com