आठवणींचा ‘शाप’ (अमोल उदगीरकर)

आठवणींचा ‘शाप’ (अमोल उदगीरकर)

‘हायपरथायमेशिया’ नावाची एक ‘सायकॉलॉजिकल कंडिशन’ आहे. त्यात माणसाला त्याच्या वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षांपासूनच्या बहुतेक गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे अमुक दिवशी कुठला ड्रेस घातला होता, तमुक दिवशी कुठल्या हॉटेलमध्ये काय खाल्लं होतं, अमुक तारखेला झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये कुणी किती रन केले वगैरे. कसला क्रूर प्रकार आहे हा! लहानपणापासून आयुष्यात घडलेले सगळे अपेक्षाभंग, अपमान, नकार; पण यामुळे लक्षात राहात असणारच की. मला एकदा वर्गात सरांनी गणित सोडवायला जमत नाही म्हणून तुफान मारलं होत. आज पण दिवसातून अवचितपणे हे एकदा तरी आठवतच मला. तर या लोकांचे कसले हाल होत असतील? ‘हायपरथायमेशिया’बद्दल वाचलं आणि मला माझा मुंबईतला परिचित आठवला.

स्ट्रगलर नट आहे. त्याची मेमरी असलीच बेकार आहे. त्याला सगळ्या डायरेक्‍टर, प्रोड्युसर, कास्टिंग एजंटचे मोबाईल नंबर पाठ आहेत. ‘व्हॉट्‌सॲप ग्रुप’मधल्या चॅट त्याला क्रमवार आठवतात. मला त्याने आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू ऑलिव्ह रंगाचा शर्ट घातला होतास, हे सांगून ‘क्‍लीन बोल्ड’ केलं होतं; पण स्ट्रगलर नटाची जी ओझी असतात ती वाईट असतात. डेली बेसिसवर नकार, अपमान. ते सगळे त्याच्या पाठकुळीवर हडळीसारखे बसले आहेत. उतरतच नाहीत. एकदा ड्रग्ज केले आणि नकारात्मक आठवणी पुन्हा उफाळून वर आल्या, त्यामुळे त्याच्या नादाला लागत नाही असं त्याचं म्हणणं. ‘मुझे छुटकारा चाहिए यार इस याददाश्‍त से’ असं वैतागून तो परवा दुसऱ्या मित्राला सांगत होता... पण यातून सुटका नाही. ‘हायपरथायमेशिया’ वाईट नाहीये. त्यासोबत असणारं संवेदनशील मन वाईट आहे. त्याला मी हायपरथायमेशियाची माहिती मेल केली. त्याचा लगेच रिप्लाय आला,‘इसका इलाज है क्‍या कोई?’ समोर विषण्णतेने हसणारा स्माईली.

...‘सिटिझन केन’मध्ये एक जबरी डायलॉग आहे- ‘द ग्रेटेस्ट कर्स इज मेमरी’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com