अजस्त्र, उत्तुंग, उत्कट... (अमोल उदगीरकर)

amol udgirkar write bahubali article in saptarang
amol udgirkar write bahubali article in saptarang

‘बाहुबली- द कन्क्‍लुजन’ या चित्रपटानं ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आजवरचे सारे विक्रम मोडीत काढत आगेकूच सुरू ठेवली आहे. तंत्रज्ञानापासून ते मार्केटिंगपर्यंत आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना या भव्य चित्रपटानं नवं परिमाण दिलं आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्याच आकडेवारी अक्षरशः काळीज दडपून टाकणाऱ्या आहेत. अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरलेल्या या चित्रपटाचं वेगळेपण नक्की आहे तरी काय? मूळ तेलगू असूनही देशभरातल्या प्रेक्षकांना कवेत घेण्याची जादू त्याला कशी काय साधली? प्रचार, प्रसाराचं कोणतं तंत्र या चित्रपटासाठी वापरण्यात आलं?...अशा सगळ्या प्रश्‍नांचा वेध.  

‘बॉलिवूड’ म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे असा अनेकांचा समज असतो. मात्र, त्यात काही तथ्य नाही. भारतीय चित्रपटसृष्टी हा जणू एक सागर आहे आणि तमीळ, तेलगू, बंगाली, मराठी अशा विविध प्रवाहांमुळं त्याची भव्यता आणखी वाढली आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ‘बाहुबली’ चित्रपटमालिका ही मल्याळी, हिंदी आणि तमीळमध्ये डब झाली असली, तरी त्याची मुळं तेलगू चित्रपटसृष्टीतच आहेत, हे जास्त महत्त्वाचं.  भारतीय चित्रपटसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वांत महागडा मानला जाणारा ‘बाहुबली’ चित्रपटमालिकेतला दुसरा भाग गेल्या शुक्रवारी (ता. २८ मे) प्रदर्शित झाला आणि त्याचं अक्षरशः ‘धुमशान’ सुरू झालं. ‘बॉक्‍स ऑफिस’पासून माध्यमांपर्यंत- विशेषतः सोशल मीडियापर्यंत. ‘बाहुबली- द कन्क्‍ल्युजन’ला (बाहुबली-२) मिळालेल्या बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. काही टीकेच्या असल्या, तरी त्यांचं प्रमाण नगण्य आहे. एकूणच एका प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्या दिग्दर्शकानं, प्रादेशिक ‘अपील’ असणाऱ्या कलाकारांना घेऊन तयार केलेल्या चित्रपटाची दखल देशभरात, नव्हे तर जगभरात ‘क्‍लासेस’ आणि ‘मासेस’ दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर असणाऱ्या घटकांकडून घेतली जात आहे, हीच घटना मुळात अभूतपूर्व आहे. प्रचंड सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक विविधता असणारा देश जेव्हा एकच ‘ट्रेंड’ दाखवायला लागतो, तेव्हा तो ऐतिहासिक ठरतो. अर्थात ‘बाहुबली’शी संबंधित सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा काळीज दडपून टाकणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या आकड्याभोवती फिरताना दिसत आहेत. चित्रपट क्षेत्र हा एक उद्योग किंवा व्यवसाय असल्यामुळं ‘बजेट’ किंवा उत्पन्नाचे वेगवेगळे विक्रम यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहेच; पण ‘बाहुबली-२’च्या देशव्यापी प्रदर्शनानं आणि दणकेबाज उत्पन्नानं काही महत्त्वाचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत. आकडेवारीच्या आणि चित्रपटाच्या भव्यतेच्या पलीकडं जाणारे प्रश्न. ‘बाहुबली’सारख्या  प्रादेशिक चित्रपटाला देशभरात ‘रेकॉर्ड-ब्रेक स्क्रीन’ मिळाल्या कशा? चित्रपटमालिकेतल्या दोन चित्रपटांमध्ये दोन वर्षांचा फरक असूनसुद्धा प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम कशी राहिली? ‘बाहुबली’कडून मराठी चित्रपटानं शिकण्यासारखं काय आहे?...असे किती तरी प्रश्न. सगळ्याच चर्चा फक्त काळीज दडपून टाकणाऱ्या आकडेवारीभोवती फिरत राहिल्या, तर भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण देणाऱ्या या चित्रपटाशी संबंधित काही महत्त्वाचे, मूलभूत मुद्दे दुर्लक्षित राहण्याची शक्‍यता आहे. अशाच काही गोष्टी आपण बघुयात.

शिवाजी महाराजांचा प्रभाव
बहुतांश महान चित्रपटांच्या कल्पना अर्थातच चित्रपटलेखकांच्या डोक्‍यात जन्माला येतात आणि पुढं त्यांना मूर्त स्वरूप येत जातं; पण आपल्या व्यक्तिपूजक समाजात यशाचं श्रेय कायम कलाकारांना- विशेषतः नायकाला आणि त्यातून काही शिल्लक राहिलं तर दिग्दर्शकाला अशी आपली उफराटी पद्धत असते. लेखक कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसतो. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली हे आज कारकिर्दीच्या शिखरावर पोचले आहेत,  त्यामागं लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद या लेखकाचा मोठा वाटा आहे. ते राजमौली यांचे वडील आहेत; पण त्यांची केवळ तेवढीच ओळख नाही. अतिशय अभिनव संकल्पनांना कागदावर पटकथेच्या स्वरूपात उतरवणारा अवलिया चित्रकर्मी ही त्यांची खरी ओळख. राजमौली यांच्या बहुतेक चित्रपटांच्या कथा-पटकथा विजयेंद्र प्रसाद यांनीच लिहिल्या आहेत. ‘मगधिरा’ किंवा ‘एगा’ (हिंदीत हा चित्रपट ‘मख्खी’ या नावानं डब झाला होता) या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांना देशभरात प्रेक्षकवर्ग मिळाला. सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपटसुद्धा त्यांनीच लिहिला होता. विजयेंद्र आणि राजमौली या पिता-पुत्रांच्या बाबतीत एक अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. मराठी प्रेक्षकांना ही गोष्ट अपरिचित आहे; पण त्यांना ती खूप आवडेल. ही गोष्ट म्हणजे या दोघांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला प्रभाव. राजमौली यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि अर्थातच विजयेंद्र यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती’ चित्रपटातत प्रभास मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात प्रभासनं साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव शिवाजी असतं. हा शिवाजी नावाचा युवक काही मित्रांना सोबत घेऊन खलनायकाच्या गुन्हेगारी साम्राज्याचा कसा बीमोड करतो, अशी चित्रपटाची ढोबळमानानं कथा होती. काही सवंगड्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी अन्यायकारी आदिलशाहीला पायबंद घातला, या इतिहासाशी या चित्रपटाच्या कथेचं बरच साधर्म्य होतं. राजमौली आणि विजयेंद्र या दोघांचं शिवाजी महाराजांच्या आयुष्याविषयी असलेलं आकर्षण इथंच थांबत नाही. शिवाजी महाराज सिद्दी जौहरनं पन्हाळगडाला दिलेल्या कडेकोट वेढ्यातून निसटले आणि विशालगडाकडं जायला निघाले, तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी आदिलशाही फौजेला पावनखिंडीत थोपवून धरलं. महाराजांच्या इतिहासातल्या या घटनेवरून विजयेंद्र यांना ‘मगधिरा’ चित्रपटाची प्रेरणा मिळाली. इतकंच काय, ‘बाहुबली-२’मध्ये कटप्पा एका प्रसंगात ‘जय भवानी’ अशी मराठी प्रेक्षकांना परिचित असणारी घोषणा देतो, तेव्हा चित्रपटगृह टाळ्या-शिट्ट्यांच्या आवाजांनी दुमदुमून जातं. ‘बाहुबली’सारख्या कलाकृतीची निर्मिती केल्यानंतर आता ही पिता-पुत्राची जोडगोळी काय करणार, या प्रश्नाची उत्कंठा सगळ्यांना लागून राहिली आहे. ‘महाभारत’ या अतिमहत्त्वाकांक्षी प्रोजेक्‍टवर ते काम सुरू करणार आहेत, असं काही बातम्यांतून सूचित होत आहे. मात्र, नुकत्याच आलेल्या काही बातम्यांतून एक सुखद चाहूलही लागली आहे. राजमौली-विजयेंद्र या जोडगोळीचा पुढचा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर असू शकतो, असं काही बातम्यांतून सूचित झालं आहे. ही दुसरी शक्‍यता प्रत्यक्षात उतरली, तर महाराष्ट्रासाठी अजून आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असेल? त्यांच्या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण असेल, या मुद्द्यावरून चर्चेला उधाण येईल हेही नक्की. शिवाय जो कलाकार ही भूमिका करेल, त्याच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी ही सर्वोत्तम भूमिका असेल हेही नक्की. अर्थात ही सगळी चर्चा सध्या खूपच प्राथमिक पातळीवर आहे, हेही समजून घ्यायला हवं.

करण जोहर नावाचा ‘सेतू’
साधारणपणे एखादा चित्रपट आपल्यापर्यंत पोचतो कसा याबद्दल प्रेक्षकांना फारसं माहीत नसतं. याची तुलना विजेशीच करता येईल. बटण दाबलं, की पंखा सुरू होतो हे आपल्याला माहीत असतं; पण त्यामागचं अवघड इलेक्‍ट्रॉनिक्‍स समजून घेण्यात कुणालाच रस नसतो. चित्रपटाचंही तसंच असतं. एखादा चित्रपट तयार झाल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत पोचवणारी व्यवस्था कशी आहे, हेसुद्धा प्रेक्षकांना माहीत नसतं. आपल्याकडं चित्रपट बनवणं एक वेळ सोपं आहे; पण त्याचं वितरण करणं हे त्यापेक्षा अवघड काम आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या दर्जेदार आणि अतिशय वेगळ्या प्रकारचे विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटांचे निर्माते हे जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील. ‘बाहुबली-२’ सारख्या प्रादेशिक चित्रपटाला (हिंदीत डब झाला असला, तरी) देशभरात प्रदर्शनाच्या वेळेस तब्बल नऊ हजार स्क्रीन कशा मिळतात, हा ‘मिलिअन डॉलर’ प्रश्न आहे. याचं उत्तर करण जोहर या माणसापाशी येऊन थांबतं. आडवातिडवा विस्तार असणाऱ्या या देशाचं चित्रपटवितरण क्षेत्र मुंबई, दिल्ली, बेरार, निझाम इत्यादी अकरा मोठ्या भागांत विभागलं गेलेलं आहे. सर्वच्या सर्व अकरा क्षेत्रांत आपला चित्रपट प्रदर्शित करताना भल्याभल्या दिग्गज निर्मात्यांच्या तोंडाला फेस येतो. याला अनेक आर्थिक, सामाजिक आणि भाषिक घटक कारणीभूत आहेत. प्रादेशिक भाषेत चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांचे हाल तर जास्तच. मुख्य कलाकारसंचात एकही देशव्यापी ओळखीचा चेहरा नसताना ‘बाहुबली’ला मात्र सर्व वितरणक्षेत्रांमध्ये सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांत स्थान मिळालं. याचं श्रेय निर्माता म्हणून ‘बोर्ड’वर आलेल्या करण जोहरला द्यावं लागेल. ‘गुडी-गुडी’ चित्रपट बनवणारा निर्माता-दिग्दर्शक म्हणून करणची कुणीही कितीही हेटाळणी केली, तरी तो एक उत्तम ‘बिझनेसमॅन’ आहे, हे त्यानं वर्षानुवर्षं सिद्ध केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची देशभर असलेली लोकप्रियता आणि शंभर टक्के ‘सक्‍सेस रेशो’ असणारा राजमौली यांचं जबरदस्त ‘पोटन्शिअल’ या चाणाक्ष ‘बिझनेसमॅन’नं कधीच ताडलं होतं. ‘बाहुबली’ चित्रपटमालिकेत साडेचारशे कोटी एवढी मोठी रक्कम गुंतली असल्यामुळं निर्माते परताव्यासाठी फक्त दक्षिण भारतीय मार्केटवर अवलंबून राहू शकत नव्हते. हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणं आवश्‍यक होतं. वितरकांची भक्कम साखळी पाठीशी असणारा करण निर्माता म्हणून ‘बोर्ड’वर येणं यापेक्षा चांगली घटना ‘बाहुबली’ चित्रपटमालिकेसाठी दुसरी कुठलीच असू शकत नव्हती. करण जोहरची ही ‘मूव्ह’ जबरदस्त यशस्वी ठरली, हे सांगण्यासाठी ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आकडे पुरेसे आहेत.

मार्केटिंगचं बदललं ‘ग्रामर’
चित्रपटाचं मार्केटिंग कसं करावं, याबद्दल ‘बाहुबली-२’नं अनेक पायंडे पाडले आहेत. बॉलिवूडमध्ये मार्केटिंगचे तेच-तेच रटाळ प्रकार वर्षानुवर्षं चालू आहेत. ‘स्टार’नं मॉलमध्ये किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जायचं, हात हलवायचे, लोकांशी माइकवरून अतिशय निरुत्साही संवाद साधायचा, टीव्ही-रेडियोवरून गाण्यांचा भडीमार करायचा, कपिल शर्माच्या किंवा तत्सम एखाद्या ‘शो’ला हजेरी लावायची, असे काही प्रकार केले, की ‘मार्केटिंग’ झालं, असा अनेक निर्मात्यांचा समज असतो. अर्थातच आमीर खानसारखा एखादा ‘मार्केटिंग जिनिअस’ अपवाद असतोच. डिजिटल मार्केटिंगबद्दल बॉलिवूडमध्ये प्रचंड निरुत्साह आहे. अनेक चित्रपटांचं साधं फेसबुक पेज, ट्विटर अकौंट, विकिपीडिया पेजसुद्धा नसतं. ‘बाहुबली’नं मात्र चित्रपटाच्या मार्केटिंगचं ‘ग्रामर’ बदलून टाकलं. प्रभास किंवा अनुष्का तुम्हाला ‘कपिल शर्मा शो’मध्ये (जिथं मार्केटिंगसाठी जाणं सगळे बॉलिवूडचे लोक अत्यावश्‍यक मानतात) किंवा इतर एखाद्या शोमध्ये दिसले का, याचं उत्तर नकारात्मक आहे. ‘बाहुबली’च्या मार्केटिंग टीमनं डिजिटल मार्केटिंगला केंद्रस्थानी आणलं. ‘बाहुबली’चा पहिला भाग आणि दुसरा भाग यांच्या प्रदर्शनात अडीच वर्षांचं अंतर आहे. या मधल्या काळात ‘बाहुबली’च्या पहिल्या भागानं तयार केलेला ‘हाइप’ तसाच टिकून राहणं आवश्‍यक होतं. हे आव्हान ‘बाहुबली’च्या मार्केटिंग टीमनं पेलून दाखवलं. ‘कटप्पानं बाहुबलीला का मारलं,’ हा प्रश्न सोशल मीडियावर सतत धुमाकूळ घालत राहिला आणि घराघरांत चर्चिला गेला, याचं श्रेय चित्रपटाच्या डिजिटल मार्केटिंग टीमला. ‘बाहुबली’च्या फेसबुकवरच्या ऑफिशिअल पेजला चाळीस लाखांच्या आसपास लाइक्‍स आहेत. ट्विटरवर त्यांना अडीच लाख लोक ‘फॉलो’ करतात आणि त्यांच्या यूट्युब चॅनेलला साडेचार लाख लोकांनी सबस्क्राइब केलं आहे. हे आकडे ऐतिहासिक म्हणावेत असे आहेत. फेसबुकनं दिलेल्या ‘लाइव्ह व्हिडिओ’च्या सुविधेचासुद्धा वापर ‘बाहुबली’च्या टीमनं खुबीनं करून घेतला. सर्वसाधारणपणे चित्रपटनिर्माते आपल्या चित्रपटाच्या मार्केटिंगची जबाबदारी आऊटसोर्स करतात; पण आपल्या चित्रपटाचं मार्केटिंग कॅंपेन साडेचार वर्षं चालू राहणार आहे, याची जाणीव निर्मात्यांना होती. त्यामुळं त्यांनी ‘इन-हाऊस’ मार्केटिंग टीम तयार केली. ही व्यूहरचना एकदम फळाला आली. आपल्या चित्रपटाला दक्षिण भारतात प्रतिसाद मिळणार आहे, हे त्यांना माहीत होतं- म्हणून तुलनेनं कमकुवत असणाऱ्या उत्तर भारताच्या ‘मार्केट’ला डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनी आपलं ‘मार्केटिंग कॅंपेन’ आखलं. चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ जास्तीत जास्त माध्यमांमधून लोकांपर्यंत पोचेल, याची त्यांनी दक्षता घेतली. ‘बाहुबली-२’चा ट्रेलर एक कोटीच्या आसपास लोकांनी बघितला. ‘ॲमेझॉन प्राइम’वर ‘बाहुबली- द लास्ट लिजंड्‌स’ नावाची ॲनिमेशन मालिकासुद्धा प्रदर्शित करण्यात आली, तिलाही चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित होण्याच्या आधीच बहुतांश प्रेक्षकांनी ‘बाहुबली-२’ बघायचा आहे, हे मनात नक्की केलं होतं, यातच ‘बाहुबली’च्या आक्रमक डिजिटल मार्केटिंगचं यश सामावलं आहे.  

‘व्हीएफएक्‍स’बद्दल संमिश्र प्रतिक्रिया
‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत व्हिज्युअल इफेक्‍ट्‌सचा (व्हीएफएक्‍स) वापर अतिशय सढळपणे करण्यात आला आहे. राजमौली यांच्या ‘मगधिरा’ आणि ‘एगा’मध्येही व्हीएफएक्‍स आणि स्पेशल इफेक्‍टसचा वापर होता; पण ‘बाहुबली’मध्ये राजमौली यांनी ‘न भूतो न भविष्यती’ अशा प्रकारे व्हीएफएक्‍सचा प्रचंड प्रमाणावर वापर केला. प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारी युद्धं, भल्लालदेवचा रेड्याशी लढण्याचा प्रसंग, धबधब्याच्या पार्श्वभूमीवर चित्रीत केलेले नयनरम्य प्रसंग, दुसऱ्या भागात बाहुबली पिसाळलेल्या हत्तीला रोखतो तो प्रसंग आणि अशा किती तरी प्रसंगांत व्हीएफएक्‍स आणि स्पेशल इफेक्‍ट्‌सची नेत्रदीपक उधळण आहे. तब्बल सोळा स्टुडियो यासाठी झटत होते. हे सगळे व्हीएफएक्‍स तयार करण्यासाठी तंत्रज्ञांची टीम तब्बल दोन वर्षं अहोरात्र झटत होती. मात्र, दिग्दर्शकानं आणि व्हीएफएक्‍स टीमनं एवढी मेहनत घेऊनसुद्धा ‘बाहुबली-२’मध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्‍सबद्दल प्रतिक्रिया संमिश्र आहेत. जाणकारांच्या मते, काही ठिकाणी हे व्हीएफएक्‍स वाईट पद्धतीनं वापरले आहेत. चित्रपटात ज्या प्रमाणात त्यांचा प्रभाव पडायला पाहिजे त्या प्रमाणात तो पडत नाही, असं त्यांना वाटतं. माझं वैयक्तिक मत असं आहे, की शाहरूख खानच्या ‘रा-वन’ चित्रपटात व्हीएफएक्‍सचा सगळ्यांत उत्तम वापर करण्यात आला आहे. तो चित्रपट फारसा चांगला नसला, तरी व्हीएफएक्‍स डिपार्टमेंटमध्ये त्यांनी जी उंची गाठली, ती ‘बाहुबली-२’च्या टीमला जमली नाहीये. ‘बाहुबली’च्या पहिल्या भागात व्हीएफएक्‍सचा वापर जास्त चांगल्या पद्धतीनं करण्यात आला होता. नसिरुद्दीन शाह यांनी ‘यूं होता तो क्‍या होता’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्या चित्रपटाच्या बऱ्याच प्रसंगात व्हीएफएक्‍सचा वापर करावा लागला होता; पण जुन्या काळातच रमलेल्या नसिरभाईंनी जुन्या पद्धतीनं चित्रीकरण करण्याचा आग्रह धरला. ‘ट्‌वीन टॉवर’वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कथानक घडतं. या चित्रपटात ‘ट्‌वीन टॉवर’वर विमान धडकण्याचा प्रसंग निव्वळ विनोदी वाटतो. प्रेक्षक पण त्या प्रसंगाला थिएटरमध्ये हसत होते. अर्थातच चित्रपट आपटला. नसिरभाईंनी प्रामाणिकपणे ‘आधुनिक तंत्रज्ञानाकडं आम्ही दुर्लक्ष केल्यामुळं चित्रपट आपटला,’ अशी जाहीर कबुली दिली. व्हीएफएक्‍सचं महत्त्व तेव्हापासून निर्माता-दिग्दर्शकांना पटलं. ‘यूं होता तो क्‍या होता’ आणि ‘बाहुबली-२’ या प्रवासात आपण बराच पल्ला गाठला आहे; पण हॉलिवूडशी तुलना करता अजून आपल्याला या क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचा आहे, याचीही आपण खूणगाठ बांधलेली बरी.

शिकण्यासारखं काय?
‘बाहुबली’ चित्रपटमालिकेचं बजेट साडेचारशे कोटी रुपयांच्या घरात आहे. कुठं खर्च झालं हे बजेट?- चित्रपटामधल्या व्हीएफएक्‍स आणि स्पेशल इफेक्‍ट्‌सवर, मार्केटिंगवर, पटकथेवर आणि चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चकचकीत करण्यावर. थोडक्‍यात चित्रपटाची गुणवत्ता वाढवण्यावर. बॉलिवूडचे जे ‘बिग बजेट’ चित्रपट असतात, त्यांच्या बजेटचा मुख्य हिस्सा कशावर खर्च होतो, तर एखाद्या सुपरस्टारच्या मानधनावर. सलमान खान, आमीर खान, शाहरूख खान, हृतिक रोशन यांच्या मानधनाचे आकडे थक्क करणारे आहेत. पन्नास ते पंचाहत्तर कोटी रुपयांच्या घरात हे आकडे जातात.

चित्रपटाला मिळणाऱ्या नफ्यातही यांचा वाटा असतो तो वेगळाच. चित्रपटाच्या दर्जावर पैसे खर्च करण्यापेक्षा एका कलाकाराच्या मानधनावर एवढे पैसे करण्यामुळं अर्थकारण बिघडतं. तेलगू किंवा एकूणच दाक्षिणात्य चित्रपट तांत्रिकदृष्ट्या बॉलिवूडच्या चित्रपटांपेक्षा अतिशय सरस असतात- कारण  चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये ते सतत गुंतवणूक करत असतात. बॉलिवूडमध्ये बहुतेक पैसा ‘स्टार’ लोकांच्या मानधनासाठीच खर्च होत असल्यानं अशा प्रकारच्या गुंतवणुकीला वाव नाही. शिवाय बॉलिवूडचे किती सुपरस्टार एकाच चित्रपटात स्वतःला पाच वर्षांसाठी गुंतवून ठेवतील, हाही आणखी एक प्रश्न.

मराठी चित्रपटांनीही ‘बाहुबली’ चित्रपटमालिकेकडून आणि एकूणच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे. हे चित्रपटाच्या बजेटच्या संदर्भात नाहीये- कारण एका ‘बाहुबली’च्या बजेटमध्ये किती तरी चित्रपट बनू शकतात. मात्र, चित्रपटातला आशय चांगला असेल, तर देशभराचं मार्केट तुमच्यासाठी खुलं आहे, या राजमौली यांच्या आत्मविश्वासातून आपण शिकण्यासारखं आहे. अनेक ‘सांस्कृतिक संदर्भ’ वेगळे असल्यानं दाक्षिणात्य चित्रपट देशाच्या इतर भागांत फारसे चालू शकत नाहीत, असा एक युक्तिवाद काही काळापूर्वी केला जायचा; पण राजमौली यांना हे मान्य नाही. एका मुलाखतीत ते म्हणतात ः ‘‘भारतीय चित्रपटांचा प्रेक्षक अतिशय लवचिक आणि नवनवीन कल्पनांचं स्वागत करणारा आहे. सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ वेगळे असूनही तो ब्रूस लीचे चित्रपट पाहत नाही का? हॉलिवूडमधले ‘सुपरहिरों’चे चित्रपट आपल्याकडं जोरदार चालतातच ना? ‘बाहुबली’ तर याच मातीतला, याच देशातला एक चित्रपट आहे.’’ राजमौली यांचा हा आशावाद खरा आहे, हे भरघोस प्रतिसाद देऊन देशभरातल्या प्रेक्षकांनी सिद्ध केलं. आपल्याच मातीतल्या नागराज मंजुळे यांनीही ‘सैराट’मधून ते सिद्ध केलं आहे. मराठी चित्रपटांनीही जास्त महत्त्वाकांक्षी व्हायला हवं. मात्र, दाक्षिणात्य चित्रपटांना त्यांच्या प्रेक्षकांचा आणि तिथल्या राज्य सरकारांचा खंबीर पाठिंबा मिळतो तसा आपल्या चित्रपटांना मिळतो का? दुर्दैवानं याचं उत्तर नकारार्थी आहे. आपल्याकडच्या ‘अस्तु’, ‘कासव’, ‘इन्व्हेस्टमेंट’ अशा पुरस्कारप्राप्त चित्रपटांना वितरक मिळत नाहीत, ही परिस्थिती दुर्दैवाची आहे. बरं समजा असे डब्यात अडकून पडलेले चित्रपट प्रदर्शित झाले, तर त्यांना आपला प्रेक्षक प्रतिसाद देतो का, याचं उत्तर पुन्हा नकारात्मकच आहे. प्रेक्षक हे चित्रपट बघत नाहीत म्हणून वितरक त्यांना शिवत नाहीत आणि वितरक नसल्यामुळं ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे त्यांना तो पाहायला मिळत नाही, असं हे दुष्टचक्र आहे. आचार्य अत्रे यांच्या ‘श्‍यामची आई’ ला पहिलं ‘सुवर्णकमळ’ मिळालं होतं. त्यानंतर मुंबईत शिवाजी पार्कवर आचार्य अत्रे यांचा जाहीर सत्कार झाला. त्यावेळी केलेल्या भाषणात अत्रे विषादानं म्हणाले ः ‘‘तुम्ही इथं इतक्‍या मोठ्या संख्येने आलात; पण याच्या अर्धी गर्दी जरी चित्रपट बघायला आली असती, तर आमच्या डोक्‍यावरचा कर्जाचा बोजा थोडा हलका झाला असता.’’ असं म्हणण्याची वेळ मराठी चित्रपटांच्या निर्मात्यावर येऊ  नये, यासाठी एक भाषिक समाज म्हणून आपण काय करणार आहोत, हा कळीचा प्रश्न आहे. दाक्षिणात्य प्रेक्षकांकडून शिकण्यासारखं आहे ते हे!

बाहुबलीसाठी हृतिक, शिवगामीसाठी श्रीदेवी...
राजमौली यांच्या मनात ‘बाहुबली’ चित्रपटमालिकेसाठी वेगळीच ‘स्टार कास्ट’ होती. महेंद्र बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेत हृतिक रोशन, तर भल्लालदेवच्या भूमिकेसाठी जॉन अब्राहम यांना ‘कास्ट’ करावं, असं त्याच्या मनात होतं; पण या दोघांनी फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. शेवटी या भूमिका केल्या प्रभास आणि राणा डुगुबट्टी यांनी. महाराणी शिवगामीच्या भूमिकेत राजमौली श्रीदेवीला पाहत होते; पण श्रीदेवीनंही या भूमिकेसाठी नकार दिला आणि ही भूमिका मिळाली ती रम्या या अभिनेत्रीला. ‘दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम’ म्हणतात, तसं प्रत्येक भूमिकेवर नियती एका विशिष्ट अभिनेत्याचं नाव कोरून ठेवते हेच खरं.

कुटुंब रंगलंय चित्रपटात...
‘बाहुबली’ चित्रपटमालिकेच्या निर्मितीच्या प्रत्येक अंगात राजमौली यांच्या कुटुंबाचा सदस्य सहभागी आहे. राजमौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी कथा लिहिली आहे. एम. एम. किरवानी हे संगीतदिग्दर्शक राजमौली यांचे चुलतभाऊ आहेत. राजमौली यांच्या पत्नी रमा यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे, तर काका शिवशक्ती दत्ता यांनी गाणी लिहिली आहेत. किरवानी यांची पत्नी वल्ली लाइन प्रोड्युसर म्हणून कार्यरत होती, तर त्यांचा भाऊ कल्याणी कोडुरी साउंड रेकॉर्डिंग करत होता. राजमौली यांचा मुलगा कार्तिकेय सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. याशिवाय त्यांच्या कुटुंबातले आणखीही अनेक सदस्य चित्रपटनिर्मितीत सहभागी होते. चित्रपट क्षेत्रातली ही आगळीवेगळी ‘घराणेशाही’च म्हणावी लागेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com