तुकडा पडला !

anand ghaisas write article
anand ghaisas write article

अंटार्क्‍टिका खंडातल्या ‘लार्सन सी’ नावाच्या प्रदेशात हिमनगाचा एक प्रचंड तुकडा मुख्य हिमफलकापासून तुटून वेगळा झाला आहे. ‘ए-६८’ असं या वेगळ्या पडलेल्या तुकड्याला नाव देण्यात आलं आहे. प्रचंड मोठ्या आकाराचा हा तुकडा सध्या मूळ प्रदेशाच्या जवळच असला, तरी समुद्राच्या अंतर्गत प्रवाहांमुळं तो उत्तरेकडं सरकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हिमनगाचा तुकडा तुटून वेगळी पडण्याची ही घटना नेमकी घडली कशामुळं, तिचे लघुकालीन आणि दीर्घकालीन परिणाम काय होतील, पृथ्वीच्या आरोग्याला फटका बसेल का आदी गोष्टींचं विश्‍लेषण.

एखाद्या वस्तूला, काचेला, आरशाला, तडा गेला, की ती वस्तू वापरातून कायमची जाते. तडा गेला, की संपलं. मग तो तडा विश्वासाला पडलेला का असेना. तसंच एखाद्या गोष्टीचा ‘तुकडाच पाडतो’ म्हणजे सोक्षमोक्षच लावतो, असंही म्हटलं जातं. कारण एखाद्या वस्तूचा तुकडा पडला, की तो जोडूनही ती वस्तू पहिल्यासारखी कधीच होत नसते. हीच गोष्ट काही दिवसापूर्वी घडलेली आहे, तीसुद्धा एका मोठ्या हिमनगाच्या बाबतीत. या हिमनगाच्या मूळ ठिकाणाहून त्याचा एक तुकडा पडून वेगळा झाला आहे. शिवाय हा तुकडा आता काहीही करून परत जोडता तर येणार नाहीच; पण ती एका वाईटाची चाहूलही ठरू शकते. हे पूर्ण पृथ्वीच्या स्वास्थ्यासाठी काळजी करण्यासारखं आहे. तुकडा पडला की चिंता करणं पाठोपाठ येतंच...!
ही तुकडा पडण्याची बातमी होती १२ जुलैची. मिडास या संस्थेनं हा तुकडा पडला, असं जाहीर केलं. त्याला नासाच्या उपग्रहांनी निरीक्षण करून दुजोरा दिला आणि ही बातमी प्रसिद्धीच्या झोतात आली. अंटार्क्‍टिका खंडाच्या ‘अंटार्क्‍टिक पेनिन्सुला’ या प्रदेशातल्या समुद्रावरच्या हिमाच्छादित भागांना विविध नावं देण्यात आली आहेत. त्यात ‘लार्सन’ नावाने ओळखले जाणारे काही भाग ‘लार्सन ए’, ‘लार्सन बी’, ‘लार्सन सी’, ‘लार्सन डी’ असे ओळखले जातात. यातला ‘लार्सन ए’ छोटा, त्यापेक्षा ‘बी’ मोठा, तर ‘सी’ सर्वांत मोठा प्रदेश आहे. ‘डी’ साधारण ‘बी’एवढाच आहे, तर त्यापुढचे ‘ई’, ‘एफ’, ‘जी’ हे खूपच छोटे प्रदेश आहेत. ‘लार्सन’ या एका दक्षिण ध्रुवीय प्रदेशात एकोणिसाव्या शतकात मत्स्यसंशोधन करणाऱ्या दर्यावर्दी कप्तानाचं नाव या प्रदेशाला देण्यात आलं आहे. हे सारे ‘लार्सन’ हिमाच्छादित प्रदेश, अंटार्क्‍टिका खंडाच्या भूप्रदेशावर नसून, भूप्रदेशावर असणारा हिमाच्छादित भागच जणू सलगपणे  समुद्राच्या पाण्यावर अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या तरंगणाऱ्या हिमनगाच्या स्वरूपात आहे. जमिनीवर असणाऱ्या हिमाच्छदित भागाला ‘आईस शीट’ (हिमप्रस्तर), तर अशा हिमनगासमान; पण पठारासारख्या हिमप्रदेशाला ‘आईस शेल्फ’ म्हणजे एखाद्या फळीसमान रचना असलेला हिमफलक असं म्हणतात. हे लार्सन प्रदेश असे हिमाच्छादित फलकाच्या स्वरूपात आहेत. खरं तर आता ते सगळेच सर्वार्थानं पूर्वी होते, तसे आता राहिलेले नाहीत. त्याच्यामागं हे तुकडा पडण्याचंच कारण आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की ही तुकडे पडण्याची घटना साधारणपणे विसाव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाली असावी; पण प्रत्यक्ष त्याबाबत कळलं ते १९९२मध्ये. लार्सन ‘ए’चा काही भाग सखल होत मूळ प्रस्तरापासून वेगळा झाला आणि १९९५मध्ये त्यातले सर्वच विलग झालेले हिमनग जवळजवळ वितळून किंवा वाहून जाऊन तिथला हा भाग नाहीसाच झाला. त्याची जागा सागरानं घेतली, किंवा त्याखाली असणारा सागर उघडा झाला. ही धोक्‍याची पहिली घंटा होती...

आणखी एक तुकडा
फेब्रुवारी १९९८ ते मार्च १९९९ मध्ये ‘लार्सन बी’ आणि ‘विल्किन्स’ भागातून या ‘लार्सन ए’ पेक्षा मोठा, सुमारे ३००० वर्ग किलोमीटरचा एक मोठा तुकडा पडला. एवढंच नाही, तर तो भाग सखल होत, तिथल्या हिमनगांचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे पडत, जणू त्याच्या ठिकऱ्या पडत, विरघळून तो समुद्रात नाहीसा झाला. त्यामुळं या बाबीकडं थोडं अधिक लक्ष वेधलं गेले. या ‘लार्सन बी’च्या थोडं अधिक दक्षिणेकडं असलेल्या ‘लार्सन सी’ या भागात असलेल्या सर्वांत मोठ्या पठारासारख्या प्रदेशात काही घड्या पडल्यासारख्या रचना दिसतच होत्या. त्यावर त्यामुळं लक्ष ठेवणं सुरू झालं खरं; पण काही विशेष बदल होताना काही जाणवले नाहीत- अगदी २००२पर्यंत. 
२००२मध्ये पुन्हा एकदा ‘लार्सन बी’च्या प्रदेशात असलेल्या हिमफलकाला तडा गेला, मग त्याच्या आसपासचा हिमफलक सखल होत त्याचे अनेक तुकडे पडत गेले आणि तो भागच समुद्रात विलीन झाला. या घटनेमुळं या साऱ्या प्रकाराकडं शास्त्रज्ञांचं लक्ष वेधलं गेलं. या ध्रुवीय प्रदेशाची उपग्रहीय निरीक्षणं नियमित कालावधीनं घ्यायला सुरवात झाली. या आधीही सुमारे १९९२पासून उपग्रहीय उंचीमापन उपकरणांच्या मदतीनं केलेल्या निरीक्षणांचे निष्कर्ष पुन्हा एकदा तपासण्यात आले. त्यातून असं निष्पन्न झालं, की १९९२ ते २००१पर्यंत दरवर्षी लार्सन प्रदेशातल्या हिमाच्या फलकांची सखलता वाढत आहे. दर वर्षाला हे हिमफलक ११ ते २७ सेंटिमीटरनं सखल होत आहेत. त्यामुळं आता या प्रदेशाची निरीक्षणं करणं अगत्याचं वाटू लागलं. 
२००४मध्ये ‘लार्सन सी’ भागात काही ठिकाणी चर पडल्यासारखे दिसू लागले- तेही एक-दोन किलोमीटर लांबीचे. त्यामुळं उत्सुकता आणि चिंता या दोन्ही गोष्टी वाढल्या; पण पुढच्या सुमारे एका दशकात काही विशेष फरक दिसून आला नाही. मात्र, निरनिराळ्या उपग्रहांमधून अधूनमधून निरीक्षणं घेणं सुरूच होतं.

अभ्यासासाठी ‘मिडास’ प्रकल्प
नासानं २००६मध्ये घेतलेल्या एका उपग्रहीय निरीक्षणात ही फट किंवा भेग लांबीनं काही किलोमीटर वाढल्याचं जाणवलं. याचदरम्यान २००५पासून या भागाच्या वैज्ञानिक निरीक्षणांसाठी ‘मिडास’ नावानं एक प्रकल्प सुरू झाला होता. मिडास हा एक ब्रिटिश अंटार्क्‍टिक प्रकल्प असून, ‘लार्सन सी’ हिमफलकावर जागतिक वातावरण, तापमान आणि त्यात होणाऱ्या बदलांचे परिणाम निरीक्षणाखाली आणण्याचं मुख्य काम त्यात ठरवण्यात आलं आहे. या हिमफलकात होणारे बदल, त्याची कारणं शोधणं, जागोजागी होणाऱ्या बदलांची सूक्ष्म निरीक्षणं घेणं, त्यांचे अर्थ लावणं अशा प्रकारची कामं यात अंतर्भूत आहेत. या हिमप्रदेशाचं वातावरण, त्याची मापनं, उपग्रहामार्फत घेतलेली निरीक्षणं, प्रत्यक्ष या प्रदेशात जागेवर जाऊन घेतलेली निरीक्षणं आणि त्या माहितीचा वापर करून संगणकीय प्रारूपं तयार करणं, त्यावरून भविष्यातल्या घटनांचा अंदाज घेणं, अनुमान काढणं अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे.
वेल्समधल्या ‘स्वानसी युनिव्हर्सिटी’ आणि ‘ॲबरिस्ट्‌विथ युनिव्हर्सिटी’त हा प्रकल्प राबवला जातो, ज्याला ‘ब्रिटिश अंटार्क्‍टिक सर्वेक्षण संस्थे’चं आणि जगभरातल्या इतर वैज्ञानिक संस्थांचंही साह्य आहे. नासाचे उपग्रह निरीक्षणांची कामं यांच्यासोबत करतात. ‘आईसब्रिज’ या प्रकल्पातल्या विमानांच्या वैज्ञानिकांची ने-आण करण्याचं आणि आकाशातून प्रदेशाचं निरीक्षण करण्याचं कामही यात अंतर्भूत आहे. या प्रकल्पाला प्रमुख आर्थिक साह्य ‘नॅचरल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च कौन्सिल’कडून 
मिळतं. असो.

या प्रकल्पातले वैज्ञानिक या हिमफलकावर प्रत्यक्ष उतरून, तिथं ‘बोअर’ घेऊन, खणून हिमस्तराचे नमुने घेणं, भूकंपमापनाची साधनं वापरून निरीक्षणं घेणं, वातावरणाचे नमुने घेणं, वाऱ्यांच्या बदलत्या दिशांची नोंद ठेवणं, तापमानाचं सतत निरीक्षण आणि तिथली छायाचित्रं काढणं अशी कामं सुनियोजित पद्धतीनं गेली बारा 
वर्षं करत आहेत.

हळूहळू वाढणारी भेग
‘लार्सन सी’ हा हिमफलक सुमारे ४४,२०० वर्ग किलोमीटरचा प्रदेश असून, जगातला हा सर्वांत मोठा असा हिमफलक गणला जात होता. याची एकूण जाडी सरासरी ८३७ मीटर मोजली गेली होती, त्यातला सुमारे ७५० मीटरचा भाग पाण्याखाली होता. २०१६मध्ये त्यावर जाऊन जेव्हा प्रत्यक्ष निरीक्षणं घेण्यात आली, (हे कामही ज्यावेळी या ध्रुवीय भागातली सहा महिने असलेली रात्र संपते तेव्हाच करायला मिळतं, हे लक्षात घेतलं पाहिजे) तेव्हा, एका छोट्या टेकडीसारख्या उंचवट्याच्या शेजारून सुरू झालेला, कमाल ९१ मीटर रुंद आणि ५०० मीटर (१६०० फूट) खोल असलेल्या चरासारख्या एका खड्ड्याची, भेगेची लांबी हळूहळू वाढत आहे, असं नजरेस आलं. रोजच्या रोज त्यात काय बदल होत आहेत, हे नोंदवणं (एकूण प्रचंड थंड वातावरणामुळं तिथं कायम राहणं) शक्‍य नसलं, तरी डिसेंबर २०१६पर्यंत या चराची किंवा फटीची लांबी २१ किलोमीटरनी वाढलेली दिसली. यावेळी ही लांबी सुमारे १३० किलोमीटर होती. या वर्षीच्या जानेवारीत या कमानीच्या आकाराच्या फटीचं वाढत जाणारं टोक दुसऱ्या बाजूला असलेल्या समुद्रापासून फक्त वीस किलोमीटर बाकी राहिलं होतं. यामुळं उत्सुकता बरीच वाढली होती. १ मे २०१७ला या मुख्य फटीच्या शिरोभागी अचानक एक आणखी फाटा फुटून तो समुद्राच्या दिशेनं नाही, तर सरळ पुढं जाणारा आहे, असं लक्षात आलं. आता उपग्रहानं रोजच्या रोज निरीक्षणं घेणं सुरू झालं. २० ते २४ जून या चारच दिवसांत ही भेग दोन्ही दिशांनी वाढण्याचा वेग दिवसाला दहा किलोमीटर एवढा वाढला. शिवाय मागच्या भागातली फट शंभर फुटांवरून तीनशे फुटांपर्यंत रुंदावत चालली आहे, हे लक्षात आलं. ७ जुलैला सरळ रेषेत पुढं वाढणाऱ्या फटीला आणखी फांद्या फुटल्या आणि त्यातून भेगाळलेल्या अनेक हिमनगांचा जन्म झाला. ते एकमेकांपासून हळूहळू विलगही व्हायला लागले. हे मात्र फार भराभर होत गेलं. दोन-तीन दिवसांत. अखेर ‘मिडास’नं १३ जुलै रोजी मुख्य फलकापासून हा एक वेगळा मोठा हिमनगाचा फलक तुटल्याचं जाहीर केलं. ताबडतोब नासानं उपग्रहाच्या मदतीनं या वेगळ्या पडलेल्या हिमनगाची विविध प्रारणांच्या माध्यमांतून छायाचित्रं घेऊन या घटनेला दुजोरा दिला आणि ही बातमी सगळीकडं प्रसिद्ध करण्यात आली. या तुटून दूर पडत चाललेल्या हिमनगाला आता ‘ए-६८’ असं नाव देण्यात आलं आहे. अंदाजे ७०० फूट जाडी असलेला, मुंबईच्या साधारण दहापट क्षेत्रफळाचा हा हिमनग, अब्जावधी टन वजनाचा आहे. सध्या तो मूळ हिमफलकाच्या अगदी जवळपास असला, तरी समुद्राच्या अंतर्गत प्रवाहांच्या बलाखाली तो उत्तरेकडं सरकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्यातरी कोणत्याही सागरी मार्गांना या हिमनगाचा अडथळा होत नसला, तरी पाण्यावर तरंगणाऱ्या या ‘बर्फाच्या पठाराचं’ पुढं काय होईल, ते आताच सांगता येत नाही, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं, ते चिंताजनकच आहे.

नक्की कारण काय?
या अंटार्क्‍टिका पेनिन्सुला भागातल्या हिमफलकांचं असं तुटणं, वितळणं का होतं याची जी कारणमीमांसा या प्रकल्पातून केली गेली, ती जरा विचित्रच वाटते. मात्र, संगणकीय प्रारूपांची मदत घेऊन त्यावर आता अधिक अभ्यास चालू आहे. त्याची कारणमीमांसा अशी, की फक्त जागतिक तापमानाचा हा स्थानिक परिणाम नसून, दक्षिण ध्रुवप्रदेशापासून फार दूरवर, म्हणजे सुमारे सहा हजार किलोमीटर अंतरावर महासागरात जे वेगवान वारे वाहणं गेल्या काही वर्षांपूर्वीपासून (सुमारे गेल्या शतकापासून) सुरू झालं आहे, त्याचा परिणाम सागराच्या आतल्या पाण्याच्या अंतर्गत उष्ण प्रवाहावर होतो. या वाऱ्यांमुळं हे उष्ण प्रवाह सागरात वर उचलले जातात. शिवाय ध्रुवीय प्रदेशाच्या भोवती एका चक्राकार गतीनं वारे, विशेषत: पूर्व भागातले वारे, वाहत येत या पेनिन्सुलाच्या पर्वतरांगांना धडकतात. ते वारे ज्या हिमाला घेऊन येतात, त्याचा वर्षाव पर्वताच्या पूर्व उतारावर अधिक प्रमाणावर होतो आणि आर्द्रता कमी झालेले वारे पुढं जाताना कमी प्रमाणात हिमवर्षाव करतात. त्यामुळं एकतर वर्षभरात या भागातल्या हिमाच्या एकूण भरावर भर पडत जात नाही. त्यांच्या पूर्वी वाढत असलेल्या जाडीत आता भर पडत नाही. हे एक कारण. दूरच्या वाऱ्यांमुळं जो एक उचलला गेलेला उष्ण पाण्याचा प्रवाह या हिमफलकाच्या खालून सतत वाहत जातो, त्याचंही तापमान सरासरीनं थोडं वाढत गेल्यानं या फलकाच्या तळाच्या भागातल्या हिमाचं वितळून पाणी होतं आणि त्यानं हिमफलकाची एकूण जाडी कमी होत जाते. या तुलनेनं गरम असणाऱ्या पाण्याचा प्रवाह जसा वाहतो, त्याच्या परिणामस्वरूप हिमफलकाची अखंडितता भंग होते आणि ती या फलकात फट पाडण्याची मुख्य कारण बनते. म्हणजे फक्त हिमफलकाच्या वरच्या हवेतल्या उष्णतेचं कारण नसून, खालूनही होणारे बदल या कमी होत जाणाऱ्या एकूण हिमाच्छादित प्रदेशामागं आहेत, असं या विषयात काम करणाऱ्या संशोधकांचं म्हणणं आहे. मात्र, या कारणांवर कोणतेही उपाय मात्र सध्या नजरेत नाहीत. तसंच अशा वेगळ्या पडलेल्या हिमनगाला परत सांधणंही 
शक्‍य नाही.

पुढं काय?
‘ए-६८’ या तुटून वेगळ्या झालेल्या एखाद्या राज्याएवढ्या आकाराच्या हिमनगाचं वितळून पाणी झालं तर? तर एकूण पृथ्वीवरच्या सागराची पाण्याची पातळी सुमारे सात ते आठ इंचांनी वाढेल, असं अनुमान आहे. १९९२पासून अंटार्क्‍टिकाच्या एकूण हिमाच्छादित हिमफलकांपैकी ७५ टक्के क्षेत्रफळ आजपर्यंत असं तुटून त्यांचं हिमनगात रूपांतर झालं आहे! ते अजून सर्वच्या सर्व वितळलं नसलं, तरी त्याचं वितळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. ४४,२०० वर्ग किलोमीटरच्या ‘लार्सन सी’ मधून ५८०० वर्ग किलोमीटरचा आज तुकडा पडला आहे, उद्या जर असंच होत हा पूर्ण हिमफलक पाण्यात विरघळला तर? संगणकीय प्रारूपं असं दाखवत आहेत, की इसवीसन २१००पर्यंत हा ध्रुवीय हिम वितळण्याचा दर असाच कायम राहिला, तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सरासरी एक मीटरनं वाढ होईल. ज्यामुळं अनेक सखल भाग समुद्रानं व्यापले जातील, जे हितावह नाही. त्याही पुढं जर जागतिक वातावरणाचं सरासरी तापमान वाढत राहिलं, तर इसवीसन २५००पर्यंत म्हणजे अजून फक्त पाचशे वर्षांनंतर जागतिक महासागरांच्या पाण्याची पातळी सरासरी १५ मीटरपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे... हे मात्र एकूणच सजीवसृष्टीला घातक ठरणारं आहे. 
हा ‘लार्सन सी’मधून तुटून पडलेला, ध्रुवीय हिमफलकाचा तुकडा ‘ए-६८’ ही पाचशे वर्षांनंतर होणाऱ्या जगबुडीच्या नाटकाची, धोक्‍याची घंटा तर नाही ना, आता आता गंभीरपणे विचार करायलाच हवा आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com