कृष्ण माझी माता... कृष्ण माझा पिता... ( आनंद घैसास)

कृष्ण माझी माता... कृष्ण माझा पिता... ( आनंद घैसास)

कृष्णऊर्जा आणि विश्‍वाच्या उत्क्रांतीमधले तिचे परिणाम शोधण्याबाबतचा ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ हा प्रकल्प सध्या सुरू आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्‍लेषण आता हाती आलं आहे. या निरीक्षणांमधून जो नकाशा हाती आला आहे, त्यात ‘कृष्णद्रव्या’चं प्राबल्य आहे, हे लक्षात येत आहे. या प्रकल्पाच्या निमित्तानं एकूणच कृष्णद्रव्य आणि कृष्णऊर्जा यांचं स्वरूप, त्यांचं विश्‍वातलं स्थान महत्त्व या सर्व गोष्टींची केलेली उकल.

एखादं लहानसं बी आपण रुजवावं, त्यातून बाहेर आलेल्या छोट्याशा अंकुराचा आपण फोटो काढून ठेवावा. पुढच्या सात वर्षांत त्याचं रोप, झाड कसं होईल, त्याचं स्वप्न पाहत त्याचं काल्पनिक चित्र तयार करावं. लगेच भविष्यात झेप घेऊन ते चित्र प्रत्यक्षाशी ताडून पाहावं...असंच काहीसं काम सध्या एका विश्वरचनेशी संबंधित प्रकल्पात सुरू आहे. विश्वाच्या रचनेचं, रुजलेल्या बीमधून बाहेर आलेल्या अंकुराचं चित्र खरं तर आधीच आपल्या हाती होतं. त्याला आपण ‘वैश्विक सूक्ष्मपार्श्वप्रारणांचा नकाशा’ (कॉस्मिक मायक्रोवेव बॅकग्राऊंड रेडिएशन ः सीएमबीआर) असं म्हणतो; पण आता या प्रकल्पातून, वाढलेल्या रोपाचं, म्हणजे तरुणपणच्या विश्वाचं जे चित्र हाती आलं आहे, ते आपण मागं केलेल्या तर्कापेक्षा, अनुमानापेक्षा थोडं निराळं आहे. हा प्रकल्प आहे ‘डार्क एनर्जी सर्व्हे.’ म्हणजे ‘कृष्णऊर्जा’ आणि तिचे विश्वाच्या उत्क्रांतीमधले परिणाम शोधण्याचा. सध्या आपण जे काही आहोत, त्या साऱ्याला- या विश्वाच्याच सद्यःस्थितीपर्यंतच्या उत्क्रांतीत ‘कृष्णऊर्जे’चा आणि त्यासोबतच ‘कृष्णद्रव्या’चाही फार मोठा वाटा आहे. किंबहुना त्यातूनच हळूहळू विश्व आकाराला आलं आहे, असं आता समजू लागलं आहे.

‘कृष्णद्रव्य’ आणि ‘कृष्णऊर्जा’ हे तसे अलीकडचे शब्द; पण त्याबद्दलचं गूढच अधिक. या संकल्पना नीट समजून न घेता, त्याबद्दल अवास्तव कल्पना आणि अफवाही बऱ्याच. कारण ‘कृष्ण’ हा तसा आपल्या भारतीयांसाठी जितका जवळचा तितकाच गूढ. तसंच काहीसं या विश्वातल्या कृष्णद्रव्याचं आणि कृष्णऊर्जेचं. जे दिसतच नाही ते पाहायचं कसं, समजून घ्यायचं कसं, हा मुख्य प्रश्न. या ‘कृष्ण’ संकल्पनांचा आधी थोडा इतिहास आणि त्या संकल्पनांबद्दलच जाणून घेऊया.

विश्व म्हणजे फक्त आपली आकाशगंगा नसून, आपल्यासारख्या आणखी दीर्घिका आहेत, हे एडविन हबलनं १९२४मध्ये म्हणजे जेमतेम एका शतकापूर्वी दाखवून दिलं. त्याआधी आपल्या आकाशगंगेतले सारे तारे म्हणजेच आपलं विश्व अशी धारणा होती. मात्र, अनेक ढगांसारख्या, तेजोमेघासारख्या वाटणाऱ्या या अवकाशातल्या वस्तू म्हणजे आपल्या आकाशगंगेचा भाग नसून, दूरवरच्या आकाशगंगा- दीर्घिका आहेत, हे तेव्हा कळलं. या प्रत्येक दीर्घिकेत आपल्या आकाशगंगेप्रमाणंच सुमारे दोनशे अब्ज तारे आहेत, हेही कळलं. त्यानंतर जेवढी दूरची दीर्घिका तेवढी तिची ‘ताम्रसृती’ (आपल्याकडं येणाऱ्या वस्तूंमध्ये त्यांचा वर्णपट निळ्या रंगाच्या बाजूस सरकलेला दिसतो. याला ‘अभिनील विस्थापन’ म्हणतात. दूर जाणाऱ्या वस्तूंमध्ये त्याचा वर्णपट लाल रंगाच्या बाजूस सरकलेला दिसतो. याला ‘ताम्रसृती’ असं म्हणतात) जास्त- अर्थात ती आपल्यापासून अधिक वेगानं दूर जात आहे, हेही हबलनं दाखवून दिलं. यालाच ‘हबल स्थिरांक’ म्हणतात. याच सुमारास आइनस्टाईनचा व्यापक सापेक्षता सिद्धांतही पुढं आला होता. त्यात अधिक वस्तुमानाच्या शेजारून जाताना प्रकाशकिरणही वक्र होतो, त्यामुळं गुरुत्वीय भिंगाचा परिणाम होऊन मुख्य अवकाशीय वस्तूच्या मागं लपलेल्या वस्तूंची विकृत प्रतिमा या वस्तूशेजारी दिसून येईल, असं त्यानं म्हटलं होतं. ते एका खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सिद्धही झालं. पुढं दीर्घिकांच्या प्रतिमा घेताना, त्या दीर्घिकांच्या मागं असणाऱ्या काही गोष्टीही अशाच ‘गुरुत्वीय भिंगा’च्या परिणामानं दिसू लागल्या. मात्र, त्यातून एक प्रश्नही पुढं आला, कारण दिसणाऱ्या दीर्घिकेत असणाऱ्या वस्तुमानाचा गुरुत्वीय परिणाम जेवढा अपेक्षित होता, त्यापेक्षा प्रत्यक्ष परिणाम अधिक होता. तसंच त्याचं क्षेत्रही अधिक असल्याचं जाणवत होतं. त्यातून प्रथम या जागेत न दिसणारं; पण गुरुत्वीय परिणाम दर्शवणारं जास्तीचं वस्तुमान असणार, असं अनुमान निघालं. हे वस्तुमान स्वयंप्रकाशित नसल्यानं ते दिसत नसावं. ते कोणतीही प्रारणं उत्सर्जित न करणारे रेण्वीय ढग किंवा मृतवत ग्रह, धूळ वगैरे असावेत, अशी कल्पना होती.

न दिसणारं वस्तुमान
सर्वांत आधी ‘लॉर्ड केल्विन’नं १८८४मध्ये त्याच्या एका व्याख्यानात अवकाशातल्या अशा न दिसणाऱ्या वस्तुमानाबद्दल उल्लेख केला होता. आपल्या आकाशगंगेतले एकूण तारे, त्यांचं वस्तुमान आणि त्यांचा आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरण्याचा वेग याचं गणित बसवायचं झालं, तर याच जागेत अनेक न दिसणारे तारे असले पाहिजेत, असा तो निष्कर्ष होता. याचीच मिमांसा हेन्‍री पॉइनकेरेनं १९०६मध्ये त्याच्या एका पुस्तकात ‘आकाशगंगा आणि त्यातले वायू’ या प्रकरणात केली होती. यात त्यानं सर्वांत प्रथम या न दिसणाऱ्या वस्तुमानासाठी ‘कृष्ण द्रव्य’ हा शब्द वापरला होता. डच खगोलविद ‘जेकोबस कॅप्टेयन’नं १९२२मध्ये आकाशगंगेतल्या ताऱ्यांच्या गती प्रत्यक्ष मोजून, त्यावरून ‘कृष्णद्रव्या’ची संकल्पना मांडली होती. १९३२मध्ये रेडिओ खगोलशास्त्राचा जनक ‘ऊर्ट’नंही असंच अनुमान काढलं होते. खगोलशास्त्रज्ञ ‘फ्रिट्‌झ झ्विकी’नं १९३३मध्ये कोमा दीर्घिकासमूहाचा अभ्यास करताना ‘व्हिरीयल थेरम’ वापरला होता. त्यातही दीर्घिकांचं परिवलन पाहता, त्यातल्या ताऱ्यांचे संवेग हे ज्या कारणाने असावेत, ते ‘न दिसणाऱ्या बला’मुळं- कदाचित ‘कृष्णद्रव्या’मुळंच असू शकतं. शिवाय हे न दिसणारं वस्तुमान, दिसणाऱ्या वस्तुमानाच्या अनेकपट (ते सुमारे चारशेपट असावं, असं अनुमान त्यानं काढलं होतं, ते जरा अतिशयोक्तच होतं) असावं, असं त्यानं म्हटलं होतं. त्यात दीर्घिकांचा हा संवेग म्हणजे ‘कृष्णऊर्जेचा’ आणि ‘कृष्णद्रव्या’नं तयार होणारा असावा, असंही त्यानं म्हटलं होतं.

१९३९मध्ये दीर्घिकांची दीप्ती आणि त्यांचं वस्तुमान यांचं गुणोत्तर प्रथम अभ्यासलं गेलं. ‘दीर्घिकेचं परिवलन (दीर्घिकेच्या केंद्राभोवती त्यातल्या एकूणच सर्व ताऱ्यांचं फिरणं) जेवढं दिसतं तेवढं असेल, तर त्यात दिसणारं वस्तुमान, अर्थात तारे त्या गतीनं दीर्घिकेत कायम टिकू शकणार नाहीत. ते सामान्य अपकेंद्री बलाला अनुसरून दूरवर भिरकावले जायला हवेत. मात्र, ते तर अजूनही याच क्षेत्रात तसेच फिरत राहताना दिसत आहेत. अर्थात, त्यांना गुरुत्वीय बलानं बांधून ठेवणारं अदृश्‍य वस्तुमान, त्यांच्या आजूबाजूस आणि बाहेरील अंगास असायला हवं. तरच हे शक्‍य आहे,’ असा निष्कर्ष होरॅस बॅबकॉक यांनी काढला होता.

१९६०-७०मध्ये व्हेरा रुबिन आणि केंट फोर्ड यांनी याच सिद्धांताला पुष्टी देणारे अनेक पुरावे दिले. ते दीर्घिकांच्या परिवलनासंदर्भात केलेल्या वर्णपट विश्‍लेषणातून ‘ताम्रसृती’च्या आणि ‘अभिनील विस्थापनाच्या’ (रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट) काटेकोर अभ्यासातून मिळवलेले होते. या साऱ्याच दीर्घिकांच्या दृश्‍य वस्तुमानापेक्षा त्यांच्यात न दिसणारं ‘कृष्णद्रव्य’ जास्त आहे, या निष्कर्षाला १९७४मध्ये सर्वमान्यता मिळाली- ते परत तपासून पाहिलं तेव्हा! व्हेरा रुबिन यांच्या या शोधनिबंधाला १९८०मध्ये प्रसिद्धी मिळाली आणि दृश्‍य वस्तुमानाच्या सुमारे सहापट ‘कृष्णद्रव्य’ असतं, असं त्यानंतर गृहीत धरलं जाऊ लागलं.

आण्विक हायड्रोजनच्या अस्तित्वाचा वेध
या प्रयत्नांच्या वेळीच रेडिओ खगोलशास्त्रज्ञ जवळच्या दीर्घिकांमधल्या ‘२१ सेंटिमीटरच्या रेषेचा’ अर्थात आण्विक हायड्रोजनच्या अस्तित्वाचा- ज्याला ‘एच १’ क्षेत्र म्हणतात, त्या तरंगलांबीचा- रेडिओ वेध घेऊ लागले होते. ग्रीन बॅंक्‍सची तीनशे फूट व्यासाची रेडिओ दूरवेक्षी आणि जॉड्रेल बॅंकची अडीचशे फूट व्यासाची दूरवेक्षी यांनी आधीच घेतलेल्या वेधात दीर्घिकांच्या दृश्‍यव्याप्तीपेक्षा या ‘एच १’चं क्षेत्र बरंच मोठं दिसत होतं, ते या रेडिओ प्रारणाच्या माध्यमातून! देवयानी (अँड्रोमिडा) या आपल्या जवळच्या दीर्घिकेची दृश्‍य व्याप्ती, तिच्या परिवलन केंद्रापासून सुमारे १५ किलो पारसेक (किलो म्हणजे एक हजार, तर एक ‘पारसेक’ म्हणजे सुमारे ३.२६ प्रकाशवर्षं) एवढ्या त्रिज्येची असताना, तिच्या ‘एच १’चं क्षेत्र मात्र दृश्‍य तबकडीच्या बाहेर वीस ते तीस किलो पारसेकपर्यंत पसरलेलं आहे, असं दिसून येत होतं. तसंच आणखी एक गोष्ट यात लक्षात आली, ती म्हणजे या दीर्घिकांच्या तबकडीची परिवलनाची जी गती दिसते, ती केप्लरच्या नियमांत बसणारी नाही. केप्लरचा ग्रहगतीचा दुसरा नियम असा आहे, की केंद्रापासून जसजसे दूर जाऊ, तसतशी अवकाशीय वस्तूची केंद्राभोवती फिरण्याची गती कमी कमी होत जाते. अर्थात केंद्राभोवती फिरण्याचा कालावधी वाढत जातो. मात्र, या दीर्घिकांच्या बाबतीत तसं दिसत नाही. एक तर तबकडीचा परीघ अधिक विस्तारलेला असतानाही त्यांची परिवलनाची गती काही कमी झालेली दिसत नाही, ती एकसारखीच राहते. तेही या न दिसणाऱ्या वस्तुमानाचाच परिणाम असणार. हीच निरीक्षणं अधिक प्रगत साधनांनी मॉर्टन रॉबर्टस आणि रॉबर्ट व्हाइटहर्स्ट यांनीही (१९७२) घेतलेली होती. मात्र, त्यानंतर डेव्हिड रॉगस्टड आणि सेठ शोस्तक यांनी पाच दीर्घिकांच्या ‘एच १’ क्षेत्राची ‘ओवेन व्हॅली इंटरफेरोमीटर’ वापरून निरीक्षणं घेतली. यातही दृश्‍य वस्तुमानाशी असणारं ‘कृष्णद्रव्या’चं गुणोत्तर अधिक भरलं होतं.

‘हबल’मुळं बळ
१९६०-७०नंतर हबल अवकाशीय दूरवेक्षीसारखं अधिक सक्षम आणि दृश्‍य माध्यमांत प्रतिमा टिपणारं माध्यम हाती आलं. या दूरवेक्षीनं अधिकाधिक खोलवर असणाऱ्या दीर्घिकांचीच नव्हे, तर दीर्घिकांच्या समूहांची छायाचित्रं टिपणं सुरू केलं. यांत महत्त्वाचं म्हणजे ‘गुरुत्वीय भिंगा’चे स्पष्ट परिणाम दर्शवणारी अनेक छायाचित्रं हाती आली. दीर्घिकांच्या गुच्छाभोवती त्यांच्या वस्तुमानाप्रमाणं किती अंतरावर, किती अंतरामागच्या वस्तू दिसतात, त्यांच्यात किती आणि कोणत्या प्रकारची विकृती निर्माण होते, त्या मागच्या वस्तू किती अंतरावर असू शकतात, अशा ‘गुरुत्वीय भिंगा’च्या अनेक गोष्टींची त्यातून खातरजमा करता आली. त्यातून या कृष्णद्रव्याचे अस्तित्व अधिकच प्रत्ययास आलं. याच गुरुत्वीय भिंगाच्या तत्त्वाचा आजही दूरच्या दीर्घिकांचे वेध घेण्यासाठी वापर करण्यात येतो.

कृष्णद्रव्याची निर्मिती
विश्वरचनेत या कृष्णद्रव्याचं कार्य कसं चालतं, ते या सगळ्या शोधांमधून मांडण्याचं काम अनेकांनी केलं. त्यातून ज्या संकल्पना सध्या सर्वमान्य झाल्या आहेत, त्या अशा ः विश्वाच्या निर्मितीच्या वेळी जे मूलकणांचे (अणू बनण्याआधीचे कण) अस्तित्व असेल, ते कदाचित सगळीकडं समानतेनं विखुरलेलं असावे. मात्र, ज्यावेळी या मूलकणांमधून आंतरक्रिया होऊन प्रोटॉन, न्युट्रॉन तयार होऊन त्यांचं एकमेकांशी गुरुत्वाकर्षण वाढत गेलं, अणू-रेणूंची रचना जन्माला येऊ लागली, त्यावेळी विश्वाच्या या पटावर कमी-अधिक घनतेचे आणि कमी-अधिक तापमानाचे विभाग तयार झाले असावेत. त्यानंतरच्या छोट्याशा कालावधीत हेच विभाग आणखी विलग होऊन, जणू काही, काही भाग रिकामा, विरळ, तर काही भाग गुठळ्यांसारखा थोडा सघन तयार झाला असावा. हेच चित्र आपल्याला ‘वैश्विक सूक्ष्मपार्श्वप्रारणां’च्या माध्यमातून जाणवतं. यात अधिक सघन होत चाललेल्या गुठळ्यांसारख्या ठिकाणी तारे आणि दीर्घिकांची निर्मिती होत गेली; पण ज्यांचं मूलद्रव्यात रूपांतर झालंच नाही, असे अदृश्‍य मूलकण काही प्रमाणात शिल्लक राहिले असणारच. ताऱ्यांच्या निर्मितीनंतर विद्युतचुंबकीय प्रारणं त्यांच्याकडून प्रसारित होऊ लागली. जास्त वस्तुमान गोळा झालेला, गुरुत्वीय बंधनात असलेला दीर्घिकांच्या समूहांचा भाग आता कमी प्रसरण पावू लागला, तर जिथं तुलनेत विरळ अवकाशाची रचना असणार, तो भाग मात्र भरभर प्रसरण पावू लागला असावा... अशा तऱ्हेनं अवकाशात दीर्घिकांच्या समूहांच्या गुच्छासारख्या रचना तयार झाल्या आणि त्यांचंही सावकाश प्रसरण होत होत सध्याची आपल्याला दिसणारी गुठळ्या, त्यांना जोडणारे धागे आणि मध्ये रिकाम्या अवकाशाची जागा, अशी विश्वरचना तयार झाली असावी.

हे सारं होताना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात कार्य करणारी, विश्वप्रसरणास कारण ठरणारी जी ऊर्जा विश्वात आहे, त्यालाच झ्विकीच्या ‘कृष्णद्रव्या’प्रमाणं, ‘कृष्णऊर्जा’ असं नाव १९९८मध्ये मायकेल टर्नरनं दिलं. १९९८मध्येच दूरच्या दीर्घिकांमध्ये झालेल्या ‘ए’ प्रकारच्या सुपरनोव्हा उद्रेकांची निरीक्षणं घेतली गेली. त्यावेळी ते सुपरनोव्हा उद्रेक हे आपल्या जवळचे नव्हे, तर फार दूरवरचे आहेत आणि अर्थातच विश्वप्रसरणाचा तो एक पुरावाच हाती लागला आहे, हे समजून आलं. मात्र, विश्वाच्या सततच्या आणि सतत वाढत जाणाऱ्या दरानं होणाऱ्या प्रसरणाचा हे उद्रेक पुरावाच ठरले. त्यावरून या कृष्णऊर्जेचे परिणाम किती आणि कसे झाले आहेत, याचा अभ्यास करणं सुरू झालं. प्राचीन काळी जेव्हा सगळीकडं समानता अधिक प्रमाणात होती, त्यावेळी हे कृष्णऊर्जेचं प्रमाण कमी किंवा नगण्य असणार. ते आता अधिक प्रमाणात दिसत आहे, तर कृष्णद्रव्य अधिक प्रमाणात असणार, ते मात्र आता कमी झालेलं असावं, असं अनुमान यातून काढलं गेलं आहे. मात्र, या सर्वांत आपल्याला निरीक्षणक्षम असं, दिसणारं द्रव्य मात्र फारच थोड्या प्रमाणात आधीही असणार आणि त्याहून ते आता कमी प्रमाणातच शिल्लक असणार, असं अनुमान यातून निघत आहे. (संपूर्ण विश्वाच्या तुलनेत दृश्‍य वस्तुमान सध्या फक्त सहा टक्केच आहे, असं मानलं जातं.)

‘डार्क एनर्जी सर्व्हे’
याच विषयावर संशोधन करण्यासाठी सुमारे चारशे संशोधकांचा एक संघ सध्या ‘डार्क एनर्जी सर्व्हे’ नावाचा एक प्रकल्प गेली चार वर्षं चालवत आहे. यासाठी ते ‘सेर्रो टॅलॅलो इंटर अमेरिकन वेधशाळे’चा वापर करत आहेत. त्यातल्या चार मीटर व्यासाच्या ‘व्हिक्‍टर एल बॅंको’ दूरवेक्षीवर खास ५७० मेगापिक्‍सेलचा ‘डार्क एनर्जी’ कॅमेरा बसवलेला आहे. डोळ्यांनी सर्वात अंधूक दिसणाऱ्या ताऱ्यापेक्षा दहा लाख पटींनी अंधूक असणाऱ्या दीर्घिकेचा या दूरवेक्षीनं वेध घेणं आता शक्‍य आहे. या पाच वर्षांच्या प्रकल्पासाठी दक्षिण आकाशातल्या सुमारे दोन कोटी साठ लाख दीर्घिकांची ‘नमुना’ म्हणून तपासणीसाठी निवड करण्यात आलेली आहे. यात पहिल्या वर्षात घेतलेल्या वेधांचं विश्‍लेषण आता हाती आलं आहे. त्यातल्या सुमारे तीनशे दीर्घिकांच्या समूहांचे हाती आलेले निष्कर्ष त्यांनी तीन ऑगस्टच्या एका अहवालात प्रसिद्ध केले आहेत. गुरुत्वीय भिंगांचे परिणाम दर्शवणाऱ्या आणि चार वेगवेगळ्या अंतरावरच्या दीर्घिकांची, त्यांच्या समूहांची जी स्थिती निरीक्षणांमधून दिसत आहे, त्यातून कृष्णद्रव्याचं प्रमाण किती, कुठं आणि ते तसं का, याचे अंदाज आता बांधता आले आहेत. गेल्या सात अब्ज वर्षांचा इतिहासच जणू यातून समोर येत आहे, जो कालावधी म्हणजे विश्वाच्या आजच्या आयुष्याच्या सुमारे निम्मा आहे! विश्वाच्या तरुणपणीच्या घडामोडींचा आहे.

या निरीक्षणांमधून जो नकाशा हाती आला आहे, त्यात ‘कृष्णद्रव्या’चं प्राबल्य आहे, हे लक्षात येत आहे. शिवाय दीर्घिकांच्या समूहांची आणि कृष्णद्रव्याच्याही गुठळ्यांची रचना यात लक्षात येत आहे. मात्र, पूर्वीच्या निरीक्षणांमधून जी अनुमानं, तर्क केले गेले होते, त्या प्रमाणात काही या गुठळ्यांच्या रचना दिसून येत नाहीत. तर त्यांचं प्रमाण कमी आहे, वस्तुमानाचं समप्रमाणात वितरण अधिक आहे, असं दिसून आलं आहे!

हे निरीक्षण फार महत्त्वाचं ठरू शकतं का? खरं तर आताच काही सांगता येत नाही. हा प्रकल्प म्हणजे आकाशाचा एक छोटासा भाग आहे. फक्त पंधराशे अंश वर्ग क्षेत्रफळाचा. तसंच पाच वर्षांच्या प्रकल्पातलं एक वर्ष अजून निरीक्षणं घेण्यासाठी शिल्लक आहे. फक्त एका वर्षाच्या निरीक्षणांचंच विश्‍लेषण आत्ता हाती आलं आहे. अर्थात अजून चार वर्षांच्या निरीक्षणांचा अभ्यास आणि विश्‍लेषण हाती येणं बाकी आहे. तेव्हा थोडा धीर धरावाच लागणार आहे.

आणि हो, यापेक्षा अधिक मोठ्या, आकाशाच्या सुमारे पाच हजार अंश वर्ग क्षेत्रफळाची निरीक्षणं अशाच प्रकारे घेण्याच्या पुढच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा तर श्रीगणेशा ठरावा...

कदाचित ‘कृष्णद्रव्य’ आणि ‘कृष्णऊर्जा’ हेच विश्वरचनेचं मूळ कारण आहे, असाही निष्कर्ष यातून निघू शकतो...‘कृष्णऊर्जा माझी माता, कृष्णद्रव्य माझा पिता’ असंही मग म्हणता येईल, बरोबर ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com