आकाशातली ‘दिवाळी’ (आनंद घैसास)

आकाशातली ‘दिवाळी’ (आनंद घैसास)

आपल्याला अचानक एखादा तारा सर्रऽऽर्कन्‌ तुटल्यासारखा दिसतो. त्याला ‘तारा तुटणं’ अशी संज्ञा वापरली जात असली, तरी प्रत्यक्षात त्या उल्का किंवा अशनी असतात. एका रात्रीत एका तासात वीसपेक्षा जास्त उल्का पडताना दिसतात, त्याला ‘उल्कावर्षाव’ असं म्हणतात. हा उल्कावर्षाव म्हणजे आकाशातली एक प्रकारे आतषबाजी किंवा दिवाळीच. या उल्कावर्षावाच्या कारणांपासून त्याच्या नोंदींपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा वेध.

रा  त्रीच्या आकाशात अचानक एक तारा सर्रऽऽर्कन्‌ तुटताना दिसतो. कधी निळ्या-पांढऱ्या रंगाचा, तर कधी चक्क लाल-पिवळा. पाहतापाहता तो लुप्तही होतो. कधीकधी तो एक निळसर हिरवी किंवा कधी पिवळसर-लालसर रेषा मागं सोडत पुढं जाताना दिसतो, तर कधी पिवळसर लाल आगीच्या लोळासारखा, शिवाय मोठामोठा होत जमिनीपर्यंतही पोचल्यासारखा दिसतो; पण बहुतेक वेळा तो क्षणार्धात विझल्यासारखाच होताना दिसतो. अनेकजण असा तुटणारा तारा दिसला रे दिसला, की पटकन डोळे मिटून घेतात आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटताना दिसतात. तारा तुटताना दिसेल तेव्हा मनातली इच्छा बोलून दाखवली, किंवा मनातल्या मनात तशी प्रार्थना केली, तर ती इच्छा लवकरच पूर्ण होते, एक अशी समजूत आहे. खरं तर हा एक मोठा गैरसमज आहे. अंधश्रद्धाच म्हणा ना!...कारण तारा तुटणं हीच खरं तर अशक्‍यप्राय अशी गोष्ट आहे...

आकाशातला कोणताही तारा आपल्या आयुष्यात आपली जागा सोडताना आपल्याला कधीच दिसणार नाही, असं म्हटलं, तर ते वावगं ठरणार नाही. कारण तारे एकतर आपल्यापासून फारच दूरवर आहेत. बहुतेक वेळा सूर्यापेक्षा ते कितीतरी पटींनी मोठे असणारे, दैदीप्यमान तारे आहेत. आकाशात आपल्याला दिसणारे सारेच तारे हे आपल्या आकाशगंगेतलेच आहेत. आपल्यापासून ते काही हजार प्रकाशवर्षं दूरवरपर्यंत पसरलेले आहेत. सूर्यानंतरचा सर्वांत जवळचा ताराच सुमारे साडेचार प्रकाशवर्षं दूर आहे. हे सारेच तारे एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाच्या बंधनात जणू जखडल्यासारखे आहेत. सहसा आपली एकमेकांपासून असलेली ठराविक जागा ते सहसा बदलत नाहीत. एकूण दीर्घिकेच्या पसाऱ्यात, त्या सर्वांना विशिष्ट संवेग आणि दिशा असल्या, तरी निदान आपल्या आयुष्याच्या छोट्याशा कालावधीत (अगदी हा शंभर वर्षांचा धरला तरी) त्यांच्या ठिकाणात, जागेत होणारा बदल आपल्याला समजून येईल एवढ्या प्रमाणात कधीच दिसून येत नाही. शिवाय ते इतक्‍या दूरवर आहेत, की हा बदल आपल्याला जाणवतच नाही. मग रात्रीच्या आकाशात तारा तुटताना दिसतो तो कसा काय, असा प्रश्न साहजिकच मनात येणार...

फार पूर्वीपासूनच कोडं
फार पूर्वीपासूनच हे कोडं माणसाला पडलेलं होतं; पण ही काही खगोलीय, म्हणजे अवकाशाशी संबंधित घडणारी घटना नाही, तर ती आपल्या आकाशात, म्हणजे पृथ्वीभोवती जे वातावरणाचे आवरण आहे, त्यामध्ये घडणारी घटना आहे, हे कळून आलं ते जेमतेम एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर! अवकाशातून पृथ्वीवर, तेही दगडासारखं काहीतरी येऊन पडत असणार ही गोष्टच त्याकाळी शास्त्रज्ञांनासुद्धा मान्य नव्हती. १८०७मध्ये अमेरिकेत कनेक्‍टिकट इथं एक अशनी किंवा उल्का जमिनीवर येऊन कोसळली होती. त्याची निरीक्षणं जेव्हा येल विद्यापीठाच्या एका प्राध्यापकानं प्रसिद्ध केली, तेव्हा इतर शास्त्रज्ञांनी त्याची चक्क खिल्ली उडवली होती. कारण अवकाशात, सूर्यमालेत, असे भरकटणारे दगड असू शकतात, हेच तेव्हा कल्पनेत बसणारं नव्हतं.

१८३३च्या नोव्हेंबर महिन्यात, रात्रीच्या वेळी अनेकांनी शेकडो तारे, तेही फक्त एका रात्रीत एकापाठोपाठ एक निखळताना पाहिले. ते सारे तारे जणू काही आकाशातल्या एकाच ठिकाणाहून, म्हणजे सिंह राशीत कल्पना केलेल्या सिंहाच्या तोंडाच्या भागातून उगम पावल्यासारखे भासत होते. तेव्हा या तारे तुटण्याच्या कोड्याकडं सर्वच शास्त्रज्ञांचं लक्ष वेधलं गेलं. हे सारेच जर अवकाशातून पृथ्वीकडं येणारे, झेपावणारे दगड असतील, तर ते असे एकाच दिशेनं आणि एकाच वेळी कसे काय येत असतील? त्यांना तिथून आपल्याकडं फेकणारं कोण असेल? एवढ्या मोठ्या प्रमाणात हे दगड आले तरी कोठून?...या सर्व गोष्टींच्या अधिक अभ्यासानंतर असं लक्षात आलं, की एका धूमकेतूच्या शेपटीत असणाऱ्या, धूमकेतू पुढं गेल्यावर मागं अवकाशात तरंगत राहिलेल्या, धुळीतल्या या वस्तू आहेत. धूमकेतू पुढं निघून गेला, तरी त्याच्या शेपटीतली ही धूळ सूर्याभोवती फिरत राहते. तिचा जणू सूर्याभोवती एक बांगडीसारखा पट्टाच तयार होतो. हा पट्टा सूर्याभोवती पृथ्वीच्या प्रतलाशी बऱ्याचवेळी तिरप्या दिशेनं फिरत असतो, तर पृथ्वी सूर्याभोवती आडव्या दिशेनं फिरत असते. त्यामुळं जेव्हा या पट्ट्याजवळून वर्षातून कधीतरी पृथ्वी जात असते, तेव्हा त्यातली ही धूळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीकडे खेचली जाते. या धुळीत अगदी छोट्या एक सेंटिमीटर आकाराच्या कणांपासून काही मीटर आकाराच्या मोठ्या दगडाएवढ्या आकाराच्या वस्तूही असतात. त्या जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं आकर्षिल्या जाऊन पृथ्वीकडं झेपावतात, तेव्हा पृथ्वीच्या वातावरणाशी त्यांची टक्कर होते. खाली येताना हवेशी होणारी ही टक्कर आणि जे घर्षण होतं त्यामुळं ते जळू लागतात. कारण त्यावेळी त्यांचा पृथ्वीकडं येण्याचा वेगच सुमारे एका सेकंदाला पन्नास ते सत्तर किलोमीटर एवढा प्रचंड असतो. दगड लहान असतील, तर ते पूर्णपणे वरच्यावर जळून जातात. कधी वातावरणाशी टक्कर घेतल्यावर त्यांचे तुकडेही होतात. त्यांची जळती तप्त राख मागच्या बाजूला एक उजळरेषा तयार करते. त्यामुळं आपल्याला ते दृश्‍य दिसताना तारा निखळल्यासारखं दिसतं. ही घटना पृथ्वीच्या वातावरणात, जमिनीपासून सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर एवढ्या उंचीवर होते.

तारा तुटण्याच्या या प्रकाराला ‘उल्कापात’ किंवा ‘अशनीपात’ असंही म्हणतात. यातला एखादा दगड जमिनीपर्यंत पोचला, तर त्यांना सामान्यत: ‘अशनी’ असे म्हणतात. अशा अनेक अशनी आजपर्यंत आपल्याला सापडलेल्या आहेत. अवकाशातून रोजच अशा अनेक अशनी पृथ्वीकडे झेपावत असतात. एका दिवसात सुमारे काही हजार टन एवढ्या वस्तुमानाचे हे दगड पृथ्वीवर रोजच येत असतात; पण आपल्याला ते सर्व काही दिसून येत नाही. कारण एक तर दिवसा हे तारे तुटलेले समजत नाहीत. शिवाय पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे ७१ टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे, या भागातून रात्री आकाशाकडं पाहणारे फारच थोडे लोक आहेत. त्यामुळं या भागातले तुटणारे तारेही आपल्याला समजून येत नाहीत.

‘उल्कावर्षावा’चं केंद्र
जेव्हा एका रात्रीत, तासाभरात साधारण वीसपेक्षा जास्त उल्का पडताना दिसतात, तेव्हा त्याला ‘उल्कावर्षाव’ असं म्हणतात. या ‘वर्षाव’ शब्दामुळं कित्येकांच्या मनात पावसासारख्या उल्का पडताना दिसतात, अशी एक समजूत झालेली दिसते. प्रत्यक्षात मात्र उल्का पडताना रात्रीच्या आकाशात प्रत्येक उल्केची एक प्रकाशाची रेघ तयार होताना दिसते. अशी प्रत्येक दिसलेली रेघ, आकाशामध्ये मागं वाढवली, तर त्या साऱ्या रेषा जणू एका बिंदूतून, एका ठिकाणाहून निघाल्यासारख्या दिसतात. त्या ठिकाणाला उल्कावर्षावाचं केंद्र म्हणतात. तसंच या उल्कावर्षावाला तो आकाशातल्या ज्या ठिकाणाकडून येत आहे असं दिसतं, त्या जवळच्या ठळक ताऱ्याच्या आणि त्या राशीच्या, तारकासमूहाच्या नावानं ओळखतात. म्हणजे अक्वेरिअस (कुंभ रास) तारकासमूहातल्या चौथ्या क्रमांकावरची दीप्ती असणाऱ्या ‘डेल्टा’ ताऱ्याला ‘डेल्टा अक्वेरी’ म्हणतात, तर त्याच्या जवळ ज्या उल्कावर्षावाचं केंद्र आढळतं, त्याला ‘डेल्टा अक्वेरिड्‌स’ असं म्हणतात. तसंच ‘जेमिनी’तील ‘जेमिनिड्‌स’, ओरायनमधील ‘ओरिओनिड्‌स’ अशी नावं आहेत.

नोव्हेंबर १८३३मध्ये, उत्तर अमेरिकेच्या रॉकी पर्वतरांगेच्या पूर्वेस, १७ नोव्हेंबरच्या रात्री, सर्वाधिक म्हणजे नऊ तासांत एकूण सुमारे दोन लाख उल्कांची, तारे निखळण्याची नोंद झाली. मात्र, त्याच कालावधीत युरोपमध्ये असा उल्कावर्षाव काही नोंदला गेला नव्हता. १८३४ मध्ये डेनिसन ऑल्मस्टेडनं याचा अहवाल ‘अमेरिकन जरनल ऑफ सायन्स अँड आर्टस’मध्ये प्रसिद्ध केला. त्यातून ही घटना पृथ्वीवर अवकाशातल्या काही ठिकाणच्या अशनींच्या समुच्चयामुळं होत असावी आणि तो समुच्चय धूमकेतूंशी किंवा लघुग्रहांशी संबंधित असावा, ही संकल्पना पुढं आली. मग धूमकेतूंचा उल्कांशी असणारा संबंध याबाबतचा अभ्यास सुरू झाला. फक्त धूमकेतूच नव्हे, तर काही मोठ्या अशनींचं सूर्याजवळून फिरताना (उपसूर्य बिंदूशी) सूर्याच्या गुरुत्वबलानं तुकडे होण्यानंही उल्कावर्षाव होतात, हे नुकतंच पीटर जेनिस्कननं (२००६) त्याच्या निरीक्षणांमधून दाखवून दिलं. लघुग्रहासमान असलेल्या ‘२००३ ईएच’ आणि ‘३२००फाइथॉन’ या अशनींच्या पाचशे आणि एक हजार वर्षांपूर्वी ते उपसूर्य बिंदूशी असताना झालेल्या तुकड्यांमुळं ‘क्वाड्रांटिड्‌स’ आणि ‘जेमिनिड्‌स’ हे दोन उल्कावर्षाव होतात, तर अवकाशात सूर्याच्या आसपास; पण पृथ्वीच्या कक्षा ओलांडणाऱ्या कक्षेत अनेक अशनींचा समूह आहे. तो साधारणपणे सूर्याच्या पूर्वेला १९५ अंशांवर, तर पश्‍चिमेला १६५ अंशांवर आयनिक वृत्तावरच आहे. हा भाग रोजच मध्यरात्री बरोबर आपल्या डोक्‍यावर येत असतो. याला ‘अँटिहिलियम उल्का समुच्चय’ असं म्हणतात. यातून येणाऱ्या उल्कांचं प्रमाण फारच कमी, म्हणजे तासाला पाच वगैरे असलं, तरी हे जानेवारीत जास्त प्रमाणात दिसून येतात.
खरं तर प्रत्येक महिन्यात हे असे उल्कावर्षाव होतच असतात. ते कमी जास्त प्रमाणात होत असले, तरी ते कोणत्या धूमकेतूच्या शेपटीमुळं होतात, ते आता चांगलं माहीत झालेलं आहे. तसंच काही वर्षाव हे काही नियमित कालात ‘कमाल’ आणि ‘किमान’ वर्षाव दाखवतात, त्याचं कारणही अवकाशातल्या ठराविक कक्षेत फिरणाऱ्या अशनींचा समुच्चय हे आहे. लिओनिड्‌स दर ३३ वर्षांनी कमाल वर्षाव देतात. ‘५५पी/टेंपल-टटल’च्या मागं उरलेल्या शेपटीच्या कक्षेचा आणि या वर्षावाच्या ‘कमाल’ क्षमतेचा थेट संबंध आहे. वर्षभरातले काही प्रमुख उल्कावर्षाव, त्यांचा कालावधी, त्यातल्या कोणत्या रात्री सर्वांत जास्त उल्का पडताना दिसणार आहेत ते अंदाज, तासाभरात जास्तीत जास्त किती उल्का दिसतील, वर्षाव कोणत्या वस्तूमुळं बनलेले आहेत, त्याचा एक तक्ता सोबत दिला आहे. तो तुम्हाला उल्कावर्षाव पाहण्याचं नियोजन करण्यास उपयुक्त ठरेल.

‘पर्सिड्‌स’ आणि ‘लिओनिड्‌स’ वर्षावात उल्कांचं प्रमाण सर्वांत अधिक असतं. ‘लिओनिड्‌स’ एका तासात कधी दोनशेपेक्षा जास्तही असतात, तर ‘पर्सिड्‌स’ सुमारे मिनिटाला एक. नोव्हेंबर महिन्यात १७/१८ तारखेच्या रात्री, म्हणजे आजपासून फक्त एक महिना आणि दोन दिवसांनी दिसणारा उल्कावर्षाव ‘लिओनिड्‌स’ म्हणजे सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव आहे. हा उल्कावर्षाव ‘५५ पी/टेम्पल-टटल’ नावाच्या धूमकेतूमुळं होतो. या रात्री सिंह रास मध्यरात्री उगवते, त्यामुळं रात्री बारा वाजल्यापासून सकाळी पाचपर्यंत, दर तासात साधारणत: १५ ते २० उल्का पडताना आपल्याला दिसू शकतात.

उल्कावर्षावाच्या नोंदी
उल्कावर्षाव पाहण्याची इच्छा असेल, तर काही खास सामग्रीची गरज नसते. कोणतीही खास दूरवेक्षी, द्विनेत्री वगैरेही सोबत घ्यावी लागत नाही. नुसत्या डोळ्यांनीच तर उल्का पाहायच्या असतात. आजकाल जागतिक स्तरावर उल्कावर्षावाच्या नोंदी घेण्याचं आणि त्या एकत्रित करून त्याची जागतिक नोंद ठेवण्याचंही काम चालू आहे. ते कसं चालतं ते पाहूया आणि जमलं, तर तुम्हीही या उल्कावर्षावाची नोंद घेण्याचं काम करू शकता.

उल्कावर्षावांचं निरीक्षण तीन प्रकारे घेतलं जातं. एक म्हणजे उल्कांची मोजणी, दुसरं त्यांची ‘दृश्‍यप्रत’ किती (‘दृश्‍य-प्रत’ म्हणजे प्रकाशमानता. डोळ्यांनी दिसणारा सर्वात अंधुक तारा सहा प्रतीचा, तर अभिजित हा तारा शून्य प्रतीचा मानण्यात येतो) आणि त्यांचा रंग कोणता ते नोंदवणं. तिसरी गोष्ट म्हणजे उल्कांच्या मार्गाचे प्रत्यक्ष नकाशे तयार करणं. यासाठी आकाशाचा सध्या दिसणाऱ्या भागाचा मोठा नकाशा हाताशी ठेवावा लागतो. नकाशाचं आणि प्रत्यक्ष आकाशाचं एकमेकांशी काय नातं आहे, त्यातले विविध तारे, त्यांची एकमेकांशी असणारी अंतरं, त्यांचं क्षेत्र हे नीट समजून घ्यावं लागतं. कारण त्या नकाशावरच आपल्याला पाहिलेल्या निखळलेल्या ताऱ्याची रेष काढायची असते. ती रेष किती लांबीची, कुठून कुठं जाणारी, त्याची अचूक दिशा दाखवणारी असायला पाहिजे. ज्यावर निरीक्षणं नोंदवायची त्याचं कोष्टक स्वरूपात तक्ते तयार करून ठेवावे लागतात. त्यात कोणकोणत्या गोष्टींची नोंद घ्यायची ते आधी ठरवावं लागतं. महत्त्वाची बाब म्हणजे, आकाशाकडं रात्री अंधारात बसून पाहायचं असतं. अशा वेळी कागदावर अंधारातच टिपण करणं जिकीरीचं असतं. एक छोटी विजेरी (टॉर्च) जवळ बाळगावी लागते; पण या विजेरीवर लाल रंगाचा जिलेटिन कागद लावावा लागतो- कारण रात्री तारे पाहण्यासाठी डोळ्यांचं जे अनुकूलन झालेले असते, अशा स्थितीत साध्या छोट्या विजेरीच्या प्रकाशानंही रात्रीच्या अंधारात डोळे इतके दीपतात, की समोरचं काहीच दिसेनासं होतं, तेही काही कालावधीपर्यंत. मग पटकन पडणारी उल्का टिपायची, तर ते अवघडच होतं. पडणाऱ्या उल्केची लगोलग कागदावर नोंद घेण्यासाठी, अशा वेळी लाल रंगाचा दिवा, विजेरी आवश्‍यक ठरते. या वेळी हिरव्या रंगाचं स्केच पेन फार उपयोगी ठरतं- कारण लाल प्रकाशात त्यानं काढलेली अक्षरं, खुणा, ठळक काळ्या दिसतात.

सविस्तर नोंदी महत्त्वाच्या
नीट नोंदी ठेवायच्या, तर ते एकट्याचं काम नाही. चार-पाच मित्र सोबत असले, तर फार चांगलं. यात चौघांनी पाठीला पाठ लावून बसायचे, तेही उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्‍चिम अशा दिशांना. प्रत्येकानं त्याच्या समोरच्या आकाशाच्या अर्धगोलाकडं लक्ष ठेवायचं. अर्थात काही भाग यात सामाईक येणार. मात्र, ते एका दृष्टीनं योग्यच होतं. या चौघांपेक्षा आकाशाकडं नाही, तर हातातल्या कोष्टकांकडं, नकाशाकडं आणि हो, सतत एखाद्या घड्याळ्याकडं (हे घड्याळ मंद प्रकाशित, डिजिटल स्क्रीनचे मोठे आकडे असणारं असावं) लक्ष ठेवणारा आपला पाचवा मित्र लागतो. निखळता तारा दिसला रे दिसला, की ज्याला तो दिसला त्यानं मोठ्या आवाजात ते सांगत त्या दिशेकडं बोट दाखवायचं. म्हणजे रेष  विझून गेली, तरी दिशा कायम लक्षात येते. ‘घड्याळजीं’नी ताबडतोब क्रमांक आणि वेळ नोंदवायची. मग ज्यानं उल्का पाहिली, त्यानं तिची दृश्‍यप्रत किती त्याचा अंदाज, रंगाचा अंदाज आणि त्या उल्केनं तयार केलेली रेघ किंवा उल्का दिसायला कुठून सुरुवात झाली आणि कुठे विझली त्याचा अंदाज (हे सांगताना तारकासमूहातल्या कोणत्या ताऱ्याच्या शेजारी, किती अंतरावरून ही सुरवात आणि शेवट झाला) ते सांगायचं. ते सारं मित्रानं लगेच कोष्टकात नोंदवायचं. यात आकाशाकडं पाहणाऱ्यानं अजिबात कोष्टक, नकाशाकडं लक्ष द्यायचं नाही. कारण तिकडं पाहताना एकादी उल्का निरीक्षणातून निसटू शकते... शिवाय साधा, मीडियम वेव्हचा रेडिओही सोबत असेल, तर आणखी एक उपयोग होईल. आकाशात जेव्हा तारा निखळलेला दिसतो, तेव्हाच त्याच्या वातावरणाशी होणाऱ्या घर्षणातून मागं जी रेघ तयार झालेली दिसते, तो तर आयनीभूत झालेल्या कणांचा पट्टा असतो. या पट्ट्याच्या आयनांचं आयुष्य कधी क्षणिक, तर कधी काही मिनिटांचंही असतं. मात्र, या वेळी दूरवरचं एखादं प्रक्षेपण जे सामान्य आयनोस्फिअरमधून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोचत नाही, ते या आयनांच्या पट्ट्यामुळं परावर्तित होतं. रेडिओमध्ये अशा दूरच्या न लागणाऱ्या आकाशवाणी केंद्राच्या जागी निव्वळ स्थितिजविद्युत लहरींमुळं (स्टॅटिक) सतत एखाद्या ‘डिस्टर्बन्स’सारखा आवाज येत असतो; पण अशनीनं तयार केलेल्या आयनीभूत पट्ट्यामुळं अचानक परावर्तित होणाऱ्या लहरींचे ध्वनी ऐकू येतात, एखाद्या स्पंदांप्रमाणं. हा पट्टा किती वेळ वातावरणात टिकून होता, तेही यावरून कळतं. शिवाय हा रेडिओ वेधांचा प्रकार असल्याने हे तंत्र दिवसाही उल्कांचं प्रमाण किती त्याचा अंदाज घेण्यासाठी वापरता येतो...

निरीक्षणासाठी इतर सामग्री
रात्रीच्या उल्कावर्षाव निरीक्षण कार्यक्रमात आणखीही काही साहित्य लागतं. बसण्यासाठी आरामखुर्ची अतिशय उपयुक्त ठरते. म्हणजे आकाशाकडं वर पाहताना मान दुखून येत नाही. डोक्‍याखाली एक मऊ उशीही हवी; पण गादी अंथरून, झोपून आकाशाकडं पाहू नये. अशानं एकतर फक्त डोक्‍यावरच्या आकाशाकडं लक्ष राहतं. मात्र, क्षितिजालगतचं आकाश अंगणात गादीवर झोपल्यावर नजरेच्या टप्प्यात येत नाही; शिवाय खुल्या आकाशाखाली थंड वातावरणात गादीवर डुलकी लागते ते वेगळंच! हां, थंडीसाठी योग्य त्या स्वेटर-मफलरचीही गरज भासते. नोव्हेंबरमध्ये दिवसा नाही; पण रात्री उघड्यावर  ११नंतर थंडी अंगात झिरपत जाते. त्यामुळं गरमागरम चहा-कॉफीचीही सोय हवीच. त्यासोबत फार नाही; पण तोंडात टाकायला, भुकेला आधार म्हणून किंवा जागं राहण्यासाठी चाळा म्हणून, चमचमीत-कुरकुरीत शंकरपाळी, चॉकलेटं, बिस्किटं, खाकरा, चिवडा असं काहीतरी जवळ असावं...

समजा, कुठल्या तरी गड-किल्ल्यावर दिवसा चढाई करत रात्रीचा हा कार्यक्रम रचला मित्रांसोबत तर फार मजा येते. या वर्षी सोळा नोव्हेंबरच्या रात्री आणि सतरा नोव्हेंबरच्या रात्री ही संधी आहे. मी तर नुसतं निरीक्षणच नव्हे, तर यावेळी चारचार वाइड लेन्सचे डिजिटल कॅमेरे चार दिशांना रात्रभर सतत रोखून ठेवणार आहे. तेही गोव्यातल्या एका वस्तीपासून दूर समुद्रकिनारी असणाऱ्या एका ‘फोर्ट’वर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com