मी मादी आहे म्हणून...

आनंद घैसास
रविवार, 25 डिसेंबर 2016

प्रगत प्राण्यांमध्ये नराचं आणि मादीचं निसर्गदत्त कार्य यात एक मोठा फरक नेहमी दिसून येतो. संततीचं संगोपन करणं, एकट्या संततीलाच नव्हे; तर कधी कधी पूर्ण कुटुंबाला अन्न पुरवणं, घर सांभाळणं हे बऱ्याच कालावधीपर्यंत चालणारं काम मादीचं, तर संरक्षण आणि कधी कधी घर बांधणं, हे नराचं काम असं सर्वसाधारण वर्गीकरण करण्यात येतं; पण नरांच्या बाबतीत हा नियम म्हणून प्रत्येक वेळी किती लागू होतो, हाही प्रश्नच आहे. उत्क्रांतीत सरपटणारे प्राणी जेव्हा ‘सस्तन’ बनत गेले, तेव्हा मादीवरची ही निसर्गदत्त जबाबदारी वाढत गेली, असंही मानलं जातं. 
 

प्रगत प्राण्यांमध्ये नराचं आणि मादीचं निसर्गदत्त कार्य यात एक मोठा फरक नेहमी दिसून येतो. संततीचं संगोपन करणं, एकट्या संततीलाच नव्हे; तर कधी कधी पूर्ण कुटुंबाला अन्न पुरवणं, घर सांभाळणं हे बऱ्याच कालावधीपर्यंत चालणारं काम मादीचं, तर संरक्षण आणि कधी कधी घर बांधणं, हे नराचं काम असं सर्वसाधारण वर्गीकरण करण्यात येतं; पण नरांच्या बाबतीत हा नियम म्हणून प्रत्येक वेळी किती लागू होतो, हाही प्रश्नच आहे. उत्क्रांतीत सरपटणारे प्राणी जेव्हा ‘सस्तन’ बनत गेले, तेव्हा मादीवरची ही निसर्गदत्त जबाबदारी वाढत गेली, असंही मानलं जातं. 
 

न र आणि मादी असा फरक निसर्गानं का केला असावा, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्यातही नराला निसर्गदत्त सौंदर्याचं दान जास्त आणि मादीला कमी, असं का,  हाही प्रश्न पडतो. माझ्या या म्हणण्यावर आजवर अनेक स्त्रिया नाराज झालेल्या मी पाहिल्या आहेत.

‘म्हणे पुरुष सौंदर्यवान...!’

‘हे विज्ञानवाले थोडे चक्रमसारखेच बोलतात नाही? की मुद्दामच चर्चेत राहावं म्हणून असं काही बरळत असतात...?’ वगैरे नेहमीच ऐकू येतं; पण हे खरं आहे की नराचं शरीर हे जात्याच सुंदर असतं. मादीचं शरीर मात्र तिच्या ‘आई’ होण्याच्या क्षमतेसाठी सर्वस्वी वाहून घेतल्यासारखं, फक्त उपयोगिता ध्यानात घेऊन बनवल्यासारखे असतं. मानवानंच फक्त, किंबहुना नरमानवानंच फक्त, त्यांच्या स्वत:च्या निव्वळ अवाजवी लैंगिक कल्पनांमधून स्त्रीवर, विशेषत: ‘तरुण माद्यां’वर, वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य आरोपित केलं आहे. अनेक स्त्रिया या पुरुषजमातीच्या सौंदर्यसंकल्पनेला बळी पडत होत्या, पडत आहेत, कदाचित बळी पडत राहतीलही...पण तो झाला मुद्दाम लावलेल्या सौंदर्यनिकषांचा भाग आणि त्यातून निर्माण झालेली सौंदर्यप्रसाधनंही; पण मला सध्या त्यात शिरायचं नाही. मात्र, निसर्गानं बहाल केलेल्या काही विशेषांबद्दल मी बोलत आहे. त्यात जो भेदभाव दिसून येतो, त्याबद्दल मी बोलत आहे.

पाहा : दाढी, मिश्‍या या पुरुषांना येतात. पुरुषाचं शरीर पीळदार, भरदार होतं...आवाजही भारदस्त होतो...केव्हा ? तर वयात येताना किंवा वयात आल्यावर. हे सगळं असतं नैसर्गिकपणे मादीला आकर्षित करण्यासाठी... हा खरा निसर्गाचा खेळ आहे. मानवाच्या मादीमध्ये मात्र वयात येताना होणारा बदल म्हणजे फक्त पुनरुत्पादनासाठी आवश्‍यक असणारा बदल असतो. मग तो कमरेचा आकार रुंद होणं असो की स्तनांची वाढ असो किंवा त्वचेखाली चरबीचं प्रमाण वाढणं असो. पुरुषांमध्ये अन्नाचं रूपांतर स्नायूंमध्ये होण्याचं प्रमाण स्त्रियांपेक्षा ३० टक्के अधिक प्रमाणात होत असल्याचं दिसून आले आहे, तर खाल्लेल्या अन्नाची चरबी होणं हे पुरुषांपेक्षा ३० टक्के अधिक प्रमाणात स्त्रियांमध्ये होतं. त्यात फक्त पुढं ‘आई’ होण्यास उपयुक्त गोष्टी असतात. मग भले तो एक सौंदर्याचा भाग म्हणून कुणी म्हणो...

सगळ्या प्राण्यांचाच विचार अशा प्रकारे करावा लागेल. नर आणि मादी यांच्यातल्या शारीरिक ठेवणीतला फरक हा एक जीवशास्त्रामधला वेगळा अभ्यासाचा विषयच म्हणावा एवढा मोठा आहे. सिंह पाहा ः त्याची आयाळ, रुबाबदार तोंड, सिंहकटी (आता ‘सिंहकटी’ हे स्त्रीचं सौंदर्य कसं बरं होऊ शकतं? ते तर नराचं सौंदर्य आहे) सिंहाचं चालणं...वागणं सगळंच रुबाबाचं. त्यामानानं सिंहीण लहान, तिला आयाळ नाही...नर आणि मादीमधला असा फरक अनेक प्राणी आणि पक्ष्यांमध्ये दिसतो. विचार करा... बैलाचं वशिंड, त्याची शिंगं- त्याच्या तुलनेत गाय. मोराचा रंग, डोक्‍यावरचा तुरा, पिसारा - त्या तुलनेत किरकोळ, रंगानंही कमी भडकपणा असलेली, पिसाराहीन लांडोर. तुरा, शेपटी आणि आकारानंही डौलदार असणारा कोंबडा, त्या तुलनेत कोंबडी...नर-पक्षी आणि त्यांच्या माद्या यांच्यामध्ये त्यांचा आकार, पंखांवरचे रंग, शेपटी आणि डौलदारपणाचे आणखी काही विशेष ठळक भागच आपल्याला दिसतात. कधी त्यांच्या आवाजात गोडवा जाणवतो. उदाहरणार्थ ः कोकीळ (नर) गातो, पण मादी (कोकिळा) जेमतेम ‘चकचक’ करते... सांबराला डौलदार शिंगं असतात, तशी मादीला नसतात... अशी कितीही उदाहरणं दिली, तरी ती कमीच. मात्र,  हा निसर्गदत्त फरक नराचं पारडं जड ठेवणारा आहे काय? की तसा नुसता आभासच आहे? ‘पुनरुत्पादनासाठी निसर्गात उत्क्रांतीतून नर आणि मादी निर्माण होत गेले,’ असं अनेक शास्त्रज्ञ मानतात. प्राथमिक एकपेशीय जीवांमध्ये नर-मादी असा फरक नाही. तिथं एका पेशीचंच विभाजन होऊन एकाच्या दोन, दोनाच्या चार पेशी होतात; पण अधिकाधिक प्रगत प्राण्यांमध्ये नर आणि मादी हा फरक अधिकाधिक स्पष्टपणे जसा दिसतो, तशीच त्यांच्या जीवनशैलीतली तफावतही वाढलेली दिसते. प्रगत प्राण्यांमध्ये नराचं आणि मादीचं निसर्गदत्त कार्य यातही एक मोठा फरक नेहमी दिसून येतो. संततीचं संगोपन करणं, एकट्या संततीलाच नव्हे; तर कधीकधी पूर्ण कुटुंबाला अन्न पुरवणं, मग ते शिकार करून असो की गोळा करून असो... घर सांभाळणं हे बऱ्याच कालावधीपर्यंत चालणारं काम मादीचं, तर संरक्षण आणि कधी कधी घर बांधणं हे नराचं काम असं सर्वसाधारण वर्गीकरण करण्यात येतं; पण नरांच्या बाबतीत हा नियम म्हणून प्रत्येक वेळी किती लागू होतो, हाही प्रश्नच आहे.

उत्क्रांतीत सरपटणारे प्राणी जेव्हा ‘सस्तन’ बनत गेले, तेव्हा मादीवरची ही निसर्गदत्त जबाबदारी वाढत गेली, असंही मानतात. अंडी देणाऱ्या प्राण्यांमध्ये, विशेषत: पक्ष्यांमध्ये पिलांचं संगोपन, पालन, त्यांची अन्नाची गरज भागवण्यासाठी नर-पक्षी खूप कष्ट घेताना दिसतात. अनेक पक्ष्यांमध्ये मादीची अंडी घालण्याची जेव्हा वेळ येते, त्याचदरम्यान बऱ्याच वेळा मादीच्या देखरेखीखाली नर मोठ्या कष्टानं घरटं बांधतो. तिचं समाधान झालं नाही तर ती ते घरटं चक्क विस्कटून टाकते! नराला मग परत दुसरं अधिक चांगलं घरटं बांधणं भाग पडतं. जरा निरनिराळी घरटी आठवा ः बाया किंवा सुगरणीचं घरटं, धनेश आणि सुतारपक्ष्याचं ढोलीतलं घरटं, बगळ्यांचं झाडांच्या शेड्यांवरचं घरटं. ही सगळी घरटी अंडी उबवण्यासाठी आणि त्यातून जन्माला येणाऱ्या पिलांसाठी असतात. एकदा का पिलं मोठी झाली की घरट्याचं कामच संपतं. फक्त काही चिमणीच्या गटातले पक्षीच जोडीनं, एकमेकांच्या साथीनं घरटे बांधतात. अंडी आणि पिलं घरट्याच्या आतल्या भागात राहतात; पण नर मात्र बऱ्याचदा घरट्याबाहेर दाराशी (!) पहारा देत असतो...काही पेंग्विनच्या जातीतले पक्षी मात्र घरट्यात मादीनं घातलेली अंडी नर-पेंग्विन उबवतो!

सस्तन प्राण्यांमध्ये मात्र हे चित्र फारच उलट दिसतं. जोपर्यंत पिलं मोठी होऊन स्वत:चं अन्न स्वत: मिळवू शकत नाहीत, तोपर्यंत त्यांचा सांभाळ करावा लागतो, त्यांना स्तनपान द्यावं लागतं. अशा काळात पुन्हा पिलं होऊ न देणं, असणाऱ्या पिलांचं संगोपन, प्रसंगी संरक्षण हेही फक्त मादीचंच जणू कर्तव्य. मनुष्यप्राणी सोडला तर घर बांधण्याचा प्रकार सस्तन प्राण्यांमध्ये जवळजवळ नाहीच. उंदीर, घुशी, ससे असे काही प्राणी बीळ खणून त्यात आपला संसार थाटतात, राहतात; पण तेही स्वसंरक्षणासाठी अधिक उपयुक्त म्हणून...निव्वळ मादीसाठी आणि पिलांच्या संगोपनासाठी निवारा म्हणून नव्हे. काही सस्तन प्राणी ढोलीत, तर वाघ-सिंहासारखे प्राणी नैसर्गिक गुहेत पिलांना जन्माला घालण्यासाठी बस्तान मांडतात; पण तिथंही ही अशी योग्य जागा शोधण्यात मादीचाच पुढाकार असतो; तोही पिलांचा सांभाळ करण्यासाठी जेमतेम निवारा म्हणून. प्राण्यांमध्ये नरांची बेफिकिरीच जास्त दिसून येते...केवळ घराच्या बाबतीतच नव्हे, तर एकंदरीतच...प्रत्येक प्राणी, त्यातले नर आणि मादी हे कसं जीवन जगतात हे तपासलं, तर निसर्गदत्त कामांचं ओझं माद्या पुरेपूर पेलताना दिसतात; पण नर मात्र त्यांची कामं करतातच असं नाही.

हां, मादीच्या प्राप्तीसाठी नरांची एकमेकांमध्ये असणारी चढाओढ, त्यातून होणाऱ्या मारामाऱ्या, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी होणारी युद्धंच ती, ती मात्र ठायी ठायी दिसून येतात. पिलांचं संरक्षण मात्र माद्याच करतात...आणि त्यातही माद्यांचा कमकुवतपणा हा, की दिसायला अधिक रुबाबदार असणाऱ्या, गोड आवाजात साद घालणाऱ्या, लढायांमध्ये जिंकणाऱ्या, शक्तिशाली नराला त्या मागचा-पुढचा विचार न करता सर्वस्व बहाल करतात. मग तो नर नंतर सोडून जाणारा बेफिकीर असो, की बसून खाणारा, छळ करणाराही असो! पण एक मात्र खरं, की समागमासाठी कोणत्या नराची निवड करायची, याचा अधिकार मात्र सर्वस्वी मादीचाच असतो.

प्राण्यांमध्ये मोठ्या कौतुकानं ज्याला ‘वनाचा राजा’ म्हटलं जातं, त्या सिंहाचंच उदाहरण घ्या. हा राजा बहुतेक वेळ फक्त आरामच करत असतो. काही काळ कळपातलं आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी, टिकवण्यासाठी इतर नरांशी भांडत असतो, नाही असं नाही; पण पूर्ण कुटुंबासाठी अन्न मिळवण्यासाठी शिकार करण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा ती जबाबदारी मात्र मादीची...सिंहिणीची. ती आकारानं लहान, अधिक चपळ, अधिक वेगवान. शिकार करण्यातलं तिचं कौशल्यही अधिक. शिकारीला घेरण्याचं काम कुटुंबातले इतर सदस्य सिंह जरी कळपानं करत असले, तरी कुटुंबप्रमुख वनराज मात्र मागच्या फळीत. पुढं मोक्‍याच्या जागी सिंहीण. तीच सर्व शक्तीनिशी शिकार करणार. इतरांचा फक्त हातभार...पण शिकार झाल्या झाल्या शिकारीमधला ‘सिंहाचा वाटा’ मात्र तथाकथित कुटुंबप्रमुख वनराजाला. शिकार खायच्या वेळी नर आधी. त्याचं समाधान झालं की मग सिंहीण खाणार, तेही छाव्यांसाठी योग्य तेवढं शिल्लक ठेवून. आणखी एक जबाबदारी सिंहिणी नेहमीच घेताना दिसतात, ती म्हणजे कळपातला कुणाचाही का छावा असेना, जेव्हा दूध पाजण्याची वेळ येते, तेव्हा त्या आपपर भाव करत नाहीत. कळपातल्या भुकेलेल्या कोणत्याही छाव्याला त्या दूध पाजतात हे विशेष. आपल्या पिलांच्या संगोपनासाठी किती विविध प्रकारचे मार्ग ‘आई’ झालेला किंवा होणारा मादी हा प्राणी करत असतो, हे पाहिलं तर आश्‍चर्य वाटतं. 

कोकीळ पक्ष्याचंच उदाहरण घ्या. त्यातल्या कोकिळाचं (नर) वागणं सर्वश्रुत आहे. विणीच्या हंगामात गोड साद घालून माद्यांना आकर्षित करून घेणारा गाणारा कोकीळ, पिलांसाठी स्वत:चं घरटं बांधणं तर सोडाच; पण अंडी उबवणं, नंतर पिलांना भरवणं हे काहीच करत नाही. नुसता उंडारत असतो. त्यामुळं कोकिळेला (मादी) दुसऱ्यांच्या घरट्यात, म्हणजे कावळ्यांच्या घरट्यात, अंडी घालण्याशिवाय पर्याय राहत नाही. तिची अंडी कावळ्याच्या मादीला आपली वाटावीत म्हणून कावळीनं घातलेली घरट्यातली मूळ अंडी कोकिळा चक्क घरट्याबाहेर ढकलून नष्ट करते. कधी कधी तर कावळ्याच्या अंड्यातून नुकत्याच जन्माला आलेल्या पिलांचाही त्यांना घरट्यातून हुसकावून लावून खातमा करते. कारण, आपल्या पिलांचं चांगलं संगोपन व्हावं हा उद्देश. हे फक्त कोकिळाच करतात, असं नाही. अशा दुसऱ्यांच्या घरट्यात अंडी घालणाऱ्या अनेक पक्ष्यांच्या माद्या आहेत. त्या फक्त आपली अंडीच दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात घालून थांबतात असं नाही, तर आपल्या अंड्यांना काही धोका होत आहे, असं वाटल्यास संपूर्ण घरटंच उचकटून-विस्कटून टाकायला मागं-पुढं पाहत नाहीत.

आपल्या संततीच्या संगोपनाचं काम आपल्याला न झेपणाऱ्या काही मधमाश्‍यांचीही हीच पद्धत आहे. या मधमाशा पराग आणि मध पुरेसा जमवण्यास निसर्गतःच असमर्थ असतात. मग या मादी-माश्‍या काय करतात, की मध जमवणाऱ्या मधमाश्‍यांच्या पोळ्यात कधी तिथली अंडी नष्ट करून त्या जागी आपली अंडी घालतात, तर काही ठिकाणी आधी जिथं अंडी असतात, तिथंच आपलीही अंडी घालतात. गंमत म्हणजे, नंतर घातलेल्या या अंड्यांमधून नवीन जन्माला येणाऱ्या अळ्या आधी जन्माला येणाऱ्या मूळ अळ्यांना मारून खातात, त्यांचाच अन्न म्हणून उपयोग करून घेऊन अधिक चांगल्या प्रकारे जोपासल्या जातात...काही पतंगांच्या (वास्प) बाबतीतही दुसऱ्यांच्या घरात आपल्या अपत्याला वाढवण्याचं तंत्र या पतंगांच्या माद्यांकडून वापरण्यात येतं. चिखलातून मडक्‍यासारखं घर करणाऱ्या कुंभारमाशीच्या (मड वास्प) घरात, या मडक्‍यात कुंभारमाशीच्या माद्यांनी त्यांच्या अंड्यांसोबत बेशुद्ध केलेल्या अळ्या आणि कोळी साठवलेले असतात, ते त्यांच्या अंड्यातून जन्माला येणाऱ्या अळ्यांचं खाद्य म्हणून. याचाच फायदा इतर पतंगांच्या माद्या घेतात. त्या या अंडी आणि अन्न साठवलेल्या मडक्‍यातच आपली अंडी घालतात. गंमत म्हणजे त्यातून अळ्या जन्माला येण्याचा कालावधी मूळ कुंभारमाशीच्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या अळ्यांपेक्षा थोडा कमी असतो. आधी जन्माला आलेल्या या अळ्या साठवलेले अन्नच नव्हे, तर कुंभारमाशीची अंडीही फस्त करून टाकतात. अशा घुसखोरीनं घराचं संरक्षण आणि अन्न दोन्ही या पतंगांच्या नवजात अळ्यांना आयतंच मिळतं.

नराच्या तुलनेत ‘मादी’च्या माथी नेहमीच ‘बेवफाई’चा दोष मारला जातो. नरांचं अनेक माद्यांबरोबर समागम करणं, हे जणू गृहीतच धरलेलं असते. कायम जोडीनं राहणारे प्राणी-पक्षी काही प्रमाणात आहेतही; पण तो काही नियम ठरत नाही. मात्र, एकापेक्षा अधिक नरांबरोबर संबंध असणाऱ्या कोणत्याही ‘मादी’ला अतिशय वाईटपणे‘बिच’ म्हणजे‘कुत्री’ असं जे शिवीप्रमाणे संबोधलं जातं, ते मात्र सर्वस्वी चुकीचं आहे, असं मला वाटतं. कारण, एकापेक्षा अधिक नरांशी संबंध होणं हा काही कुत्रीचा वैयक्तिक दोष नाही. ही गोष्ट ती काही स्वत: विचारानं ठरवून करत नसते, तर ती निसर्गानं केलेली क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल. ती कशी? तर कुत्री जेव्हा मोसमावर येते, तेव्हा तिच्या शरीरातून एक प्रकारचा गंध बाहेर पडू लागतो. हा गंधच नर-कुत्र्यांना आकर्षित करतो; पण जोपर्यंत गर्भधारणा होत नाही, तोपर्यंत हा गंध येणं थांबत नाही. त्यामुळं तेवढे सगळे दिवस नर-कुत्रे तिच्याकडं आकर्षित होतच राहतात. त्यामुळंच या गंधानं बेभान झालेल्या नर-कुत्र्यांच्या अत्याचाराला तिला कारण नसताना बळी पडावं लागतं. नाहक बदनाम व्हावं लागतं. अशीच स्थिती लांडग्यांच्या आणि कोल्ह्यांच्या माद्यांबाबतही होते. या माद्यांना त्यांच्या मोसमाच्या काळात नर-कोल्हे आणि नर-लांडगे तर चक्क घेरतात आणि त्यांच्या मोठ्या हल्ल्यांनाही कधी कधी माद्यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी तर या लैंगिक अत्याचारांमुळं या माद्यांना आपले प्राणही गमवावे लागल्याची उदाहरणं आहेत. मात्र, एका संशोधनात आपल्या घरासाठी, किंबहुना आपल्या पिलांसाठी, त्यांच्या संगोपनासाठी, ‘सुपर्ब स्टर्लिंग’ जातीच्या पक्ष्यांच्या माद्या आपणहून ‘देहविक्रय’ करतात, व्यभिचार करतात, तेही आपल्या प्रामाणिक जोडीदार नराला फसवून, असं निदर्शनास आलं आहे. याबदल्यात या इतर नरांकडून आपल्या पिलांचं पोषण, घरट्याची, एकंदर अन्नपुरवठ्याची तजवीज त्या करतात असं दिसून आलं आहे.

अंडी देण्याच्या कालावधीत अन्नाच्या शोधात जेव्हा नर घरट्याबाहेर असतो, तेव्हा आपल्याच कळपातल्या; पण मादीला सहज जिंकू न शकणाऱ्या लहान, दुर्बल नरांशी या माद्या जाणूनबुजून शरीरसंबंध करतात. त्याबदल्यात हे नरपक्षीही मग तिच्या पिलांच्या पोषणासाठी मदत करतात. पिलांच्या पोषणासाठी एरवी अपुऱ्या पडणाऱ्या अन्नाची भरपाई त्यांच्याकडून होते, त्यामुळं पिलांच्या बालमृत्यूचं प्रमाण घटतं हे विशेष. त्यासाठीच मादीची ही धडपड... नर आणि मादी हा प्रकार केवळ प्राण्यांमध्येच असतो असं नाही. वनस्पतींमध्येही नर-मादी हा प्रकार आहे. धोत्रा, पपई, करटोली, तोंडली यांमध्ये काही वनस्पती नर-वनस्पती, तर काही मादी-वनस्पती असतात. नर-वनस्पतींवर जी फुलं येतात, त्यांमध्ये फक्त पुंकेसर असतात, त्यांना कधीच फळ धरत नाही. ज्या मादी-वनस्पती असतात त्यांवर या नर-वनस्पतींच्या परागकणांचं शिंपडण वेगवेगळ्या कीटकांमार्फत होतं, तेव्हाच त्यांची फलधारणा होते आणि त्यांना फळं लागतात. नाहीतर त्याही फलधारणेपासून वंचित राहतात. हे असं
कीटकांवर अवलंबून राहणं त्यांच्या नशिबी का? तर तिचं उत्तर असं असेल...‘मी मादी आहे म्हणून...जबाबदारीची सारी भिस्त निसर्गानं माझ्यावरच सोपवली आहे म्हणून... आणि मी माझं हे निसर्गदत्त कर्तव्य ‘येनकेनप्रकारेण’ पूर्णत्वास नेणार आहे म्हणून... ’ नुसत्या दिखाऊ दिमाखापेक्षा हे कर्तव्य सहनशीलतेचं, लाखमोलाचं आहे...नुसतं शरीरसौंदर्य नव्हे तर सत्य, शिव आणि सुंदरतेचा तो एक नैसर्गिक मिलाप या ‘आई’पणात आहे, हे मान्यच केलं पाहिजे...