मनातलं ‘पार्श्‍वसंगीत’ (आनंद घैसास)

आनंद घैसास anandghaisas@gmail.com
रविवार, 19 मार्च 2017

अनेकदा आपण काम वेगळंच करत असतो आणि मनात वेगळ्याच कुठल्या तरी गाण्याचं ‘पार्श्‍वसंगीत’ सुरू असतं. हे ‘पार्श्‍वसंगीत’ कधी अगदी मूळ गाण्यासारखं, कधी तुकड्यांच्या स्वरूपात, तर कधी आणखी वेगळ्या स्वरूपात सुरू असतं. अशा गाण्यांना कर्णकिडे (इअरवर्म) म्हणतात. नक्की कुठली असतात ही गाणी, त्यांच्या मागचं तत्त्व काय, प्रत्यक्ष संगीताचा आणि मनातल्या या ‘पार्श्‍वसंगीता’चा नेमका परस्परसंबंध काय अशा मुद्द्यांचा वेध.

अनेकदा आपण काम वेगळंच करत असतो आणि मनात वेगळ्याच कुठल्या तरी गाण्याचं ‘पार्श्‍वसंगीत’ सुरू असतं. हे ‘पार्श्‍वसंगीत’ कधी अगदी मूळ गाण्यासारखं, कधी तुकड्यांच्या स्वरूपात, तर कधी आणखी वेगळ्या स्वरूपात सुरू असतं. अशा गाण्यांना कर्णकिडे (इअरवर्म) म्हणतात. नक्की कुठली असतात ही गाणी, त्यांच्या मागचं तत्त्व काय, प्रत्यक्ष संगीताचा आणि मनातल्या या ‘पार्श्‍वसंगीता’चा नेमका परस्परसंबंध काय अशा मुद्द्यांचा वेध.

कधी कधी वेगळाच अनुभव येतो. काम काही वेगळंच चालू असतं. आपण कोणाशी काही बोलत असतो, लिहीत असतो, ऑफिसचं काही काम करत असतो; पण कोणतं तरी एक गाणं सतत आपल्या डोक्‍यात ‘बॅकग्राउंड’ला वाजतच असतं. कानाला लावलेल्या ‘इअरफोन’मधून नव्हे, तर आपल्याच डोक्‍यात ते चालू असतं. कधी ते अगदी मूळ गीतासारखं तंतोतंत वाजत असतं, तर कधी ते आपणच म्हणत असतो- आपल्या आवाजात!... गंमत म्हणजे ते गाणं आपण ठरवून म्हणत नसतो, ते असंच अचानकच सुरू झालेलं असतं. आपल्या कामाचा, सध्या मनात असलेल्या भावनांचाही काही संबंध असतोच, असं नाही. त्यात नव्या-जुन्याचा, त्या गाण्याच्या कवितेचा, अर्थाचा; ते हिंदी, इंग्रजी, की मराठी आहे याचा; बालगीत, नाट्यगीत, भावगीत की समूहगीत याहे याचा, अशा कशा-कशाचाही संबंध नसतो. तसंच, तेच गाणं का, असा आपण विचार केला, तर आपल्यालाच ते लक्षात येत नाही; पण एक आहे, कधी-कधी एकच गाणं असं दिवसभर सुरू असतं. कधी आपण ऑफिसला जात असता वाटेत कुठं तरी कानावर पडलेलं गाणं, त्यातल्या कधी-कधी एखाद्या दुसऱ्या ओळीच आपण दिवसभर आळवत बसलेलो असतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला आठवतंय, की लहानपणीसुद्धा कित्येकदा अगदी अभ्यास चालू असतानाही डोक्‍यात मागं एखादं गाणं चालू असायचं. बरं, मी काही कोणी गायक नाही; पण मनातल्या मनात मात्र मी अगदी जसंच्या तसं सुरात गाणं म्हणू शकत होतो. हो... खरंच सांगतो. पण मी मोठ्यानं गाणं म्हणायला लागलो, की आजूबाजूचे लोक हसायचेच... मलाही मग खजील झाल्यासारखं व्हायचं. असो.

हे सारं सांगण्याचं कारणही असंच झालं. काही गाणीच अशी ‘कर्णकिडे’ (इअरवर्म) असतात, असं वाचनात आलं. जरा औत्सुक्‍य वाढलं. आणखी संदर्भ पाहत गेलो, तर चक्क यावर काही जणांनी बराच मोठा अभ्यास केला आहे आणि तोही वैज्ञानिक रीतीनं, हे कळलं. मग ते तुम्हालाही सांगावं वाटलं. या विषयावर, म्हणजे अशी कोणती गाणी ‘इअरवर्म’ ठरली आहेत, तसंच का होतं, कोणत्या लोकांना कोणती गाणी आवडतात, ती गुणगुणली जातात, याचा आणि असं हे नकळत सतत गाणं डोक्‍यात गुणगुणलं जाणं आठवड्यातून किती वेळा होतं, असाही अभ्यास काही जणांनी केला आहे. हा काही विशिष्ट वर्गाचाच स्वभावविशेष आहे, की हे सार्वत्रिक आहे, असं डोक्‍यात चाललेलं सततचं गाणं विसरावं कसं, यात संगीत शिकणारे अधिक असतात की संगीत येत नसणारे अधिक, असे अनेक बाजूंनी केलेले अभ्यास माझ्या हाती लागले.

संगीताच्या ‘स्मृती’
लास्सी लिक्कानेन यांनी गेल्या दहा वर्षांपासून केलेला अभ्यास तर यात फार महत्त्वाचा मानला जातो. तसंच ब्रिटनमध्ये जोशुआ फ्राय, डॅनिएल मुलेनसिफेन, सागर जिल्का, ऱ्हिनॉन जोन्स, लॉरेन स्टिवॉर्ट आणि व्हिक्‍टोरिया विल्यमसन या संशोधकांच्या एका गटाने केलेला अभ्यास समोर आला. गंमत म्हणजे हे अभ्यास संगीताबद्दल असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश मानसशास्त्रीय विश्‍लेषणाचा होता. या प्रकाराला त्यांनी ‘आयएनएमआय’ म्हणजे ‘इनव्हॉलंटरी म्युझिकल इमेजरी’ असं म्हटलं. म्हणजे पूर्वी ऐकलेल्या गाण्यांच्या स्मृतींमुळं, नकळतच आपणहून काही न ठरवता, गाणं गुणगुणण्याचा, डोक्‍यात गाणं सतत चालू राहण्याच्या प्रकाराचा उगम होतो, असा मानसशास्त्रीय निष्कर्ष त्यांनी काढला. त्याचसोबत ज्यांनी स्वतः गाण्याचा अभ्यास केला आहे, त्यांच्या डोक्‍यात गाणं चालू राहण्याचा कालावधी मोठा असतो. त्यांच्या गुणगुणण्यात मोठ्या सुरावटी असतात, असं त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं. अर्थात, नवीन चाली करताना हे असं होणं जरा त्रासदायकच असतं, असं संगीतकारांना वाटतं. इतर कामांत या गाण्यांचा कधीकधी त्रास होतो, असं इतरांनीही नमूद केलं आहे. डोक्‍यात असं गाण्यांचं ‘पार्श्‍वसंगीत’ सुरू असण्याची घटना सर्वांच्या बाबतीत होत असते; पण कमी- जास्त प्रमाणात, असाही निष्कर्ष आहे. कानाला ‘इअरफोन’ लावून सतत, मोठ्या प्रमाणात गाणी ऐकणाऱ्यांच्या बाबतीत हे अधिक वेळा होतं; पण त्यांचा कालावधी तुकड्या-तुकड्यांच्या गाण्यांचा असतो. विशेष म्हणजे, संगीताबद्दल काहीही आपुलकी नसलेल्यांच्याही मनात असं ‘पार्श्‍वसंगीत’ चालू असतं; मात्र ते कमी वेळा होतं आणि त्याचे कालावधीही छोटे असतात, असं दिसून आलं आहे. याविरुद्ध बाब म्हणजे गाणी मनापासून ऐकणाऱ्या लोकांना मनात गाणं चालू नसलं, तर अस्वस्थता येते, असंही अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. जे लोक थोडं का होईना, पण गाणं म्हणू शकतात, अशांच्या बाबतीत मनातलं गाण्याचं ‘पार्श्‍वसंगीत’ अधिक काळ चालू असतं. गाण्याच्या मोठमोठ्या ओळी- कधी तर संपूर्ण गाणंही, त्याच्या कडव्यांमधल्या संगीतासकट हे लोक मनात म्हणत असतात. गंमत म्हणजे काल आपण कोणतं गाणं म्हणत होतो, हे त्यांना नंतर आठवेलच असं नाही... या अशा गमतिशीर बाबी चक्क एका सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत. या सर्वेक्षणात फिनलॅंडमधले १२,५१९; तर युरोप, अमेरिका आणि ब्रिटनमधले प्रत्येकी सुमारे दीड हजार लोक सहभागी झाले होते. इंटरनेटद्वारे पाठवलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात भारतातलं मात्र कोणी नाही.

भारतीयांची ‘स्वरमानसिकता’
मलाही गाणं मनात नकळत चालू असण्याचा अनुभव आहे. भारतीय संगीताला एक मोठी परंपरा आहे. संपूर्ण जगाच्या सुमारे सोळा टक्के लोकसंख्या भारतात आहे. आठ धर्मांचे लोक इथं राहतात. विकसित आणि मान्य अशा अठरा भाषा इथं आहेत, ज्यांत असंख्य गाणी निर्माण होत आहेत. बोलीभाषा आहेत अठराशे. वीस महानगरं, चार हजार शहरं आणि सुमारे साडेपाच लाख खेडी भारतात आहेत. आजची ‘आकाशवाणी’ भारतातल्या सुमारे ९८ टक्के लोकसंख्येपर्यंत पोचते, असा अहवाल नुकताच हाती आला आहे. शिवाय दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओही आहेत... अर्थातच गाणं, संगीत हे विविध स्तरांतून विविध प्रकारे सर्वसामान्यांपर्यंत पोचतं, हे मान्य करावंच लागेल. शास्त्रीय संगीत काही घराघरांतून किंवा शाळाशाळांतून शिकवलं जात असेलच असं नाही; पण अगदी लहानपणच्या ‘अडगुलं मडगुलं’पासूनच संगीत आपल्या कानावर आलेलं असतंच. मग आपणही असा काही संशोधन प्रकल्प करायला काय हरकत आहे, असा एक विचार मनात आला.... निदान आपल्या संगीताबद्दल आपल्याच लोकांची मानसिकता समजेल.

कोणती गाणी गुणगुणली जातात, हे पाहिलं तर लक्षात येतं, की सोपी, सहज, कोणालाही म्हणता येण्याजोगी गाणी कानात पटकन्‌ बसतात. जास्त चढ-उतार आणि तेही आळवायला कठीण असलं, तर सहसा असं दिवसभर गुणगुणलं जाण्यातलं नसतं. हे गाणं ऐकताना आवडलेलं असलं तरी! अर्थात, हे निष्कर्ष पाश्‍चिमात्य गाण्यांचे आहेत. पण मी जेव्हा माझ्या घरच्यांना, मित्रांना विचारलं, तेव्हा त्यांनी जी गाणी सांगितली, त्यांतही हेच दिसून आलं. तसंच, गाण्यातल्या पहिल्या ओळीची लय पुढं तशीच कायम राहिली, तर ती गाणी जास्त गुणगुणली जातात असं दिसतं.  
‘सैराट’मधल्या ‘उरात होतंय धडधड लाली गालावर आली’ या गाण्याचं, किंवा ‘शांताबाई... शांताबाई’ अशा गाण्यांची उदाहरणं देता येतील. हिंदीतलं ‘भिगी भिगी रातों में, मिठी मिठी बातोंमें, ऐसा लगता है’ हे राजेश खन्नावर चित्रित झालेलं, किंवा ‘चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नही चुराना सनम’ यांतलं तर म्युझिकही शब्दांनंतर गायलं जातं... आपोआप. अनेक लोकगीतांमध्ये हीच बाब दिसते, ज्यात दोन- तीन सुरावटी पुनःपुन्हा येतात. ‘ह्यो ह्यो ह्यो पावना सखूचा म्हेवना, तुझ्याकडं बघून हसतोय गं’ असो, की  ‘गंगा जमना दोघी भैणी गं पाणी झुळझुळं व्हाय... नेसली पैठनी साडी गं’ किंवा ‘हेऽ पावलंय देव माझा मल्हारी, देवा तू भाव रे पाव रे मल्हारी’ अशी उदाहरणं वानगीदाखल देता येतील. पाहा हं, ही गाणी कधी पाठ करावी लागलीच नाहीत, ती आपोआपच लक्षात राहतात...

मन व्यापणारं ‘सोपेपण’
गाणं जुनं असो की नवीन, नाट्यगीत असो की चित्रपटगीत, ते म्हणायला सोपं असावं लागतं. अशी खरं तर बरीच गाणी निघतील, जी आपण अनाहूतपणे म्हणत असतो. कधी-कधी संपूर्ण गाणं कठीण असलं, तरी त्याची ध्रुवपदंच आपण गुणगुणत असतो... जसं, ‘मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा...’
गाणं ही काही सोपी गोष्ट नाही, हेही तितकंच खरं. एवढंच नव्हे, तर एखाद्या चांगल्या गायकाचं, तो नेहमी गात असलेलं गाणंही प्रत्येक वेळी तेवढंच चांगलं; मूळ रेकॉर्डसारखं होतं असं नाही. आपणही अशा वेळी ‘अरे, आज त्याचा सूरच लागला नाही,’ असं म्हणतो. हे सूर लागणंसुद्धा गणिताला फारच धरून आहे. गणितात दोन आणि दोन चारच होतात, थोडंही कमी- जास्त नाही- तसंच असतं सुरांचं, जराही कमी- जास्त चालत नाही, ते बेसूरच होऊन जातं. सुरांचं गणित ज्याचं जमतं, तोच उत्तम गायक किंवा वादकही ठरतो. या सुरांच्या गणिताची यानिमित्तानं थोडी ओळख करून घेऊया, म्हणजे आपल्यालाही कधी जमलं, तर सुरात गुणगुणता येईल...
असं म्हणतात, की मानवानं संगीताचे सूर पक्ष्यांच्या किंवा निसर्गातील इतर प्राण्यांच्या आवाजावरून शिकले असावेत. खरं तर मानवाला एका सेकंदात वीस ते वीस हजारपर्यंतच्या वारंवारतेचे आवाज ऐकू येतात; पण एवढे सारे आवाज तो काही आपल्या गळ्यातून काढू शकत नाही. अगदी खालच्या पट्टीत (याला संगीताच्या भाषेत ‘खर्ज’ म्हणतात) ‘आ’ असं म्हणायला सुरवात केली आणि आवाजाची पट्टी वाढवत- वाढवत (आवाज नुसताच मोठा नव्हे) गेल्यास साधारणतः आपण नेहमी ज्या आवाजात बोलत असतो (याला ‘मध्य’ म्हणतात) तेवढा होतो आणि त्यानंतर पट्टी आणखी वाढवत (इथं आवाज थोडा बारीकही होत जातो) एका उंचीवर थांबतो. त्याच्यावरचे उंच सूर आपल्याला काढताच येत नाहीत. ही आपल्या आवाजाची मर्यादा असते; पण ही नेहमीच एकसारखी राहत नाही. तसंच, सगळेच जण एवढे सारे सूर काढू शकतात, असंही नाही... पण ‘खर्ज’, ‘मध्य’ आणि ‘तार सप्तक’ अशी साधारण तीन सप्तकांची आपल्या आवाजाची अधिकतम मर्यादा, व्याप्ती गृहीत धरलेली आहे. खरं तर खर्जातल्या पंचमापासून ते तार सप्तकातल्या पंचमापर्यंत म्हणजे दोन सप्तके ही बऱ्यापैकी गाणाऱ्या गायकांच्या आवाजाची व्याप्ती असते. (ज्युली अँड्य्रूज या ‘साउंड ऑफ म्युझिक’मधल्या गायिकेची मर्यादा साडेतीन सप्तकांची होती, असं प्रसिद्ध आहे) सप्तक म्हणजे सात सूर : सा, रे, ग, म, प, ध, नी. हे बहुतेक सर्वांना माहीत असतं. यांनाच ‘षड्‌ज’, ‘ऋषभ’, ‘गंधार’, ‘मध्यम’, ‘पंचम’, ‘धैवत’ आणि ‘निषाद’ असंही म्हटलं जातं. पण हे एक भौतिकशास्त्रीय अनुतरंगांचं गणित आहे.
ध्वनी म्हणजे हवेतून कानापर्यंत पोचणाऱ्या लाटा, तरंग किंवा लहरी. आपल्याला जे काही आवाज ऐकू येत असतात, ते म्हणजे अनेक लहरींची एकमेकांत झालेली भेळ असते, गोंधळ असतो, ज्याला आपण ‘गोंगाट’ असं म्हणतो. पण, एकच एक तरंग, लाट जर सतत एकसारखी एकापाठोपाठ येत असेल, तरच त्याचा ‘नाद’ किंवा ‘स्वर’, ‘सूर’ बनतो.

वाद्यमेळाचं ‘गणित’
आजकाल संगीताची वाद्यं सुरात मिळवताना ती सारी एकाच सुरात वाजण्यासाठी एक प्रथा जगात मान्य केली गेली आहे, ती म्हणजे बाजाच्या पेटीत मध्य सप्तकातील जो शुद्ध धैवत (ध) आहे, (त्यालाच पाश्‍चात्त्य देशांत ‘ए’ नोट असं म्हणतात) ती बरोबर सेकंदाला ४४० वारंवारितेनं वाजेल, असं बघितलं जातं. या धैवताच्या संदर्भात मग इतर स्वरांचा मेळ साधला जातो. आपण बाजाच्या पेटीवरच्या पहिल्या पट्टीला ‘सा’ गृहीत धरलं, तर जे सप्तक तयार होईल, त्यालाच पाश्‍चात्त्य लोक पुढच्या ‘सा’सकट ‘अष्टक’ असं म्हणतात एवढाच काय तो फरक. यातील पट्ट्यांना १) सी, २) सी शार्प, ३) डी, ४) डी शार्प, ५) ई, ६) एफ, ७) एफ शार्प, ८) जी, ९) जी शार्प, १०) ए, ११) ए शार्प, १२) बी असं ओळखलं जातं. यात कधी कधी ‘सी शार्प’ला ‘डी फ्लॅट’ असंही म्हणण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे सर्वच ‘शार्प’ हे पुढच्या स्वराचे ‘फ्लॅट’ म्हटले जाऊ शकतात. असो. यातल्या ‘ए’ला ४४०च्या ऐवजी पूर्वी ४३२ वारंवारितेला नादबद्ध करण्याची पद्धत होती. अनेक वाद्यवादकांना ते अधिक बरोबर होतं, असं आजही वाटतं, कारण त्यात सुरांचं एकमेकांशी येणारं गुणोत्तर पूर्णांकात येत असे. शिवाय, त्याचा संदर्भ बदलल्यानं गोडवा आता कमी होऊन कर्कश्‍शपणा वाढला, असंही काहींचं म्हणणं आहे. जुन्या नाटकात बाजाची पेटी वाजवणारे भारतीय कलाकारही हे ४३२वरून ४४० वर झालेलं स्थित्यंतर (इ.स. १९३९) जर्मन ‘चढी’ पेटी म्हणून नाकारत असत. कधी सारे सूर स्वतः बदलूनही घेत असत. पण आता ‘ए नोट = ४४० हर्टझ’ हे वाद्यमेळाचं आंतरराष्ट्रीय मानक ठरलं आहे.

आपण कोणत्या पट्टीत मनात गाणं गुणगुणतो, हे मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. गाणीही वेगवेगळी असतात. ती आठवायची कारणं मात्र अजून समजून आलेली नाहीत. गंमत आहे ना, हे लिहितानाही मी मनातल्या मनात ‘काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार’ असं काही वेळ म्हणत होतो, नंतर ‘जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी’ कधी सुरू झालं, कळलंच नाही...

Web Title: anand ghaisas's article in saptarang