Bauddha Idols in cambodia
Bauddha Idols in cambodiasakal

कम्बोडियातील बौद्ध मंदिरं आणि मूर्ती

कम्बोडियातील हिंदू-मंदिरांबद्दल गेल्या लेखात आपण माहिती घेतली. आता या लेखातून तिथल्या बौद्ध धर्माची परंपरा, मंदिरं आणि मूर्ती यांबद्दल जाणून घेऊ या.
Summary

कम्बोडियातील हिंदू-मंदिरांबद्दल गेल्या लेखात आपण माहिती घेतली. आता या लेखातून तिथल्या बौद्ध धर्माची परंपरा, मंदिरं आणि मूर्ती यांबद्दल जाणून घेऊ या.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

कम्बोडियातील हिंदू-मंदिरांबद्दल गेल्या लेखात आपण माहिती घेतली. आता या लेखातून तिथल्या बौद्ध धर्माची परंपरा, मंदिरं आणि मूर्ती यांबद्दल जाणून घेऊ या.

प्राचीन कम्बोडियात शिवाचे आणि विष्णूचे भक्त असलेल्या राजेंद्रवर्मन, सूर्यवर्मन इत्यादी राजांच्या काळातही बौद्ध धर्म प्रचलित होता. इसवीसनाच्या पाचव्या शतकात चीनमध्ये गेलेल्या कम्बोडियातील दूतानं हिंदू आणि बौद्ध हे दोन्ही धर्म प्रचलित असल्याची माहिती चिनी दरबारात दिल्याची नोंद आहे. इसवीसनाच्या आठव्या शतकात म्हणजे, अंदाजे बाराशे वर्षांपूर्वी, बौद्ध धर्मातील महायान परंपरेतील लोकेश्वराची मूर्ती उभारल्याचा शिलालेखातील पुरावा आपल्याला कम्बोडियात मिळतो.

एक हजार वर्षांपूर्वी अंकोर इथं राजेंद्रवर्मन नावाचा राजा राज्य करत होता. स्वतः शिवभक्त असणाऱ्या आणि शिवमंदिरं उभारणाऱ्या राजेंद्रवर्मन राजानं एका बौद्ध विहारात लोकेश्वर आणि प्रज्ञापारमिता यांच्या मूर्ती दान दिलेल्या होत्या, असं इथल्या एका शिलालेखात नमूद केलं आहे. या राजेंद्रवर्मन राजाच्या काळात कवींद्रारीमथन हा स्थपती होता. या स्थपतीनं राजेंद्रेश्वर नावाचं शिवमंदिर उभारलं होतं; परंतु तो स्वतः बौद्ध उपासक होता असं शिलालेखातून आपल्याला समजतं. कवींद्रारीमथन यानं बुद्ध, अवलोकितेश्वर, वज्रपाणि, प्रज्ञापारमिता यांच्या मूर्ती असलेलं बौद्धमंदिरदेखील उभारलं होतं.

बांते श्राय हे मंदिर याच राजेंद्रवर्मन राजाच्या काळात उभारलं गेलं होतं, हे आपण गेल्या लेखात पाहिलं. या राजेंद्रवर्मन राजाच्या काळातील काही शिलालेखांत शैव तत्त्वज्ञानाबरोबरच महायान बौद्ध तत्त्वज्ञानातील काही शब्दांचा उल्लेख दिसून येतो. कम्बोडियात इसवीसनाच्या दहाव्या शतकानंतर हळूहळू बुद्ध, अवलोकितेश्वर यांच्या मूर्तींची संख्या वाढत असलेली दिसून येते.

राजेंद्रवर्मन राजाचा मुलगा जयवर्मन (पाचवा) याच्या काळातही कम्बोडियात शैव मंदिरं निर्माण होत होती; परंतु याच जयवर्मन राजाच्या काळातील एका शिलालेखात उल्लेख केल्यानुसार, पद्मवैरोचन नावाच्या बौद्ध भिक्षूंनी एका मंदिरात भगवान बुद्ध, प्रज्ञापारमिता, लोकेश्वर, मैत्रेय, वज्रपाणि आणि इंद्र यांच्या मूर्ती स्थापन केल्या होत्या.

कम्बोडियात एक हजार वर्षांपूर्वीच्या काही शिलालेखांमध्ये शैव आणि बौद्ध संकल्पना एकाच शिलालेखात वापरलेल्या दिसून येतात. एका शिलालेखाच्या सुरुवातीला नटराजाची स्तुती, तर पुढील वाक्यामध्ये बुद्धस्तुती केलेली आहे. शिवाय, एका शिलालेखावर एका बाजूला शिवस्तुती, तर दुसऱ्या बाजूला भगवान बुद्धांची स्तुती केल्याचं आढळून आलं आहे.

इसवीसनाच्या बाराव्या शतकात सूर्यवर्मन (दुसरा) यानं सुरू केलेल्या अंकोरवाट या भव्य विष्णुमंदिराची निर्मिती झाली होती; परंतु सूर्यवर्मन (दुसरा) याच्यानंतर राज्यावर आलेला राजा जयवर्मन (सातवा) याच्या राज्यकाळात बौद्ध धर्मातील महायान परंपरा कम्बोडियात अधिक जोमानं पसरली.

बौद्ध मंदिरं आणि मूर्ती

जयवर्मन (सातवा) या राजानं मूळचं ‘राजविहार’ नावाचं मंदिर; परंतु सध्या ‘ता फ्रोम’ या नावानं ओळखलं जाणारं अंकोर इथलं मंदिर आठशे वर्षांपूर्वी बांधले. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जयवर्मननं आपल्या आईच्या स्मरणार्थ प्रज्ञापारमिता या बौद्ध देवतेची मूर्ती स्थापन केली, तर काही वर्षांनी सध्या ‘प्रेह खान’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भव्य मंदिरात जयवर्मन राजानं आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ बोधिसत्त्व लोकेश्वराची मूर्ती स्थापन केली होती.

अंकोर थोम इथल्या नगरामध्ये मध्यभागी जयवर्मन (सातवा) यानं उभारलेलं बायोन नावाचं प्रसिद्ध भव्य बौद्ध मंदिर आहे. या मंदिराच्या सध्या उभ्या असणाऱ्या ३७ शिखरांवर चेहरे कोरण्यात आलेले आहेत. हे भव्य मंदिरदेखील अंकोर इथल्या इतर मंदिरांप्रमाणे मेरुपर्वताची संकल्पना दर्शवणारं आहे.

जयवर्मन (सातवा) याच्या काळात कम्बोडियात; विशेषतः अंकोर परिसरात महायान परंपरा होती. या काळातील शिलालेखांमध्ये काही महायान बौद्ध ग्रंथांचा उल्लेख येतो, तसंच आजपासून आठशे वर्षांपूर्वीच्या काळातील बौद्ध तंत्रयानातील वज्रसत्त्व, हेवज्र या नावांच्या महत्त्वाच्या देवतांच्या मूर्तीदेखील कम्बोडियात सापडल्या आहेत. या देवतांच्या मूर्तींवरून जयवर्मन राजाच्या काळातील कम्बोडियातील बौद्ध धर्मातील तांत्रिक पूजापद्धतीवर प्रकाश पडतो.

तेराव्या शतकात म्हणजे, आजपासून सातशे वर्षांपूर्वी, अंकोर इथं आलेल्या चिनी प्रवाशानं, अंकोर इथं हिंदू आणि बौद्ध दोघंही राहत असल्याचं लिहून ठेवलं आहे. कम्बोडियात चौदाव्या शतकात बौद्ध धर्म प्रस्थापित झाला होता; परंतु अंकोर इथल्या राज्याच्या पाडावानंतर म्हणजे, पाचशे वर्षांपूर्वी कम्बोडियातील महायान परंपरादेखील संपली होती. यानंतर कम्बोडियात थेरवादी परंपरा टिकून राहिली.

अंकोरपश्चात काळातील बौद्ध धर्म

श्रीलंकेतील थेरवाद हा हळूहळू आठशे वर्षांपूर्वी म्यानमार आणि आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये प्रचलित होत होता. श्रीलंकेतील एका ग्रंथातील नोंदीतून असं समजतं की, पंधराव्या शतकात म्हणजे, पाचशे वर्षांपूर्वी कम्बोडियातील आठ रहिवाशांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. कदाचित श्रीलंका, म्यानमार आणि थायलंडबरोबरच्या संपर्कामुळे कम्बोडियात थेरवादी परंपरा वाढीस लागली.

कम्बोडियातील बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे अंदाजे पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात म्हणजे चारशे वर्षांपूर्वी अंकोरवाटच्या विष्णुमंदिरातील मुख्य गाभाऱ्यात बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली. अंकोरवाट मंदिराच्या परिसरात आठ हातांची भव्य विष्णुमूर्ती अजूनही पाहायला मिळते. कम्बोडियात सापडणाऱ्या सोळाव्या शतकातील शिलालेखातून अंकोरवाटमंदिराच्या मुख्य कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आल्याची नोंद आहे. याच काळात अंकोरवाटमंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नवीन मोठ्या बुद्धमूर्ती आणि बुद्धपद यांची स्थापना करण्यात आली.

हळूहळू अंकोरवाट हे आग्नेय आशियातील महत्त्वाचं बौद्धमंदिर बनलं. सतराव्या शतकात अंकोरवाट इथल्या बुद्धमूर्तीच्या दर्शनासाठी काही जपानी रहिवासी समुद्रमार्गे आल्याची नोंद आहे. यानंतर अठराव्या शतकात कम्बोडियातील काही राजे थायलंडमधील राजांच्या प्रभावानं बौद्ध धर्माचे अनुयायी झाले होते. त्यांच्या काळात कम्बोडियात बौद्ध धर्म बहरला.

याच कम्बोडियाच्या शेजारील महत्त्वाचे देश म्हणजे इंडोनेशिया आणि व्हिएतनाम. या दोन्ही देशांमध्ये प्राचीन काळी भारतीय संस्कृती ही भारतीय भाषा आणि लिपी, तसंच हिंदू आणि बौद्ध स्थापत्याच्या रूपानं बहरत होती. या देशांबरोबरच्या भारताच्या सांस्कृतिक संबंधांबद्दल, तसंच इथल्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांबद्दल पुढील काही लेखांमधून जाणून घेऊ या.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com