चीनमधील किझिल लेणी

मागील लेखात आपण रेशीममार्गाविषयीची माहिती पाहिली. हा रेशीममार्ग चीनमध्ये कुठून जात होता, तिथं बौद्ध लेणी कशा निर्माण झाली ते आता या लेखात पाहू या.
Kizil bauddha Caves
Kizil bauddha CavesSakal
Summary

मागील लेखात आपण रेशीममार्गाविषयीची माहिती पाहिली. हा रेशीममार्ग चीनमध्ये कुठून जात होता, तिथं बौद्ध लेणी कशा निर्माण झाली ते आता या लेखात पाहू या.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

मागील लेखात आपण रेशीममार्गाविषयीची माहिती पाहिली. हा रेशीममार्ग चीनमध्ये कुठून जात होता, तिथं बौद्ध लेणी कशा निर्माण झाली ते आता या लेखात पाहू या.

सध्याच्या पश्चिम चीनमधील शिनजांग प्रांतातील महत्त्वाचा प्रदेश म्हणजे तारिम नदीचं खोरं. हा प्रदेश आता जरी चीनचा भाग असला तरी तारिम खोरं हे २१०० वर्षांपूर्वी चीनमधील तत्कालीन हान नावाच्या साम्राज्याचा भाग नव्हतं. चिनी सम्राटाची सत्ता या भागात नव्हती. याउलट, विविध स्थानिक राजे तारिम खोऱ्यात राज्य करत होते.

तारिम खोऱ्याच्या उत्तरेला तिआन शान नावाची पर्वतरांग आहे, तर दक्षिणेला कुन्लून नावाची पर्वतरांग आहे. या कुन्लून पर्वतरांगेपासून दक्षिणेला तिबेटचं पठार सुरू होतं. तारिम खोऱ्यात ताकलामाकान नावाचं एक हजार किलोमीटर पसरलेलं वाळवंट आहे. या वाळवंटाच्या मधल्या भागातून प्रवास करणं सोपं नव्हतं. या प्रचंड मोठ्या वाळवंटामुळे चीनचा त्याच्या पश्चिमेकडील इतर प्रदेशाशी फार संपर्क होऊ शकत नव्हता; पण या वाळवंटाच्या बाहेरील भागात पर्वतांवरील बर्फ वितळून आलेल्या पाण्याच्या प्रवाहांमुळे या वाळवंटाच्या बाहेरील बाजूस ओॲसिस निर्माण होत असे. या विविध ओॲसिसच्या भूभागात छोटी छोटी राज्यं निर्माण झाली.

ताकलामाकान वाळवंटाच्या उत्तर आणि दक्षिण बाजूच्या कडेनं असणाऱ्या या ओॲसिसच्या प्रदेशातून परदेशी प्रवासी जाताना त्यांच्या जेवणाखाण्याची सोय होऊ शकत होती. या प्रदेशाच्या पूर्वेला गान्सू (किंवा कान्सू) नावाच्या प्रदेशाचा पट्टा होता व तो तारिम खोरं आणि चिनी साम्राज्य यांना जोडणारा होता. २१०० वर्षांपूर्वी चीनमध्ये हान नावाच्या घराण्याचं राज्य होतं. हान घराण्यातील राजांनी हा गान्सू प्रदेश जिंकून आपल्या चिनी साम्राज्याला जोडून घेतला. त्यानंतर हान राजांनी गान्सू प्रदेशात विविध भागांत चिनी सैन्य नेमून, लष्करी छावण्या निर्माण केल्या. त्यामुळे तारिम खोरं ते चिनी साम्राज्यापर्यंतचे रस्ते व्यापारीतांड्यांसाठी जास्त सुरक्षित झाले.

इथला एक मार्ग तारीम खोऱ्याच्या उत्तरेकडून तुर्फान आणि कुचा या नावांच्या राज्यांतून पश्चिमेकडे काशगर या ठिकाणी पोहोचत असे, तर दक्षिणेकडील दुसरा मार्ग निय आणि खोतान या नावांच्या राज्यांतून जाऊन काशगरला मिळत असे. काशगर इथून हे मार्ग उत्तर अफगाणिस्तानातील बाल्खमधून इराणकडे जात असत किंवा काशगरकडून सध्याच्या उझ्बेकिस्तान देशातील समरकंद या शहराकडे जाणारे मार्ग असत.

या रेशीममार्गावर साधारणपणे दुसऱ्या शतकात बौद्ध धर्माचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. विविध परदेशी आणि भारतीय बौद्ध आचार्य, भिक्षू यांनी या मार्गावरून चीनपर्यंत बौद्ध धर्म नेला. भारतीय बौद्ध ग्रंथांचं स्थानिक आणि चिनी भाषेत भाषांतर केलं. आचार्य लोकक्षेम, धर्मरक्ष, कुमारजीव यांचं या प्रदेशातील योगदान विशेष होतं. त्यांच्याबद्दल पुढील लेखांतून अधिक जाणून घेऊ.

या ओॲसिसच्या प्रदेशातील राज्यांतून जाणाऱ्या व्यापारीमार्गांमुळे स्थानिक राजांना, त्यांच्या सरदारांना कररूपानं महसूल प्राप्त होत होता. इथल्या बौद्ध विहारांना राजे, सरदार, परदेशी आणि स्थानिक व्यापारी यांच्याकडून दान मिळाल्यानं या व्यापारीमार्गावर अनेक बौद्ध लेणी निर्माण झाली.

किझिल लेणी

ताकलामाकान या वाळवंटाच्या बाजूनं जाणाऱ्या मार्गावर कुचा इथं एक प्राचीन राज्य होतं. या राज्यात किझिल नावाच्या नगरातील डोंगरावर बौद्ध लेणी निर्माण झाली. इथं अंदाजे इसवीसन तिसरं शतक ते नववं शतक या कालखंडात निर्माण झालेली ३४९ लेणी आहेत. ही सध्याच्या चीनमध्ये निर्माण झालेल्या लेण्यामधील सर्वात प्राचीन लेणी आहेत.

किझिल लेणी चीनच्या सर्वात पश्चिमेकडील भागात आहेत. चीनच्या या पश्चिमेकडील भागात इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापासून भारतीय बौद्ध धर्माचा प्रभाव पडू लागला होता. इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून, म्हणजे आजपासून सतराशे वर्षांपूर्वी, इथं लेणीनिर्मितीला सुरुवात झाली. त्यामुळे या लेण्यांच्या स्थापत्याचा, कलेचा प्रभाव चीनमधील पूर्वेकडे नंतरच्या काळात निर्माण झालेल्या इतर बौद्ध लेण्यांमधील स्थापत्यावर पडलेला दिसून येतो. इथली चित्रशैली कुचा नावाच्या प्राचीन राज्यामुळे ‘कुचा शैली’ या नावानं अभ्यासकांत परिचित आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन रेशीममार्गावरील महत्त्वाच्या लेण्यांमध्ये किझिल लेण्यांची गणना होते.

किझिल येथील डोंगरात दीड किलोमीटर लांब कोरल्या गेलेल्या ही ३९४ लेणी चार गटांत विभागली गेली आहेत. या लेणीसमूहात विविध आकाराची लेणी, अनेक भित्तिचत्रं, काही प्रमाणात मूर्ती दिसून येतात. लेण्यांच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या रिकाम्या खोबणींवरून त्यात बांबू अथवा लाकूड अडकवून लेण्यांबाहेरही लाकडी स्थापत्य निर्माण केलं गेलं होतं हे लक्षात येतं.

किझिल इथं भारतीय स्थापत्यशैली आणि इथल्या स्थानिक भटक्या टोळ्यांच्या स्थापत्याचा मिलाफ काही लेण्यांमध्ये झालेला दिसतो. या वैशिष्टपूर्ण स्थापत्यशैलीचा प्रभाव चीनमधील डूनहुआंग लेणी, लोंगमेन लेणी, युनगांग लेणी इत्यादी बौद्ध लेण्यांमधील स्थापत्यावर पडलेला दिसून येतो. याशिवाय किझिल इथं अफगाणिस्तानातील बामियानप्रमाणे १० मीटर उंच बुद्धमूर्ती कोरलेली दिसून येते, तसंच इथं भिक्षूंचं निवासस्थान असलेलं विहारही होतं.

किझिल इथली चित्रं

भिंतीवर आणि छतावर मातीचा गिलावा करून त्यावर बुद्धजीवनातील कथा, जातककथा इत्यादींचं चित्रण इथल्या लेण्यांत केलेलं आढळतं. इथं साधारणपणे १०० विविध जातककथा, तसंच बुद्धांच्या आयुष्यातील ६० प्रसंग चित्रित केले आहेत असं अभ्यासकांचं मत आहे.

इसवीसनाच्या अंदाजे तिसऱ्या ते सातव्या शतकातील इथल्या चित्रांमध्ये इराणी शैली, भारतीय शैली, अफगाणिस्तानमधून आलेली गांधार शैली, मध्य आशियातील शैली इत्यादी चित्रशैलींचा मिलाफ आढळतो. किझिल इथं अनेक लेख आणि ब्राह्मी, चिनी, तुर्की, चगताई लिपीतील हस्तलिखितंही सापडली आहेत. इराण आणि सीरियातून आलेल्या चित्रकारांचे चित्रित लेख इथल्या एक-दोन लेण्यांमधील चित्रांवर आढळले आहेत. यावरूनही रेशीममार्गावर त्या काळी सुरू असलेलं कलेचं आदानप्रदान, तसंच कलाकार, चित्रकार यांचा होणारा प्रवास लक्षात येतो.

सध्याच्या चीनमधील रेशीममार्गावरून बौद्ध आचार्य, भिक्षू, चित्रकार, कलाकार, व्यापारी यांच्या प्रवासामुळे बौद्ध धर्म पश्चिमेकडून हळूहळू उत्तर आणि मध्य चीनपर्यंत पोहोचला. तिथून बौद्धधर्म कोरियामध्ये आणि जपानमध्येही पोहोचला. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच मध्य आशियाई आणि भारतीय बौद्ध भिक्षू चीनमध्ये अनेक वर्षं बौद्ध ग्रंथांच्या चिनी भाषेतील भाषांतराचंदेखील काम करत होते. अठराशे वर्षांपूर्वी मध्य आशिया, अफगाणिस्तान, भारतातून चीनमध्ये जाऊन तिथं बौद्ध धर्माच्या प्रसाराचं काम करणाऱ्या या भिक्षूंबद्दल पुढील लेखातून जाणून घेऊ या.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com