माणूस घडविणारे विद्यापीठ

माणूस घडविणारे विद्यापीठ

आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे. कायद्याचे पदवीधर मुरलीधर देविदास आमटे. सुखवस्तू कुटुंबातील. त्यांचे मन न्यायालयात फारसे रमले नाही. नियतीने त्यांची वाट वेगळीच ठरविली होती. समाजाने आणि परिवाराने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरुग्णांवर त्यांची दृष्टी पडली. त्यांना जीवनाचे ध्येय सापडले. जगण्याचा मार्ग मिळाला. सुखकर आयुष्य सोडून ते १९४९ मध्ये वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. १९५१ मध्ये काही कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या वेळी त्यांच्या पाठीशी पत्नी साधनाताई उभ्या होत्या. साधनाताईही सुखवस्तू कुटुंबातील; परंतु त्यांनी समाजाची चिंता वाहणारा, त्यांची आसवे टिपणारा फकीर, जोडीदार म्हणून निवडला. प्रारंभीच्या दिवसांत आनंदवन म्हणजे साप, विंचू यांचे घर होते. सर्वत्र दलदल. सोबत काळोख. अशा ठिकाणी बाबा आणि साधनाताई वास्तव्याला आले. अनेक कठीण प्रसंग आलेत; मात्र बाबा आणि ताई ध्येयापासून दूर गेले नाहीत. अशा वेळी त्यांच्यासमोर रक्ताच्या नात्यांनी, समाजाने बहिष्कृत केलेली माणसे दिसायची. त्यांच्या डोळ्यांतील आसवे दिसायची. त्यांच्या दु:खात स्वत:ला सामावून घेताना बाबा आणि ताईंना सुख मिळायचे. कालांतराने हजारो माणसे जुळत गेली. आनंदवन श्रमवन म्हणून विकसित झाले. मात्र, आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य एवढीच ओळख जनमानसात आहे. प्रत्यक्षात अंध-अपंग, कर्णबधिर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे मॉडेल आनंदवन आहे. 

बाबा आणि ताईंप्रमाणेच त्यांची मुलेही उपेक्षितांच्या दु:खात आपले सुख शोधणारी. त्यामुळे सारी सुखे बाजूला सारून, त्यांनी बाबांच्या खडतर मार्गावर चालण्याचे धाडस केले. यशस्वी झाले. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे यांनी बाबांच्या हयातीत सेवाकार्याचे व्रत स्वीकारले. बाबा आणि ताईंच्या नंतर आता आमटे परिवारातील तिसरी आणि चौथी पिढी सेवाकार्याचा रथ यशस्वीपणे हाकत आहे. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोगांतून पायाभूत कामे आनंदवनात उभी राहिली आहेत. आमटे परिवारातील नव्या पिढीने अनेक नवे प्रयोग यशस्वीपणे राबविले. आपल्या सेवाकार्याची व्याप्ती वाढविली. समाजाने, कुटुंबाने बहिष्कृत केलेल्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.  

डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी, तर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा सुरू केली. आपले आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित केले. लोकबिरादरी प्रकल्प उभा करताना या दोघांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा स्वत:चा जीव धोक्‍यात घालावा लागला; परंतु ते डगमगले नाहीत. त्यांच्यामुळेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. आरोग्य, शिक्षणाशी त्यांची ओळख झाली. हेमलकसा प्रकल्प आदिवासींच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. आदिवासींचे हक्काचे घर म्हणून हा प्रकल्प आता जगभरात ओळखला जातो. आता त्यांची मुले आणि स्नुषा यांनीही आदिवासींसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. डॉ. दिगंत-डॉ. अनघा आमटे यांनी आता हेमलकसाची जबाबदारी घेतली आहे. ते रुग्णालय सांभाळतात. त्यांची दोन छोटी मुले अन्वर्थ आणि आहान येथे आहेत. अनिकेत हा दुसरा मुलगा अभियंता आहे. अनिकेत आणि त्यांची पत्नी समीक्षा आमटे लोकबिरादरी प्रकल्पाचे व्यवस्थापन, आर्थिक ताळेबंद आणि शैक्षणिक कामे बघतात. त्यांनाही निर्जरा आणि रुमानी नावाची मुले आहेत. आमटे परिवारातील चौथ्या पिढीवर बालवयातच सेवाकार्याचे संस्कार होत आहेत. डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनीही बाबा आणि साधनाताईंनंतर ‘आनंदवना’च्या सेवाकार्याचा वारसा तेवढ्याच समर्थपणे आणि आत्मीयतेने सांभाळला. येथील कुष्ठरुग्णांना, वंचितांना बाबा-ताईंची उणीव भासू दिली नाही. डॉ. विकास आमटे यांनी सोमनाथ प्रकल्प यशस्वीपणे उभा केला. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग येथे होतात. येथील श्रमसंस्कार छावणी तर जगभरातील युवकांना प्रेरणादायी ठरली आहे. या छावणीतून बाहेर पडलेल्या कित्येकांनी देशभरात स्वतंत्रपणे कम सुरू केले. काही विधायक कामांत गुंतले. काहींनी अन्यायाविरुद्ध संघर्ष पुकारला. देशातील अनेक समाजसेवकांची जडणघडण सोमनाथ येथील श्रमसंस्कार छावणीतच झाली आहे. बाबांच्या भारत जोडो यात्रेचा उगम याच श्रमसंस्कारातील चर्चासत्रांमधून झाला आहे.

आता त्यांची मुले डॉ. शीतल आणि कौस्तुभ आमटे हेसुद्धा आनंदवनाच्या सेवेतच रमलेले आहेत. डॉ. शीतल आमटे यांचा गौतम करजगी यांच्याशी विवाह झाला. ते स्वत: अभियंता आहेत; मात्र, विवाहानंतर ‘आनंदवना’तच त्यांनी आपल्या संसाराला सुरवात केली. ते विकलांगांच्या शाळेचे काम पाहतात. त्यांना शर्वली नावाची मुलगी आहे. कौस्तुभ आणि त्यांची पत्नी पल्लवी आमटे येथे आहेत. पल्लवी आमटे यांनी ‘वस्त्र सन्मान’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. कौस्तुभ स्वत: सी.ए. आहेत. ते व्यवस्थापन बघतात. त्यांना दोन मुली आहेत- अश्‍मी आणि रावी. 

बाबांनी आपल्या हयातीत एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव रेणुका. ती आमटे परिवाराचा अविभाज्य घटक आहे. ती, तिचे पती विलास मनोहर दोघेही हेमलकसा येथे राहतात. त्यांनाही अजिंक्‍य आणि मोक्षदा नावाची मुले आहेत. मुलगा दूध डेअरीचे काम बघतो, तर मोक्षदा आनंदनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. आमटे परिवारातील तिसऱ्या पिढीला अनेक संधी चालून आल्या; मात्र त्यांनी त्यांचा कधी विचारही केला नाही. ते आनंदवनातच रमले. कर्मयोगी बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी आनंदवनाचे रोपटे लावले. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या पारंब्या सेवाकार्याच्या रूपाने जगभर पसरल्या आहेत. लौकिक अर्थाने ‘कुष्ठरोगी, आनंदवन आणि आमटे’ एवढेच हे कुटुंब नाही, तर जगभरातील सेवाव्रती या आनंदवनाशी आणि आमटे कुटुंबीयांशी जुळले आहेत. आमटे परिवाराचा समाजसेवेच्या परंपरेचा वारसा ते समर्थपणे आपापल्या ठिकाणी चालवीत आहेत.

डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी तर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींची सेवा सुरू केली. आपले आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित केले. लोकबिरादरी प्रकल्प उभा करताना या दोघांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा स्वत:चा जीव धोक्‍यात घालावा लागला; परंतु ते डगमगले नाहीत. त्यांच्यामुळेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com