β गोष्ट एका शोधाची.... गोष्ट एका नात्याची

Relationship
Relationship

एकीकडे उच्चशिक्षित, सुसंस्कृत म्हणवणाऱ्या कुटुंबातील आपल्या जोडीदाराच्या जिवावर उठणारे हात... तर दुसरीकडे बेपत्ता पत्नीचा जिवाच्या आकांताने शोध घेणारा उत्तर प्रदेशातील तपेश्‍वर सिंह हा अडाणी मजूर... चार इयत्ताही नीट न शकलेल्या, पण पती म्हणून आपल्या कर्तव्याला जागलेल्या तपेश्‍वरने साध्या माणुसकीचे धडे न गिरविलेल्या, वर उल्लेख केलेल्या उच्चशिक्षितांच्याच नव्हे, तर साऱ्या समाजाच्याच डोळ्यांत अंजन घातलं आहे.

अलीकडे जग जवळ आलंय असं नेहमी म्हटलं जातं. ते खरंही आहे. मोबाईल, इंटरनेटमुळे संपर्क वाढला आहे. दळणवळणाच्या आधुनिक आणि वेगवान साधनांमुळे एकमेकांना भेटणं सोपं झालं आहे. पण संपर्क वाढला म्हणून संवाद-सुसंवाद वाढला आहे काय? व्यक्त होण्याची साधनं, सुलभता वाढली, म्हणून माणसं मनानं खरोखरच अधिक जवळ आली आहेत काय? जगण्याच्या शर्यतीत धावणाऱ्या माणसाकडे पैसा असला, तरी वेळ नाही, स्वतःसाठी नाही अन्‌ इतरांसाठीही नाही. साहजिकच माणसं एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. घरच्या माणसांपासून, कुटुंबापासून, अगदी आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारापासूनही माणसं तुटत चालली आहेत, हे अधोरेखित करणारी उदाहरणे वारंवार समोर येत आहेत. वाढते ताणतणाव, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यानं येणारं नैराश्‍य, "अधिक हवे' चा हव्यास नि त्यातून बोकाळणारा चंगळवाद, सढळ हाताने खर्च करण्यातून बिघडलेली आर्थिक घडी या सगळ्याची परिणती मानसिक स्वास्थ्य ढासळण्यात होते. मग प्रसंगी स्वतःला, जोडीदाराला वा संपूर्ण कुटुंबालाच संपविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जाते, तेव्हा समाज म्हणून आपण नेमके कोठे चाललो आहोत, असा प्रश्‍न पडतो.

या सगळ्या कटू वास्तवाला छेद देणारी आणि नात्यांवरचा विश्‍वास दृढ करणारी एक घटना नुकतीच वाचनात आली.

बिहारमधून पोटापाण्यासाठी उत्तर प्रदेशातील मीरतमध्ये आलेल्या तपेश्‍वर सिंह या मजुराची मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली पत्नी गेल्या मार्चमध्ये हरवते काय... हातावर पोट असलेला हा "फाटका' माणूस तेव्हापासून सारं कामधाम टाकून, तिचा शोध घेण्यासाठी सायकलवरून गावंच्या गावं पालथी घालतो काय आणि तब्बल नऊ महिन्यांनंतर या शोधाचा उत्तराखंडमधील ब्रजघाट येथे गोड शेवट होतो काय... सारंच अचंबित करणारं. एखाद्या चित्रपटातच शोभेल अशी ही घटना. डोळ्यांवर विश्‍वास बसू नये अशी, पण तितकीच नात्यासाठी माणूस काय करू शकतो, हे दाखवून देणारी.

किरकोळ कारणावरून पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या डॉक्‍टर पत्नीचा तिच्या दवाखान्यात आपल्या चिमुरड्या मुलीसमोर गोळी घालून खून करण्याची चार महिन्यांपूर्वीची घटना आणि गेल्याच आठवड्यात औरंगाबादमध्ये आपल्या मुलीसमोर घटस्फोटीत पत्नीचा भोसकून खून करून मोटारीतून पळून जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरचा नंतर अपघातात झालेला मृत्यू... नको असलेलं नातं संपविण्यासाठी कोणत्या थराला जावं याला काही सीमा ? एकीकडे उच्चशिक्षित, सुसंस्कृत म्हणवणाऱ्या कुटुंबातील आपल्या जोडीदाराच्या जिवावर उठणारे हात... तर दुसरीकडे बेपत्ता पत्नीचा जिवाच्या आकांताने शोध घेणारा उत्तर प्रदेशातील तपेश्‍वर हा अडाणी मजूर... नात्याचं महत्त्व यातील नेमकं कुणाला कळलंय? चार इयत्ताही नीट न शकलेल्या, पण पती म्हणून आपल्या कर्तव्याला जागलेल्या तपेश्‍वरने साध्या माणुसकीचे धडे न गिरविलेल्या, वर उल्लेख केलेल्या उच्चशिक्षितांच्याच नव्हे, तर साऱ्या समाजाच्याच डोळ्यांत अंजन घातलं आहे.

केवळ एका पतीने बेपत्ता पत्नीचा घेतलेला शोध एवढ्यापुरतीच ही घटना मर्यादित नाही. तपेश्‍वर- बबिता यांच्या आगळया सहजीवनाला सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरवात झाली. नातेवाइकांनी सोडून दिलेली बबिता ब्रजघाटमधील एका धर्मशाळेत तपेश्‍वरला भेटली नि त्यांची गाठ जुळली. बालपणीच अनाथ झालेल्या तपेश्‍वरच्या एकाकी आयुष्यात बबिताने रंग भरले. लग्नानंतर मीरतमध्ये रोजंदारी करून पोटाची खळगी भरत असताना गेल्या मार्चमध्ये अचानक बबिता बेपत्ता झाली नि तपेश्‍वरवर जणू आभाळ कोसळलं. पण त्याने हिंमत सोडली नाही. त्या दिवसापासून त्यानं एकच ध्यास घेतला बबिताचा शोध घेण्याचा. एका सायकलीवर बबिताचे छायाचित्र लावून त्याची भ्रमंती सुरू झाली. खिशात पैसे नाहीत नि पोटात अन्नाचा कण नाही, अशा स्थितीत हिंडणाऱ्या तपेश्‍वरने बबिताच्या शोधासाठी दहा वर्षांत जमा केलेली सगळी पुंजी खर्च केली. कुणी सांगितलं की तिला कुंटणखान्यात विकलंय. तेव्हा त्यानं कुंटणखानेही धुंडाळले. अनेक जिल्ह्यांत पायपीट केली. गेले नऊ महिने सुरू असलेल्या त्याच्या या शोधाला अखेर गेल्या आठवड्यात यश आलं. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एका रस्त्याच्या कडेला विमनस्क अवस्थेत बसलेली बबिता आढळली नि त्याचा आनंद गगनात मावेना."" ती दिसली नि माझा माझ्या डोळ्यांवर विश्‍वासच बसला नाही,'' हे एकच वाक्‍य तपेश्‍वरनं तिचा किती ध्यास घेतला होता हे सांगण्यास पुरेसं आहे. आता पुनर्मिलनानंतर त्यांची कहाणी संपली नाही, तर ती नव्याने सुरू झाली आहे. त्यात उत्कटता, ओढ आहे नि "शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' अशा निःशब्द प्रेमाची अनोखी अनुभूतीही. तपेश्‍वरचा हा शोध केवळ पत्नीचा नाही, तर तो प्रेमाचा, एका नात्याचा शोध आहे... आपल्या सगळ्यांनाच चार गोष्टी शिकविणारा...

सध्याच्या काळात हरवत चाललेली नाती, मग ती आपल्या जोडादाराबरोबरची असोत, आई- वडिलांबरोबरची असोत, भावा- बहिणींबरोबरची असोत वा मित्र- मैत्रिणींबरोबरची... आपलं जगणं सुखकर करणारी, जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी, "आयुष्यातील प्रत्येक क्षणी आपण सोबतीला आहोत,' असा विश्‍वास देणारी ही नाती कसोशीने जपायला हवीत. या नात्यांचे रंग विरत चालले असतील, ही नाती धूसर होत चालली असतील तर वेळीच जागे होऊन त्यात प्रेमाचे रंग नव्याने भरायला हवेत. त्यासाठी समोरून हाक येण्याची वाट न पाहता स्वतःहून एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com