सरप्राइज! (अपूर्वा कुंभार)

apurwa kumbhar
apurwa kumbhar

मायराचं आज वेगळंच रूप तिच्या कुटुंबीयांना पाहायला मिळालं. प्रगल्भ मायरा! अमितनं मायराला जवळ घेतलं व तिच्याकडं पाहत तो म्हणाला ः 'मायरा बेटा, मी जे करू शकलो नाही, ते तू करून दाखवलंस. थॅंक यू बेटा.''

'मायरा, अगं कुठं आहेस? आई खूप चिडली आहे, लवकर घरी ये, बेटा!'' आजीचा फोनवरचा आवाज ऐकून मायरा थोडी चिडलीच. फोन ठेवून तावातावानं घरी निघाली. "आई म्हणजे ना...खरंच कहर करते कधी कधी...थोडं पण फ्रीडम नाही...' स्वतःशीच पुटपुटत तिनं घराची बेल वाजवली.

'आई...अगं, कधीतरी मनासारखं वागू दे. आजच परीक्षा संपली माझी. जरा रिफ्रेशमेंट म्हणून मैत्रिणींसोबत होते, तर त्यातही तुला प्रॉब्लेमच आहे,'' मायरा जरा चिडूनच म्हणाली. 'तू आई झालीस की तुला समजेल. आपल्या लेकराची काळजी त्याशिवाय नाही कळायची,'' आईचे हे शब्द ऐकून मायरा आणखीच चिडली आणि आपल्या खोलीत जात तिनं दरवाजा धाडकन्‌ आपटला आणि न जेवता ती तशीच झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर मायराचा आवडीचा ब्रेकफास्ट ठेवून साक्षी ऑफिसला निघाली. जाताना सासूबाईंना म्हणाली ः 'आई, मायराला हे खायला सांगा...एम शुअर, की यामुळं तिचा मूड नक्कीच ठीक होईल.'' दहा वाजले. मायरा उठली. तयार होऊन डायनिंग टेबलवर पाहते तर तिचा आवडता नाश्‍ता ठेवलेला होता. मग काय कळी खुललीच तिची अगदी! 'आजी... आईला ना कसं कळतं गं मला काय हवंय ते...शी इज सो ग्रेट...काल चीज आम्लेट खायलाच आम्ही थांबलो होतो म्हणून तर उशीर झाला...पण आईच्या फोनमुळं ते खायचं राहूनच गेलं,'' चीज आम्लेटचा पहिला घास घेत मायरा आजीला म्हणाली. 'मायरा...अगं, आई ही शेवटी आईच असते. तिला आपल्या बाळाच्या मनातलं सगळं काही कळतं. आपल्या घरासाठी, आपल्या बाळासाठी आई काहीही करू शकते,'' आजी मायराच्या डोक्‍यावरून हात फिरवत म्हणाली. नाश्‍ता संपवून मायरानं साक्षीला एसएमएस केला ः 'आई, थॅंक यू फॉर द डिलिशिअस अँड यम्मी ब्रेकफास्ट...लव्ह यू अँड सॉरी फॉर यस्टरडे.'' एसएमएस वाचून साक्षी हसली आणि पुन्हा कामात गुंतली. 'आजी, मी आईला आज एक सरप्राईज देणार आहे. तिची आणि बाबांची खोली आवरायची आहे, असं ती खूप दिवसांपासून म्हणत आहे. दोघं परत यायच्या आत मी ती आवरते,'' असं आजीला सांगून साक्षी आणि अमित यांच्या खोलीत मायरा गेली.

खोली आवरता आवरता मायराला साक्षीची डायरी आणि तिच्याखाली काही घुंगरं आढळली. घुंगरं पाहून मायराला धक्काच बसला. ती धावत धावतच आजीकडं आली. 'आजी, ही बघ घुंगरं...आईची आहेत का गं ही? आई डान्स करायची का?'' असे अनेक प्रश्‍न मायरानं आजीला विचारले. घुंगरं पाहून आजीलासुद्धा नवल वाटलं. 'मायरा, मला नाही वाटत ही घुंगरं साक्षीची असतील म्हणून. तसं असतं तर मला ते माहीत असतं,'' आजी म्हणाली.

-मायराच्या हातातली डायरी दोघी वाचू लागल्या. त्या डायरीत आईचा म्हणजेच साक्षीचा सर्व तपशील लिहिलेला होता. तिची स्वप्नं, तिनं केलेल्या चांगल्या गोष्टी, अमित आणि साक्षी यांची प्रेमकहाणी, मायराचा जन्म आणि कथक, कथकबद्दलचं तिचं प्रेम, तिची व्याकुळता असं सगळं काही. डायरी वाचून आजी आणि मायरा स्तब्ध झाल्या. "आई कथक करायची? मग तिनं ते मध्येच का सोडून दिलं? काय कारण असेल?' असे अनेक प्रश्‍न मायराला पडले. रात्री अमित आणि साक्षी दोघं घरी आले की याविषयी त्यांना विचारायचं, असं आजीनं आणि मायरानं ठरवलं
***
रात्री सगळ्यांची जेवणं झाली. मायरा आणि आजी एकमेकींकडं बघत खाणाखुणा करू लागल्या.
मायराच्या बाबांच्या - अमितच्या - लक्षात हे आलं.
अमितनं मायराला विचारलं ः 'काय चाललंय तुमचं?'' -मायरा शेवटी विचारतेच ः 'आई, तू कथक का सोडलंस?''
-मायरानं अचानक विचारलेला हा अनपेक्षित प्रश्‍न ऐकून साक्षी आणि अमित गोंधळून गेले. मायराच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं, ते त्यांना ऐनवेळी सुचत नाही. '-मायरा, तू माझी खोली खूप छान आवरलीस हां. तुला आइस्क्रीमची ट्रीट देते मी,'' साक्षीनं विषय बदलायचा प्रयत्न केला.
'मी सांगतो, ऐका...'' अमित पुढं काही बोलणार तेवढ्यात साक्षीनं त्याला अडवलं आणि म्हटलं ः
'अमित, घेऊन येतोस का तूच आइस्क्रीम?''
'आई, तू थांब. बोलू दे बाबाला. मला आणि आजीला ऐकायचंय,'' मायरानं साक्षीला थांबवलं आणि आईला व मायराला उद्देशून अमित सांगू लागला ः 'आम्ही तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. वुई आर सॉरी! साक्षी ही एक उत्तम कथक नृत्यांगना आहे, ही गोष्ट फक्त मलाच ठाऊक आहे. कारण, आम्हा दोघांची भेट या कथकमुळंच झाली. आपलं हे टॅलेंट सगळ्या जगानं पाहावं, असं साक्षीचं स्वप्न होतं; पण आमच्या लग्नाच्याच दिवशी ऑडिशन देण्याचाही दिवस होता; त्यामुळं तिला जाता नाही आलं. मी तिला म्हणालो, "लग्नानंतर मी तुझा हा छंद नक्की जपेन; पण लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांतच बाबा वारले, तेव्हा आईची जबाबदारी साक्षीनं उत्तमपणे पार पाडली; पण ती तिचं स्वप्न विसरली नव्हती आणि मीसुद्धा विसरलो नव्हतो. साक्षीला दिवस गेल्याचं कळलं तेव्हा आम्ही खूप खूश झालो; पण साक्षीचं कथकचं स्वप्न अधुरंच राहिलं, याची खंत मला सतत बोचत राहिली. साक्षीचे आपण अपराधी आहोत, असं मला सारखं वाटू लागलं; पण साक्षीनं सून या नात्यानं आणि आई या नात्यानं अंगावर पडलेली जबाबदारी उत्तमपणे निभावली. मी मात्र नवरा या नात्यानं माझ्यावरची जबाबदारी अर्धवटच सोडली. "तू तुझं स्वप्न पूर्ण कर,' असं मी साक्षीला नेहमीच म्हणत असतो; पण ती घर, मायरा आणि आपल्या दोघांमध्ये खूप गुंतली आहे, आई''
आपला नवरा आपल्याविषयीची सांगत असलेली कहाणी ऐकताना साक्षी भाववश झाली.
डोळ्यांतलं पाणी पुसत ती त्याला म्हणाली ः 'अमित, तू कुठंच कमी पडला नाहीस. प्रसंगच तसे येत गेले. त्या परिस्थितीला कुणीच जबाबदार नाही.''
हे सगळं सुरू असताना मायराच्या डोक्‍यात काही वेगळंच सुरू होतं. आजी आणि मायरा उठून निघून गेल्या. दोघीही आपल्यावर रागावल्या असाव्यात, असं अमित-साक्षी यांना वाटलं; पण तसं अजिबातच नव्हतं. आजीच्या आणि नातीच्या मनात काहीतरी वेगळाच आराखडा तयार होत होता.
***
ता. 23 ऑक्‍टोबरची सकाळ उजाडली. सगळ्यांनी साक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; पण मायरा साक्षीला कुठंच दिसत नव्हती. 'आई, मायरा कुठंय?'' यावर काहीच उत्तर न देता मायराची आजी देवघराकडं वळली.
दुपार टळून गेली तरी मायरा अजून घरी आलेली नव्हती व फोनही उचलत नव्हती. आता साक्षीची काळजी वाढू लागली. तेवढ्यात बेल वाजली. साक्षीनं अधीरेपणानं दार उघडलं, तर समोर मायरा उभी. 'मायरा... अगं, कुठं होतीस सकाळपासून तू? आज काय आहे विसरलीस का?''
आईच्या बोलण्याकडं लक्ष न देता मायरा आत गेली.
मायराचं हे विचित्र वागणं साक्षीला अजिबात आवडलं नाही.
साक्षी मायराला काहीसं रागावूनच म्हणाली ः 'मायरा, किती त्रास देतेस गं? तुला कधी समजणार माझी काळजी?'' ती पुढं काही बोलणार तेवढ्यात मायरानं तिच्यासमोर एक कागद धरला आणि तिला म्हणाली ः 'आई गं, हॅपी बर्थ डे...'' तो कागद बघून साक्षीच्या भावना अनावर झाल्या. कारण, तो कागद म्हणजे नृत्यस्पर्धेसाठीचा फॉर्म असतो.
मायरा सांगू लागली ः 'आई, या स्पर्धेसाठीच्या ऑडिशन्स आपल्या शहरात सुरू होणार आहेत. येत्या गुरुवारी तुला तिथं जायचं आहे. दोन राउंड्‌स होणार आहेत आणि जो जिंकेल त्याला एक लाख रुपयांचं प्राइजही आहे. ते प्राइज म्हणजे तुला आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट असेल!'' अमितला आणि आजीलाही मायराचं नवल वाटतं.
'साक्षी, तू एक उत्तम बायको, उत्तम सून आणि उत्तम आई आहेस. खूप झटलीस तू आमच्यासाठी. तुझ्यावर आता अजून एक जबाबदारी असेल व ती म्हणजे तू एक उत्तम कथक नृत्यांगनाही आहेस, हे जगाला दाखवून दे,'' मायराच्या आजीनं अर्थात साक्षीच्या सासूबाईंनी सुनेचं कौतुक केलं. ते शब्द ऐकून साक्षीनं सासूबाईंना मिठीच मारली.
साक्षीच्या नृत्यासाठी आता सगळे जण तयारीला लागले.
***

नृत्यस्पर्धेत साक्षीचा परफॉर्मन्स मस्तच झाला आणि दुसऱ्या राउंडसाठीही तिची निवड झाली.
तीन उत्तम नृत्यांगनांमधून साक्षी पहिली आली. विजेती म्हणून साक्षीचं नाव घोषित करण्यात येताच मायरा, अमित आणि आजी यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
परीक्षकांनी साक्षीचं आणि तिच्या कुटुंबीयांचं त्यांना मंचावर बोलावून घेऊन अभिनंदन केलं.
'आता आपण साक्षीजींचं मनोगत ऐकू या...'' असं म्हणज सूत्रसंचालकानं साक्षीला बोलायला सांगितलं.
साक्षी बोलू लागली ः 'माझ्या या यशात माझी मुलगी मायरा, पती अमित आणि सासूबाईंचा खूप मोठा वाटा आहे. थॅंक यू मायरा, आई आणि अमित. माझ्या आईंसारख्या सासूबाई सगळ्यांना मिळोत.
"आपल्या आईसारखी सासू आपल्याला मिळायला हवी,' अशी बहुतेक सगळ्याच जणींची इच्छा असते. मी मात्र नक्कीच म्हणेन की माझ्या सासूबाईंसारखी, आय मीन माझ्या आईंसारखी, सासू सगळ्यांना मिळो.''
मायरा साक्षीजवळ येताच तिनं तिला मिठी मारली. आईचा हात हातात घेऊन मायरा म्हणाली ः 'मला घरी यायला उशीर झाला की आई नेहमी फोन करायची आणि मी तिला म्हणायची, "आई कधीतरी मला फ्रीडम दे...पण माझी आई माझ्यासाठी तिचं स्वतःचंच फ्रीडम विसरून गेली होती...माझी आई खरंच एक उत्तम डान्सर आहे आणि उत्तम आई तर ती आहेच. तिला सलाम. थॅंक यू आई, फॉर एव्हरी थिंग.''
मायराचं आज वेगळंच रूप तिच्या कुटुंबीयांना पाहायला मिळालं. प्रगल्भ मायरा! अमितनं मायराला जवळ घेतलं व तिच्याकडं पाहत तो म्हणाला ः 'मायरा बेटा, मी जे करू शकलो नाही, ते तू करून दाखवलंस. थॅंक यू बेटा.'' आजी म्हणाली ः 'एका मुलीचं मन तिच्या आईलाच कळतं आणि एका आईचं मन तिच्या लेकीला!'' यावर चौघंही अगदी मनापासून हसले व एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा घेऊन घरी जायला निघाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com