नैनन नीर बहे... भावना, बुद्धीलाही कवेत घेणारं गाणं

Kishori Amonkar
Kishori Amonkar

किशोरीताईंनी संगीताचा विचार केवळ शास्त्र, विद्या वा कला एवढ्यापुरताच मर्यादित कधीही ठेवला नाही. संगीत म्हणजे अध्यात्म, संगीत म्हणजे आत्मानंद असे त्या मानत. तेथपर्यंत आपला संगीतविचार त्यांनी नेऊन ठेवला होता.

एखादी गोष्ट म्हणजे एखाद्याचा श्‍वास असतो, ध्यास असतो; असं मी लहानपणापासून ऐकून होते... पण हे प्रत्यक्षात अनुभवलं ते मात्र ताईंना भेटले तेव्हाच. संगीत, त्याविषयीचे मनन, चिंतन, रियाझ आणि एकूण संगीतच त्यांचा श्‍वास, ध्यास आणि प्राणही होता. आजही "सरस्वती' हा शब्द जरी नुसता उच्चारला ना, तरी माझ्या मनात येते ती प्रतिमा ताईंचीच. त्या रागसंगीताशी अंतर्बाह्य तादात्म्यच पावलेल्या होत्या.


मी ताईंना एक गुरू म्हणून पाहिलं, एक व्यक्ती म्हणूनही खूप जवळून पाहिलं... त्या संगीताच्या क्षेत्रात साक्षात्‌ माझ्या दृष्टीने देवाच्याच जागी होत्या. असंख्यांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं. त्यांचं शब्दचित्र रेखाटायचं झालं तर मी त्यांना "सात स्वरांच्या घोड्यावर आरूढ असणारी सरस्वती' असंच म्हणेन! संगीताची असीम साधना करणारी, अखंड चिंतन करणारी अशी व्यक्ती न या आधी झाली, न भविष्यात कधी होईल. किशोरीताईंनी संगीताचा विचार हा केवळ शास्त्र, विद्या किंवा कला एवढ्यापुरताच मर्यादित कधीही ठेवला नाही. याउलट, संगीत म्हणजे अध्यात्म, संगीत म्हणजे आत्मानंद, अशा पातळीवर ताईंनी आपला संगीतविचार नेऊन ठेवला होता. किंबहुना, त्याचं प्रात्यक्षिकच त्यांच्या गायनातून दरवेळी अनुभवायला येत असे.


अगदी मन नेईल तिथे जाणारा गळा त्यांना लाभला होता. पाण्यासारखा वाहता गळा, प्रवाही गळा... त्यांच्या असामान्य प्रतिभेला त्याच तोडीच्या गळ्याची जोड मिळाली. शिवाय, अंगी असणारी अतिशय अभ्यासू वृत्ती. मला आठवतं- ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे गाणं शिकायला जात असू, त्या वेळी त्या "संगीत रत्नाकर'सारखे कितीतरी जुने ग्रंथ घेऊन बसायच्या. त्यांना नेहमीच संगीताच्या मुळाशी जाऊन भिडण्यात रस होता. त्यांचा संगीतशोध अथकपणे सुरूच असायचा. आपण इतर कुठल्याही गायकाकडून कधीही न ऐकलेल्या असंख्य जागा आपणाला त्यांच्या गळ्यातून ऐकायला मिळायच्या. त्यांच्या गाण्यात कमीतकमी पाच हजार अशी स्वरवाक्‍य निघतील की, जी आजवर कधीही कुणाच्याही गळ्यातून आलेली नाहीत. ना कुणाच्या बुद्धीला अशा स्वरवाक्‍यांचा विचारही कधी स्पर्शिला असेल... मला वाटतं ताईंसारखी विदुषी पुन्हा जन्माला घालणं हे निसर्गापुढेच एक आव्हान असेल.
ताईंना स्वरांपलीकडे जाणारा राग खुणावत असे.

स्वरांपलीकडे, आकृतीपलीकडे, शब्दांपलीकडे या "पल्याड जाण्याविषयी' ताईंना मोठं कुतूहल असायचं. त्यामुळेच त्यांनी त्यासाठी संस्कृतचं शिक्षणही घेतलं. जुन्या संस्कृत ग्रंथांतून संगीताचा अभ्यास सिद्ध केला. अनेक गोष्टींचा मागोवा घेतला. शेकडो वर्षांपूर्वी राग खरे कसे गायले जायचे? त्यांचं त्यावेळचं रूप कसं होतं? त्या रागाचं वातावरण कसं होतं? ते वातावरण हुकमीपणे निर्माण कसं करायचं आणि त्याचं तंत्र काय?... अशा अनेक गोष्टींचा ताईंनी सखोल अभ्यास केला होता. मला वाटतं, त्यामुळेच की काय, पण ताईंचं गाणं हे एकीकडे विद्वानांना जेवढं खुणावत असे, तेवढंच ते संगीतातलं फारसं न कळणाऱ्या सर्वसामान्य रसिकालाही धरून ठेवत असे ! ताईंचं गाणं हे "इमोशन्स आणि इंटिलिजन्स' अशा दोहोंना कवेत घेणारं होतं. एकत्र बांधून ठेवणारं होतं.
माझ्यापुरतं म्हणायचं तर, माझ्या एकूण अस्तित्वालाच ताई अंतर्बाह्य व्यापून राहिल्या आहेत. माझ्या प्रत्येक स्वरात त्या आहेत. माझ्या प्रत्येक विचारात त्या आहेत. जीवनाकडे पाहावं कसं, याची दृष्टीच ताईंनी मला दिली. ऐकू न येणाऱ्याला कर्णयंत्रामुळे जे बळ मिळतं आणि दृष्टिहीनाला डोळे मिळाल्यावर जे नवं जगणं मिळतं ना, तसंच काहीसं बळ आणि उमेद ही ताईंच्या गुरुकृपेनं मिळते, हा माझा अनुभव आहे.


ताईंच्या स्वरांत एक गूढता जाणवून यायची. त्यांच्या गाण्यात असा काही उत्कट भाव होता की, तो थेट आपल्या मनातल्या आजवर अस्पर्श असणाऱ्या त्या अंधाऱ्या कोपऱ्याला अलगद स्पर्शून जायचा. म्हणूनच त्यांचं गाणं वेगळं होतं. म्हणूनच त्या आज जाऊनसुद्धा माझ्या आत उरलेल्या आहेत. त्या गेलेल्या नाहीत. किशोरीताई अशा व्यक्ती नव्हत्याच की त्या जातील. त्या गेलेल्याच नाहीत.
संगीताचं ते सूर्याप्रमाणे असणारं लखलखीत तेज नक्की काय आहे, हे ताईंच्या सान्निध्यात आल्यावरच जाणवू शकलं आणि स्वतः ताईतरी कुठे यापेक्षा वेगळ्या होत्या? त्या स्वतःही तर संगीताकाशातल्या एक सूर्य होत्या.

आपलं उभं आयुष्य त्या सतत तळपतच राहिल्या आणि तळपत असतानाच गेल्या. त्यांचे स्वर, त्यांची अफाट बुद्धिमत्ता, त्यांचे प्रगल्भ विचार, त्यांची उत्कटता आणि त्यांच्या भावपूर्ण अन हृदयस्पर्शी आवाजाने त्या माझ्या मनात खूप खूप खोलवर आत्ताही आहेत. माणूस खरंच जातो का, हा मला आज पडलेला प्रश्‍न आहे. मी ताईंना क्षणभरही कशी बरं विसरू शकेन ?...
(शब्दांकन : स्वप्नील जोगी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com