चला, एक तरी बी लावूया! 

चला, एक तरी बी लावूया! 

बंगळूरमधील सास्केन टेक्‍नॉलॉजी कंपनी बहुराष्ट्रीय. शेकडो कर्मचारी तिथं काम करतात. आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या बंगळूरची खरी ओळख ही बागांचं शहर अशीच. आता भारतातील आयटी पंढरी असा तिचा लौकीक. या 'सास्केन'नं आपल्या आवारातील पडीक चार एकर जागेचा पुरेपूर वापर करायचं ठरवलं. तसं पाहिलं तर अनेक कंपन्यांचा परिसर आपण पाहतो बागांनी फुललेला, बहरलेला. काही कंपन्यांचा परिसर उजाड, बोडकाही दिसतो; पण अपवादानं. कायद्याचा रेटा म्हणा किंवा इच्छेचा भाग, पण कंपन्यांचं आवार हिरवंगार, सुंदर, सौंदर्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला अनेकदा दिसतो. मात्र, 'सास्केन'च्या अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्‍यात वेगळीच कल्पना जन्माला आली. त्यांनी त्याच्या बीजारोपणाला अंकुर कसा फुटेल आणि प्रयत्नाच्या मळ्याला चांगली फळं कशी लागतील, या दिशेनं वाटचाल केली. त्यांनी कंपनीच्या आवारातील चार एकर जागेचं मातीपरीक्षण केलं. कुठल्या भाज्या, फळं तिथं येऊ शकतील, ते आजमावलं. मग कंपनीनं त्यासाठी आणखी दोन माळी नेमले आणि शेतीच फुलवली. बरं कंपनी एवढ्यावर थांबली नाही, तर तिनं हा भाजीपाला कर्मचाऱ्यांना बाजारभावाच्या वीस टक्के कमी दरानं विकणं सुरू केलं. आठवड्यातून दोनदा भाजी मंडई भरू लागली. मिळणाऱ्या पैशातूनच नवीन बी-बियाणं आणण्यासह शेतीविषयक खर्च भागवणं सुरू केलं. ही शेती पूर्णपणे सेंद्रिय आहे, हे महत्त्वाचं. तिथल्या कोणत्याही पिकावर रासायनिक खतांची मात्रा दिली जात नाही. त्यामुळं अनेक दिवस भाज्या हिरव्यागार, टवटवीत राहात आहेत, असं कंपनीचेच कर्मचारी सांगत आहेत. 

खरंतर वरवर पाहता ठीक, ओके, वॉव...अशा शब्दांनी तिच्याकडं पाहिलं जाईल. त्यात काय एवढं, असंही काही म्हणतील. तथापि तिच्यात कृतिशिलतेची अनेक बिजं आहेत, असं म्हटलं पाहिजे. 'सास्केन'च्या या उपक्रमाकडं पथदर्शी म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. अनेक कंपन्यांच्या आवारात अशा प्रयोगाची पुनरावृत्ती करता येऊ शकते. कदाचित काही कंपन्या 'सास्केन'च्या वाटेनं जातीलही. यानिमित्तानं इतिहासातील काही घटनांना उजाळा मिळतो.

काही वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिका, युरोपात मोठी मंदीची लाट आली होती, तेव्हा अनेकांना नोकऱ्यांना मुकावं लागलं होतं. हौसमौज करणाऱ्या या देशांत खिशाला कात्री लागल्यानं काहींना घरखर्च भागवायचा कसा असा प्रश्‍न पडला. बाजारात बिकट स्थिती होती. नोकरीच्या नव्या संधी थिजल्यासारख्या झाल्या होत्या. घरखर्च भागवताना नाकीनऊ येत होतं. अशावेळी तिथल्या लोकांनी मोठ्या संख्येनं घराच्या आवारात परसबाग फुलवण्यावर भर दिला होता. रोजच्या गरजेच्या भाज्या, फळं परसात लावल्या होत्या. त्याच्यातून भाजीपाल्यावरचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. याआधीही दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1929 मध्ये आलेल्या मोठ्या मंदीच्या काळातही अशाच मार्गाचा अवलंब केला गेला होता. त्यावर तेथील लोकांनी गुजराण केली होती. अशा नोंदी सापडतात. आपल्याकडच्या वृत्तपत्रात त्याबाबत रकानेच्या रकाने भरून छापून आलं होतं. सध्या तरी तशी स्थिती नाही, हे बरं आहे. पण ऑटोमेशनच्या झंझावातात काय होईल, काही सांगता येत नाही. 

'सास्केन'च्या परिसरात जर सेंद्रिय शेती केली गेली आणि त्यातून मिळणारा भाजीपाला दर्जेदार, चविष्ट, रुचकर आहे तर आपण आपल्याच घराच्या परिसरात, कुंड्यांमध्ये छोट्या प्रमाणात का होईना बी पेरून काही फळं, फुलं, वेलवर्गीय भाज्या का लावू नयेत, असा विचार तेथील कर्मचाऱ्यांच्या मनात अंकुरला. त्यांनी त्या दिशेनं प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं. एवढंच नव्हे तर तिथं मिळालेल्या फळं, भाज्यांनी त्यांना कमालीचा आनंद झाला. नवनिर्मिती, सर्जनशिलता काय असते, याचा प्रत्यय त्यांना आला. ही बाब खरं तर छोटी आहे. पण प्रत्येकानं त्याचं अनुकरण केलं पाहिजे, असं वाटतं. 

बागकाम हा छंद आहे. त्याच्यात ज्याचं मन रमतं त्यांना ताणतणाव कमी होण्यास मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात. दुसरं असं की, यातून नवनिर्मितीचा आनंद जो मिळतो, तो वेगळाच असतो. एकीकडं आपण प्रदूषणाची व्याप्ती आणि त्याचे परिणाम यावर वारेमाप चर्चा करतो. त्याचा दुष्परिणाम अनुभवतो. पण त्यावर उपाययोजना करण्याच्या दिशेने पावले उचलतो का, हा प्रश्‍न आहे. महागाईनं किती कळस गाठला, यावरदेखील वरचेवर रसभरीत चर्चा झडत असते. सगळं रसायनमिश्रित मिळत असल्यानं आपल्याला चवदार, रुचकर खायला मिळत नाही. 

रासायनिक खतांवर वाढलेला, कीटकनाशकांनी भरलेला भाजीपाला खायचा का? असा प्रश्‍न आता विचारला जात आहे. सेंद्रिय फळं, भाजीपाल्याचा वापर करण्यावर भर देणारा वर्ग वाढतो आहे. हे लक्षात घेता पुन्हा एकदा परसबाग फुलवण्याचा विचार प्रत्येकाच्या मनात अंकुरला पाहिजे, असं वाटतं. वेळ गेलेली नाही. मार्च सरून एप्रिल महिना सुरू होतो आहे. दोन महिन्यांत पावसाळा तोंडावर येतो आहे. घराच्या आवारात नाहीतर कुंड्यांमध्ये वेलवर्गीय भाज्या, जागा असेल तर इतर पालेभाज्या लावायला काय हरकत आहे. हौसेनं काहीजण कडू कारल्यापासून मधुर केळी, रसरसीत द्राक्षे, लालचुटूक स्ट्रॉबेरीपासून ते रसदार डाळिंबापर्यंत सगळं काही आपल्या टेरेसवर फुलवतात. गुलाब, मोगरा, चाफ्यापासून ते डेलिया, कार्नेशियाही बहरवतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. याच्यातून काही गोष्टी साधल्या जातील, चार पैशांची बचत, रसायनविरहित भाजीपाला, फळे आणि नवनिर्मितीचा आनंद. चला लागू या कामाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com