...तेथे लव्हाळे वाचती! (डॉ. वैशाली देशमुख)

Vaishali-Deshmukh
Vaishali-Deshmukh

छोट्याछोट्या गोष्टींनी आपली मुलं कोलमडून जायला नकोत असं कुणाला नाही वाटणार? मग आरामाच्या, सुखसमृद्धीच्या कोंदणात मुलांना सुरक्षित ठेवायचं, की थोडेतरी टक्केटोणपे खाऊ द्यायचे? ताबडतोब पुढं सरसावून अडथळा दूर सारून मार्ग मोकळा करून द्यायचा, की त्यावर मात करण्यात मुलांना मदत करायची?... मुलं सुखरूपपणे तरून जायला हवी असतील, गटांगळ्या खायला नको असतील, तर त्यांना पोहायला शिकवायला हवं. पाण्यापासून दूर ठेवणं हा उपाय नव्हे. 

‘जागतिक आत्महत्या-प्रतिबंध दिन’ नुकताच होऊन गेला! असा दिवस निश्‍चित करण्यात आला आहे- कारण आत्महत्यांचं प्रमाण धक्कादायक वेगानं वाढतंय. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळात, निकालांच्या काळात याचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेलं आपण बघतो. भारतात आत्महत्यांचं प्रमाण वेगानं वाढतंय. ‘दर तासाला एक’ अशा धडकी भरवणाऱ्या प्रमाणात विद्यार्थी हा मार्ग चोखाळतायत. यातल्या दर आत्महत्येमागे जवळजवळ वीस जणांनी तसा प्रयत्न केलेला असतो आणि शेकडो जणांनी त्या दिशेनं विचार केलेला असतो. त्याची सातत्यानं सापडणारी कारणं आहेत- कौटुंबिक समस्या, आजार, परीक्षेतलं अपयश, प्रेमभंग, व्यसनं आणि लैंगिक अत्याचार. तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच या समस्या कमी अधिक प्रमाणात भेडसावत असतात; पण म्हणून काही सगळे आत्महत्या करत नाहीत. ज्यांच्यात कुठल्याही प्रकारच्या तणावाला, अपयशाला किंवा मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीला तोंड देण्याचा लवचिकपणा (resilience) नसतो, त्यांच्याकडून असं पाऊल उचललं जाण्याची शक्‍यता असते. मुलांचा लवचिकपणा वाढवणं म्हणूनच महत्त्वाचं आहे आणि दिलाशाची गोष्ट म्हणजे ते शक्‍यही आहे. कारण तो पूर्णपणे जन्मजात, अनुवांशिक नसतो, तर कमावलेला असतो.

नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धांमध्ये ज्या भारतीय खेळाडूंनी यश मिळवलं, त्यातले बरेच जण कष्टातून आणि गरिबीतून वर आलेले होते. त्यातल्या काही जणांकडं खेळासाठी लागणारं योग्य प्रकारचं साहित्यही नव्हतं. खेळात प्रावीण्य मिळवण्याच्या जिद्दीपायी कित्येक तास प्रवास करायची ही मुलं. त्यामुळं येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायची त्यांची तयारी होती. अडचणी येणारच, त्यांच्यावर मात करायची आणि पुढं जायचं यासाठी त्यांची पुरेपूर तयारी होती आणि त्याचा सुपरिणाम दिसून आला.
अनेक तज्ज्ञांचं मत आहे, की अतिशय कडेकोट संरक्षणात, निर्जंतुक, सुरक्षित वातावरणात जी मुलं वाढतात त्यांच्यात ही लवचिकता येत नाही.

साध्या सरळ, सपाट रस्त्यानं जायची सवय असते, मध्ये छोटा जरी अडथळा आला तरी तो पार कसा करायचा हा पश्न पडतो. म्हणूनच छोट्या छोट्या अडचणींची लस मुलांना दिली, की मोठ्या अडचणी पार करण्याची प्रतिकारशक्ती त्यांच्यात येईल. शिवाय समोर येणाऱ्या अडथळ्याची तीव्रता मापण्याची क्षमता ही मुलं विकसित करतील. हे फार महत्त्वाचं आहे. कारण भविष्यात जी आव्हानं समोर उभी ठाकतील त्यांना कसं हाताळायचं; थेट भिडायचं की तात्पुरती यशस्वी माघार घ्यायची की कुणाची तरी मदत घ्यायची याचा अंदाज त्याशिवाय येणार नाही. 

हा अडथळा पार केल्यावर पलीकडं काहीतरी चांगलं आहे, यातून बाहेर पडल्यावर आपल्या बाबतीत काहीतरी भलं घडणार आहे अशी आशा असेल, तर हातपाय हलवायची इच्छा होणार ना? त्यामुळं आशादायी दृष्टिकोनही महत्त्वाचा. या बाबतीत मुलं आजूबाजूला काय पाहतात? काही अडचण आली की मान हलवत, हताशपणे ‘छे, काही खरं नाही’ असं म्हटलं जातं का? आयुष्यात अनपेक्षित समस्या येऊ शकतात, त्यांच्यासाठी आपण तयार राहायला हवं हे आपल्या वागण्या-बोलण्यातून प्रकट होतं का? मुलांवर, त्यांच्या क्षमतांवर आपला विश्वास आहे अशी भावना त्यांच्यापर्यंत पोचते का? एखाद्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र विचार करण्याची संधी आपण मुलांना देतो का? ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ असा आश्वस्त हात त्यांच्या पाठीवर ठेवतो का? कारण हा सगळा शारीरिक, मानसिक, भावनिक आधार नसेल तर कशाच्या बळावर मुलं पूर्वपदाला येणार?      

या दोन भावंडांची गोष्ट तुम्ही कदाचित ऐकली असेल. त्यांच्यातला एक होता सुखवस्तू, प्रतिष्ठित नागरिक. तो खूप शिकला होता, त्याचा स्वत:चा व्यवसाय, मोठं घर आणि सुखी कुटुंब होतं. दुसरा भाऊ मात्र दारुडा, कंगाल होता. शिक्षण नाही, नोकरी नाही आणि राहायला घर नाही अशी हलाखीची परिस्थिती होती त्याची. दोघांमधला फरक पाहून कुणीतरी कुतूहलानं त्यांना विचारलं ः ‘‘काय कारण आहे तुमच्या आजच्या परिस्थितीचं?’’ दोघांचंही उत्तर होतं ः ‘‘माझे वडील!’’ त्यांच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं. घरी शिवीगाळ, मारझोड चालायची. घराची अत्यंत गरिबी. अभ्यासाचं वातावरण नव्हतंच.    

एकाच घरात राहून, त्याच परिस्थितीचा सामना करून दोघांचं भविष्य का वेगळं बनलं? कारण पहिला होता लवचिक, अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करणारा. त्यानं विचार केला ः ‘‘मला असं नाही जगायचं. यातून बाहेर पडायचंय.’’ त्यानं मग मिळेल ती कामं केली, रात्रीच्या शाळेत जाऊन अभ्यास केला, खूप कष्ट उपसले. छोटा मात्र राग धरून बसला, ताठर राहिला. नशिबाला, परिस्थितीला दोष देत राहिला. नैराश्‍यात बुडून गेला आणि आजच्या हलाखीच्या परिस्थितीला पोचला. 

अडचणी आल्या, आव्हानं आली, की माणूस गोंधळून जाणं साहजिक आहे. अशा वेळी सारासार विवेक सुचत नाही, कल्पनाशक्तीला खीळ बसते आणि निर्णय घेण्याचा मार्ग धूसर होतो. किशोरवयात हे अडथळे अधिक जोमानं येतात- कारण त्यांचा मेंदू अजून कच्चा असतो. या भावनिक गोंधळातून मार्ग दाखवणारा ‘प्रीफ्रंटल लोब’ नावाचा मेंदूचा भाग उशिरा, सर्वांत शेवटी परिपक्व होतो. विचार ही संकल्पना प्रगत आहे, भावना मात्र आदिम, अतिप्राचीन आहेत. त्यामुळं कुठलीही घटना घडली, की पहिली तीव्र प्रतिक्रिया भावनिक असते. त्यानंतर संधी मिळाली तर विचार केला जातो आणि अधिक जबाबदार प्रतिसाद दिला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेत मार्क्‍स कमी पडले, तर दु:ख किंवा भीती किंवा राग अशा टोकाच्या भावना मनात येतात. त्या भरात पटकन काही आततायी निर्णय घेतले जातात, बहुतकरून नकारात्मक. निकाल लपवून ठेवणं, खोटं निकालपत्र दाखवणं, घरातून निघून जाणं, स्वत:ला इजा करून घेणं... या सगळ्या खरं तर प्रतिक्षिप्त क्रिया असतात. आत्ताच्या परिस्थितीपेक्षाही पूर्वी आलेल्या काही अनुभवांतून आडाखे बांधून केलेली ही कृती असते. काही जण त्यावर सावकाश विचार करतात आणि जिद्दीनं त्यावर काम करतात, ते अपयश सुधारण्याचा प्रयत्न करतात. घटना एकच, पण त्यावर केलेले (किंवा न केलेले) विचार निरनिराळे. आणि साहजिकच केलेली कृती निराळी. जेव्हा आपण येणाऱ्या प्रसंगाला आदिमानवासारखी प्रतिक्रिया न देता प्रगत मानवासारखा प्रतिसाद द्यायला मुलांना शिकवू तेव्हा भावनिक उद्रेक कमी होतील. अनेक दुर्घटना टळतील. 

येणाऱ्या अनुभवांतून मुलं खूप काही शिकत असतात. असे वेगवेगळे अनुभव आपण त्यांना देऊ शकतो. काही वेळा प्रत्यक्ष तर काही वेळा गोष्टींमधून, गप्पांमधून किंवा काल्पनिक प्रसंगांमधून. जगाचा, देशाचा, घराण्याचा इतिहास बरंच काही शिकवून जातो. आपले सगळे पूर्वज अनेक सुख-दु:खांमधून, अडी-अडचणींमधून गेले आणि तरीही नामशेष न होता टिकून राहिले ही किती उत्साहवर्धक गोष्ट आहे! विचारांना वळण लावण्याचं काम जीवनकौशल्यांच्या साह्यानं करता येतं. ‘खेळ’ हा आणखी एक हुकमाचा एक्का! जिद्द, खिलाडू वृत्ती, समस्यांवर मात करणं आणि अपयश पचवणं या गुणांची जोपासना खेळाच्या मैदानावर होते. कुठल्याही व्यक्तीच्या मनाला कठीण परिस्थितीत उसळून पुन्हा वर यायला हे गुण मदत करतात. स्वामी विवेकानंदांनी म्हणूनच तर तरुणांसाठी खेळावर आणि बलोपासनेवर इतका भर दिला होता. हे करत असतानाच तज्ज्ञांनी पुन:पुन्हा अधोरेखित केलेली गोष्ट म्हणजे एखाद्या जबाबदार प्रौढाचा दमदार पाठिंबा! हे आस्तित्व मुलांना बळ देतं, पुढं जायला, प्रयत्न करायला प्रोत्साहन देतं. काही जमलं नाही, अपयश आलं तर कुणी तरी आपल्या पाठीशी आहे ही कल्पना त्यांना दिलासा देते.     

छोट्याछोट्या गोष्टींनी आपली मुलं कोलमडून जायला नकोत असं कुणाला नाही वाटणार? मग आरामाच्या, सुखसमृद्धीच्या कोंदणात मुलांना सुरक्षित ठेवायचं, की थोडेतरी टक्केटोणपे खाऊ द्यायचे? ताबडतोब पुढं सरसावून अडथळा दूर सारून मार्ग मोकळा करून द्यायचा, की त्यावर मात करण्यात मुलांना मदत करायची?... मुलं सुखरूपपणे तरून जायला हवी असतील, गटांगळ्या खायला नको असतील तर त्यांना पोहायला शिकवायला हवं. पाण्यापासून दूर ठेवणं हा उपाय नव्हे. ही जबाबदारी फक्त पालकांचीच नव्हे तर समाज म्हणून आपल्या सर्वांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com