गुरमेहर आणि निष्पक्ष अभिव्यक्तीचा सुवर्णमध्य

Gurmehar Kaur
Gurmehar Kaur

समाज प्रगल्भ होत जाणे - ही प्रक्रिया एका कुठल्या घटनेने किंवा नेत्याकडून वा संघटनेकडून  पूर्णत्वास येत नसते. ती एक सतत घडत जाणारी प्रक्रिया असते. अनेक छोट्या छोट्या घटनांमधून समाजाच्या मानसिकतेचा प्रवाह वळणं घेत जात असतो. ही वळणं प्रगतीकडे, अधिकाधिक वैचारिक स्वातंत्र्याकडे आणि निष्पक्षतेकडे नेणारी असतील तर आणि तरच समृद्ध समाज निर्माण होत असतो. गुरमेहर कौर वरून तापलेल्या राजकीय वातावरणाने आपल्या समाजाच्या प्रगल्भ असण्यावर आणि अधिकाधिक प्रगल्भ होतजाण्यावर काही नवी संकटं उभी केली आहेत. त्या निमित्ताने काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. हे प्रश्न प्रस्थापित विचारवंत विश्व किंवा राजकीय व्यक्तींसाठी नसून, आपल्यातील अनेकांसाठी आहे. कारण समाज आपणच घडवायचा असतो.

गुरमेहर, एका हुतात्म्याची कन्या, डाव्या किंवा समाजवादी विचारांनी प्रभावित झालेली आयडियलिस्ट आहे, हे आता सर्वश्रुत आहे. तिचे "युद्धखोरी थांबवा", "माझ्या बाबांना पाकिस्तानने नव्हे, युद्धाने मारलं आहे" ही वाक्य त्याच प्रभावातून आली आहेत. सध्याच्या राष्ट्रवादाच्या उन्मादात वहावत असलेल्या काही टोळक्यांना असं तत्वज्ञान मंजूर तर नाहीच, शिवाय हे तत्वज्ञान उच्चारणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी देशद्रोही आहे. ह्या टोळक्यापेक्षा थोडासा वेगळा असलेला एक मोठा समुदाय आहे. जो राष्ट्रवादी आहे, पण उन्मादी नाही, आततायी नाही. गुरमेहरला विरोध करणारे ह्या दोन प्रकारचे लोक आहेत. वरकरणी हे प्रकरण देशद्रोही वक्तव्यांचा आरोप असलेल्या तरुणांच्या कार्यक्रमावरून सुरू झालेलं असलं तरी त्याचं मूळ ह्या वैचारिक फरकात आहे. गेल्या ३ वर्षात असे अनेक वैचारिक युद्ध आपण अनुभवले आहेत. इतर प्रकरणांप्रमाणे हे प्रकरण देखील काही दिवसांनी निवळेलच. पण आधी म्हटल्याप्रमाणे, समाजाने ह्या प्रकरणातून एक छोटंसं, आपल्याला नं जाणवणारं वळण घेतलेलं असणार आहे. ते वळण काय असावं - हे आजच ठरवायला हवं.

सोशल मिडीयावर जसजशी गुरमेहरच्या विरोधाची लाट वाढायला लागली, तसतसे, तिच्या समर्थनार्थ विविध तर्क उभे राहिले. एक स्त्री आहे, तरुणी आहे - म्हणून तिला विरोध करू नये तसेच, एका हुतात्म्याच्या पुत्रीला "असं" वागवू नये आहे हे तर्क होते. ह्या सर्व तर्कांमध्ये "तिला तिचं म्हणणं मांडायचा हक्क आहे" हा अभिव्यक्तीचा एक मुद्दा अनुस्यूत होताच. परंतु, गुरमेहरला बलात्काराची धमकी दिली गेली आणि तेव्हापासून चित्र अधिकच गडद झालं.

मानवता की राष्ट्रवाद - ह्या मूळ मुद्दावरून ही चर्चा आधीच भरकटली होतीच. हुतात्म्याची पुत्री, तरुण स्त्री ह्या कारणांद्वारे गुरमेहर ज्या तत्वज्ञानाला पुढे आणत आहे, ते तत्वज्ञान criticism-proof करण्याचा प्रयत्न चालू होताच. म्हणजे, गुरमेहर ही "अशी कुणीतरी आहे" म्हणून तिचं म्हणणं ऐका आणि मान्य कराच - हा तो होरा होता. "गुरमेहरला तिचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे" हे म्हणत असताना इतरांना तिच्या म्हणण्याला विरोध करण्याचा अधिकार देखील आहे - हे बेमालूमपणे बाजूला सारलं जात होतं. अभिव्यक्ती केवळ गुरमेहरला असते, विरोध करणाऱ्यांना नाही – असा काहीसा तर्क होता. परंतु कुणीतरी बलात्काराची धमकी दिली, आणि हा लपलेला प्रवाह विचित्र रूप धारण करून समोर आला.

ती धमकी आल्यानंतर, जो कुणी गुरमेहरच्या म्हणण्याला, तर्काला विरोध करेल - तो त्या बलात्काराच्या धमकीचंच समर्थन करतोय - असा विचित्र प्रचार सुरू झाला. आधीच अभाविप ने धुडगूस घालून ही चर्चा "गुंडगिरी" ची चर्चा करून टाकली होती. धमकी आल्यानंतर तर सर्वच विरोधक निकालात निघाले.

इथे आपण थांबून विचार करायला हवा.

तुमचे विचार डावे असोत वा उजवे - ते व्यक्त करण्यात आणि ते पटवून देण्यात प्रामाणिकपणा असायला हवा. ह्या प्रामाणिकपणावर तडजोड नको. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात, हिंसेला स्थान नाही हे जितकं स्पष्ट आहे तितकंच - अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन्ही बाजूंना असतं - हे सत्य आहे. त्यामुळे हुतात्म्याची पुत्री असो वा स्वतः सैन्यातील अधिकारी असोत - त्यांचं म्हणणं मांडण्याच्या अधिकाराचा आपण जेव्हा सन्मान करतो तेव्हा त्या म्हणण्याला होणाऱ्या विरोधाचा देखील सन्मान करायला हवा. आता हा विरोध आम्ही म्हणून तसाच, आम्ही ठरवू तेव्हढा सौम्य हवा - हे म्हणणं म्हणजे श्रीराम सेनेने valentine day साजरा कसा करावा ह्याबद्दल नियमांची सूची प्रसिद्ध करण्यासारखं आहे. त्यांची ही सूची प्रसिद्ध करण्याची कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येते. पण ते नियम नं पाळणारे व्यभिचारी किंवा बलात्कारी आहेत असा आरोप त्यांनी केला तर तो चूक ठरतो. जर विरोधाची तीव्रता समोरची व्यक्ती बघून ठरायला हवी असेल तर भारताचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्रपती, विविध धर्मातील अंधश्रद्धांवर पोसले जाणारे बाबा/पादरी/मौलवी हे सर्वच टीकेच्या कक्षाबाहेर जातील. हे आम्हाला परवडणारं तर नाहीच, शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूळ स्पिरीटला मारून टाकणारं आहे.

राष्ट्रवाद की मानवतावाद, युद्धखोरी की संरक्षण सिद्धता, पाकिस्तानसोबत शत्रुत्व की वैश्विक बंधुत्वाच्या तत्त्वाखाली पाकिस्तानबद्दल आपुलकी - ह्यावर मीमांसा करणे हा ह्या लेखाचा विषय नाही. ह्या दोन्ही विचाराच्या टोकांनी, आपापसातील फरकातील सुवर्णमध्य गाठणे, आणि हा सुवर्णमध्य समाजातील बहुमतावर बिंबवणे हे भारतीय समाजासाठी अत्यावश्यक आहे – ही जाणीव अधोरेखित करणे, हा हेतू आहे. अर्थात, दोन्हीकडील टोकांना असा सुवर्णमध्य शोधणे आणि गाठणे अशक्य आहे.

अति डावे आणि अति उजवे ह्या दोघांकडून हा मध्य साधला जाणं दिवास्वप्न आहे. कारण टोकांवर असणे, हीच त्यांची ओळख आहे. परंतु सौम्य उजवे आणि सौम्य डावे असणाऱ्यांनी अश्या प्रकरणात पुढे येऊन वातावरणातील कटुता dilute करण्याकडे लक्ष द्यायला हवं. हे करण्यासाठी परस्परांच्या अभिव्यक्तीचा आदर आणि सन्मान करण्याची वृत्ती हवी. त्याने चर्चा होऊन भारतासाठी सर्वोत्तम काय, ह्या कोड्याचं उत्तर सापडू शकतं.

बलात्काराची धमकी देणाऱ्या गरम डोक्याच्या मूठभरांमुळे गुरमेहरचा विरोध वांझोटा ठरू शकत नाही. ठरू नये. आणि ह्याची काळजी आपण सर्वांनीच मिळून घ्यायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com