वळीव... (भाग १)

शेखर नानजकर
बुधवार, 10 मे 2017

वाळलेलं गवत उन्हाळी वाऱ्याच्या वावटळींनी उडवून नेलेलं होतं. मैदानात आता फक्त मातीच उरली होती. नाही म्हणायला सशाच्या, भेकराच्या वाळक्या लेंड्या तेवढ्या दिसत होत्या. मैदानाची आता काहिली होऊ लागली होती

जंगलात अजून अंधारच होता. उकडत नसलं तरी गारवाही जाणवत नव्हता. पक्षी अंधारातच डोळे उघडून बसले होते. जांभळीच्या शेंड्यावर बसलेल्या एका कोतवालाचं लक्ष उगवतीकडे गेलं आणि तो आनंदानं किंचाळला. पण आवाजात फारसा दम नव्हता. थोडा वेळ पुन्हा शांततेत गेला. उगवतीला थोडं उजळलं होतं. जंगलात अजून काही पक्षी ओरडले. पण पहाटेचा कोलाहल माजला नाही. उगवतीला तांबूस रंग फाकू लागला. आभाळ उजळू लागलं. एक शेकरूही ओरडलं. एकदोघांनी साथही दिली. पण नेहेमी सारखी चढाओढ लागली नाही. शुक्र लोप पावला. पश्चिमेकडचे तारेही आभाळात विरून गेले. ओढ्यातलं स्वच्छ दिसू लागलं होतं. ओढ्यातले सगळे दगड पांढरे फक्क पडले होते. शेवाळं वाळून काळं पडलं होतं. वळणावळणाच्या ओढ्यात एकच पाणवठा तग धरून होता. छोटासाच होता. पण होता. पाणी अजून स्वच्छ होतं. त्यावर निवळ्या अजून जोमानं गिरक्या घेत होत्या. त्यांच्या त्या धावपळीनं उगाचच गोंधळ होईल असं वाटत होतं. पण त्यांचा आवाज होत नव्हता. कुणीतरी एकदोन जण नुकतेच पाणी पिऊन गेले असावेत. म्हणून त्यांचा गोंधळ चालला होता. नावाडी पाण्यावर पुढेमागे करत होते. दोनचार बेडकं पाण्यातच ध्यान लाऊन तरंगत होती. खंड्या अजून पाण्यावर यायचा होता.

झाडांच्या शेंड्यांवर आता उन्हं दिसू लागली होती. वसंतातली हिरवी तुकतुकीत पालवी उन्हात चमकत होती. रात्र एका जांभळीवर काढलेल्या वानरांच्या कळपाला जाग येऊ लागली होती. हुप्प्या सरसर चढत शेंड्यावर पोहोचला. आजूबाजूच्या जंगलावर नजर टाकत त्यानं एक आरोळी दिली. आवाज जंगलात दूरवर ऐकू गेला. लांबवरून दुसऱ्या एका हुप्प्यानं त्याला प्रतिआव्हान दिलं. मग थोडावेळ आरोळ्यांचं द्वंद्व झालं. मग सगळं शांत झालं. दोघांना काहीच हरकत नव्हती. दोघंही आपापल्या हद्दीत होते. हुप्प्या शेंड्यावरून खाली आला. एकदोन झेपात तो टेटूच्या झाडावरून भेन्डाच्या, मग सावरीच्या, असं करत पुढं सरकू लागला. तरण्या, म्हाताऱ्या, पिल्लं असे त्याच्या मागून निघाले. आता जंगलात फळांना तोटा नव्हता. जांभळं होती, लिंबोण्या होत्या, करवंद होती, आंबे होते, फणस होते, गुंजा होत्या, रानकेळं होती, मोहाची फुलं होती, चंगळ होती! बघताबघता कळप दिसेनासा झाला.

दिवस कासराभर वर आला होता. उन्हं तापू लागली होती. खंड्या केंव्हाच पाण्यावर आलेला होता. पाचदहा बुचकाळ्या मारून दोनचार मासेही त्यानं मटकावले होते. सुतारही कामाला लागला होता. एक वाळलेलं खोड फोडायला सुरुवात केलेली होती. त्याचा गिरणीसारखा आवाज ऐकू येत होता. शेकरं अंजनाची फुलं खाण्यात गढली होती. झाडबुडाशी मुंग्यांनी पाचोळ्यात रांगा लावल्या होत्या. कुठून कुठून त्या काहीबाही गोळा करून बिळात घेऊन जात होत्या. मधमाश्या जंगलभर उधळल्या होत्या. जांभळाचा मधु गोळा करून आपल्या पोळ्यात भरण्यात त्यांचा दिवस जाणार होता. दिनकिड्यांनी सकाळपासूनच ओरडून रान डोक्यावर घेतलं होतं. दर काही वेळानं त्यांचा कर्कश्य आवाजापुढे बाकी आवाज ऐकू येईनासे व्हायचे. गेल्या महिन्यात ते अंतरा अंतरानं ओरडायचे. पण आता सारखेच ओरडतात. उसंत नसते.

सूर्य आता माथ्याकडे सरकू लागला होता. लख्ख पांढरं उन पडलं होतं. मैदानाकडे बघवत नव्हतं. मैदानावरचं गवत केंव्हाच वाळून गेलेलं होतं. वाळलेलं गवत उन्हाळी वाऱ्याच्या वावटळींनी उडवून नेलेलं होतं. मैदानात आता फक्त मातीच उरली होती. नाही म्हणायला सशाच्या, भेकराच्या वाळक्या लेंड्या तेवढ्या दिसत होत्या. मैदानाची आता काहिली होऊ लागली होती. वाफांमुळे सगळं मैदान हलतंय असं भासू लागलं होतं. आभाळाचा रंग आता पांढरा दिसू लागला होता. काही गिधाडं आणि घारी उंच आभाळात घिरट्या घेत होत्या. पण त्यांच्याकडे बघवत नव्हतं. आभाळाकडेच बघवत नव्हतं. वारा पडला होता. मधेच एखादी वावटळ उरलंसुरलं गवत घेऊन उडायची. गवताची पाती आभाळात उंच उंच जायची. दूरवर जाऊन भेलकांडत पडायची. पण वारं असं नव्हतंच. नुसतं गरम गरम आणि घाम घाम होऊ लागलं होतं.

जंगलात तर हवा हलतच नव्हती. झाडांची पानं चित्र काढावं तशी स्तब्ध होती. काही नाही तर झाडांचे शेंडे तरी हलतात. पण तेही आज सुन्न पडले होते. काहीच हलत नव्हतं. नेहेमी कलकलाट करणारी शेकरं सुद्धा धास्तावल्यागत आवाज न करता गपगुमान या फांदीवरून त्या फांदीवर जा ये करत होती. काही माश्या तेवढ्या आवाज करत उडत होत्या. पण त्यानं जंगलातली ती गंभीर, उदास आणि कोरडी शांतता भंग पावत होती. डोक्यावर आलेली उन्हं, झाडं नसलेल्या भागात ओढ्यात उतरली होती. ओढ्याचा तेवढा भाग पांढरा भक्क दिसत होता. डोळ्याला सहन होत नव्हता. पण पांढऱ्या रंगाची फुलपाखारं ओढ्यात फिरत होती. ती त्या भागातून गेली की चमचम करायचं. पण बाकी कुणीच आपापल्या जागा सोडायला तयार होत नव्हतं. सांबरं, भेकरं झाडबुडाशी रवंथ करत बसली होती. गावेही माश्या वारत रवंथ करत होते. माश्या त्यांना छळत होत्या, पण त्यांना उठायची इच्छाच नव्हती. उकाड्यानं हैराण झालं होतं. बिबटे कपारीत गारव्याच्या जागा शोधून जीभा बाहेर काढून हपापत बसले होते. उदमांजरं बिळातून डोकावत सुद्धा नव्हती. वानरं सुद्धा एकाच झाड पकडून त्याला लगडून बसली होती. पेंगू लागली होती. उकाड्यानं गंजली होती.

उन मी म्हणत होतं. जंगल तापलं होतं. माळरानं पेटली होती. झाडं मलूल झाल्यागत वाटत होती. हवा पडली होती. हवेत दमटपणा दाटून आला होता. प्राणी आळसटले होते. सगळंच मंद आणि मलूल वाटत होतं. वैशाखातली दुपार कलली होती.....

या लेखाचा दुसरा भाग उद्या (गुरुवार) प्रकाशित केला जाईल.... 

(लेखक प्रसिद्ध पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक आहेत)