आणि वळीव कोसळू लागला..!

शेखर नानजकर
गुरुवार, 11 मे 2017

काही क्षण गेले आणि सूर्य अचानक झाकोळला. एका काळ्याशार ढगानं सूर्याला गिळलं. वाऱ्याचा एक झोत माळावर घुसला. धुळीचा लोटच्या लोट हवेत उधळला. पालापाचोळा हवेत उडाला. गगनाला जाऊन भिडला. निम्मं आभाळ काळं झालं

दुपार.....

वैशाखातली दुपार कलली होती. हवा हलतच नव्हती. ग्लानी आल्यागत जंगलं सुस्त पडलं होतं. पांढऱ्या आभाळात घारी, गिधाडंही दिसत नव्हती. ती उन्हाच्या माऱ्यानं काडेकपारीतल्या सावलीत गुमान बसून राहिली असावीत. सांबरं भेकरं सावलीतच डुलक्या काढत होती. गव्यांना पेंग येत होती. पण माश्या सारख्या छळत होत्या. त्या वारून वारून त्यांची शेपूट थकली होती. उदमांजरं, ससे बिळातून बाहेर पडायचा विचार सुद्धा करत नव्हते. रानडुकरं जिथे तिथे माती ऊकरून त्यात दबून बसली होती. अस्वलांना तर सहनच होत नव्हतं. खरंतर त्यांचा प्रणय काल सुरु होता. पण आज त्यांना तेही सुचत नव्हतं.

कोल्ह्यानं कालच रात्री बिबट्याच्या शिकारीतलं भेकाराचं एक उरलंसुरलं तंगडं पळवलं होतं. तो ते चघळत बसला होता. बाहेर जाण्याचा त्याचाही कुठलाच इरादा नव्हता. भेन्डाच्या झाडावरून दोन गिधाडं त्याच्यावर डोळा ठेऊन होती. त्यांना हुसकवायला तो मधे मधे दात विचकवत होता. साप संदिकोपरे पकडून वेटोळी घालून पडले होते. दुपारच्या ओढ्यात फिरणाऱ्या सापसुरळ्या दिसत नव्हत्या. पक्षी सुद्धा उन्हानं हबकले होते. वेड्या राघूंना मधमाश्या पकडायच्या होत्या. पण उन्हात जायचं धाडस होत नव्हतं. तेही फांद्यांवर बसून होते. मुंग्या मात्र घोर कामात होत्या. थांबायला फुरसद नव्हती. आत्ताच काय काय आणून बिळात भरून ठेवायला हवं. अवघड काळ आता जवळ आला आहे. मुंग्यांना उसंत नव्हती. पण बाकी जंगल सुस्त पडलं होतं. गरम गरम होत होतं. तहानेनं घसा कोरडा पडत होता. पण आत्ता पाण्यावर जाणं म्हणजे धोका ओढवून घेण्यासारखं होतं. ग्लानी येत होती. त्यात मधे मधे येणारा माश्यांचा आवाज डोकं उठवत होता.

गेले कित्येक दिवस असंच चाललं होतं. थंडी संपली तशी झाडांना पालवी फुटू लागली. पालवी फुटू लागली तसं ऊन तापू लागलं. थंडीतच ओढे आटले होते. ऊन तापू लागलं, तसे पाणवठे आटू लागले. आटता आटता आता एकाच शिल्लक राहिला होता. तोही आटत चालला होता. फार दिवस त्यातलं पाणी जंगलाला पुरणार नाही. जंगलातला पाचोळा करकरीत वळला होता. कितीही छोटा प्राणी त्यावरून गेला तरी मोठ्ठा आवाज व्ह्याचा. थंडीत दंव पडायचं. पण आता कित्येक दिवस तेही पडत नव्हतं. पाऊस तर आठवणीतूनच गेला होता. ओढे, माळरानं, खडक, कपारी, डोंगर सगळं जंगल कोरडं ठाण पडलं होतं. त्यात ही भट्टीसारखी तापलेली दुपार....

झोपेतच बिबट्यानं कूस बदलली. त्याची झोप थोडीशी चाळवली. त्यानं नाईलाजानं थोडे डोळे उघडले. आणि त्याला खाड्कन जाग आली. पडल्यापडल्याच मान वर करून तो अंदाज घेऊ लागला. काहीतरी ‘वेगळं’ घडत होतं. हवेत काहीतरी वेगळा बदल होत होता. खूप काहीतरी दाटून येतंय असं वाटत होतं. त्यानं अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. त्याला फारसं समजलं नाही. पण काहीतरी ‘वेगळं’ घडत होतं. त्यानं पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पण आता झोप मोडली होती. गुंजांच्या बिया खात झाडबुडाशी पेंगत बसलेल्या हुप्प्याला सुद्धा एकदम काहीतरी ‘वेगळं’ जाणवलं. वारा करकचून बांधल्यासारखा थांबला होता. एकाही छोटीशी सुद्धा झुळूक येईनाशी झाली होती. त्याला स्वस्थ बसवेना. सरसर चढत तो जांभळीच्या शेंड्यावर पोहोचला. जंगलं कडक उन्हात भाजत होतं. त्यानं चहूकडं नजर फिरवली. आणि एकदम त्याचं लक्ष गेलं. नैरुत्येच्या कोपऱ्यात काळेशार ढग जमा झाले होते. ढगांची फौजच्या फौज त्याच्याच दिशेनं पुढं सरकत होती. त्यानं शेंड्यावरनंच एक बुभु:कार केला. शांत जंगलात तो घुमला. सरसर उतरत तो झाडंबुडाशी आला आणि काहीच न सुचून रानगुंजेच्या बिया शोधू लागला.

काही क्षण गेले आणि सूर्य अचानक झाकोळला. एका काळ्याशार ढगानं सूर्याला गिळलं. वाऱ्याचा एक झोत माळावर घुसला. धुळीचा लोटच्या लोट हवेत उधळला. पालापाचोळा हवेत उडाला. गगनाला जाऊन भिडला. निम्मं आभाळ काळं झालं. उंच उंच उडालेला पाचोळा त्या काळ्या ढगात शिरतोय, असं वाटू लागलं. धूळ, वाळलेलं गवत आणि पाचोळा यानं आभाळ भरून गेलं. काळ्या कुट्ट ढगांनी निम्म्याच्या वर आभाळ झाकून गेलं. वारा जंगलात घुसला. जंगलात अचानक अंधार पडला. सांबरं, भेकारं माना वर करून पाहू लागली. नाक वर करून वास घेऊ लागली. काहीतरी ‘वेगळं’ घडतं होतं. ऊदमांजर बिळातून तोंड बाहेर काढून पाहू लागलं. जांभळीच्या ढोलीत पिल्लं घातलेल्या धनेशाच्या मादिनं चोच बाहेर काढून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. खात असलेली भेकाराची तंगडी तोंडात धरून कोल्हा पळत सुटला. गव्यांचा कळप धडपडत उठला. झाडं गदागदा हलायला लागली. वाळक्या फांद्या धडधड तुटून खाली पडू लागल्या. उंबरांचा सडा पडला. जांभळाखाली फळांचा पाऊस पडला. भोकरं अजून कच्चीच होती. आंबे पडले. मुंग्यांच्या रांगा बिळाकडे परत निघाल्या. वानरांचे कळप या झाडावरून त्या झाडावर पळू लागले. घारी आणि गिधाडं आभाळात उंच उंच घिरट्या घालू लागली. पाणवठ्यातल्या बेडकांनी ओरडून कहर माजवला. बिबट्यानं कपार सोडली. खाली उतरून तो जंगलात दिशाहीन फिरू लागला. वाऱ्याच्या, झाडांच्या आवाजानं, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या आरडाओरडीनं जंगलात काहूर माजला....

आणि एक क्षण वारा अचानक थांबला. जंगलात काही क्षण एकदम शांतता पसरली. आणि एकदम कानठळ्या बसवणारा आवाज झाला. डोळे दिपवणारा प्रकाश चमकला. आभाळ कापत एक वीज जंगलात कुठेतरी कोसळली. जो तो प्राणी धास्तावला. मग असंच दोनचार वेळा आभाळ गडगडलं. ढगांनी आपली ताकद दाखवून दिली. काळ्याकुट्ट ढगांनी सगळं आभाळ व्यापलं. जंगलात अजूनच अंधार पसरला. काही क्षण सगळंचं थांबलं. जो तो आभाळाकडे पाहू लागला....

आणि आभाळातून एक करवंदाएवढी पांढरी स्वच्छ गार येऊन माळावरच्या मातीत आपटली. उड्या घेत लांब जाऊन पडली. मग दुसरी, मग तिसरी..मग गारांचा पाऊस पडू लागला. माळ शुभ्र दिसू लागला. मातीचा गंध हवेत उधळला. मग त्या गारांमधेच मिसळून पाऊस कोसळू लागला...पाण्याच्या धारा माळावर कोसळू लागल्या. जंगलात झाडांवर कोसळू लागला. पानांवर, मग फांद्यांवर, मग खोडांवरून जमिनीवर कोसळू लागला. कलत्या दुपारी धो धो पावलात जंगलात अंधार पसरला. वळीव कोसळू लागला होता....

(लेखक प्रसिद्ध पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक आहेत)