आता जंगलाला धडकी भरली आहे...

शेखर नानजकर
बुधवार, 15 मार्च 2017

माणूस पाणवठे काबीज करणार.... त्यात घाण करणार, पाणी नासवून टाकणार... आता पाणी कुठे प्यायचं? खंड्यानं कुठल्या पाण्यात बुचकळ्या मारायच्या.... मासे कसे धरायचे? वंचकानं कुठल्या पाणवठ्यात ध्यान लावायचं? पाण्यावरचे किडे धोब्यानं कुठे शोधायचे?

आता सुट्ट्या लागतील. मुलं आणि त्यांचे पालक, दोघेही मुक्त होतील. प्रत्येकजण शहराच्या या धकाधकीपासून कुठेतरी दूर जाण्याचं ' प्लॅनिंग ' करू लागेल. कोणी दुसऱ्या शहरात, आपल्या नातेवाईकांकडे जायचं ठरवेल. कोणाला कोकण बघायचं असेल. कुणी ट्रेक ठरवेल. कुणी हिमालयातलं प्लॅनिंग केलेलं असेल. कुणाला सह्याद्रीचं वेड असेल. कुणाला जंगलात जायचं असेल. कुणाला वाघ पाहायचा असेल. कुणी स्वत:ला फोटोग्राफर मानत असेल. कुणाला पक्षी 'कॅच' करायचे असतील; तर कुणी टायगर 'ओव्हर' झाला असेल, म्हणून 'मायक्रो' फोटोग्राफीच्या मागे असेल... पण एक नक्की, की एक मोठा लोंढा आता निसर्गात घुसेल. निसर्गात जाण्याची प्रत्येकाची करणं थोडीफार वेगळी असू शकतील. पण एक कारण मात्र सामायिक असेल, "मज्जा करायची!' म्हणजे काय करायचं, तर असं काहीतरी करायचं की ज्यानं सगळ्यांना "मज्जा' आली पाहिजे. आणि मज्जा करणारा हिरो ठरला पाहिजे. मग त्यासाठी काहीही वेडे चाळे, आरडाओरडी, विदुषकी चाळे, असं काहीही चालतं. जेणेकरून आपण आकर्षणाच्या केंद्राबिंदुपाशी असलो पाहिजे. असे सगळे चाळे आणि तमाशे आता पाहायला मिळतील.....

इकडे निसर्गात काय चाललेलं असेल.... थंडीची हुडहुडी कमी झाली असेल. पानगळ जोरात सुरु झाली असेल. काही झाडांना नवीन पालवी फुटू लागली असेल. ओढ्याची धार पूर्ण आटलेली असेल. खाचखळग्यात पाणी साचून पाणवठे तयार झाले असतील. त्या स्वच्छ आणि नितळ पाण्यात निवळ्या फिरू लागल्या असतील. खडकांवर बसून बेडकं जमेल तितकं ऊन खात असतील. नखा एवढे मासे पाण्यात फेर धरू लागले असतील. नावाडी किडा पाण्यावर पुढं मागं करत वेळ काढत असेल. पाणतळीच्या दगडांच्या सपाटीतून खेकडे नंग्या बाहेर काढत असतील. मधमाश्‍या आणि फुलपाखरं पाण्यावर घोंगावू लागली असतील. पाणतळीचं शेवाळ अजूनही हिरवं गारच असेल. मैदानावरची गवतं वाळून गेली असतील. पक्षी आता काटक्‍या शोधू लागले असतील. वसंत आताशा सुरू होतो आहे. अजून झाडांना फुलं लागायची आहेत. काहींना कळ्या धरल्या आहेत. पण पक्षी आत्तापासूनच घिरट्या घालू लागले आहेत. नर मादी एकमेकांना खुणवू लागले आहेत. आता पळस फुलेल, पांगारा फुलेल, कडूनिंब फुलेल, करवंदांना फुलं लागतील, जांभळाला फुलोरा येईल, बहावा पिवळा जर्द फुलेल. अंजनाच्या जांभळ्या फुलांनी हिरवाई की जांभळाई असा प्रश्न पडेल. मधमाश्‍या घोंगावू लागल्या आहेत. कळ्यांची फुलं व्हायची वाट पाहू लागल्या आहेत. त्यांना त्यांची पोळी मधानं भरायची आहेत. अस्वलं त्याचीच वाट पाहत वेळ काढतायत. लिंबोण्या, जांभळं, करवंदं, आंबे... फळांचा नुसता खच पडेल. वानरं सुखावतील, सांबरं, भेकरं, गवे यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. उदमांजरं, जावडीमांजरं, साळिंदरं नवीन बीळं उकरू लागतील. येणार, येणार, वसंत येणार... फळाफुलांनी जंगलं भरून जाणार!

पुरेसं पाणी, मुबलक फळंफुलं. आता मीलन, प्रजोत्पत्ती आणि त्याचं संगोपन! सगळं जंगल आनंदात आहे....! आणि इतक्‍यात बातमी आली, दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या...... येणार येणार पर्यटकांचा लोंढा येणार... जंगलाची शांतता, एकांत, स्वच्छता... काय होणार त्याचं?

सगळ्यात आधी पाणवठे घाबरले! इतर सगळे जीव फक्त गरजेपुरतंच पाणी वापरायचे. फक्त प्यायला! आता माणूस येणार, त्याला खूप पाणी लागतं.... प्यायला पाणी, धुवायला पाणी, शिजवायला पाणी, खेळायला पाणी, नासवायला पाणी... तो पाण्यात खेळणार, काहीही बुचकळणार, पाणवठ्यात काहीही फेकणार.. भांडी विसळणार, चुळा भरणार... मग त्या पाण्यातल्या जीवाचं काय? खरं तर या पाण्यावर पहिला हक्क त्यांचा! त्यांनी कुठं जायचं? पाण्यावर येण्याऱ्या पक्ष्यांनी कुठे जायचं? सगळ्या बाजूनं माणसंच राहायला असतील तर जंगलातल्या प्राण्यांनी पाणी कुठं प्यायचं? स्वच्छ, नीतळ पाणवठा आता गढूळ होणार, खराब होणार... त्याला रात्रंदिवस माणसं चिकटणार.. त्याचे नेहमीचे सवंगडी त्याला भेटू शकणार नाहीत... एखाद्या बंदिवानासारखा पाणवठा आता माणसाच्या कैदेत रहाणार! पाणवठ्याला खूपच वाईट वाटू लागलं..... सुट्ट्या लागल्या... माणसं येणार.... पण तक्रार कुणापाशी करायची?

पायवाटांनाही दाटून आलं.. आत्ता पर्यंत पायवाटांवरून प्राणी जायचे, त्यांच्या खुरांच्या, पंज्यांच्या ठश्‍यांनी वाट सजायची.. सांबरांची, भेकारांची लेंडकं जागोजाग दिसायची...फळांनी, बियांनी वाटा सजून जायच्या... आता वाटांवर बुटांचे ठसे दिसतील, फळं, बिया, चिरडल्या जातील, प्राण्यांच्या पाउलखुणा पुसल्या जातील, लेंड्या चिरडल्या जातील, मुंगळ्यांची रांग वाटेवरून जात असेल तर ती चिरडून सपाट होईल. वाटेवर आडवी बांधलेली कोळ्यांची जाळी तटातट तुटतील, वाटेवर प्लास्टिक, चांद्या, सिगारेटी, त्यांची पाकीटे, बिसलरीच्या बाटल्या यांचा खच पडेल... जंगलातली जिवंत पायवाट एखाद्या कलेवरासारखी दिसू लागेल. पायवाटांना खूपच वाईट वाटू लागलं....... पण तक्रार कुणापाशी करायची?

झाडंही हेलावली. आत्तापर्यंत त्यांच्या अंगाखांद्यावर वानरं खेळत असायची, शेकरं उड्या मारत असायची, पक्षी उतरायचे, घरटी करायचे, अस्वलं झाडं येंगायची, वाघळं लटकायची, सरडे फिरायचे, मुंगळे रांगा लावायचे... आता माणसं येतील, झाडांवर चढतील, फुलं तोडतील, फळं तोडतील, फांद्या ओरबाडतील, काटक्‍या तोडतील, त्याच्या शेकोट्या करतील.... झाडांना जे, पक्ष्या - प्राण्यांना द्यायचं होतं ते माणूस खाऊन जाईल... त्याचा विध्वंस करेल.... सुट्ट्या लागल्या, कसं आवरणार या माणसाला? झाडं हिरमुसून गेली.. पण तक्रार कुणापाशी करायची?

दिवसभर पक्षी पाणवठ्याच्या चकरा मारायचे. धोबी यायचे, हळदे यायचे, स्वर्गीय नर्तक यायचे, होले यायचे, सातभाई यायचे, वंचक, सुतार, गरूड, शृंगी घुबडं, खाटिक, खंड्या, बंड्या, कितीतरी पक्षी दिवसरात्र पाण्यावर यायचे. त्यातले काही पाणवठ्यापाशीच राहायचे! आजूबाजूच्या कपारीत, फांद्यांमध्ये त्यांनी घरटी केली होती. काहींनी जोडीदार शोधले होते. दोघं मिळून घरट्यासाठी काड्या काटक्‍या गोळा करत होते. जंगलाच्या शांततेत आता पर्यंत फक्त त्यांचेच नाजूक स्वर तरंग उठवत होते. वसंताच्या आगमनानं पक्षीगण आनंदला होता, मोहोरला होता. इतक्‍यात बातमी जंगलात पसरली.... सुट्ट्या लागल्या... माणसांची झुंड निसर्गात घुसणार... आरडाओरडी होणार, जंगलात धूर पसरणार... माणूस पाणवठे काबीज करणार.... त्यात घाण करणार, पाणी नासवून टाकणार... आता पाणी कुठे प्यायचं? खंड्यानं कुठल्या पाण्यात बुचकळ्या मारायच्या.... मासे कसे धरायचे? वंचकानं कुठल्या पाणवठ्यात ध्यान लावायचं? पाण्यावरचे किडे धोब्यानं कुठे शोधायचे? दोन महिने तरी आता पाणी माणसाच्या ताब्यात रहाणार! अवघा पक्षीगण चिंतेत बुडाला..... पण तक्रार कुणापाशी करायची? साकडं कुणाला घालायचं?

ओढे आत्ताच आटलेत. आता पाणवठेही कमी कमी व्हायला लागतील. तसंही दिवसभर पाण्यावर जाताच येत नाही. जीवाची भीती असते प्राण्यांना! अंधार पडता पडता पाण्यावर यावं लागतं. रात्रभरात मधून मधून पाण्यावर जाता येतं, पण अंधार असेपर्यंतच! सूर्य बुडाला, थोडं कडूसं पडलं, की आळीपाळीनं प्राणी पाण्यावर जायचे. एकमेकांना टाळून जायचे. दिवसभराचा तहानलेला घसा पाण्यानं ओला करून घ्यायचे. पोट भरून पाणी प्यायचे. पुन्हा पाणी कधी मिळेल सांगता यायचं नाही. पण पाणी पिण्यासाठी पाणवठा त्यांची हक्काची जागा होती. तिथे शांतता होती, समाधान होतं!..... आणि त्यांच्याही कानावर ती बातमी आदळली..... सुट्ट्या लागल्या.. माणसांच्या झुंडी जंगलात घुसणार... पाणवठ्यांच्या बाजूनं मुक्काम करणार... रोज नवनवीन झुंडी....! रात्रभर शेकोट्या करणार, गाणी गाणार, नाचणार, आरडाओरड करणार, धिंगाणा करणार... नीरव शांततेच्या पाठीवर चाकूनं ओढल्यासारखे चरे ओढणार...दिवसभर जंगल तापणार, तहानतहान होणार. दिवसा तर पाण्यावर जाणं शक्‍यच नसतं, पण आता रात्री सुद्धा पाण्यावर कसं जायचं? तसाच धीर धरून कसाबसा पाण्यापाशी पोहोचलो आणि कुण्या माणसानं पाहिलं तर? आरडाओरडी होणार, लोक त्या प्राण्याच्या मागे पळणार, त्याचे फोटो का काय ते काढण्यासाठी धावपळ होणार... कदाचित काही लोक त्या प्राण्याला मारायलाही सरसावतील. जीव मुठीत धरून त्या प्राण्याला पळावं लागेल... मग तहानलेल्या त्या जीवाचं काय होणार? त्याला पुन्हा पाणी कधी मिळणार?.... नेमेके हे उन्हाळ्याचे अवघड दिवस, आणि त्यातून हा जंगलात घुसणारा माणसांचा लोंढा... काय करावं? कुणाला सांगावं? सगळं प्राणी कुळ चिंतेत पडलं.... सुट्ट्या लागल्या... सुट्ट्या लागल्या...! ओढ्यांचं धाबंच दणाणलं!.... पण तक्रार कुणापाशी करायची?

जंगलाला धडकी भरली आहे.... आता सुट्ट्या लागल्या आहेत .....!

Web Title: article regarding wildlife