वन्यजीवन म्हणजे मर्यादेबाहेरचं एकटेपण

wildebeest
wildebeest

तुम्ही, आम्ही सगळेच शहरी किंवा ग्रामस्थ जीव. आम्हाला राहायला किमान एक घर असतं. घरात सगळ्या सोई असतात. पलंग, गाद्या, पांघरूण, उश्‍या, खुर्च्या, टेबलं, वीज, दिवे, पंखे, नळ, आणि अनेक सुखसोई! कपडे, अन्नधान्य, औषधं, तयार खाणे वगैरे.. अन्न, वस्त्र, निवारा या सदरात मोडणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजारात मिळतात. आजारी पडलं तर दवाखाने, हॉस्पिटल्स, डॉक्‍टर्स आणि औषधं उपलब्ध असतात. कुटुंब असतं, बिरादरी असते, देश असतो, त्याची घटना असते, कायदा असतो, अधिकार असतात, बुद्धिमत्ता असते, तंत्रज्ञान असतं, यंत्रं असतात आणि माणसाच्या प्रदीर्घ परंपरेतून हस्तांतरित झालेलं ज्ञान असतं ... या सगळ्यासकट आपण म्हणजे "आपण' असतो. आपला राग, लोभ, द्वेष, स्वार्थ, अभिमान, दंभ अतिशय तीव्र असतो. आपण याच वातावरणात जन्मलो, वाढलो असल्यानं आपण इतर जीवांकडेही याच नजरेतून पाहतो. तेही असेच जगत असतील असं आपण नकळत मानून चालतो.

परंतु अर्थातच एक माणूस सोडला, तर इतर सगळे जीव यापेक्षा टोकाचे वेगळे आहेत. वर सांगितलेल्या पैकी एकही गोष्ट त्यांच्याकडे नाही. कुठलाच आधार नाही. काहींना अगदी जन्मापासून, तर काहींना विशिष्ट वयानंतर आई वडिलांचाही आधार नसतो. असंख्य किडे, कासवं, साप यांनी तर जन्मापासून आईवडील पाहिलेलेच नसतात. त्यांच्यात थोडंफार बालसंगोपन आहे. मात्र तेही विशिष्ट वयानंतर आईवडिलांना सोडून जातात, किंवा आईवडील त्यांना सोडून जातात, पुन्हा कधीही न भेटण्यासाठीच! यानंतर आईवडील त्यांना कधीच दिसत नाहीत किंवा दिसले तर ओळखू येत नाहीत, किंवा ओळखू आले तरी ओळख दिली जात नाही. काहीचं यानंतर आणि काहीचं जन्मापासूनच एकटेपणानं जीवनाशी युद्ध सुरु होतं. या युद्धात कोणाचीच शारीरिक साथ नसते की मानसिक आधार नसतो. एकटेपणा हा बहुतेक प्राण्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्याला एकटेपणाची खूप भीती असते. हा एकटेपणा घालवण्यासाठी आपण काय काय करतो... पण इथे तर संपूर्ण जीवन एकट्यानंच काढायचं असतं!

कळपानं राहणारे प्राणी एकत्र राहतात, पण चितळांच्या कळपावर एखाद्या वाघानं, किंवा आफ्रिकेत एखाद्या वाईल्डबीस्टच्या हजारोंच्या कळपावर सिंहांनी हल्ला केला तर सगळेच पळत सुटतात. सापडणारा एकटाच शिकार होतो. वाईल्डबीस्टचा सगळा कळप सिंहांवर धावून गेला, तर सगळे सिंह चिरडून मारतील. पण असं होत नाही. मरणारा एकटाच मरतो. म्हणजे इतक्‍या लाखोंच्या कळपात मरणाऱ्याला वाचवणारं कुणीच नसतं. वाईल्डबीस्टचा कळप हजारो मैलांचं स्थलांतर करतो. कळप निघाला की प्रत्येकाला निघावंच लागतं. आजारी आहे, जखमी झाला आहे, मूड नाही, दुसरीकडे जावंसं वाटतंय, काहीही कारण चालत नाही. या कुठल्याही कारणानं मागे पडला, किंवा दिशा चुकला, तर शिकारी टपलेलेच असतात. इतक्‍या मोठ्या कळपातही जीव एकटाच असतो. सुखदुखः, दुखलंखुपलं सगळं स्वतःचं स्वतःलाच बघायचं असतं.

कुठलीही मादी जेंव्हा पिल्लांना जन्म देते तेंव्हा तर एकटेपणाची कमाल असते. त्यात ती पहिलटकरीण असेल तेंव्हा तर आपण विचारच केलेला बरा. पहिलीच वेळ असते. काहीच अनुभव नसतो. सांगणारंही कोणी नसतं. मदत कुणाची नाही. त्यात नवजात पिल्लांवर शिकारी टपलेलेच असतात. अनेकदा पिल्लाला जन्म देता देताच शिकारी पळवून नेवून आई समोर पिल्लाचा फडशा पाडतात. घरट्यात शिरलेले साप पक्ष्यांसमोरच पिल्लांना मटकावतात. आई बाप ओरडण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. हे झालं एकेकट्यानं जगणाऱ्यांचं. कळपात राहणाऱ्या प्राण्याचंसुद्धा फारसं वेगळं नसतं. पिल्लं देण्यासाठी मादीला कळपाबाहेर एखादं एकांत ठिकाणच शोधावं लागतं. तिथं ती एकटीच असते. आपण आपली प्रत्येक गोष्ट कुणाला ना कुणाला तरी सांगतो. इथं भाषाच नाही. संभाषण नाही. असेलच तर अत्यंत मर्यादित संवाद! मर्यादेबाहेरचं एकटेपण हा वन्यजीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे!

बाल संगोपन सगळ्यांच्याच नशिबात असतं असं नाही. सगळ्यांनाच आई बाबा लाभतात असं नाही. बहुतेकसे किडे, सरपटणारे प्राणी, यांना आईबाप कधीच दिसत नाहीत. डोळे उघडल्यापासून प्रत्येक गोष्ट स्वत:ची स्वत:लाच करायची असते. हे जग काय आहे? यात राहायचं कुठं? काय खायचं? त्यांचं त्यांनाच ठरवावं लागतं. नातेवाईक, मित्र वगैरे संकल्पनाच नाहीत. पण शत्रू कोण? हे उपजतच समजावं लागतं! खरं तर स्वत: सोडून सगळेच शत्रू असू शकतात. आपण जन्माला आल्या पासून सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. हे कर, ते करू नकोस, हे खा, ते खाण्याचं नाही, याच्यापासून सावध, हा आपला, तो परका, यात धोका असतो, ते सुरक्षित असतं, असं वाग, तसं वागू नकोस. विचार करून बघा, प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवली जाते. हे सांगणारं, शिकवणारं कुणीच नसतं, तर आपण कसे झालो असतो? डोळे उघडल्यापासून आपल्याला मारायला अनेकजण टपलेले असते तर? कुठे राहायचं? कसं जगायचं? प्रत्येक गोष्ट जन्मापासून आपल्यालाच ठरवायची असती तर, आपण आज आहोत तसे असू शकलो असतो का?

आपण जन्माला आल्यापासून जितकी वर्षं जगलो असू, त्यातला प्रत्येक दिवस आपण साताठ तास बिनघोर झोपलो आहोत. झोपेत आपल्याला कुणीतरी मारेल किंवा आपला खून करेल असं आपल्याला कधीच वाटलं नाही. ज्यांना असं वाटलं, ते झोपू शकले का ते विचारा. किंवा आपण दिवसभर सर्वत्र वावरत असतो. चालत असतो, फिरत असतो, गप्पा मारत असतो, काम करत असतो, सिनेमा पाहत असतो, गाणी गात असतो. आशा वेळी कुणीतरी आपल्यावर दबा धरून बसलंय, कुणीतरी आपल्या जीवावर टपलंय, कुणीतरी सतत नजर ठेवून आहे, असं आपल्याला कधीच वाटत नाही. म्हणून आपण सुखात जगात असतो. आपल्याच नादात जगत असतो. पण ज्यांचा जीव घ्यायला कुणीतरी टपलंय, त्यांना एकदा विचारा. जागणं कसं मुष्कील होऊन जातं!

प्राणी असेच जगतात. जन्मापासून मरणापर्यंत! सतत एका अदृश्‍य भीतीच्या छायेत. आपण आपलं आयुष्य सत्तर ते शंभर वर्षापर्यंत सहज सांगू शकतो. तसं "प्लॅनिंग' वगैरे करतो. म्हातारपणाची वगैरे काळजी म्हणून त्याची तजवीज तारुण्यातच करून ठेवतो. कारण तेवढी सुरक्षितता आपल्याला असते. प्राण्यांना कधीच पुढच्या क्षणाची खात्री नसते. कुठल्या पावलावर धोका आहे ते माहीत नसतं. कुठल्या वळणावर कोण दबा धरून बसलेला असेल ते नाही सांगता येत. आणि या अनिश्‍चिततेची जाणीव त्यांना सतत असते.

आपल्या जीवनाचा विचार करून बघा, आपल्या आसपास असलेल्या किंवा आपण वापरत असलेल्या, रोजच्या स्वयंपाकाशिवाय किती गोष्टी आपण स्वत: बनवतो किंवा मिळवतो? भाजी शेतकरी पिकवतो, आपण फक्त शिजवतो. घर गवंडी बांधतो, आपण फक्त राहतो. कपडे शिंपी शिवतो, आपण फक्त घालतो. फर्निचर सुतार बनवतो, आपण फक्त वापरतो. गाड्या कुणीतरी तंत्रज्ञ डिझाईन करतो, कुणीतरी गडी बनवतो, आपण ती फक्त चालवतो. पेट्रोल कुठेतरी काढलं जातं, आपण त्यावर गाड्या फिरवतो. वीज कुठेतरी निर्माण होते, आपलं सगळंच त्यावर चालतं. औषधं कुणीतरी तयार करतं, कुठला तरी डॉक्‍टर आपल्याला लिहून देतो, आपण ती घेतो, बरे होतो. फारच काही झालं तर तज्ञ डॉक्‍टर्स असतात, हॉस्पिटल्स, नर्सेस, ऑपरेशन्स असतात. शक्‍य ते सगळं असतं. आपल्याला काहीच करावं लागत नाही. विचार करून बघा, आपण आपल्या जीवनाला लागणारं फारसं काहीच स्वत: करत नाही, फक्त वापरतो!

यातली कुठलीच गोष्ट आपल्यापाशी नसेल तर? प्रत्येक गोष्ट आपल्याला शून्यातून निर्माण करावी लागली तर? उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक गोष्ट आपली आपल्यालाच करावी लागली असती तर? आपण सततच भीतीच्या दडपणाखाली असतो, आपल्याला कधीच पुढच्या क्षणाची खात्री नसती तर? आपलं जीवन कसं असतं?

प्राणी असेच जगतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com