मातीचं नातं (अरविंद जगताप)

arvind jagtap
arvind jagtap

किल्ल्यांवर स्वच्छता करणारे तरुण दिसले, ट्रॅफिक जॅममध्ये स्वत:हून मदतीला धावणारे लोक पाहिले; आरोग्य, पाणी, शेतकरी यांच्यासाठी झटणारे लोक पाहिले, पूर किंवा वादळात लोकांचा मदतीचा ओघ बघितला, की अशाच लोकांच्या भरवशावर इंग्रज देश सोडून गेले असावेत असं वाटतं. इंग्रजांनी काढता पाय घेतला तेव्हा उद्योग, शिक्षण, आरोग्य असे अनेक प्रश्न होते; पण या प्रत्येक क्षेत्रात देशानं प्रगती केली. एके काळी देवीचा कोप होईल म्हणून प्लेगची लस टोचून घ्यायला नकार देणारा आपला देश जवळपास पोलिओमुक्त झाला. अजून खूप सुधारणा बाकी आहेत. कर्ज करून परदेशात जाणारे काही असले, तरी परदेशातल्या कंपन्या विकत घेणारेही आहेत.

भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य देणार, असं इंग्रजांनी जाहीर केलं, तेव्हा अनेक धक्के बसले होते. काही लोकांनी म्हणे तो दिवस थोडा मागं-पुढं करण्याची मागणी केली. अनेक संस्थानिकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. एखादी संघटना म्हणायची, की हे स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही. एखाद्या संघटनेला देशाचा झेंडा मान्य नव्हता, तर एखाद्या संघटनेला आपण या देशाचा भागच नाही, असं वाटत होतं. हे सगळं तेव्हा जाहीरपणे चालू होतं. आजही कमी अधिक प्रमाणात चालू असतं. मग प्रश्न पडतो, की आपल्याला स्वातंत्र्याचं खरंच किती महत्त्व आहे?
स्वातंत्र्य मिळालं आणि आपण क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक यांनी दिलेलं बलिदान 15 ऑगस्टपुरतं ठेवलं. फार नेमकं सांगायचं, तर एखाद्या गाण्यावर ती जवाबदारी ढकलून दिली. "जरा आंखमें भरलो पानी' ऐकायचं. क्षणभर भावूक व्हायचं आणि विसरून जायचं. स्वातंत्र्याची सत्तरी उलटली, तरी झेंडे रस्त्यावर टाकू नका हे सांगायची वेळ येते. हा झेंडा जमिनीवर पडू नये म्हणून लोकांनी गोळ्या झेलल्या. सरकारी कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्टला उपस्थित राहण्यासाठी सक्ती करावी लागते. जणू काही दुसऱ्याच कुणाच्या देशाच्या झेंड्याला मानवंदना द्यायचीय. पंधरा ऑगस्टला लागून सुट्टी असली पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते- म्हणजे पिकनिकला जाता येईल. पिकनिकला जाऊ नये हा मुद्दा नाही; पण कुठल्या पिकनिक स्पॉटला देशभक्ती दिसते? तिथं झेंडा फडकवणं ही देशभक्ती नाहीच अर्थात. तिथं असलेली स्वच्छता, शिस्त ही देशभक्ती. याबाबतीत आपण स्वातंत्र्याचा "स्वैराचार' असा अर्थ घेतलाय. खरं तर आपल्याला पहिल्यांदा स्वातंत्र्याचा अर्थ कळला तो आणीबाणीत. अचानक किती तरी हक्कांवर गदा आली. सगळे खडबडून जागे होतील असं वाटलं होतं; पण आज आणीबाणीचे किस्से सांगताना लोक काय सांगतात? सक्तीनं नसबंदी केली गेली. म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा कुटुंबनियोजनाचा त्रास जास्त. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं याचं दुःख फार काळ राहिलं नाही. आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधी यांना लोकांनी पुन्हा निवडून दिलं. काय कारण असेल? एक तर बहुतांश लोकांना व्यक्तिस्वातंत्र्याची गरज वाटत नाही. सातत्यानं कुठल्या ना कुठल्या पक्षाची किंवा व्यक्तीची विचारसरणीच जगात सगळ्यात थोर आहे, असं समजून चालणारे लोक खूप आहेत. आपला आवडता नेता भ्रष्टाचारी आहे हे कळल्यावरही जनतेला फारसा फरक पडत नाही. गुन्हेगारसुद्धा तुरुंगातून निवडून येतात. गुन्हेगार तुरुंगात असल्यावरही जनता पारतंत्र्यात असल्यासारखी मतदान करत असेल, तर आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय हे कळलेलं नाही.
स्वातंत्र्य म्हणजे आपली राज्यघटना माहीत असणं. आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीवच नसेल, तर स्वातंत्र्याचं महत्त्व कळणार नाही. ज्या दिवशी 15 ऑगस्टएवढंच 26 जानेवारीचं महत्त्व वाटू लागेल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं "प्रजासत्ताक' असू. आपण हॉर्न वाजवून वाजवून समोरच्याला वैतागून टाकणं हे स्वातंत्र्य नाही. आपल्या सगळ्यांचा शांततेत जगण्यातला आनंद महत्त्वाचा आहे. प्रत्येक मिरवणुकीत सगळेच ढोल वाजवणारे असावेत असं नाही. काही लोक ऐकणारेही हवेत. रेल्वे रुळ ओलांडणं, सिग्नल तोडणं, वाटेल तिथे गाड्या पार्क करणं म्हणजे "स्वातंत्र्य' असं काही लोकांना वाटतं. काही लोक किल्ल्याच्या भिंतीवर स्वत:चं आणि प्रेयसीचं नाव लिहितात. जणू काही सासऱ्यानं किल्ला हुंड्यात दिलाय. बसच्या सीटवर, स्वच्छतागृहांत, झाडांवर, नोटांवर लिहिलेलं बघून साक्षरतेचाच वैताग येतो. भर रस्त्यावर फक्त हात दाखवून रस्ता ओलांडणारे लोक बघितले, की पुन्हा संस्थानिकांचं राज्य आल्यासारखं वाटतं....पण सगळंच चित्र एवढं निराश करणारं नाही.

किल्ल्यांवर स्वच्छता करणारे तरुण दिसले, ट्रॅफिक जॅममध्ये स्वत:हून मदतीला धावणारे लोक पाहिले; आरोग्य, पाणी, शेतकरी यांच्यासाठी झटणारे लोक पाहिले, पूर किंवा वादळात लोकांचा मदतीचा ओघ बघितला, की वाटतं अशाच लोकांच्या भरवशावर इंग्रज देश सोडून गेले. नाही तर भारतीय लोक देश चालवू शकणार नाहीत, असं चर्चिल यांच्यासारख्या कितीतरी लोकांचं मत होतं. महायुद्धानं कंबरडं मोडलेल्या इंग्रजांनी काढता पाय घेतला तेव्हा उद्योग, शिक्षण, आरोग्य असे अनेक प्रश्न होते; पण या प्रत्येक क्षेत्रात देशानं प्रगती केली. एके काळी देवीचा कोप होईल म्हणून प्लेगची लस टोचून घ्यायला नकार देणारा आपला देश जवळपास पोलिओमुक्त झाला. अजून खूप सुधारणा बाकी आहेत. कर्ज करून परदेशात जाणारे काही असले, तरी परदेशातल्या कंपन्या विकत घेणारे पण आहेत. विचारधारांचे वाद होतील, राजकीय भांडणं होतील. अस्वस्थ वाटेल; पण हा देश कधी असुरक्षित वाटत नाही.
अनेक भारतीय आपल्या प्रत्येक चुकीचं खापर देशावर फोडतात. ऑफीसला जायला उशीर झाला, तरी या देशाच्या लोकसंख्येपासून कारणं सांगतात. बॅंकॉकपलीकडं जग न पाहिलेली माणसं या देशाची विमानंसुद्धा स्लो चालतात असं सांगतात. खेळात पदक मिळालं नाही, किंवा मुलाला कमी मार्क मिळाले, तरी देशाला नावं ठेवतात. जो एका झटक्‍यात बारावीत पास होत नाही, तोसुद्धा या देशाचं काही खरं नाही म्हणतो....पण इतकं सगळं असलं, तरी तोच देश सकारात्मकतेचेही मळे फुलवतो लोकांच्या मनात. छोट्या गोष्टींतूनसुद्धा देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे किती तरी आहेतच की! आनंदाची गोष्ट ही आहे की तरीही हा देश पंधरा ऑगस्टला वेगळाच वाटतो. अंगावर शहारे येतात "मेरे देशकी धरती' ऐकून. छाती फुलून येते तिरंगा बघून. सोशल मिडीयावर आलेला देशभक्तीचा पूर बघून अभिमान वाटतो. मात्र, व्हॉट्‌सऍपवर आपापल्या जातींच्या ग्रुपमध्ये असलेल्या पोस्ट वाचल्यावर भीती वाटते, की आपली आणखी एक फाळणी जवळ आलीय की काय? आधीची फाळणी धर्मामुळं झाली होती; आता जातीमुळं होईल का, अशी चिंता वाटते... पण स्वातंत्र्य या मातीला मिळालंय. जातीला नाही. शेकडो वर्षांपूर्वी माती होती. जात नाही. या मातीला आपण "माता' म्हणतो. आपलं नातं एवढं सरळ आहे. वर्षभर वेगवेगळे झेंडे बघत असतो आपण; पण पंधरा ऑगस्टला सगळीकडे फक्त तिरंगा बघून समाधान वाटतं. या झेंड्यातच आपल्याला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. बाकी आपल्यात कॉमन आवड काय आहे? ना नेता, ना रंग, ना खेळाडू, ना खाण्यापिण्याच्या सवयी! एवढ्या वैविध्यपूर्ण देशात एक फक्त तिरंगा आहे- जो प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे. या अर्थानं जगातला सगळ्यात ताकदीचा राष्ट्रध्वज.
जय हिंद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com