मोदींना 'मास' नकोय, 'क्‍लास'च हवाय !

Narendra Modi
Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मंत्रिमंडळाचा तिस-यांदा विस्‍तार झाला. बाकी कोणत्‍या गोष्‍टीत नसलं तरी विस्‍तारात मात्र तीन वर्षापासून सातत्‍य दिसतंय. तिसरा विस्‍तार फक्‍त भाजपच्‍याच नेत्‍यांना सामावून घेण्‍यासाठी होता. भले केंद्रात एनडीएचं सरकार असलं तरी ! मंत्रिमंडळात ज्‍यांना मास अपील आहे, अशी माणसं हाताच्‍या बोटावर मोजण्‍याइतकीच आहेत. त्‍यामुळं मोदींना मास नकोय, क्‍लास हवाय, असं म्‍हणायला खूप संधी आहे. पण मंत्रिमंडळातला हा 'क्‍लास'  मोदींच्‍या मनातला 'न्‍यू इंडिया' उभारण्‍यात कितपत उपयुक्‍त ठरणार, याबद्दल माझ्यासारख्‍यांना नक्‍कीच शंका आहे. कारण फक्‍त बोर्डरुममधे बसून ग्रास रुट कनेक्‍ट करता येत नाही, हे वास्‍तव कोणालाच नाकारता येणार नाही. त्‍यामुळं ग्रासरुटपासून कोसो दूर असलेल्‍यांच्‍या हातात विविध मंत्रालयांची जबाबदारी सोपवून मोदींनी त्‍या त्‍या मंत्रालयाला मंत्री नव्‍हे, तर सीईओ नियुक्‍त केलाय, असंच वाटतंय. 

माझा मंत्री 'पॅसिव्‍ह'च असावा, हीच मोदींची भावना ? 
मोदींनी स्‍वच्‍छ भारत अभियानापासून न्‍यू इंडियापर्यंत अनेक महत्‍वाकांक्षी घोषणा केल्‍या. त्‍या त्‍या वेळी त्‍यांना वेगवेगळ्या माध्‍यमातून जोरदार प्रसिद्धीही दिली गेली आणि अजूनही दिली जातेय. यातल्‍या काही घोषणा फक्‍त जाहिरातींमधेच दिसत आहेत. प्रत्‍यक्षात कसलीच प्रगती दिसत नाही. स्‍वच्‍छ भारत अभियानाचं उदाहरण यासाठी देता येईल. अर्थात स्‍वच्‍छ भारताची जबाबदारी ही काही केवळ सरकारची किंवा सरकारी यंत्रणांचीच आहे, असं नाही. ती तुमच्‍या माझ्यासारख्‍या प्रत्‍येकाची आहे. त्‍यामुळंच सुरवातीला लोकसहभागाचा महापूर पाहायलाही मिळाला. पण तो केवळ फोटोपुरताच, हे आता स्‍पष्‍ट झालंय. त्‍यामुळं प्रत्‍येक वेळी नवी घोषणा करण्‍याशिवाय दुसरं काहीच होताना दिसत नाही. त्‍यामुळं मोदी सरकारच्‍या घोषणा त्‍या त्‍या वेळी जनमानसाला भुरळ पाडतात आणि नंतर त्‍यातला फोलपणा दिसायला लागतो, ही वस्‍तुस्थिती आहे. ही वस्‍तुस्थिती बदलायची असेल, तर मंत्रिमंडळात 'मास' लीडरच हवेत, 'बोर्डरुम' लीड करणारे नकोत, हे नक्‍की. बोर्डरुम लीड करण्‍यासाठी आपल्‍याकडं नोकरशाही आहे. फक्‍त त्‍यांना 'अॅक्टिव्‍ह' मोडमध्‍ये आणणारा लीडर हवा असतो. त्‍यांचं नेतृत्‍व करणाराही त्‍यांच्‍याच जातकुळीतला म्‍हणजे बोर्डरुमपुरताच लीडर असेल, तर परिस्थितीत फारसा फरक पडेल, असं म्‍हणणं धाडसाचंच ठरणार आहे. 

विसंगतीवर बोट ठेवलं तरच बदल होणार, हेच नाकारण्‍याचा प्रयत्‍न? 
राजकारण्‍यांची मानसिकता लोकांची बाजू घेणारी असते, तर नोकरशाही प्रशासनाच्‍या बाजूची असते. ती असायलाही हवी. पण नोकरशाही आणि तिला लीड करण्‍याची जबाबदारी असलेला मंत्रीही त्‍याच पठडीतला असेल, तर विकासाची किंवा बदलांची गाडी पुढे निघेल, असं नक्‍कीच म्‍हणता येणार नाही. कारण प्रशासनात यशस्‍वी ठरलेला माणूस राजकारणातही तसंच यश संपादन करेल, असं ठासून सांगता येत नाही. कुठल्‍याही गोष्‍टीत बदल करायचा झाला, तर त्‍यातल्‍या त्रुटी, विसंगतींवर बोट ठेवलं गेलं पाहिजे. विसंगतींवर बोट ठेवण्‍याचं काम दोघंही एकाच नंबरच्‍या चष्‍म्‍यातून पाहणारे नसावेत. नोकरशाहीनं प्रशासनाच्‍या, अंमलबजावणीच्‍या चष्‍म्‍यातून आणि लोकप्रतिनिधींनी लोकांच्‍या चष्‍म्‍यातूनच पाहिलं पाहिजे. पण मोदी मंत्रिमंडळातल्‍या आजच्‍या नावांकडं पाहिलं तर प्रत्‍यंक वेळी आणि प्रत्‍येक ठिकाणी असं होईल, असं वाटत नाही.
 
या चेह-यांच्‍या जोरावर निवडणुका जिंकता येतील? 
या मंत्रिमंडळ विस्‍ताराकडं निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेला बदल असंही म्‍हटलं जातं. पण मला तरी तसं वाटत नाही. याचं कारण म्‍हणजे, मंत्रिमंडळात ज्‍या चेह-यांना स्‍थान दिलं गेलंय किंवा प्रमोशन दिलं गेलंय, ती मंडळी पाहता त्‍यांच्‍या चेह-यांवर त्‍या त्‍या राज्‍यातल्‍या जागा वाढवता येतील, असं नक्‍कीच नाही. कारण यातली बरीच मंडळी फक्‍त पत्रकार परिषदा घेऊ शकणारी किंवा विविध टीव्‍ही चॅनलच्‍या प्राइम टाइम डिबेटमध्‍ये भाजपची, संघ विचारधारेची बाजू वकिलांप्रमाणे जोरकसपणे मांडण्‍यापुरतीच पाहायला मिळालेली आहेत. यातला एखाद दुसरा मंत्री वगळता जाहीर सभा गाजवू शकेल, असं कोणी दिसत नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. त्‍यामुळं हा विस्‍तार निवडणुका जिंकण्‍यासाठी केला गेलाय, असं म्‍हणता येणार नाही. निवडणुका जिंकण्‍यासाठी बोर्डरुम मेम्‍बरपेक्षा ग्रासरुट मेम्‍बरच जास्‍त उपयुक्‍त ठरतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्‍यामुळंच मनमोहसिंगांसारखा बुद्धीवान माणूसही लोकांमधून निवडून येऊ शकत नसल्‍याचं पाहायला मिळतं. 

हा आत्‍मविश्‍वास की दंभ? 
भाजपनं 2019 च्‍या लोकसभा निवडणुकीत स्‍वबळावर 350 जागा मिळवण्‍याचं नियोजन केलंय, असं सांगण्‍यात येतंय. यात एनडीएतल्‍या घटक पक्षांच्‍या जागा मोजलेल्‍या नाहीत. त्‍यामुळं घटक पक्षांची नाटकं सहन न करण्‍याचा निरोप प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षपणे त्‍या त्‍या पक्षांपर्यंत पोहोचण्‍याचं काम या विस्‍तारानं नक्‍की केलंय. त्‍यासाठीच तिसरा विस्‍तार एनडीएच्‍या मंत्रिमंडळाचा नव्‍हे, तर भाजपच्‍याच मंत्रिमंडळाचा आहे, हे दाखवून देण्‍याचं काम मोदी-शहा यांनी केलंय. यात भाजपचा आत्‍मविश्‍वास आहे की आता आम्‍हाला कोणी रोखू शकणार नसल्‍याचा दंभ आहे, हे आताच ठरवता येणार नाही. पण एक मात्र नक्‍की आहे की, 2019 च्‍या निवडणुका 2014 प्रमाणे मोदींच्‍या 'लार्जर दॅन लाइफ' इमेजवर नाही, तर या पाच वर्षात केलेल्‍या कामांवरच जिंकता येणार आहे. त्‍यामुळं तर बोर्डरुमवर विश्‍वास टाकण्‍याचं धाडस मोदींनी केलं नसेल ना, असा प्रश्‍न उपस्थित होतोय. पण मोदींची ही 'बोर्डरुम' ग्रासरुटचा विचार कोणत्‍या चष्‍म्‍यातून करणार, यावर सगळं काही अवलंबून राहणार आहे.

'क्‍लास'ला 'मास' कळेल का? 
 या मंत्रिमंडळ विस्‍तारानं चर्चेला एक नवा विषय दिलाय, हे नक्‍की. त्‍यामुळंच 'क्‍लास' आणि 'मास'वर लिहिण्‍याचा मोह मलाही आवरता आलेला नाही. क्‍लास आणि मास यांचं योग्‍य मिश्रणच प्रगतीच्‍या वाटेवर धाऊ शकतं. पण मोदींचा यावर बहुधा विश्‍वास नसावा. त्‍यामुळंच त्‍यांनी 'मास'पेक्षा 'क्‍लास'ला अधिक प्राधान्‍य दिलंय. त्‍यांचा हा प्रयोग, हो प्रयोगच, त्‍यांच्‍या न्‍यू इंडिया, मेक इन इंडियासारख्‍या संकल्‍पांना उभारी देणारा आणि त्‍यासाठी 'क्‍लास'ला 'मास' कळण्‍यास मदत करणारा ठरावा, हीच अपेक्षा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com