नेमकं चित्र,मोजके शब्द (आश्‍विनी देशपांडे)

Ashvini deshpande writes about Book review
Ashvini deshpande writes about Book review

वाचक-प्रेक्षक-ग्राहकांपर्यंत नेमका संदेश परिणामकारकपणे पोचवायचा असेल तर डिझाइनमध्ये फापटपसारा असून चालत नाही. नेमकेपणा-नेटकेपणा असावा लागतो. Keep Calm and Carry On / We can do it / Obama HOPE ही कम्युनिकेशन-डिझाइनची तीन उदाहरणं यासंदर्भात पुरेशी बोलकी आहेत. कम्युनिकेशन डिझाइन केवढा मोठा परिणाम साधू शकतं, हे या तिन्ही पोस्टरमधून सिद्ध होतं.

एखादं तंत्रज्ञान जेव्हा मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, तेव्हा ते स्वस्त होत जातं आणि लोकप्रियही. फ्लेक्‍स प्रिंटिंग हे एक असंच उदाहरण. देशातल्या कानाकोपऱ्यात अशी एकही जागा सापडणार नाही, जिथं स्थानिक नेत्यांच्या सुहास्य वदनांनी भरलेले फलक नसतील. 
संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं माध्यम वापरून केलेलं ते कुरूप, विसंगत प्रदूषण पाहून माझ्यातली डिझायनर खिन्न तर होतेच; शिवाय काही प्रश्न सतत मनात येत राहतात. काय असतं या फलकाचं उद्दिष्ट? हे असे चेहऱ्याचे फोटो उभारून नेमकं काय साध्य होतं? हे फलक तयार करणारे डिझायनर, छायाचित्रकार आणि हे फ्लेक्‍स छापून ते लावणारे मुद्रक वा कंत्राटदार यांची कार्यपद्धती किंवा विचारप्रक्रिया कशी असेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, माध्यमाद्वारे संवाद निर्माण करण्याची जी संधी असते, ती ते अशी वाया का घालवतात? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं राज्यात वाहतंय; त्यामुळं आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळं हे फलक-प्रदूषण सध्या जरा कमी दिसतंय. ते परत सुरू होण्याआधी मला ‘कम्युनिकेशन डिझाइन किंवा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे नेमका संदेश पोचवण्याची खुबी’ यावर लिहावंसं वाटलं. 
वेचक माध्यमांद्वारे विशिष्ट समुदायाला नेमका संदेश पोचवणं किंवा हेतुपुरस्सर संवाद निर्माण करणं हे कम्युनिकेशन डिझाइनचं कौशल्य म्हणता येईल. चित्र, छायाचित्र, आकार, रंग, चिन्ह, खुणा, शब्द, तो लिहिण्याचा फाँट ही सगळी साधनं योग्य तेवढी योग्य त्या प्रकारे वापरून माहिती किंवा संदेश मांडला जातो. त्यामागं तो कुणासाठी आहे, याचा विचार तर असतोच; शिवाय त्या व्यक्ती किंवा समुदायाची मानसिकता, संस्कृती आणि सौंदर्याच्या कल्पना समजून घेऊन या संदेशाचं धोरण आखलं जातं.  प्रत्यक्ष डिझाइनबद्दल सांगायचं तर, त्याचे काही ठराविक उद्देश असतात. पहिला उद्देश म्हणजे, पाहणाऱ्याला आकर्षित करून उत्सुकता निर्माण करणं. एकदा पाहणारा (प्रेक्षक) त्यात गुंतला की पुढचा टप्पा म्हणजे, जो काही संदेश पोचवायचा आहे, तो प्रभावी पद्धतीनं मांडायचा; जेणेकरून प्रेक्षकानं अपेक्षित कृती करायला प्रवृत्त व्हावं. ही कृती म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्याची असेल किंवा एखादा विचार मुद्देसूदपणे आत्मसात करण्याचीही असू शकेल. मोठ्या प्रमाणावर मतबदल घडवण्यात कम्युनिकेशन डिझाइनचा उपयोग करण्यात येतो.
राजकारण, नेतेमंडळी आणि जनमानस असे विषय निघालेच आहेत, तर काही सुप्रसिद्ध सामाजिक विषयांवरच्या पोस्टरचा संदर्भ मी इथं घेऊ इच्छिते. ही अशी पोस्टर आहेत, की ज्यांनी इतिहास घडवायला किंवा त्याहीपुढं जाऊन असं म्हणता येईल, की इतिहास बदलायला, समाजात मतपरिवर्तन घडवून लोकांना कृतिशील व्हायला मदत केली. 
कदाचित ही पोस्टर तुम्ही पाहिलीही असतील. त्यांचा आजच्या काळातला अपभ्रंश किंवा ट्रोलही पाहिला असेल. आता या पोस्टरच्या निर्मितीमागचे संदर्भ आणि विचार समजून घेऊ या. 
***
ब्रिटिश लोक शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. Keep Calm and Carry On (शांत चित्तानं (काम) सुरू ठेवा) हे पोस्टर ब्रिटिश सरकारनं १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सज्जतेचा भाग म्हणून तयार केलं होतं.
जर्मनी ब्रिटनवर हल्ला करण्याची दाट शक्‍यता होती. तसं झालंच तर समाजाचं मानसिक धैर्य टिकून राहावं म्हणून तीन पोस्टरची मालिका तयार करण्यात आली होती. दुसरी दोन्ही पोस्टर ही प्रत्यक्ष शौर्य, विजय आणि स्वातंत्र्याबाबत होती. ती थोड्या प्रमाणात वापरण्यात आली. मात्र, या तिसऱ्या पोस्टरच्या २५ लाख प्रती छापूनही ते पोस्टर केवळ सुरक्षित जागी जपून ठेवण्यात आलं होतं. याबाबतची योजना अशी होती, की गंभीर हवाई हल्ले झाले, तरच ते पोस्टर प्रकाशित करायचं. मात्र, तसं काही न झाल्यामुळं सन १९४० मध्ये जवळजवळ सगळ्या प्रतींचा चक्क लगदा करण्यात आला. 


ब्रिटनच्या माहिती मंत्रालयातल्या वॉटरफील्ड नावाच्या अधिकाऱ्यानं या पोस्टरचा मजकूर लिहिला होता. ब्रिटिश साम्राज्याचा मुकुट या मजकुराबरोबर चिन्ह म्हणून वापरण्यात आला होता. मात्र, डिझायनरचं नाव कोणत्याही नोंदीत सापडत नाही. तब्बल ६० वर्षांनी, सन २००० मध्ये एका पुस्तकविक्रेत्याला जुन्या खोक्‍यांमध्ये या पोस्टरच्या काही प्रती सापडल्या. त्यानंतर त्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात येऊन काही आणखी प्रती धूळ झटकत बाहेर निघाल्या! गंमत म्हणजे, या पोस्टरची लोकप्रियता जगभर पसरली आणि आता तर एका ॲपमध्ये तुमचे शब्द घालून अगदी तसंच पोस्टर तुम्हीही बनवू शकता. ७५ वर्षं उलटून गेली तरीही हे पोस्टर आणि त्यावरचा संदेश जगभरातल्या अस्थिर वातावरणात आजही उपयुक्त आहे. 
***
We can do it म्हणजेच ‘आपण (हे) करू शकतो’ हे पोस्टरसुद्धा दुसऱ्या महायुद्धाच्या काळातलंच आहे. सन १९४३ मध्ये हॉवर्ड मिलरनं वेस्टिंग हाउस इलेक्‍ट्रिक या अमेरिकी कंपनीसाठी ४० च्या वर पोस्टर तयार केली. वरकरणी हे पोस्टर स्त्रियांचे सामान हक्क मांडणारं किंवा स्त्रियाही किती खंबीरपणे कुठल्याही गोष्टीला सामोऱ्या जाऊ शकतात हे दाखवणारं आहे, असंच वाटतं; पण असा कुठलाही थोर विचार मांडण्याचा प्रयत्न त्या वेळी तरी नव्हता. युद्धाच्या काळात अथक्‌ उत्पादन सुरू राहावं आणि त्यासाठी कामगारांना प्रेरित करावं, या साध्या उद्देशानं कारखान्यात ठिकठिकाणी लावण्यासाठी ४० हून अधिक पोस्टर तयार केली गेली होती. बहुतेक पोस्टरवर पुरुष कामगार अथवा पर्यवेक्षक दाखवले गेले होते. मात्र, या कारखान्यात अनेक महिला कामगारही कार्यरत होत्या. त्यातल्याच एका महिलेच्या छायाचित्रावरून हे पोस्टर तयार करण्यात आलं होतं, असं म्हणतात. डिझायनरनं अतिशय नेमकेपणानं लाल आणि निळ्या रंगाचा वापर करत अमेरिकी कामगारांमध्ये स्वदेशाभिमान जागा ठेवण्याचा सूक्ष्म; पण महत्त्वाचा निर्णय घेतलेला दिसतो. या पोस्टरच्या उगमाबाबत बरीच चर्चा आणि गैरसमज आजही आहेत. सन १९८० च्या सुमाराला जेव्हा हे पोस्टर पुन्हा समोर आलं, तेव्हापासून अगदी आजपर्यंत याचा वापर स्त्रीसमानतेच्या चळवळीपासून ते अमेरिकन ॲड काउन्सिलपर्यंत अनेक वेळा झाला आणि पुढंही होत राहील. 
***
Obama HOPE या पोस्टरची गोष्ट फार जुनी नाही. सन २००८ मध्ये बराक ओबामा यांची जेव्हा अमेरिकेच्या
राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली, तेव्हा ‘रोड आयलंड स्कूल ऑफ डिझाइन’मध्ये शिक्षण घेतलेल्या शेपर्ड फेरी या डिझायनरनं तीन पोस्टरची मालिका प्रसिद्ध केली. त्याला अधिकृतरीत्या हे काम मिळालेलं नव्हतं.
त्यानं स्वतःच प्रेरित होऊन Progress (प्रगती), Hope (उमेद) आणि Change (बदल) हे तीन शब्द वापरून स्टेन्सिलसारख्या शैलीत ओबामा यांच्या चेहऱ्याच्या तसबिरीबरोबर अतिशय प्रभावी रचना मांडली. निळा आणि लाल रंग गडद करून वापरल्याचा बराच उलटसुलट अर्थ ओबामा यांच्या रंगाशी जोडला गेला. फेरीनं एका दिवसात डिझाइन करून सुमारे ३०० पोस्टर छापून विकूनसुद्धा टाकली; पण सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे Hope  हे पोस्टर इतकं लोकप्रिय झालं, की शेवटी त्याला ते अधिकृतरीत्या छापायला सांगण्यात आलं. काही आठवड्यांच्या कालावधीत या पोस्टरच्या तीन लाख प्रती छापल्या गेल्या. शेवटी, या पोस्टरची इमेज कुणालाही छापता येईल किंवा शेअर करता येईल, अशा पद्धतीनं इंटरनेटवर टाकण्यात आली. 
Hope हा एकच शब्द! या शब्दाच्या बळावर ओबामा निवडून आले, असं म्हणतात आणि ती अतिशयोक्ती म्हणता येणार नाही.  
एकच शब्द, एकच चित्र; पण केवढा मोठा परिणाम! ‘एक चित्र हजार शब्दांची बरोबरी करू शकतं’ असं म्हटलं जातं. ही तिन्ही उदाहरणं बघता कम्युनिकेशन डिझाइन केवढा मोठा परिणाम साधू शकतं हे सिद्धच आहे. 
(Disclaimer ही तिन्ही पोस्टर ‘क्रिएटिव्ह कॉमन्स’च्या मुक्त परवान्यांतर्गत उपलब्ध आहेत.)
***
जाता जाता एक छोटीशी माहिती  तुम्हाला डिझाइन या विषयात रस असेल आणि डिझायनर्सना भेटण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा असेल तर ११ व्या ‘पुणे डिझाइन फेस्टिव्हल’साठी आजच नाव नोंदवा किंवा पुणे डिझाइन
एक्‍स्पोला १०-११ फेब्रुवारीला भेट द्या.
www.punedesignfestival.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com