आखूड शिंगी, बहू दुधी... (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 15 एप्रिल 2018

एकाच वस्तूची अनेकानेक कामांसंदर्भात उपयुक्तता वाढवण्याच्या उद्देशानं बहू-उद्देशीय किंवा मल्टिपर्पज डिझाइनची संकल्पना अस्तित्वात आली असावी. या संकल्पनेअंतर्गत त्या वस्तूची उपयुक्तता वाढवण्याचा प्रयत्न तर केला जातोच; शिवाय ती वस्तू टिकाऊ असायला हवी, यावरही भर दिला जातो. त्यामुळे ती वस्तू दीर्घायुषीही ठरते. अशा वस्तूचं सध्याच्या काळातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्मार्ट फोन! ‘कधीही कुठूनही फोनकॉल करण्याची सुविधा असणारी वस्तू ते आयुष्य व्यापून टाकणारी अपरिहार्य गोष्ट’ असा मोबाईल फोनचा प्रवास पाहिला तर या बहू-उद्देशीय शक्तीचं माहात्म्य कळून येईल!

एकाच वस्तूची अनेकानेक कामांसंदर्भात उपयुक्तता वाढवण्याच्या उद्देशानं बहू-उद्देशीय किंवा मल्टिपर्पज डिझाइनची संकल्पना अस्तित्वात आली असावी. या संकल्पनेअंतर्गत त्या वस्तूची उपयुक्तता वाढवण्याचा प्रयत्न तर केला जातोच; शिवाय ती वस्तू टिकाऊ असायला हवी, यावरही भर दिला जातो. त्यामुळे ती वस्तू दीर्घायुषीही ठरते. अशा वस्तूचं सध्याच्या काळातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्मार्ट फोन! ‘कधीही कुठूनही फोनकॉल करण्याची सुविधा असणारी वस्तू ते आयुष्य व्यापून टाकणारी अपरिहार्य गोष्ट’ असा मोबाईल फोनचा प्रवास पाहिला तर या बहू-उद्देशीय शक्तीचं माहात्म्य कळून येईल!

‘गाय कशी असावी?’ असं विचारलं तर ‘आखूड शिंगी, बहू दुधी, कृष्णवर्णी, अल्पखादी हवी,’ असं सांगितलं जातं. याचा साधा अर्थ म्हणजे, एकाच गोष्टीपासून कमीत कमी प्रयत्नात आणि खर्चात अनेक फायदे मिळावेत अशी अपेक्षा असते. मात्र, कोणत्याही वस्तूचा अनेक प्रकारे वापर करण्याची खुबी आपल्यात जरी असली तरी अतिशय विशिष्ट अशा कार्यासाठी उत्तम असलेली वस्तू इतर वेळी सपशेल निरुपयोगी ठरू शकते!

बहू-उद्देशीय किंवा मल्टिपर्पज डिझाईनची संकल्पना याच कारणानं पुढं आली असावी. यात त्या वस्तूची उपयुक्तता वाढवण्याचा प्रयत्न तर असतोच; शिवाय ती वस्तू टिकाऊ असावी यावरही भर दिला जातो. यामुळे ती वस्तू दीर्घायुषीही ठरते. नेहमीच्या वापरातला सोफा-कम-बेड किंवा दूरचं आणि जवळचं स्पष्ट दिसण्याचा एकत्रित चष्मा, आतून-बाहेरून वेगवेगळी नक्षी असल्यामुळे दोन्ही बाजूंनी घालता येणारे कोट असा दुहेरी उद्देश साधणारी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभवती दिसतात. काही अशीही उदाहरणं आहेत, की जी मुख्यत्वेकरून वापरणाऱ्या व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन, त्या केंद्रस्थानी ठेवून विकसित केली गेलेली आहेत.

सन १८८० च्या सुमाराला कार्ल एसेनर आणि त्यांची आई व्हिक्‍टोरिया यांनी शस्त्रक्रियेचे चाकू, कात्र्या वगैरे सामान तयार करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये इबाच इथं कारखाना सुरू केला. लवकरच त्यांना घडी घालून बंद करता येण्याजोगा, खिशात सहज मावेल असा चाकू तयार करण्याचं कंत्राट खुद्द स्विस सैन्यातर्फे मिळालं. अन्नाचे पत्र्याचे डबे कापता यावेत आणि गरजेनुसार रायफल उघडून परत जुळवता यावी, असा या ‘पॉकेट नाईफ’चा उद्देश होता. तिची मूठ लाकडी असायची. चाकू, कटर आणि स्क्रू-ड्रायव्हर अशा तिन्ही गोष्टी चाकूच्या एकाच बाजूला बसवल्या तर उघड-मिट शक्‍य करण्यासाठी तीन स्प्रिंग लावाव्या लागायच्या. यामुळे चाकू जाड आणि जड व्हायचा. तीन-चार वर्षांच्या प्रयोगांनंतर १८८६ मध्ये कार्ल एसेनर यांना मुठीच्या दोन्ही बाजूंनी अवजारं लावून ती एकाच स्प्रिंगच्या साह्यानं उघडबंद करता येण्यात यश आलं. ही होती सुरवातीची ‘सोल्जर नाईफ’...हा झाला जवानांचा चाकू; मात्र त्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कशा प्रकारच्या चाकूची गरज असेल असा विचार कार्ल एसेनर यांच्या मनात आला. मग त्यांनी यात एक छोटा चाकू आणि वाईनच्या बाटलीचा कॉर्क काढण्याचा आकडा यांची भर घालून ‘ऑफिसर्स नाईफ’ डिझाईन केला. त्यावर चक्क पेटंटही मिळवलं. या कंपनीनं नंतरच्या काळात इतर अनेक प्रकारची अवजारं या चाकूत समाविष्ट केली.

सन १९२१ पासून हे चाकू स्टेनलेस स्टीलचे बनायला लागले. त्यानंतर कार्ल एसेनर यांनी ‘आयनॉक्‍स’ या स्टेनलेस स्टीलसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रेंच शब्दाचं संक्षिप्त रूप आणि स्वतःच्या आईचं नाव यांपासून ‘व्हिक्‍टोरिनॉक्‍स’ हा शब्द तयार करून कंपनीचं नवीन नाव आणि ब्रॅंड प्रसारित करायला सुरवात केली. आज या ‘नाइफ’मध्ये काळाच्या गरजेनुसार टॉर्च, पेन ड्राइव्ह इत्यादींचाही समावेश केला जातो. आजही या कंपनीचं मुख्य कार्यालय इबाच इथंच आहे आणि ‘स्विस नाइफ’ची घोडदौड अजूनही सुरूच आहे. आता कार्ल एसेनर यांचे पणतू हा उद्योग चालवतात. गेल्या वर्षी ‘व्हिक्‍टोरिनॉक्‍स’ कंपनीनं निरनिराळ्या प्रकारचे तब्बल दीड कोटी चाकू जगभर विकले आणि बहू-उद्देशीय असलेलं हे उत्पादन जगाच्या कानाकोपऱ्यात किती लोकप्रिय आहे, हे सिद्ध करून दाखवलं.
***

‘स्विस नाईफ’पेक्षा जास्त मल्टिपर्पज काय असेल, या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या अक्षरशः हातात आहे! सन १९७३ मध्ये तयार झालेला पहिलावाहिला पोर्टेबल फोन सुमारे दोन किलो वजनाचा होता आणि तो एका हातात मावणारा तर मुळीच नव्हता. मोटरोला कंपनीचं हे तंत्रज्ञान व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊन त्याची प्रगती १९९० च्या दशकात झाली. आज ज्या वस्तूशिवाय सामान्य माणूस जगण्याची कल्पनाही करू शकत नाही, तो मोबाईल फोन जेमतेम २० वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ मध्ये भारतात उपलब्ध झाला. त्या वेळी केवळ फोनकॉल करण्यासाठीच त्याचा वापर शक्‍य होता. फोनही किमती आणि त्यापासून कॉल करणंही महाग हे गणित जगात कुठंच जुळण्यासारखं नव्हतं. एकीकडं मोबाईल कॉलव्यतिरिक्त कोणतं तंत्रज्ञान या वस्तूत समाविष्ट करता येईल, याचं संशोधन तंत्रज्ञ करत होते आणि त्याचबरोबर दुसरीकडं एकंदरीत राहणीमान, जगण्याच्या, काम करण्याच्या, नातेसंबंधांच्या, मनोरंजनाच्या, दळणवळणाच्या पद्धतीत काय बदल घडत आहेत आणि त्यामुळं लोकांच्या गरज कशा बदलत जातील, याचं बारकाईनं अवलोकन डिझायनर्स करत होते. हा प्रवास समांतरच असतो. कारण, तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल प्रत्यक्ष घडवून आणू शकतं, हे सिद्ध होईपर्यंत त्याचा काहीच उपयोग नसतो. या समांतर प्रवासाचा परिणाम म्हणजे मोबाईल फोनमध्ये जोडली गेलेली नवनवीन वैशिष्ट्यं. सुरवात झाली ती फोनबुक, डायरी आणि कॅलेंडरनं. पुढं एसएमएस, कॅमेरा, टॉर्च, फ्लॅश, व्हिडिओ कॅमेरा, त्यानंतर ई-मेल आणि इंटरनेट ब्राउजिंग, म्युझिक आणि आता तर वेगवेगळ्या ॲप्सद्वारे बॅंक, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, ट्रॅव्हल एजन्सी हे सगळंच फोनमध्ये समाविष्ट झालं आहे. ‘कधीही कुठूनही फोनकॉल करता येऊ शकण्याची सुविधा असणारी वस्तू ते आयुष्य व्यापून टाकणारी अपरिहार्य गोष्ट’ असा मोबाईल फोनचा प्रवास पाहिला तर एक नक्कीच...ते म्हणजे त्यात ठासून भरलेली बहू-उद्देशीय शक्ती!

अगदी अलीकडचं संशोधन पाहिलं तर आज ॲपल होमपॉड, ॲमेझॉन एको आणि गुगल होम यांच्याद्वारे आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता घरोघरी पोचते आहे. बोलून सूचना देता येणारे हे डिजिटल सोबती आपण सांगू ती गाणी तर ऐकवतातच; पण त्यांचा आवाका याहून खूपच विस्तृत, व्यापक आहे. घरातले दिवे लावणं/बंद करणं, फोन लावून देणं, बातम्या सांगणं, हवामानाचा अंदाज सांगणं, शॉपिंग लिस्ट तयार करून तिची ऑर्डर देणं, एखाद्या घटनेची आठवण करून देणं आणि दमल्या-भागल्या क्षणी चक्क विनोद सांगून रिझविणं हे सगळं अगदी मानवी वाटावं अशा आवाजात, उच्चारात ते करू शकतात. शिवाय, आपल्या सूचना वारंवार ऐकून त्यांच्या प्रतिक्रियाही सुधारत जातात. अशा प्रकारची प्रॉडक्‍ट्‌स विकसित करण्यामध्ये ‘यूजर एक्‍स्पिरिअन्स डिझायनर्स’ मोठी जबाबदारी सांभाळतात. तंत्रज्ञान आणि त्याची आयुष्याशी इतक्‍या चपखलपणे घातलेली सांगड पाहिली की डिझाईन हे केवळ बाह्य स्वरूपाचं राहिलेलं नाही, असं ठामपणे म्हणता येतं.

(छायाचित्रं : निर्मात्यांच्या मालकीची)

Web Title: ashwini deshpande write article in saptarang