हस्तकला ते डिझाईन (आश्विनी देशपांडे)

ashwini deshpande write article in saptarang
ashwini deshpande write article in saptarang

अमाप वैविध्य आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या भारतासारख्या देशात अगणित हस्तकला आढळतात. पंजाबातली फुलकारी, महाराष्ट्रातली वारली, कच्छी कशिदा, गुजराथी बांधणी, आसाममधलं बांबूकाम, आंध्र प्रदेशातलं बिदरी काम, सावंतवाडीची लाकडी खेळणी, राजस्थानच्या लाखेच्या बांगड्या...अशा असंख्य हस्तकला भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. मात्र, काही हस्तकला काळाच्या ओघात लोपही पावल्या आहेत, तर काहींचं पुनरुज्जीवनही करण्यात आलं आहे. काही हस्तकलांच्या पुनरुज्जीवनाविषयी...

डिझाईन या नियोजनबद्ध क्रियेचा उगम कसा झाला, याचा मागोवा घेतला तर दोन शक्‍यता पुढं येतात. एक म्हणजे समस्या सोडवण्याच्या तीव्र गरजेतून काहीतरी नावीन्यपूर्ण शोध आणि नावीन्य वारंवार गवसावं यासाठीचा पद्धतशीर पाठपुरावा. दुसरी आणि अतिशय महत्त्वाची शक्‍यता म्हणजे हस्तकलांचा योजनाबद्ध विकास. अमाप वैविध्य आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या भारतासारख्या देशात अगणित हस्तकला आढळतात. हवामान, पिकं, राहणीमान, भूप्रदेश, कौटुंबिक रचना यांनुसार अनेक प्रकारच्या हस्तकौशल्याचं नमुने ठिकठिकाणी पाहायला मिळतात. पंजाबातली फुलकारी, महाराष्ट्रातली वारली, कच्छी कशिदा, गुजराथी बांधणी, आसाममधलं बांबूकाम, आंध्र प्रदेशातलं बिदरी काम, पैठणी, महेश्वरी, कांजीवरम्‌ विणकाम, काश्‍मिरी भरतकाम, सावंतवाडीची लाकडी खेळणी, राजस्थानच्या लाखेच्या बांगड्या, सांदखेड्याचं फर्निचर, जयपुरी मोजड्या अशा असंख्य हस्तकला भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत.

एकेकाळी भारतात हस्तकलाकारांची संख्या एवढी होती की रोजगारात शेतकऱ्यांनंतर त्यांचाच नंबर असायचा; पण शहरं पसरत चालली, लोकसंख्या वाढली, स्रोत घटत चालले, राहणीमान बदलत गेलं. हस्तकलांचं कौतुक करायला किंवा त्यांचा समावेश आयुष्यात करून घ्यायला ना वेळ राहिला ना उत्साह. ‘कलेसाठी कला’ ही संकल्पना कालबाह्य व्हायला लागली. पाश्‍चात्य राहणीमुळं सौंदर्याच्या भारतीय कल्पना मागं पडू लागल्या. गृहसजावट असो अथवा वैयक्तिक सुशोभन, गरजा पुरवणाऱ्या साध्या गोष्टींच्या वाढत्या मागणीमुळं कलाकुसर केलेल्या वस्तूंचं स्थान केवळ सण-समारंभातच शिल्लक राहिलं. या सगळ्या बदलांमुळं डिझाईन हा व्यवसाय कलेपासून काहीसा वेगळा झाला. लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून वस्तू, सेवा यांची संकल्पना आणि निर्मिती यावर डिझाईन-व्यावसायिकांचा भर वाढत गेला. दुसरीकडं काळाबरोबर न बदलता आल्यामुळं, मागणी कमी होत गेल्यामुळं हस्तकलांवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुशल कारागिरांच्या पुढच्या पिढ्या कला शिकायला नकार द्यायला लागल्या. त्यांचा शहरात जाऊन नोकरी मिळवण्याकडं जास्त कल राहिला. त्यामुळं ना कलेचा विकास होऊ शकला ना नवीन हस्तकलाकार निर्माण झाले. बदलत्या जीवनशैलीत बारकाईनं, फुरसतीनं बनवलेल्या, विशेष उपयुक्तता नसलेल्या वस्तूंना स्थानच राहिलं नाही. हस्तकला एकेक करून लुप्त व्हायला सुरवात झाली.
आता डिझाईन आणि हस्तकला यांच्यात मोठं अंतर पडलं. नेमक्‍या याच वेळी म्हणजे १९७० च्या दशकात कलांबाबत आस्था बाळगणाऱ्या दूरदर्शी विचारवंतांनी काही कला पुनरुज्जीवित करण्याचा चंग बांधला. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’चे कार्यकारी संचालक अशोक चटर्जी आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’चे संचालक रवी मथाई यांनी सुमारे २०० दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी राजस्थानात ग्रामीण विद्यापीठाचा प्रकल्प उभा केला. त्या भागातल्या पारंपरिक हस्तकला पुनरुज्जीवित करून ३०० वर्षांपासून चालत आलेलं जवाजा लेदर क्राफ्ट नव्या जोमानं उभं करण्यासाठी डिझाईनचा पुढाकार फारच उपयुक्त ठरला. ज्या कातडी वस्तू परंपरागत चालीनुसार तयार केल्या जात होत्या उदाहरणार्थ, पाण्याची कवाड, उंटासाठी झूल यांना शहरात मागणी असण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय विसंगत रंगसंगती, भरमसाट नक्षी, वास येणारी कातडी, असमान पोत अशा समस्यांमुळं वस्तू शहरी गरजेनुसार सफाईदार बनत नव्हत्या. कातडी वाळवणं, कमावणं, रंगवणं, तिला टाके घालणं या सगळ्या प्रक्रिया डिझायनर्सनी अभ्यासपूर्वक प्रमाणबद्ध केल्या आणि जवाजा परिसरातल्या सगळ्या कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांना प्रशिक्षण देऊन तयार केलं. त्यामुळं सलग, पक्के रंग असलेली, चमकदार कातडी तयार व्हायला लागली. आधुनिक राहणीमानात बसतील अशा बॅगांची अनेक सुबक आणि उपयुक्त डिझाईन्स या कारागिरांना साच्यांसह आणि प्रात्यक्षिकांसह उपलब्ध करून देण्यात आली. चष्म्याच्या पेट्या, छोटी पाकिटं, फोल्डर, पर्स अशा इतरही अनेक वस्तू जवाजा पद्धतीच्या कारागिरीनुसार डिझाईन केल्या गेल्या. सन १९७६ मध्ये सहकारी तत्त्वावर लावलेलं हे रोपटं हस्तकला पुनरुज्जीवनाचं एक उत्तम आणि जागतिक पातळीवर नावाजलेलं उदाहरण मानलं जातं. जवाजासाठी आयपॅड केस किंवा लॅपटॉप बॅगसारख्या बदलत्या राहणीमानाला योग्य त्या वस्तू डिझायनर्सद्वारा आजही विकसित केल्या जातात. जवाजाची उत्पादनं जगाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन पोचलेली आहेत आणि आजतागायत जवाजाचा उत्तम विकास सुरू आहे.

म्हैसूरवर राज्य करताना सुमारे २५० वर्षांपूर्वी टिपू सुलतानानं पर्शियातल्या काही कारागिरांना लाकडी खेळणी तयार करायला आमंत्रित केलं होतं, असं म्हणतात. कोरीव काम करायला योग्य असलेलं लाकूड छन्नपटणाच्या परिसरात सापडल्यामुळं त्या भागात काही लोकांनी ही कला शिकून घेतली. हळूहळू या कलेचा प्रसार होऊन तिथं तब्बल तीन हजार कुशल कारागीर लाखेचा थर दिलेली रंगीत लाकडी खेळणी तयार करायला शिकले. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही खेळणी दिसायला सुंदर जरी असली तरी आयपॅड आणि ड्रोन्सच्या जमान्यात त्यांची मागणी अतिशय कमी होत होती. मात्र इथंही डिझाईनचा पुढाकार मदतीला आला. गेल्या दोन- तीन वर्षांत आधुनिक गरजांनुसार आकार, रंग, वजन आणि विषय बदलून, निर्यातीच्या शक्‍यतेवरही लक्ष ठेवून अगदी नव्या कल्पना मांडण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ‘लंडन डिझाईन फेअर’मध्ये छन्नपटणाच्या वस्तूंना विशेष असं स्थान होतं. हे जागतिक व्यासपीठ खास आमंत्रित करून छन्नपटणाच्या हस्तकलेला देण्यात आल्यामुळं या मावळत्या हस्तकलेला नवा जोम आला आहे. डिझाईनच्या पुढाकारामुळं कला पुनरुज्जीवित व्हायला मदत झाल्याचं तिसरं अलीकडचं उदाहरण आहे बंगालमधल्या गमछांचं. हातमागावर विणले जाणारे हे चौकडींचे रंगीबेरंगी रुमाल आणि पंचे कष्टकरी डोक्‍याला बांधून-खांद्यावर टाकून फिरतात. मात्र, या विणकामाची मोठ्या प्रमाणावर प्रस्तुती करण्याची कल्पना भारतीय हस्तकलांबद्दल प्रचंड आस्था असणाऱ्या कार्यकर्त्या जया जेटली यांची.

सन २०१६ मध्ये त्यांनी काही सुप्रसिद्ध टेक्‍स्टाईल डिझायनर्सना ‘गमछा प्रोजेक्‍ट’मध्ये सहभागी करून घेतलं. त्यांच्याद्वारे गमछा ज्या पद्धतीनं विणला जातो, त्याच पद्धतीनं साड्या, ड्रेस मटेरिअल, टेबलक्‍लॉथ वगैरे विणता येऊ शकेल का, असा विचार करण्यात आला. सर्वप्रथम केवळ चार हातमागांवर प्रायोगिक तत्त्वावर १०० साड्या विणल्या गेल्या. आता हा प्रकल्प मोठा आकार धारण करत आहे आणि लवकरच तो उडिशातही मूळ धरेल अशी शक्‍यता दिसत आहे. आसाममध्ये बांबूपासून होणारी नवीन उत्पादनं, आधुनिक अवतारातल्या महेश्वरी साड्या, भारतीय आणि पाश्‍चात्य फॅशनच्या मध्य गाठून साधण्यात आलेलं बांधणीकाम अशी डिझाईनचा स्पर्श होऊन उजळून निघालेली अजूनही काही उदाहरणं आहेत, जी भारतीय हस्तकलाक्षेत्रासाठी नक्कीच आशादायी आहेत. तेव्हा हस्तकलेची वस्तू विकत घेताना शक्‍यतो घासाघीस करू नका! आणि कपाटात एखादा तरी हातमागाचा सूट, साडी असू द्या. हे तर आपण सगळेच करू शकतो.
(छायाचित्रं : निर्मात्याच्या मालकीची)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com