ट्रेंड का आणि कसा? (आश्विनी देशपांडे)

ट्रेंड का आणि कसा? (आश्विनी देशपांडे)

समाजाच्या मनःस्थितीची अचूक माहिती आणि संवेदनशीलता जोपासणाऱ्या डिझायनर्सनी अलीकडच्या काळात ‘रेट्रो’ हाच ट्रेंड आणला आहे. हा ‘रेट्रो’ किंवा गतकालीन कल्पना नव्या रूपात परत पेश करण्याचा ट्रेंड सगळ्याच क्षेत्रांत पाहायला मिळतो. ऑडिओ कॅसेटसारखी दिसणारी फोन कव्हर्स, तबकडीवरचे आकडे फिरवून चालणाऱ्या फोनसारखे डॉक, मायक्रोफोनसारखे दिसणारे स्पीकर्स, रेडिओ किंवा ट्रान्झिस्टरसारखे दिसणारे mp३ प्लेअर, १९६० च्या दशकात रेफ्रिजरेटर जसे दिसायचे तसेच; पण आधुनिक तंत्रज्ञानाचे अद्ययावत फ्रिज अशी अनेक उदाहरणं सध्या जगभर पाहायला मिळतात...या सगळ्या प्रॉडक्‍टकडं पाहून ‘रेट्रो’ ट्रेंड हा डिझाईनचा एक अविभाज्य भाग आहे, हे स्पष्ट होतं. येत्या काळात कोणता ट्रेंड पुनरुज्जीवित होईल असं तुम्हाला वाटतं?

नावीन्याचं कुतूहल असेल तर प्रत्येक क्षेत्रात वेगळं किंवा वैशिष्ट्यपूर्ण काय सुरू आहे, यावर चौफेर लक्ष राहतं.

गाड्या, फर्निचर, विजेची उपकरणं, रोजच्या वापराची साधनं, खेळणी, मनोरंजनाची यंत्रं, सौंदर्यप्रसाधनं या सगळ्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत. राहणीमान किंवा बदलत्या हवामानाप्रमाणे त्यांचे आकार आणि रंग-रूप तर बदलतच आहे; शिवाय विकसित तंत्रज्ञानामुळं शक्‍य झालेल्या उत्पादनाच्या पद्धती, संशोधनाअंती तयार झालेली नवीन मटेरिअल्स यांच्या मदतीनं त्यांचा कायापालटही होत राहतो. साधं उदाहरण म्हणजे, ज्या वस्तू काचेच्या बनायच्या, त्या प्लॅस्टिकमध्ये वेगानं आणि कमी किंमतीत तयार व्हायला लागल्या. त्या वस्तू जास्त टिकाऊ तर झाल्याच; शिवाय आकार, रंग, पारदर्शकता याबाबतींत त्यांच्यात वैविध्य आणणं सहज शक्‍य होऊ लागलं. मात्र, प्रत्येक निर्मात्यांकडं तंत्रज्ञान तेच उपलब्ध असल्यामुळं डिझाईन हे एक वेगळेपणा दाखवण्याचं साधन समजलं जाणार हे ओघानंच आलं. कारण, किमतीच्या किंवा वितरणशक्तीच्या जोरावर लोकप्रिय होणं, हे एका पातळीपर्यंतच शक्‍य होऊ शकतं. त्यापुढं जर ग्राहकाला आकर्षित करून घ्यायचं असेल, तर ते नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त अशा डिझाईनची मदत घेऊनच करावं लागणार.

कोणत्याही वस्तूची पुढची आवृत्ती जास्त आकर्षक, आगळीवेगळी आणि तरीही उपयुक्त व्हावी यासाठी डिझायनर्सना समाजाचा कल कोणत्या दिशेनं जाऊ शकेल, यावर तर्क लढवावे लागतात. कोणती आवड बराच काळ लोकप्रिय ठरेल आणि कोणत्या प्रवृत्ती अल्पावधीत मागं पडतील, याचा मागोवा घेत राहावं लागतं. म्हणजेच ट्रेंड कोणता आणि फॅड कोणतं याची समज यावी लागते. त्या अंदाजानुसारच गाड्यांपासून ते फॅशनपर्यंत सगळ्या गोष्टींची शैली, रंग, पोत ठरवले जातात.
यात गंमत अशी की, ट्रेंड किंवा फॅशन यांचं एक चक्र असतं. काही काळ ती राज्यं करतात, मग गायब होतात आणि मग तीन-चार दशकांनी थोड्या सुधारित अवतारात परत येतात. या चक्रांचं प्रमाणीकरण किंवा निमित्त प्रत्येक वेळी वेगवेगळं असू शकतं. १९३० च्या दशकात वर्तुळाकार भाग असलेली बीटल ही छोटी गाडी लोकप्रिय झाली. पुढं गती आणि इंजिनची शक्ती यावर लागलेल्या चढाओढीत लांबलचक, निमुळते कोपरे असलेल्या गाड्या डिझाईन केल्या गेल्या. जवळजवळ ६० वर्षांच्या संचारानंतर बीटल रिटायर झाली; पण एकसारख्या खाचा-कोपरे असलेल्या गाड्यांची धार एवढी पराकोटीला गेली की त्यातलं नावीन्य संपलं आणि सुधारित बीटल चक्क परत आली. वरकरणी १९४०-५० च्या दशकातलं रूप; पण आत इंजिनसह बरेच फेरफार आणि सुधारणा अशी ही गाडी ‘रेट्रो’ म्हणजेच मागच्या काळाची आठवण करून देणारी ठरली आणि त्याच कारणानं प्रचंड यशस्वी झाली. एखादी शैली, रंग किंवा तत्त्व कुठं आणि कोणत्या वस्तूसाठी परत वापरता येईल, याचा योग्य अंदाज अनुभवानं येतो.

नेमक्‍या किती वर्षांनी एखादी शैली किंवा रीत परत येते, याचं अचूक निदान करणं अशक्‍य असलं, तरी समाजशास्त्राच्या आणि मानववंशशास्त्राच्या पाहणीनुसार काही सिद्धान्त मांडले गेले आहेत. एक पिढी लहानपणी एखाद्या शैलीच्या वस्तूंची उपभोक्ती असेल, तर ती पिढी जसजशी मोठी होत जाईल तसतशी ती शैली, फॅशन किंवा ट्रेंड मागं पडत जातात.

तीच पिढी जेव्हा नवीन शैलीची निर्मिती करण्याएवढी सजग आणि प्रौढ होते, तेव्हा साहजिकच स्वतःच्या लहानपणचे संदर्भ घेऊन निर्णय घ्यायला लागते. यामुळं २० ते २५ वर्षांनी एखादी फॅशन सुधारित आवृत्तीत परत आलेली दिसते. कारण, एक पिढी म्हणजे सुमारे २५ वर्षं.

समाजाच्या मनःस्थितीची अचूक माहिती आणि संवेदनशीलता जोपासणाऱ्या डिझायनर्सनी अलीकडच्या काळात ‘रेट्रो’ हाच ट्रेंड आणला आहे. हा ‘रेट्रो’ किंवा गतकालीन कल्पना नव्या रूपात परत पेश करण्याचा ट्रेंड सगळ्याच क्षेत्रांत पाहायला मिळतो. ‘जुडवा’ सिनेमा ‘जुडवा २’ रूपात २० वर्षांनी परत आलाय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन १९८२ मध्ये सादर झालेल्या ‘ब्लेड रनर’ ची ‘ब्लेड रनर-२०४९’ आवृत्ती नुकतीच पाहायला मिळाली. बेलबॉटम जीन्स प्रत्येक दशकात एकदा तरी थोड्याफार सुधारित आवृत्तीत प्रकट होते. फुग्याच्या बाह्या, प्लॅटफॉर्म हिल्स, चष्म्याची जाड फ्रेम अशा अनेक फॅशन्स पुन्हा पुन्हा येतात आणि जातात. याचा अर्थ, समाजाच्या वेगवेगळ्या बदलांवर बारकाईनं नजर ठेवणारे डिझाईन-तज्ज्ञ आणि मार्केटिंग-तज्ज्ञ एकत्र येऊन काही अनुमान बांधतात आणि अशा प्रकारच्या पूर्वकाळातल्या ट्रेंडवर आधारित नवीन आवृत्त्या विकसित करतात.

ऑडिओ कॅसेटसारखी दिसणारी फोन कव्हर्स, तबकडीवरचे आकडे फिरवून चालणाऱ्या फोनसारखे डॉक, मायक्रोफोनसारखे दिसणारे स्पीकर्स, रेडिओ किंवा ट्रान्झिस्टरसारखे दिसणारे mp३ प्लेअर, १९६० च्या दशकात रेफ्रिजरेटर जसे दिसायचे तसेच; पण आधुनिक तंत्रज्ञानाचे अद्ययावत फ्रिज अशी अनेक उदाहरणं सध्या जगभर पाहायला मिळतात.

या सगळ्या प्रॉडक्‍टकडं पाहून ‘रेट्रो’ ट्रेंड हा डिझाईनचा एक अविभाज्य भाग आहे, हे स्पष्ट होतं. येत्या काळात कोणता ट्रेंड पुनरुज्जीवित होईल असं तुम्हाला वाटतं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com