डिझाइनच्या दुनियेत... (आश्विनी देशपांडे)

डिझाइनच्या दुनियेत... (आश्विनी देशपांडे)

डिझाइन हा शब्द बऱ्याच वेळा आणि बऱ्याच संदर्भांत वापरला गेला, तरी एकंदरीत डिझाइन या शब्दाची शक्ती आणि प्रभाव आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या प्रमाणात असतो, त्या प्रमाणात त्याबद्दलची माहिती जरा कमीच उपलब्ध आहे. भारतात डिझाइन-पत्रकारिता नगण्य आहे आणि मराठीत तर जवळजवळ नाहीच. एखाद्या उत्पादनाचं डिझाइन हे नेमकं काय ‘प्रकरण’ असतं, ‘डिझाइनचं डिझाइन’ कसं केलं जातं, त्याचा लाभ काय, त्याचा उद्देश काय... अशा आणि अन्य कितीतरी प्रश्‍नांचा ऊहापोह करणारं हे अनोखं सदर...

ल  हानपणी मला चित्रकला आवडायची आणि जमायचीही. ती आवड जोपासण्यासाठी मला आई-वडिलांचं प्रोत्साहनही होतं. छंदवर्गात, शाळेत चित्र किंवा रंगकला स्पर्धांमध्ये सहभाग आणि बक्षिसं, पुढं राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा हे सगळं अभ्यास, वक्तृत्व, खेळ यांना समांतर असं सुरू होतं. त्या वेळी प्रचलित असलेल्या म्हणजे मेडिकल अथवा इंजिनिअरिंग शाखांपेक्षा ज्या क्षेत्रात सृजनशीलता आणि अभिव्यक्तीला जास्त वाव मिळेल, असं क्षेत्र आपण निवडावं, असं हळूहळू मला वाटायला लागलं. व्यवसाय किंवा क्षेत्रांची व्याप्ती यांचा विचार त्या वेळी मनात नव्हता. सन १९८० च्या दशकात डिझाइन हा शब्दच रोजच्या वापरात किंवा समजुतीत नव्हता. औरंगाबादसारख्या छोट्या शहरात तर त्या वेळी आर्किटेक्‍चर कॉलेजही नव्हतं. डिझाइनचा अभ्यासक्रम असतो आणि तो एका राष्ट्रीय पातळीच्या संस्थेत अहमदाबादमध्ये शिकवला जातो, हेही योगयोगानंच, मात्र योग्य वेळी म्हणजे बारावीत समजलं.

राष्ट्रीय डिझाइन संस्थान म्हणजेच नॅशनल डिझाइन इन्स्टिट्यूट (NID) ही एक अव्वल दर्जाची पदवीपातळीचं शिक्षण देणारी संस्था असून, त्या वेळी दरवर्षी जेमतेम २५ विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश दिला जायचा. मात्र, ‘अज्ञानात सुख असतं’ म्हणतात, ते मी संपूर्ण प्रवेशप्रक्रियेत अनुभवलं. राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेविषयी मी अनभिज्ञ असल्यामुळं कुठलाही दबाव न जाणवणाऱ्या मनःस्थितीत मी प्रवेशपरीक्षा दिल्या आणि माझी निवड त्या मोजक्‍या विद्यार्थांमध्ये झाली. १९८९ मध्ये माझा हा प्रवास सुरू झाला.

डिझाइनचा अभ्यासक्रम अगदीच आगळावेगळा असतो. ना पाठ्यपुस्तकं, ना प्रचलित प्रकारच्या परीक्षा, ना फळा-खडू वापरून शिकवणं. मात्र ‘लर्निंग बाय डुईंग’ किंवा ‘अनुभवातून शिक्षण’ यावर संपूर्ण भर. हे शिक्षण म्हणजे माझ्या आयुष्याचा दृष्टिकोन घडवणारा मोठा टप्पा होता.

***
...तर डिझाइन म्हणजे काय? सर्वसामान्य जीवनात त्याचं काही स्थान आहे का? डिझाइन हा शब्द बऱ्याच वेळा आणि बऱ्याच संदर्भांत वापरला गेला, तरी एकंदरीत डिझाइन या शब्दाची शक्ती आणि प्रभाव आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या प्रमाणात असतो, त्या प्रमाणात त्याबद्दलची माहिती जरा कमीच उपलब्ध आहे. भारतात डिझाइन-पत्रकारिता नगण्य आहे आणि मराठीत तर जवळजवळ नाहीच. ती उणीव थोडीफार भरून काढावी, विस्तारित स्वरूपात या व्यवसायाच्या वाटांची माहिती व्हावी आणि डिझाइनमुळं घडून आलेले सकारात्मक बदल समजावेत यासाठी हा प्रपंच. डिझाइन म्हणजे प्रगतीचा एक मार्ग. डिझाइन या शब्दाचा विस्तार मोठा आहे. ‘या खुर्चीचं डिझाइन एकदम आवडलं,’ असं म्हणताना डिझाइन हा शब्द केवळ बाह्यस्वरूपी संज्ञा असतो. मात्र, ‘दिल्लीतली मेट्रो हे अतिशय प्रभावी आणि कार्यक्षम डिझाइनचं उत्तम उदाहरण आहे,’ असं म्हणताना तो शब्द रचना, योजना आणि प्रणाली सामावणारं क्रियापद असतं (Design as a noun & and as a verb). संवाद, संदेश, वस्तू, उपकरणं, ठिकाणं, अनुभव, सेवा सगळ्या गोष्टी योग्य, व्यवहार्य आणि प्रेरणादायी करण्याची पद्धतशीर आणि सर्जनशील प्रक्रिया म्हणजे डिझाइन.

ज्या व्यक्ती किंवा गटांसाठी एखादी गोष्ट योजली जाते, ती व्यक्ती हा डिझाइन-प्रक्रियेचा केंद्रबिंदू ठरते. ती योजना किंवा रचना त्या व्यक्तीपर्यंत यशस्वीपणे पोचणं आणि तिला ती नुसती उपयुक्तच नव्हे, तर मनापासून भावणं, याबरोबरच तंत्रज्ञान, व्यावसायिक समतोल आणि नावीन्यपूर्ण अनुभूती या सगळ्याच मुद्द्यांचा विचार डिझाइन-प्रक्रियेत अपेक्षित असतो.

‘ॲपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज्‌ यांची डिझाइनची व्याख्या मला अनुकूल वाटते. ते म्हणतात ः ‘डिझाइन म्हणजे एखादी वस्तू कशी दिसते किंवा कशी वाटते, एवढंच नव्हे. ...तर डिझाइन म्हणजे ती वस्तू कशा प्रकारे चालते हेसुद्धा.’’
रेखाटनं, चित्रकला, रंगकला यांचा उपयोग कल्पना जगासमोर मांडण्यासाठीचं माध्यम म्हणून जरी केला गेला तरी डिझाइन ही फक्त स्वतःची अभिव्यक्ती मांडण्याची कला नाही. एका विशिष्ट समुदायाच्या आवडी, गरजा किंवा अडचणी मोठ्या प्रमाणावर सोडवण्यासाठी केलेली अभ्यासपूर्वक आणि शक्‍यतो नावीन्यपूर्ण योजना हे डिझाइनचं व्यापक स्वरूप आहे, असं म्हणता येईल.

***
डिझाइन ही आधुनिक काळातली प्रक्रिया आहे का? अजिबात नाही. ठिणगीनं आग पेटवण्याची क्रिया किंवा पहिलं चाक बनवणं यांना कदाचित ‘अभियांत्रिकी शोध’ म्हणता येईल; पण त्या चाकाचा उपयोग कसा करावा किंवा वेगवेगळे धातू वितळवून, लाकूड तासून त्याची उपयुक्त अवजारं कशी आणि का बनवावीत, या योजनांना ‘डिझाइन’च म्हणावं लागेल.
जसजशी मी ‘डिझाइन’ या क्रियेचा मागोवा घेत गेले, तसतसं मला हे ठामपणे कळत गेलं, की हा काही एका व्यक्तीनं करण्याचा प्रवास नव्हे. डिझाइन हा टीम-गेम म्हणजे सांघिक खेळ आहे.
ती छोटीशी अन्‌ अर्थपूर्ण गोष्ट आहे ना...

कोणे एके काळी एका गावात एक हत्ती आला. त्या गावात दृष्टिहीनांचा एक जथाच होता. त्या जथ्याला दिसत जरी नसलं तरी त्यातला प्रत्येक जण चौकस होता. त्यांना हत्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यांच्यातल्या प्रत्येकानं हत्ती चाचपला आणि परत येऊन आपल्याला ‘काय सापडलं’ याची चर्चा सुरू केली. ज्यानं पाठीला स्पर्श केलेला होता तो म्हणाला ः ‘हत्ती म्हणजे भिंतीसारखा असतो.’ ज्यानं पायाला हात लावला होता, त्यानं सांगितलं ः ‘हत्ती तर झाडाच्या खोडासारखा असतो’. जो कानाला हात लावून आला होता, त्याच्या मते ः ‘हत्ती म्हणजे सुपासारखा प्राणी आहे.’ ज्यानं शेपटीला हात लावला होता, त्याचा अभिप्राय होता ः ‘हत्ती तर सापासारखा वाटतोय.’ काय?... त्यांच्या चर्चेचं वादात रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. कारण प्रत्येकाला ‘आपलंच खरं आहे’ असा ‘विश्‍वास’ होता. सुदैवानं एक डोळस व्यक्ती तिथं आली आणि म्हणाली ः ‘तुम्ही सगळेच बरोबर सांगताय. कुणाचंच म्हणणं चुकीचं नाही. मात्र, तुम्ही प्रत्येकानं जे काही चाचपलं होतं, तो हत्तीचा केवळ एकेक अवयव होता, समग्र हत्ती नव्हे. तुम्ही वर्णन केलेले हे सगळे अवयव जर एकत्र जोडलेत तर जी मूर्ती तयार होईल ती म्हणजे हत्ती.’

डिझाइन ही प्रक्रिया किंवा प्रणाली अगदी या गोष्टीसारखीच घडते. ज्यांच्यासाठी डिझाइन योजलं जातं तो समुदाय, जे तो संदेश, उपकरण किंवा सेवा या समुदायापर्यंत पोचवणार आहेत ते उत्पादक किंवा प्रवर्तक, इंजिनिअर आणि तंत्रज्ञ, समाजशास्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, संबंधित शाखेचे डिझायनर अशा कित्येक व्यक्ती मिळून जेव्हा एखादी कल्पना परिपूर्ण करतात, तेव्हा ती सर्वार्थानं यशस्वी होण्याची शक्‍यता जास्तीत जास्त असते.

***
असं म्हणतात, की चांगलं डिझाइन स्पष्टपणे उठून दिसतं किंवा जाणवतं; पण उत्तम डिझाइन हे अदृश्‍य असावं, ते जाणवूही नये. स्विस डिझायनर एड्रियन फ्रुटिगर हे टायपोग्राफीच्या जगातलं आदरस्थान होतं. ते म्हणत ः ‘जेवणात वापरलेल्या चमच्याचा आकार तुम्हाला आठवत असेल, तर तो चुकीचा आकार होय. चमचा काय किंवा अक्षरं काय, ही केवळ साधनं आहेत. जसा चमचा हे वाटीतून अन्न उचलण्याचं साधन आहे, तसंच अक्षरं ही पानातून आशय आत्मसात करण्याची साधनं आहेत.’

आत्ता तुम्ही जे वाचताय त्या मजकुराचा टाईप किंवा फाँट काय असावा, त्याचा आकार, दोन ओळींमधलं अंतर, दोन स्तंभांमधलं अंतर, संपूर्ण पानाचा आकार आणि प्रमाण काय असावं या प्रत्येक गोष्टीवर संशोधनात्मक आणि संवेदनशीलतेनं विचार करूनच ते ठरवलं जातं.
मुळात तो फाँट डिझाइन करताना अक्षराचं वळण, जाडी, अंतर, ज्या प्रकारच्या व्यक्ती आणि माध्यमांसाठी तो केला जात आहे, त्यांच्या सोईचा विचार आणि सार्वत्रिक वापर सुरळीत होण्यासाठीचं तंत्रज्ञान अशा अनेक मुद्द्यांचा विचार केलेला असतो.

डिझाइन ही काही ‘काळ्या दगडावरची पांढरी’ रेघ नव्हे. ती एक सतत विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे. समाजात, तंत्रज्ञानात, नात्यांत, जगण्याच्या पद्धतीत जे बदल होतात, त्यांचं प्रतिबिंब डिझाइनमध्येही दिसून येतं, तसंच डिझाइनमुळंही काही सांस्कृतिक आणि सामाजिक बदल घडून येऊ शकतात...नियोजितही आणि अचानक घडून येणारेही.

असंच एक उदाहरण बघू या ः
भारताला आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतो. भारतात आजवर वर्षानुवर्षं ज्या निवडणुका झाल्या, त्यांत मतपत्रिका कागदीच असायच्या; पण सन १९९९ मध्ये अंशतः आणि सन २००४ पासून पूर्णतः इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन वापरण्यात येतात. हा बदल केवळ मतदान केंद्रांपुरताच मर्यादित नाही. कित्येक टन कागदाची आणि तो वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत, अफरातफरीची अगदी कमी शक्‍यता, वेळेची बचत आणि मतमोजणीसारख्या किचकट कामाचं स्वरूप अगदी सोपं करून टाकणं असे कित्येक बदल आणि फायदे या एका उपकरणामुळं झाले.
‘इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर’मधले प्रो. राव आणि प्रो. पूवैय्या यांच्या पुढाकारानं हे मशिन डिझाइन करण्यात आलं. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढं कधीतरी.

ही ‘डिझाइन पर्पज’ या सदराची सुरवात आहे. यात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वस्तू, घटना किंवा शाखांबद्दल वाचायला आवडेल, ते सांगत राहा...कधी एखाद्या डिझाइनबद्दल प्रश्‍न मनात आले असतील किंवा एखादा चांगल्या-वाईट डिझाइनचा नमुना शेअर करावासा वाटला, तर मला ई-मेल पाठवा आणि सांगत राहा काय वाटतंय ते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com