सर्वसमावेशक (अश्‍विनी देशपांडे)

सर्वसमावेशक (अश्‍विनी देशपांडे)

वय, आर्थिक स्थिती, स्त्री-पुरुष, देश, भाषा, जात, शारीरिक सक्षमता अथवा अक्षमता असा कोणताही भेदभाव आड न येता प्रत्येकाला सहज समजतील, उपलब्ध होतील आणि वापरता येतील, अशा डिझाइनची उत्पादनं सध्या मोठ्या प्रमाणावर तयार केली जात आहेत. डिझाइनच्या या शाखेला ‘सार्वत्रिक डिझाइन’ म्हणून संबोधता येईल. सार्वत्रिक, सर्वसमावेशक डिझाइन हे फॅड नाही, तर तो एक सामाजिक जबाबदारी पेलणारा, विश्‍वासार्ह आणि व्यापक उपयुक्ततेची बांधिलकी मानणारा स्वागतार्ह प्रयत्न आहे.

भा  रतीय राहणीमान, हवामान आणि संस्कृती यांच्याशी निगडित डिझाइनबाबत गेल्या वेळच्या लेखात चर्चा झाली. एकीकडं प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्यानं प्रत्येक व्यक्तीला अनुकूल अशा वस्तू तयार करणं शक्‍य आहे. मात्र, एक विचारप्रवाह असाही आहे, की जास्तीत जास्त व्यापक प्रमाणावर वापरता येतील, अशाच वस्तू तयार केल्या जाव्यात. जगभर अनेक डिझायनर अशा विस्तृत स्वरूपात उपयोगी असणाऱ्या वस्तू प्रत्यक्षात आणण्याच्या मागं लागलेले आहेत. वय, आर्थिक स्थिती, स्त्री-पुरुष, देश, भाषा, जात, शारीरिक सक्षमता अथवा अक्षमता असा कोणताही भेदभाव आड न येत प्रत्येकाला सहज समजतील, उपलब्ध होतील आणि वापरता येतील, अशी उत्पादनं डिझाइन केली जात आहेत. डिझाइनच्या या शाखेला ‘सार्वत्रिक डिझाइन’ म्हणून संबोधता येईल.

अशा सर्वसमावेशक डिझाइनची गरज गेल्या २५-३० वर्षांतच प्रामुख्यानं चर्चेत असली, तरी फार पूर्वीपासूनच ती जाणवलेली आहे.
नियमित आकाराच्या कात्रीनं आपल्यापैकी बहुतांश मंडळी व्यवस्थित कापू शकतात; पण डावखुऱ्या व्यक्ती त्याच कात्रीनं तेच काम नीटसं करू शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी वेगळ्या कात्र्या डिझाइन केल्या गेल्या. आता डावखुऱ्या लोकांची संख्या खूपच कमी म्हणजे लोकसंख्येच्या जेमतेम १० टक्केच असल्यामुळं या वेगळ्या कात्र्यांचा खप फारसा होऊ शकत नाही. शिवाय, एखाद्या घरात अथवा व्यावसायिक गाळ्यात जर दोन्ही हातांचा वापर केला जात असेल, तर मग नेमकी कोणती कात्री ठेवायची? हे एक सहज समजू शकेल असं उदाहरण झालं.

अशा कित्येक समस्या शारीरिक किंवा इतर प्रकारच्या वेगळेपणामुळं पाहण्यात येतात. लहान मुलांना मोठ्या तोंडाच्या बरण्या उघडता येत नाहीत. पार्किन्सनचा आजार झालेल्यांना दिव्याची किंवा इतरही बटणं अचूकपणे दाबता येत नाहीत. कमी उंचीच्या व्यक्ती बस किंवा रेल्वेमध्ये सामान ठेवण्याच्या कप्प्यापर्यंत बॅग चढवू शकत नाहीत. उंच व्यक्तींना कमी उंचीच्या दारांतून वाकून जावं लागतं. रंगांध व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलचा संदेश समजू शकत नाहीत. याहून बरीच मोठी गैरसोय होते ती कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या व्यक्तींची.

सार्वजनिक ठिकाणचे जिने, पायऱ्या, छोटी दारं असलेल्या खोल्या अथवा व्हीलचेअर आत जाऊ न शकणारी छोटी शौचालयं, जास्त उंचीवर असलेली दिव्यांची/इतर उपकरणांची बटणं, नळ... या सगळ्याच गोष्टींचा विचार करून आपल्या देशात ‘सुगम्य भारत अभियान’ खुद्द पंतप्रधानांनीच सुरू केलं आहे. हेतू असा की यापुढं विकलांगांना सोईस्कर अशाच जागा योजल्या जाव्यात आणि देश सगळ्यांसाठी सुखकर व्हावा.
तर अशा या सार्वत्रिक किंवा सर्वसमावेशक डिझाइनची पद्धतशीर सुरवात १९९० च्या दशकात रोनल्ड मेस या अमेरिकी आर्किटेक्‍टनं प्रॉडक्‍ट डिझायनर, इंजिनिअर आणि पर्यावरणावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर केली. या टीमनं सार्वत्रिक डिझाइन कसं असावं, याची काही तत्त्वं निश्‍चित केली.

 पहिलं तत्त्व म्हणजे प्रत्येक डिझाइन प्रत्येक व्यक्तीला समान (Equitable) लेखेल, असंच योजलं जावं. वय, लिंग, आर्थिक किंवा शारीरिक क्षमता यांपैकी कोणत्याही घटकाचा परिणाम डिझाइनच्या उपयुक्ततेवर होऊ नये.

 दुसरं तत्त्व म्हणजे Flexibility. म्हणजेच डिझाइन असं असावं, की अनेक प्रकारे आणि अनेक गोष्टींसाठी एखाद्या वस्तूचा वापर शक्‍य व्हावा. दोन्ही हातांनी वापरता येणारी कात्री किंवा मोठ्या आकाराची बटणं याच तत्त्वात बसतात.
 तिसरं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे डिझाइन साधं आणि समजायला सोपं (Intuitive) असावं. शैक्षणिक, बौद्धिक अथवा भाषेच्या आकलनाचा फरक डिझाइनच्या कामगिरीवर दिसू नये. वापरणारी व्यक्ती कमीत कमी विचारांद्वारे आणि प्रयासाद्वारेही त्या वस्तूची मूलभूत कार्यक्षमता उपभोगू शकली पाहिजे. याचं अगदी रोजच्या वापरातलं उदाहरणं म्हणजे सोशल मीडिया. आज प्रत्येक व्यक्ती फोटोग्राफी, सामाजिक मतप्रदर्शन किती सहजपणे करू शकते. राजकीय किंवा धार्मिक मतप्रदर्शन, मित्र-मैत्रिणींच्या किंवा केवळ तोंडओळख असलेल्या ’Friends’ च्या आयुष्यावर स्वैर भाष्य अशा केवळ १० वर्षांपूर्वी समाजात अशक्‍य असलेल्या बाबी आज या एका सोशल मीडिया ॲपच्या साध्या-सोप्या डिझाइनमुळं आयुष्याचा अपरिहार्य भाग होऊन बसल्या आहेत. केवळ भारतातच १६ कोटी लोक फेसबुकचा वापर करतात. जर हे ॲप वापरायला आणि समजायला सोपं नसतं, तर ही एवढी मोठी संख्या दिसणं अशक्‍यच होतं.

 चौथं तत्त्व म्हणजे माहिती किंवा सूचना ठळक (Perceptible) आणि सुसंगत असाव्यात. भाषेचा वापर कमीत कमी आणि रंग, बोधचिन्ह यांचा वापर जास्तीत जास्त. वेगवेगळ्या साधनांचा, उपकरणांचा एकमेकांशी मेळ असावा, महत्त्वाची नियंत्रणं, सूचना उठून दिसणाऱ्या म्हणजेच कमीत कमी चुका होऊ देणाऱ्या असाव्यात. या तत्त्वाचं अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे डिजिटल थर्मामीटर. आपल्यातल्या बऱ्याच जणांना पूर्वीचा तो झटकून झटकून लावण्याचा आणि अतोनात प्रयत्न करून तापमान वाचण्याचा थर्मामीटर नक्कीच आठवत असेल. आधीच आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आजाराची काळजी, त्यातून तो जेमतेम वाचता येणारा तापाचा आकडा! पण डिजिटल थर्मामीटरनं ही गैरसोय पार दूर करून टाकली आहे.
 सार्वत्रिक डिझाइनचं पाचवं तत्त्व म्हणजे Tolerance of Errors किंवा चुका, त्रुटी सामावून घेण्याची क्षमता. बऱ्याच ठिकाणी नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबत निरीच्छा दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे चुकीच्या वापरानं उपकरण मोडण्याची, निरुपयोगी होण्याची भीती. या तत्त्वानुसार अशी उपकरणं, साधनं डिझाइन व्हावीत, की जी चुकीच्या पद्धतीनं वापरूनही मोडू नयेत किंवा कायमची बंद पडू नयेत. मानवी चुका होण्याची मोकळीक त्या उपकरणाच्या रचनेअंतर्गतच असावी. कोणत्याही उपकरणात आपण जेव्हा संदेश, शब्द टाईप करतो तेव्हा delete, undo करण्याची संधी तिथंच दिलेली असते, ती याच तत्त्वानुसार.

सर्वसमावेशक डिझाइनबद्दल काही गैरसमजही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या तत्त्वांवर आधारलेलं डिझाइन सरधोपट नाही. नीरस किंवा कंटाळवाणं, केवळ काम एके काम करणारं नाही. सगळी तत्त्वं पाळूनही अतिशय मोहक, आनंददायी आणि आरामदायी सिद्ध झालेलं एक उत्तम उदाहरण म्हणजे OXO GOOD GRIPS. उभं, आडवं, डावीकडून उजवीकडं अथवा उजवीकडून डावीकडं कसंही वाचलं तरी तोच शब्द असणारं OXO हे नावच त्या ब्रॅंडची विचारसरणी स्पष्ट करतं. सन १९८५ च्या सुमाराला सॅम फार्बर या अमेरिकी डिझायनरला आपल्या संधिवात झालेल्या बायकोच्या स्वयंपाकघरातल्या छोट्या छोट्या कामातल्या अडचणी जाणवायला लागल्या. फळांच्या साली काढण्याचं उपकरण वापरताना तिला विशेष त्रास व्हायचा. कारण, ते धरण्यासाठी तिला व्यवस्थित पकड मिळायची नाही. सॅम यांनी तिच्यासाठी मऊ रबराची मोठी पकड असलेली सालं काढण्याची तासणी तयार केली. यातूनच पुढं १९९० मध्ये OXO या नावांतर्गत स्वयंपाकघरातली कामं सोपी करणारी १५ उपकरणं सादर करण्यात आली. आज मूळ संस्थापक जरी नसला, तरी OXO ही जगभरात लोकप्रिय, हजारो कोटींचा कारभार असलेली अतिशय यशस्वी कंपनी आहे.

सार्वत्रिक, सर्वसमावेशक डिझाइन हे फॅड नाही, तर तो एक सामाजिक जबाबदारी पेलणारा, विश्‍वासार्ह आणि व्यापक उपयुक्ततेची बांधिलकी मानणारा स्वागतार्ह प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com