नेमके अनुभव (आश्विनी देशपांडे)

नेमके अनुभव (आश्विनी देशपांडे)

सर्वसमावेशक डिझाइनचा पुढचा टप्पा म्हणजे अनुभवात्मक (Experiential) डिझाइन. अशा प्रकारची डिझाइन करणाऱ्यांकडं अनेक कौशल्यं असावी लागतात. भूमिती आणि त्रिमितीची जाण, स्पर्श, दृष्टी आणि भाषाज्ञानाबद्दल तीव्र संवेदनशीलता, मानववंशशास्त्र आणि संस्कृतीबाबत विधायक दृष्टिकोन हे तर हवंच; शिवाय ध्येय, तत्त्व, मूल्य हे सगळं गोष्टीरूपात सोपं आणि रंजक करून सांगण्याचं तंत्रही डिझायनरकडं असणं अत्यावश्‍यक असतं.

‘ए  खादी गोष्ट केवळ शब्दांत सांगितली, तर ती विसरली जाईल. तीच गोष्ट दाखवली, तर लक्षात राहील. मात्र, त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आला, तर ती पूर्णपणे समजेल, आत्मसात होईल,’ अशी एक चिनी म्हण आहे.  सर्वसमावेशक डिझाइनचे काही पैलू गेल्या लेखात होते. सर्वसमावेशक डिझाइनचा पुढचा टप्पा म्हणजे अनुभवात्मक (Experiential) डिझाइन.

कंपनी किंवा ब्रॅंडची सकारात्मक प्रतिमा उभी करण्यामागं केवळ जाहिरात किंवा दुसरा कोणताही एकतर्फी संवाद पुरेसा नसतो. जिथं जिथं ब्रॅंड आणि त्याच्याशी निगडित समुदाय समोरासमोर येण्याची शक्‍यता असते, त्या प्रत्येक जागी एक परिणामकारक अनुभव निर्माण करता येतो. ही जागा प्रत्यक्ष, म्हणजे कारखाना, ऑफिस, दुकान, प्रदर्शन असो अथवा वेबसाइट, ॲप अशी डिजिटल असो, त्या प्रत्येक माध्यमात एका विशिष्ट अनुभवाची संकल्पना केलेली असते. या लेखात वेगवेगळ्या जागांचं अनुभवात रूपांतर कसं केलं जातं, हे पाहू या.

बॅंक, फॅशन स्टोअर किंवा रेस्टॉरंट अशा अगदी माहितीच्या, नेहमीच्या जागी भेट द्यायची असली, तरी आपण एक प्रवास करतो. तो त्या जागेची चालू राहण्याची वेळ, सुटीचा वार याबाबत माहिती घेण्यापासून ते तिथं पोचल्यावर पार्किंग, आत रांगेत किंवा बाहेर वाट पाहणं, प्रत्यक्ष व्यवहार संपवून बाहेर येणं आणि एकंदरीत त्या भेटीबाबतची आठवणीत राहणारी अनुभूती हा सगळा कळत-नकळत झालेला प्रवासच असतो.

अशा एखाद्या भेटीचा अनुभव सकारात्मक होण्यासाठी त्या प्रवासातला प्रत्येक टप्पा सोपा, उपयुक्त आणि सुखकर होईल अशा प्रकारे योजता येऊ शकतो, डिझाइन करता येतो. शिवाय त्या टप्प्यात ब्रॅंडबाबतची खास मूल्यंही अनुभवता आली किंवा एखादी निवडक कथा थोडक्‍यात सादर झाली, तर मागं राहणारी आठवण अधिकच अर्थपूर्ण ठरू शकते.

भेट देणारी व्यक्ती नेमक्‍या योजनेप्रमाणे प्रवास करून प्रत्येक टप्प्यावर अचूक संदेश घेऊन पुढं जात असेल तर उत्तमच; पण माणसाचं मन आणि त्याची पुढची दिशा याचा अंदाज लावून तो शंभर टक्के प्रत्यक्षात घडवणं हे अतिशय अवघड काम आहे. म्हणूनच अनुभव म्हणजेच Experience डिझाइन करणाऱ्यांकडं अनेक कौशल्यं असावी लागतात. भूमिती आणि त्रिमितीची जाण, स्पर्श, दृष्टी आणि भाषाज्ञानाबद्दल तीव्र संवेदनशीलता, मानववंशशास्त्र (Ethnography) आणि संस्कृतीबाबत विधायक दृष्टिकोन हे तर हवंच; शिवाय ध्येय, तत्त्व, मूल्य हे सगळं गोष्टीस्वरूपात सोपं आणि रंजक करून सांगण्याचं तंत्रही डिझायनरकडं असणं खूपच महत्त्वाचं ठरतं. याचीच काही उदाहरणं पाहू या.

आज जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’ ही कंपनी जेव्हा त्यांचं पाहिलं मोठं ऑफिस उभारत होती, तेव्हा आजच्यासारखी ‘सिंगल विंडो’ पद्धत नव्हती. नवीन व्यवसाय, तोही माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उभारणं, ही एक अथक जिद्द, चिकाटी आणि दीर्घ प्रयत्नांनी साध्य होणारी बाब होती. भगीरथ राजानं अनेक वर्षं तपस्या करून गंगा नदी पृथ्वीवर आणल्याची पुराणातली कथा सुप्रसिद्ध आहे. चिकाटीच्या प्रयत्नांना ‘भगीरथ प्रयत्न’ असं त्यावरूनच म्हटलं जातं. ‘पर्सिस्टंट’च्या इमारतीचं नाव ‘भगीरथ’ ठेवणं हे योग्यच होत. मात्र, इमारतीत प्रवेश केल्यावर देश-विदेशातल्या पाहुण्यांना या नावामागची कथा आणि ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’शी त्या कथेचा संबंध कसा समजणार, हा प्रश्न होता. तेव्हा डिझाइन टीमनं एक छोटीशी, प्रतीकात्मक गंगा म्हणजे सतत पाणी वरून खाली येणारी पाण्याची भिंत स्वागतकक्षात उभारली आणि शेजारी ‘भगीरथ’ प्रयत्नांची गोष्टच लिहून काढली. पाण्याच्या आवाजात मन शांत करण्याची शक्ती असते आणि वाहतं पाणी पाहून एक सुखद अनुभूतीही मिळते. असा हा नावामागची कथा सांगणारा अनुभव.
***

दुसरं उदाहरण आहे नावाजलेल्या दुचाकी कंपनीचं. बजाज ऑटो कंपनीनं जेव्हा सुधारित ब्रॅंडिंगचा उपक्रम केला, तेव्हा बोधचिन्ह (Logo) तर बदललंच; पण त्याबरोबर अतिशय पद्धतशीरपणे कंपनीची मूल्यं, ध्येयं आणि उद्दिष्टं प्रत्येक कर्मचाऱ्याला समजतील अशा प्रकारे प्रकाशित केली. मूल्य केवळ कागदोपत्री न राहता व्यवस्थापन ते कामगारवर्गापर्यंत प्रत्येकानं ती आत्मसात करावीत म्हणून अनेक कार्यशाळा घेतल्या गेल्या. त्याचबरोबर ती मूल्यं सतत डोळ्यासमोर राहावीत, प्रत्यक्ष जगता यावीत यासाठी आमच्या डिझाइन टीमनं एक अतिशय कल्पक अनुभव निर्माण केला.

असं म्हणतात की जीवनमूल्य अढळ असावीत. एखाद्या पोलादी स्तंभाप्रमाणे ती वादळवाऱ्यातही मजबूत आणि स्थिर राहावीत. यापासून स्फूर्ती घेऊन प्रत्येक मूल्यासाठी एक स्तंभ फॅक्‍टरीच्या आवारात एका वर्तुळात उभारले गेले. प्रत्येक स्तंभावर एक मूल्य लेझर तंत्रज्ञानाद्वारे कोरलं गेलं. स्तंभाची उंची आणि रचना अशा खुबीनं केली गेली, की एका विशिष्ट जागी उभं राहिल्यावर ते पाचही स्तंभ जणू एक भिंतच आहेत असं वाटावं आणि त्यावर कोरलेला भव्य लोगो प्रकट व्हावा. हा एक जादूई अनुभव होता आणि स्तंभाभोवती सहज फेरफटका मारताना तो अकस्मात पुढं आल्यावर फारच अनोखा वाटावा, अशीच योजना होती. या कल्पनेला अतिशय उत्तम प्रतिसाद तर मिळालाच; शिवाय कंपनीची मूल्यं समजून घेणं, आत्मसात करणं हा ‘पुस्तकी पाढा’ न राहता एक जिवंत अनुभव झाला.
***

कंपनीचे पंख सातासमुद्रापलीकडं भरारी घेत असताना ‘आम्ही जागतिक पातळीवर झेप घेतलेली आहे, यासाठी तयारी म्हणजे आमची टीमही आता स्थानिक राहिली नसून ती राष्ट्रीय आणि त्याही पुढं जाऊन जागतिक झालेली आहे, हा संदेश सगळ्यांपर्यंत कसा पोचवायचा’ असा एक मुद्दा ‘प्राज’ या अतिशय उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीपुढं होता.

संस्कृतीची सगळ्यात सोपी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे भाषा आणि लिपी. डिझाइन टीमनं भारतीय आणि विदेशी लिप्या वापरून ‘प्राज’ कंपनीच्या स्वागतकक्षात एक भव्य असं म्यूरल उभं केलं. प्रत्येक लिपीच्या सौंदर्याबरोबरच ज्याला जी लिपी वाचता येईल, त्याला एक वेगळा शब्दसमूह मिळेल आणि तो प्रत्येकासाठी अगदी वैयक्तिक संदेश ठरेल, अशी कल्पना होती. वेगवेगळ्या भाषांमधले शब्द कंपनीच्या मूल्याशीच निगडित होते. त्यामुळं सौंदर्यानुभूतीबरोबरच ‘जागतिक स्थान’ आणि ‘जोपासलेली मूल्यं’ असे दोन संदेश सहजपणे पोचवता आले.
आपल्या आसपास काही उत्स्फूर्त आणि काही काळजीपूर्वक आखलेले असे अनेक अनुभव असतात. त्यांचा डोळसपणे आनंद घ्यायचा की संधी नजरेआड करायच्या हे आपल्यावरच अवलंबून आहे. तुम्हाला असे काही खास अनुभव आले असतील, काही लपलेले संदेश तुम्ही शोधून काढले असतील तर जरूर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com