ब्रॅंडिंग क्रीडास्पर्धांचं (आश्विनी देशपांडे)

ब्रॅंडिंग क्रीडास्पर्धांचं (आश्विनी देशपांडे)

केवळ सामने जिंकून लोकप्रियता मिळते, असं नाही. चाहत्यांसोबत सातत्यानं संपर्क, संघांचे झेंडे, टी शर्ट, प्रत्यक्ष भेटी-गाठी, छोट्या-मोठ्या स्पर्धा, सोशल मीडियाद्वारे संदेश, सामाजिक कार्याला पाठिंबा, छोट्या चाहत्यांचं क्रीडाप्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांद्वारे संघाचा ब्रॅंड तयार व्हायला लागला, की त्या संघाची आर्थिक जबाबदारी उचलायला प्रायोजक पुढं येऊ लागतात. या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन हे आता एक शास्त्रच झालं आहे.

सध्या आयपीएलचं वातावरण आहे. क्रिकेटचे लाखो चाहते आपल्या मनपसंत टीमचे टी शर्ट घालून मॅच बघायला स्टेडियमला जातात किंवा टीव्ही-इंटरनेटवर सामने बघून आपली तहान भागवत आहेत. काही संघ अस्तित्वात येऊन १० वर्षं झाली असली, तरी पुण्यासारख्या टीमला केवळ दोनंच वर्षांचं पाठबळ आहे आणि तरीही या टीमला मोठ्या प्रमाणावर चाहते लाभले आहेत. मैदानावर वा बाहेर त्या चाहत्यांची तीव्र, उत्कट आवड जागोजागी पाहायला, अनुभवायला मिळते. अर्थात या सगळ्या टीम आपल्याच देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशांच्या किंवा शहरांच्या असल्यामुळं त्यांना भारतीय चाहते मिळणं यात विशेष आश्‍चर्य नाही; पण ‘मॅंचेस्टर युनायटेड’, ‘आर्सेनल एफसी’ किंवा ‘रिअल माद्रिद’ या फुटबॉल टीम भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. हे कसं? जसं गाड्या, घरगुती उपकरणं, साबण, शीतपेयं, मोबाईल फोन, बूट यांचं ब्रॅंडिंग अतिशय काळजीपूर्वक केलं जातं आणि त्या ब्रॅंडशी संबंधित गटांमध्ये त्यांचा पद्धतशीर प्रसार केला जातो, त्याचप्रमाणे क्रीडासंघ आणि क्रीडास्पर्धाचंही योजनापूर्वक ब्रॅंडिंग केलं जातं.

केवळ सामने जिंकून लोकप्रियता मिळते, असं नाही. चाहत्यांसोबत सातत्यानं संपर्क, संघांचे झेंडे, टी शर्ट, प्रत्यक्ष भेटी-गाठी, छोट्या-मोठ्या स्पर्धा, सोशल मीडियाद्वारे संदेश, सामाजिक कार्याला पाठिंबा, छोट्या चाहत्यांचं क्रीडाप्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांद्वारे संघाचा ब्रॅंड तयार व्हायला लागला, की त्या संघाची आर्थिक जबाबदारी उचलायला प्रायोजक पुढं येऊ लागतात. या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन हे आता एक शास्त्रच झालं आहे.

आमच्या टीमला या क्षेत्रात काम करण्याची पहिली संधी पुण्यात झालेल्या नॅशनल गेम्समुळं मिळाली. बालेवाडीचं स्टेडियम त्याच काळात उभारण्यात आलं होतं आणि संपूर्ण शहराला या स्पर्धांबाबत उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळी साईनेज्‌, नकाशे, खेळांची बोधचिन्हं तयार करण्यात आली होती.

मात्र, क्रीडास्पर्धांच्या ब्रॅंडिंगचा मोठा आवाका समजला तो पुण्यातच झालेल्या ‘कॉमनवेल्थ यूथ गेम्स’साठी ब्रॅंडिंग करायची जी संधी मिळाली, त्या संधीमुळं.
सत्तरपेक्षा जास्त देशांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धा आपल्याच देशात आयोजित व्हाव्यात, यासाठी कित्येक देशांमध्ये स्पर्धा असते.  

२०१० च्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’ आयोजित करण्याची संधी मिळवण्यात भारताला यश आल्यावर साहजिकच २००८ मध्ये होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ यूथ गेम्स’ म्हणजे १४ ते १८ वर्षं वयोगटासाठी होणाऱ्या स्पर्धाही भारतातच होणार हे निश्‍चित झालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती संधी पुण्याला देण्यात आली.

ऐनवेळी माहिती पुरवून डिझाइनचं काम झटपट करून मागणारे लोक तर नेहमीचेच; पण ‘कॉमनवेल्थ यूथ गेम्स’ची टीम ब्रॅंडिंग आणि डिझाइनचं महत्त्व पुरेपूर समजून होती. २००८ मध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी त्यांनी आम्हाला तब्बल हजार दिवस आधी, म्हणजे २००५ मध्येच, चर्चा करायला बोलावणं पाठवलं. ही डिझाइन टीमच्या दृष्टीनं काहीतरी उत्तम काम करून दाखवण्याची पर्वणीच होती. नऊ प्रकारचे गेम्स, ७१ देशातून येणारे १३०० च्या वर स्पर्धक आणि  ३५० च्या आसपास अधिकारी व प्रशिक्षक या प्रकारचा आणि आकाराचाही आंतर्देशीय स्तरावरचा कार्यक्रम उभारायचा, ही जितकी मोठी संधी होती, तितकीच मोठी ती जबाबदारीही होती. आपलं शहरचं नव्हे, तर आपल्या देशाची प्रतिमा उंचावर नेण्याची जबाबदारी पेलायची म्हणजे सर्जनशीलतेबरोबरच नियोजन आणि व्यवस्थापनही जोरदार हवं. जे काही काम केलं जाईल, त्यात आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब तर असावंच; शिवाय ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा दिमाख वाढवणारंही असावं, असा विचार घेऊन हे काम सुरू झालं.
योगायोगानं त्याच सुमाराला आपल्या शहराला एक बोधचिन्ह असावं, अशा कल्पनेनं आमच्या डिझाइन टीमनं पुण्याच्या स्फूर्तिस्थानांवर संशोधन सुरू केलं होतं. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तयार करण्यात आलेल्या मुद्रेपासून प्रेरणा घेऊन ‘पुणे’ ही अक्षरं इंग्लिश आणि देवनागरीत एखाद्या शिक्‍क्‍यासारख्या वर्तुळात बसवून हे बोधचिन्ह आम्ही निश्‍चित केलं होतं. हे बोधचिन्ह कॉमनवेल्थ यूथ गेम्सच्या बोधचिन्हाचाच एक भाग व्हावं, हे साहजिकच ठरलं; पण दुसरा भाग खेळांशी संबंधित असावा आणि तोही आपल्या संस्कृतीतून प्रेरणा घेऊन बनावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला.

महाराष्ट्राची कलासंस्कृती पाहिली, तर वारली पद्धतीची चित्रकला विशेष उठून दिसते. वारली समुदायात घराच्या भिंतींवर रोजच्या घडामोडी, उत्सव, खेळ, ऋतुमानानुसारचे बदल, कुटुंबातल्या व्यक्ती अशा अनेक घटकांचा समावेश असलेली विशिष्ट शैलीतली चित्र काढली जातात. हीच शैली वापरून जे नऊ क्रीडाप्रकार या गेम्समध्ये खेळले जाणार होते, त्यांची बोधचिन्हं तयार करण्यात आली. पुण्याच्या वर्तुळाकार बोधचिन्हासमोर वारली शैलीतला धावपटू वर्तुळात चपखल बसवून एक संपूर्ण logo तयार झाला.

 त्याचबरोबर खेळात रस नसलेल्यांनाही या गेम्समध्ये रस वाटावा, वेगवेगळ्या वयोगटांना या कार्यक्रमाबाबत आवड निर्माण व्हावी म्हणून ‘जिगर’ नावाचा खेळगडी ‘घडवण्यात’ आला. वाघाच्या बच्च्याप्रमाणेच तो चपळ आणि थोडासा मिश्‍किल होता.
अडीच-तीन वर्षं या स्पर्धांबाबत कुतूहल आणि उत्कंठा निर्माण करून ती कायम ठेवायची असेल, तर खेळांशिवाय इतरही कार्यक्रम योजावेत असं लक्षात आलं. पुणेकरांचा मोठा आणि उत्साही सहभाग मिळावा म्हणून आमच्या टीमनं ‘आता ७५० दिवसांवर’ किंवा ‘५०० दिवस पुढे’ अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजिले. शिवाय, तीन लक्षणीय उपक्रम जाहीर करण्यात आले. पहिला आणि सहभागाच्या दृष्टीनं महत्त्वाचा उपक्रम म्हणजे, गेम्स हे एखादा सण-समारंभ असल्यासारखे ‘साजरे’ केले जावेत, अशा प्रकारचं ब्रॅंडिंग योजण्यात आलं. Festive Pune अशी कल्पना त्यात गुंफली गेली.

पर्यावरणाची हानी शक्‍यतो होणार नाही, ऊर्जेचा वापर जपून होईल आणि कचरानिर्मूलन योग्य पद्धतींनी होईल, असा केवळ गेम्सच्याच काळात नव्हे; तर नेहमीच राबवला जावा, असा एक उपक्रम हाती घेण्यात आला. त्याला Green Pune असं संबोधण्यात आलं.

आपल्या शहरात त्या वेळी हजारो विदेशी पाहुणे येणार होते. तेव्हा त्यांचं स्वागतही अगत्यपूर्वक आणि शिस्तबद्धपणे व्हायला हवं होतं, हे नक्कीच. त्यासाठी शहरातून मोठ्या संख्येनं स्वयंसेवक आवश्‍यक होते. हे काम करण्यासाठी खास जोम यावा म्हणून Team Pune ही योजना स्वयंसेवकांसाठी तयार करण्यात आली. त्यात केवळ पुणेच नव्हे, तर अनेक देशांतल्या स्वयंसेवकांनी अतिशय उमेदीनं काम केलं.
शहरातली दिशादर्शक साईनेज्‌, नकाशे, विमानतळ, रस्ते, स्टेडियम, हॉटेलं याचं सुशोभीकरण, वेगवेगळे गणवेश, टी शर्ट, स्मरणिका, स्मरणचिन्हं, खेळाडूंसाठी स्वागतसंच, पत्रकारांसाठी माहितीसंच, प्रशस्तिपत्रं, सुवर्ण-रजत-कांस्यपदकं अशा दोन हजारांहून अधिक गोष्टी आमच्या टीमनं संपूर्ण नियोजन करून डिझाइन केल्या आणि तितक्‍याच काळजीपूर्वक प्रत्यक्षात आणल्या.

प्रत्येक रंगसंगती, रचना अर्थपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचीच होती. हे काम म्हणजे एक मोठं आवाहन होतं. ते समर्थपणे पेलून पुण्याची शान ७१ देशांमध्ये पोचवण्यात जे यश मिळालं, ते टीमच्या उत्कट आणि अथक्‌ परिश्रमांचंच.
याच गेम्ससाठी अत्यंत नावीन्यपूर्ण आणि सार्थ ‘बॅटन’ डिझाइन करण्यात आलं होतं...त्याची कथा पुढच्या लेखात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com