पाकिस्तानमधील लोकशाहीचा नंदादीप निमाला...

asma
asma

मानवाधिकार व लोकशाही विचाराचे ज्वलंत प्रतिनिधित्व करणाऱ्या पाकिस्तानमधील धैर्यशील विचारवंत अस्मा जहांगीर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. पाकिस्तानमधील गेल्या काही दशकांतील राजकीय व्यवस्थेचा अभ्यास असलेल्यांना अस्मा जहांगीर यांचे नाव माहिती नसणे अशक्‍यच आहे. इस्लामच्या तत्त्वावर निर्माण झालेल्या या देशात सातत्याने आलेल्या विविध हुकूमशहांच्या राजवटींमध्ये लोकशाही व्यवस्थेची अनेकदा लक्तरे निघाली. लोकशाही व मानवाधिकारांची मूल्ये दैनंदिन राजकारणात अक्षरश: पायदळी तुडविणाऱ्या येथील राजकीय व्यवस्थेस जर कुणाची भय वाटले; तर ते अस्मा जहांगीर यांचेच होते. पाकमध्ये सातत्याने हिंसाचार आणि दहशतवादाचे थैमान सुरु असतानाही अस्मा जहांगीर या जणु येथील लोकशाही व्यवस्थेचा तेवणारा ओजस्वी नंदादीप होत्या.

1952 मध्ये जन्मलेल्या अस्मा यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात 80 च्या दशकातील पाकिस्तानी लष्करशहा जनरल झिया उल हक यांच्या राजवटीस दर्शविलेल्या प्रखर विरोधामधून झाली. झिया यांच्या पाकिस्तानच्या संपूर्ण इस्लामीकरण करण्याच्या धोरणाच्या त्या कडव्या टीकाकार होत्या. पाकिस्तानमधील ईश्‍वरनिंदा (ब्लास्फेमी) आणि "हुडूड' (बलात्कारप्रकरणी महिलेसच स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करता न आल्यास शिक्षा केली जाण्यासंदर्भातील नियम) संदर्भातील कायद्यांवरही अस्मा यांनी बेधडकपणे टीकेचे आसूड ओढले होते. 83 मध्ये झियांची राजवट असताना लोकशाही पुन:प्रस्थापित करण्यासंदर्भातील आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पाकिस्तानमधील अन्यायी राजवटींचा बळी ठरलेल्यांसाठी अप्रतिहत संघर्ष करणाऱ्या अस्मा यांना अनेक वेळा कैद व नजरकैद झाली.

पाकिस्तानात 1987 मध्ये मानवाधिकार आयोगाची स्थापना करणाऱ्या अस्मा यांचे कार्य जगभरातून वाखाणण्यात आले होते. याचबरोबर, अस्मा यांनी त्यांच्या भगिनी हीना जलानी आणि इतर दोन वकिलांबरोबर पाकिस्तानमधील केवळ महिलांची असलेली पहिली कायदा सल्लागार कंपनीही स्थापन केली होती. 1996 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने पाकिस्तानमधील सज्ञान मुस्लिम महिला तिच्या पालकांच्या परवानगीशिवाय विवाहबद्ध होऊ शकत नाही, असा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे स्वतंत्रपणे पती निवडलेल्या अनेक महिलांचे विवाह रद्द होण्याचा धोका असल्याचे अस्मा यांनी परखडपणे दाखवून दिले होते. याशिवाय, बालहक्कांविषयीही त्या अत्यंत जागरुक व सक्रिय होत्या.पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक, पीडित महिला आणि बालकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची संयुक्त राष्ट्रसंघानेही अत्यंत आत्मीयतेने दखल घेतली. पाकिस्तानमधील मानवाधिकारांसंदर्भात या आयोगाकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या वार्षिक अहवालास जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठा आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यातही आले होते.

अस्मा यांच्या व्यक्तिमत्त्वास नैतिकतेचे शुभ्रधवल अधिष्ठान होते. केवळ मानवतेच्या उच्च मूल्यांसाठी आग्रही असलेल्या अस्मा यांना प्राण जाण्याचे भय कधी स्पर्शच करु शकले नाही. विशेषत: पाकिस्तानमधील ईश्‍वरनिंदेच्या (ब्लास्फेमी) कुप्रसिद्ध कायद्याच्या कचाट्यात अडकणाऱ्या नागरिकांची बाजु न्यायालयासमोर मांडताना त्यांनी दर्शविलेले शौर्य केवळ अतुलनीय होते. ईश्‍वरनिंदेच्या पाकिस्तानमधील कायद्यांतर्गत इस्लामशी संबंधित कोणत्याही विषयामध्ये टीका केल्यास थेट मृत्युदंडाची तरतूद आहे. या कायद्याबद्दल येथील जनमतही अत्यंत भावनिक व हिंसक आहे. गेल्याच वर्षी (2017) पाकमधील अब्दुल वली खान विद्यापीठामध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याची जमावाने विद्यापीठाच्या आवारामध्येच क्रूरपणे हत्या केली. या विद्यार्थ्याने फेसबुकवर ईश्‍वरनिंदा करणारा मजकूर लिहिल्याचा जमावाचा आरोप होता. विशेषत: पाकिस्तानमधील हिंसक इस्लामी राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर या कायद्याच्या विरोधात बोलणे म्हणजे मृत्युलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. या पार्श्‍वभूमीवर अस्मा यांनी गेल्या काही दशकांत केलेल्या प्रचंड कार्याची महती पटण्यास हरकत नाही.

"1986 मध्ये पाकिस्तानमध्ये ईश्‍वरनिंदेचा कायदा अस्तित्वात आला. त्या वर्षाआधी पाकिस्तानमध्ये ईश्‍वरनिंदेसंदर्भातील केवळ दोन प्रकरणे होती. आता पाकिस्तानमध्ये ईश्‍वरनिंदेसंदर्भातील हजारो प्रकरणे आहेत. तेव्हा कायदे करण्याच्या प्रक्रियेत धर्म आणताना अत्यंत काळजी घेणे आवश्‍यक आहे हेच यामधून दिसून येते. कारण कायदा हेच अत्याचार करण्याचे साधन बनु शकत नाही,'' अशी भूमिका त्यांनी नुकतीच मांडली होती. त्यांच्या आयुष्यभराच्या निर्भय कार्याचे हेच प्रातिनिधिक सूत्र होते.

पाकिस्तानमधील जखमी लोकशाहीचे मूर्त चित्र असलेल्या अस्मा यांचे घर हे अन्यायग्रस्त घटकांचे एक हक्काचे आश्रयस्थान होते. याशिवाय मित्रमंडळी, राजकीय नेते, माध्यम प्रतिनिधी, याचिकाकर्ते अशा कोणत्याही भूमिकेतून येणाऱ्या सर्वांचेच अस्मा यांच्याकडून स्वागत होई. तत्त्वांसाठी आयुष्यभर झगडलेल्या अस्मा यांचे आयुष्य सततच्या संघर्षामुळे तामसी, वैराण झाले नव्हते. त्या रसिक होत्या. त्यांची विनोदबुद्धीही उत्तम होती! अस्तित्वासाठी झगडत असलेल्या हिंसक व मूलतत्त्ववादी पाकिस्तानमध्ये लोकशाही मूल्यांनुसार जगु इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठीच त्या मूर्तिमंत आदर्श होत्या. त्यांच्या मृत्युमुळे पाकिस्तानचीच नव्हे; तर लोकशाही विचाराची हानी झाली आहे.

पाकिस्तानमधील या प्रेरणादायी मातेस भावपूर्ण श्रद्धांजली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com