सणांची समृद्ध दक्षिण परंपरा

सणांची समृद्ध दक्षिण परंपरा

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात युगाधी
भारताचा दक्षिण भाग कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळमध्ये विभागलाय. येथील निसर्ग जेवढी विविधता दाखवितो तेवढीच प्रत्येक राज्यातील परंपराही भिन्न. त्यांचे कॅलेंडर किंवा पंचांगही वेगळे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आता तेलंगणाचं कॅलेंडर समान असतं (ग्रेगॅरिअन कॅलेंडर सगळीकडेच समान असतं); तर या कॅलेंडरनुसार आपला गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेला असतो, तसाच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात उगाधी किंवा युगाधी साजरं केलं जातं त्याच मुहूर्तावर. चैत्र शुद्ध प्रतिपदेला तेथे हा सण साजरा करून नवीन वर्षाची सुरवात केली जाते. युगाधी (किंवा उगाधी) म्हणजेच नवीन युगाचा प्रारंभ, असा अर्थ आहे याचा. या दिवशी दारात रांगोळी काढली जाते. फुलांनी-पानांनी दारापुढे सजावट केली जाते. त्याला ‘कोलम’ असं म्हणतात तिकडे. आपल्याकडे कुठल्याही इतर शुभप्रसंगी जसे दारात आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जातं, तसंच आंब्याच्या पानांचं तोरण लावून नवीन वर्षाचं स्वागत होतं. त्या दिवशी सुगंधी तेल लावून घरातील सर्वांनी अंघोळ करून नवीन कपडे लेऊन एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर, तेथे नैवेद्यात ‘पचडी’ म्हणजेच आपल्याकडील चैत्री कोशिंबीर (आंब्याची) करण्याचीही पद्धत आहे. कडुलिंबाची चटणी व होलिगे म्हणजेच पुरणपोळी आणि साजूक तुपाचाही नैवेद्य दाखविला जातो. अशा पद्धतीने नवीन वर्षाची सुरवात महाराष्ट्र आणि गोव्यासारखेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही होते. मात्र तमिळनाडू आणि केरळमध्ये ग्रेगॅरिअन कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष एप्रिलमध्ये सुरू होते. तमिळनाडू आणि पदुच्चेरीमध्ये नव्या वर्षाच्या या सणाला ‘पुत्थांदू’ म्हणतात. केरळमध्ये आणि कर्नाटकच्या तुळू भागात याला ‘विशु’ म्हणतात. असं असलं तरी हा दिवस केरळमध्ये नववर्षारंभ नसतो. तमिळनाडूमध्ये, मदुराईत मीनाक्षी मंदिरात महिनाभर हा उत्सव सुरू असतो. ‘चित्राई तिरुविजा’च्या या उत्सवाला सुमारे दहा लाख भाविक उपस्थित असतात. या उत्सवाचे पहिले पंधरा दिवस मीनाक्षी देवीचा अभिषेक आणि मीनाक्षी देवी व सुंदरेश्‍वराचा विवाह सोहळा यात साजरे केले जातात. मात्र, या सणाचे घरगुती स्वरूप हे आपल्या गुढीपाडव्यासारखेच असते. गुढी उभारत नाहीत. पण, कोलम (तांदळाच्या पिठानं आणि फुलांनी काढलेली रांगोळी), दारात तोरण, नवीन कपडे लेऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणं. हे सर्व तमिळनाडू, केरळमध्येही समानच असतं. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशप्रमाणेच तमिळनाडूतही पचडी केली जाते. ज्यात गूळ, आंबा, मोहरी, कडुलिंब आणि मिरची असे पदार्थ वाटून घातलेले असतात. जुने लोक म्हणतात, हे एक प्रतीक आहे, की या प्रत्येक पदार्थाच्या गुणधर्मासारखेच नवीन वर्षात अनुभव येऊ शकतात, कडू, गोड, तिखट, तुरट वगैरे. पण, या पचडीप्रमाणेच आपण त्या सर्व प्रसंगांना, अनुभवांना आपल्यात सामावून घ्यायचं. केरळमध्ये विशु म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या या नवीन वर्षारंभाच्या दिवशी ‘साद्य’ म्हणून नैवेद्य दाखविला जातो. साद्य म्हणजे केळीच्या पानावर वाढलं जाणारं पायसम, लोणचं, अवियल, भात, ताक आदी.

पौर्णिमांचे वेगळेपण
तमिळनाडूत बुद्धपौर्णिमेबरोबरच वैशाख पौर्णिमा मुरुगन जयंती म्हणून साजरी केली जाते. त्याचबरोबर अक्षयतृतीयेनंतर नरसिंह जयंतीचे नवरात्र सुरू होते. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या काही भागांत ज्येष्ठी पौर्णिमा ही वटसावित्रीची पूजा करून साजरी करतात. या शिवाय कर्नाटकात बेंदूर साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा सोबती बैल, त्याचे ऋण मानण्यासाठी कर्नाटकात बैलाचं सुशोभन करून त्याची पूजा केली जाते, त्याला पुरणपोळी खाऊ घातली जाते. आणि बेंदराच्या दिवशी बैलाला विश्रांती दिली जाते. हा बेंदूर महाराष्ट्रातील बैल पोळ्यासारखाच साजरा होतो, पण तो ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जातो.

आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतभरात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि गुरूंचे ऋण मानण्याची एक संधी आपल्याला मिळते. दक्षिण भारतातही हा दिवस असाच साजरा केला जातो. मात्र, आषाढी एकादशीला जे महत्त्व महाराष्ट्रात आहे, तसेच कर्नाटकातही आहे. वैकुंठ एकादशी म्हणून हा दिवस तिकडे माहीत असतो. या दिवशी उपवास केला जातो. पांडुरंगाची पूजा करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. 

श्रीमंत श्रावण महिना
मला वाटतं, श्रावण महिना हा सर्वच बाबतीत श्रीमंत महिना आहे. सणांची अगदी रेलचेल असते. या महिन्यात नागपंचमीपासून सणांना प्रारंभ होतो. नागपंचमीला महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिण भारतात महत्त्व आहे. विशेषतः महिलांच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असतो. कर्नाटकात भीमा अमावास्येपासून म्हणजेच दिव्यांची अमावास्या झाली, की या दिवसाची तयारी सुरू होते. अनेक ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. या पूजेत हळद-कुंकू वाहून वारुळावर फुलांची आरास रचतात आणि पुरणाची दिंडे नैवेद्य म्हणून करतात. विवाहित स्त्रिया वारुळाभोवती फेर धरून गाणी गातात; तर काही भागात मूल नसणाऱ्या काही महिला मूल व्हावे म्हणून पिंपळाच्या झाडाखाली नाग प्रतिमा म्हणजेच दगडी मूर्ती/स्तंभ ठेवून त्याची भक्तिभावानं पूजा करतात. या दिवशी घरात देवापुढे, दारापुढे नागाची रांगोळी काढून पूजा केली जाते. त्याला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवितात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही नागप्रतिमांची पूजा केली जाते. केरळमध्ये जुन्या घराच्या एका कोपऱ्यात नागप्रतिमा ठेवून तिची पूजा करतात. महिला आदल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी दुधाचा नैवेद्य दाखवून जास्वंदीच्या फुलाने ते दूध घरातील आपल्या भावाच्या पाठीवर शिंपडतात. हळदीत भिजवलेला दोरा भावाच्या मनगटावर बांधून मग उपवास सोडतात. 

श्रीकृष्ण जन्माष्टमी 
नागपंचमी संपते आणि पाठोपाठ गोकुळाष्टमी येते आणि विष्णूअवतार असणाऱ्या श्रीकृष्णाचा जन्म संपूर्ण भारतात साजरा केला जातो. कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणेच दहीकाल्याचा नैवेद्य दाखविला जातो. आंध्र प्रदेश, तमिळनाडूत निरनिराळ्या मिठाया करून हा दिवस साजरा करतात. काही ठिकाणी अंगणापासून घराच्या देव्हाऱ्यापर्यंत पावलांचे ठसे उमटवविले जातात. श्रीकृष्णाचं घरात आगमन झालं आहे, याचं प्रतीक म्हणून ही पावलं असतात. घरातील सर्वांत लहान मुलाला श्रीकृष्णाचा वेश परिधान करून पूजा आणि पाळणा झाल्यानंतर त्याला सर्वांत आधी प्रसाद दिला जातो आणि मग घरातील बाकी मंडळींना दिला जातो. या दिवशी गीतेची पारायणं, स्तोत्रांचं पठण केले जाते आणि काही ठिकाणी महिला उपवास करतात. केरळ, तमिळनाडूमध्ये सूर्योदयापूर्वी स्नान करून महिला श्रीकृष्णाची पूजा करतात. 

ओणमचा थाट 
जन्माष्टमीनंतर येणारी नारळी पौर्णिमा साजरी करून समुद्रदेवतेचं ऋण मानलं जातं. या दिवशी समुद्राची पूजा करतात आणि त्याला नारळ अर्पण करतात. जेवणात नारळाचा उपयोग करून सर्व पदार्थ बनवितात. हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मात हा सण राखी पौर्णिमा म्हणूनही साजरा होतो. या दिवशी बहिणी भावांना राख्या बांधतात व ओवाळतात. भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. या दिवशी केरळमध्ये ‘ओणम’ला प्रारंभ होतो. ओणम हा केरळच्या नवीन वर्षारंभाचा सण. दहा दिवस हा सण साजरा करतात. फुलांनी संपूर्ण घर सजवलं जातं. फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात. खाण्या-पिण्यात विविध गोड-तिखट पदार्थांची रेलचेल असते. या दिवशी महिला-मुली मोतीशुभ्र केरळी साड्या नेसून, निरनिराळे नृत्य करतात. लोकगीतं गातात; तर पुरुष मंडळी नौकाविहार करतात. या दिवशी तेथे होड्यांच्या शर्यतीही रंगतात.

श्रावण संपतो आणि जशी आपल्याकडे गौरी-गणपतीची धांदल सुरू होते, तशीच गौरीपूजेसाठी कर्नाटकातही. मातीच्या सुगडावर हळदी-कुंकवानं गौरी रेखाटल्या जातात. गौरीच्या पोटात धान्य ठेवून तिला निरनिराळे दागिने घालून सजवलं जातं आणि पूजा मांडली जाते. गौरी जेवणात तिला पुरणाचा, खिरीचा (हुग्गी) आणि निरनिराळ्या भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. गौरी आणताना पाण्याच्या स्रोतापासून घरापर्यंत गौरीची पावलं उमटवली जातात. जे भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. याशिवाय, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी गणपतीची पूजाही केली जाते. 

म्हैसूरचा प्रसिद्ध दसरा
कर्नाटकातील दसरा म्हैसूर दसरा म्हणून जगप्रसिद्ध आहे. घटस्थापना ते विजयादशमी हे दहाही दिवस म्हैसूरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. सजविलेल्या हत्तींची मिरवणूक काढली जाते. सर्वत्र फुलांची आरास, रस्ताभर रांगोळ्या काढल्या जातात. दहा दिवस रोषणाईने शहर उजळून निघते. नवरात्रोत्सवात देवीची पूजा होते. रोज अभिषेक आणि देवापुढं सतत तेवत राहणारा दिवा हे नवरात्रात असतंच. दसऱ्या दिवशी नवे कपडे लेवून दसरा महोत्सवाची तयारी केली जाते. सर्वांत मोठा सण दिवाळीचा. हा सण म्हणजे कपडे, फराळ, नातेवाइकांची रेलचेल आणि धमाल. रांगोळ्या, फटाके, सुगंधी तेल, सुवासिक फुलं, लाडू, चिवडा, करंजी हे सर्वत्र समानच असतं. केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू व कर्नाटकातील काही भागांत नाताळ सण विशेष साजरा केला जातो. कार्निव्हल्स म्हणजेच छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या जत्रा भरवून एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. नातेवाइक व मित्रमंडळींबरोबर चर्चमध्ये प्रार्थना करून मेजवानीचा आनंद घेतला जातो.

पोंगलची आगळी परंपरा
ग्रेगॅरियन कॅलेंडरप्रमाणे येणाऱ्या जानेवारीत मकर संक्रमणात तमिळनाडू आणि पुद्दुचेरी व आंध्र प्रदेशात पोंगल सण साजरा होतो. पहिल्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी जुन्या वस्तूंची होळी केली जाते. घर स्वच्छ करून सजवलं जातं. घरची संपत्ती, जनावरे स्वच्छ करून गायी, म्हशी, बैलांची शिंगं रंगवली जातात. आंध्र प्रदेशात आपल्याकडील बोरन्हाणप्रमाणेच लहान मुलांना उसाचे करवे, लहान फळं, पैसे यांच्या मिश्रणानं न्हाऊ घालतात. थाई पोंगल म्हणून दुसरा दिवस असतो. त्या दिवशी आपल्याकडे मकर संक्रांत साजरी करतात; तर दक्षिणेत सुगडीत दूध तापवून ते उतू घालवलं जातं. पोंगल या शब्दाचा अर्थ भरभरून वाहणे असा होतो. या उतू घालून उरलेल्या दुधात वर्षाच्या पहिल्या पिकातला तांदूळ शिजवला जातो. हे शिजवत असताना घरातील इतर लोक ‘पोंगल पोंगल’ असा घोष करीत असतात. पोंगल शिजवून झाले की मुरुक्कू (चकली), वडाई (डाळवडा), पायसम (खीर) अशा तिखट-गोड पदार्थांबरोबर घरातील सर्वांना वाढले जाते. यानंतरच्या दिवशी गायीची पूजा केली जाते. गायीची शिंगं रंगवून तिला सजवलं जातं. गूळ, फळं, भात असं खाणं गायींना भरवलं जातं. यानंतरचा दिवस कन्नम पोंगल म्हणजेच गाठीभेटींचा दिवस असतो. या दिवशी भाऊबीजेप्रमाणेच भाऊ आपल्या बहिणींना भेटतात. त्यांच्याकडून ओवाळून घेतात, त्यांची ख्यालीखुशाली पाहून आनंदीत होऊन त्यांना भेटवस्तू देतात. हाच दिवस आंध्र प्रदेशात मुक्कनुमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गायीची पूजा केली जाते. तेलुगू लोकांत सामिष आहार करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असतो. संक्रांतीचे पहिले तिन्ही दिवस हे लोक मांसाहार करीत नाहीत. मात्र, त्यानंतर ते मांसाहार करतात. थोडक्‍यात, पोंगल हा सण उत्तर, पूर्व, पश्‍चिम भारतात साजरा केल्या जाणाऱ्या दिवाळीसारखा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com